Monday, September 15, 2025
Homeकलादिवाळी आणि रांगोळी…

दिवाळी आणि रांगोळी…

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला, कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात.

काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी, लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली.
कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली.
कोण म्हणतं लक्ष्मणानी सीतेसाठी जी लक्ष्मण रेषा काढली, तेव्हापासून रांगोळी सुरू झाली.
काहींच्या मते गुराखी गुरं चरायला न्यायचे तेव्हा बसून धुळीमध्ये रेघा मारत, काही चितारत, मग धुलीचित्र सुरू झाली, पुढे त्यातून रांगोळी प्रगती होत गेली.
जमिन सुशोभित करण्यासाठी ज्या कलाकृती केल्या जायच्या, त्याला रांगोळी म्हटले जायचे.

रांगोळी हा शब्द संस्कृत शब्द रंगवल्ली वरून आला आहे. म्हणजे रंगाच्या पंक्ती .. रंगाची ओळ !…रंगावली, चित्रमाळी, रंगमाळी असे रांगोळी चे अनेक उल्लेख आपल्या हजारो वर्षे पुरातन ग्रंथात सापडतात.
फार पूर्वी १४ विद्या आणि ६४ कला विकसित झाल्या असा उल्लेख आढळतो. त्या ६४ कलांमध्ये …तंडुल कुसुमावली विकार – तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे….असा उल्लेख आहे.
रांगोळी ही वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या नावानी ओळखली जाते.
अल्पना हे नांव बंगालमध्ये आहे, तामिळनाडूत कोलम म्हणतात, तर छत्तिसगड मध्ये चौकपूर्णा म्हणतात.
ओडिसामध्ये फक्त जगन्नाथ देवापुढे काढणाऱ्या रांगोळ्यांना जोती म्हणतात.
महाराष्ट्रात – रांगोळी,कर्नाटकात – रंगोली गुजरातमध्ये – रंगोळी, राजस्थान मध्ये – मांडना, मध्य प्रदेशात- चौकपूरना, उत्तर प्रदेशात – सोनारख्खा, केरळात- पुवीडल, कलम. आंध्र प्रदेशात – मुग्गुळु. बिहारमध्ये- अरीपण. सौराष्ट्रात- सध्या, ओडिशा – झुंटी म्हणतात.

पांढरी रांगोळी म्हणजे शिरगोळा दगडाची दगड प्रथम भट्टीत भाजून, बारीक कुटून मग वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार होतो. पांढऱ्या रांगोळीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार केली जाते.

संगमरवर दगड कापतांना जो भुगा पडतो त्या, आणि गारगोटीच्या चूर्णापासूनही रांगोळी बनते. शंखजिऱ्याची भाजून केलेली पांढरी पूड, भाताच्या तुसाची भाजून केलेली राख, चुन्याची भुकटी ह्यापासूनही रांगोळी काढतात.

रांगोळीला आपल्या संस्कृतींत खूप महत्व आहे.धार्मिक महत्व आहे, पवित्र मानतात.रांगोळी हे मांगल्य आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. तिला पाय लागू नये व पुसतांनाही केरसुणी फिरवू नये अशी काहींची श्रध्दा आहे.

उंब-यावर काढलेली रांगोळी अशुभ शक्ती घरात येऊ देत नाही व शुभ शक्तींना घराबाहेर पडण्यास अडथळा आणते अशी समजूत आहे.

काही अंगणात तांदुळाच्या पिठाची रांगोळी घातली जाते, ती छोटे कीटक खातात. पण जेवणाच्या ताटाभोवती घातलेल्या पांढऱ्या रांगोळीमुळे, पानातील पदार्थ खायला येणारे कीटक अडविले जातात. या कीटकांच्या ओलसर नाजूक त्वचेला, दगडाच्या बारीक पावडरची रांगोळी आणि त्यात भरली जाणारी हळद व कुंकू सहन होत नाही. त्यामुळे ते ही रांगोळी ओलांडून पानात येत नाहीत.
चैत्रांगणमध्ये, कांही विधी किंवा पूजेला, बोडण च्या वेळी काढायच्या रांगोळ्या ह्या खास असतात .रांगोळीमध्ये किमान हळद आणि कुंकू हे दोन रंग तरी भरले जातातच. फक्त अशुभ प्रसंगी काढल्या जाणाऱ्या रांगोळीत मात्र रंग भरले जात नाहीत.

रांगोळी ही मुख्यता स्त्रियांनी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहोचवलेली लोककला म्हटली पाहिजे.
काहीजण रोज अंगणात रांगोळी काढण्यामागे इतरही कारणं सांगतात. पूर्वी बायका घराबाहेर पडत नसतं. घरांत भरपूर माणसं, असल्यामुळे त्या कायम स्वयंपाकघरांत अडकलेल्या असायच्या. पण सकाळी अंगणात सडामार्जन करून तुळशी पुढे रांगोळी काढून तिची पूजा करणे, ह्यामुळे तिला बाहेरची मोकळी शुध्द हवा मिळत असे. तुळस पहाटे ओझोन वायू सोडते त्यामुळे जवळपासचे वातावरण शुध्द होते. त्या वातावरणांत स्त्रियांना जास्त वेळ रहाता यावे म्हणून रांगोळी काढण्याची प्रथा सुरू झाली.

रांगोळी काढली कि सूर्यदेवाची बैठक झाली, असा समज आहे. रांगोळी हे ह्या विचारानी मांगल्याचे, सौंदर्याचे प्रतिक समजले जाते.
पूर्वी आंगण शेणानी सारवले जायचे. त्याच्या वेड्यावाकड्या रेषांमुळे , पृथ्वीच्या कंपनांमुळे जो अनिष्ट परिणाम होतो, तो रांगोळीच्या पांढऱ्या उभ्या, आडव्या कोनातल्या रेषा काढल्यावर कमी होतो, असा ही समज सांगितला जातो. म्हणूनही रांगोळी काढण्याची प्रथा चालू राहिली.
रांगोळीचे काही सोपे प्रकार…

फुलांची रांगोळी…
फुलांच्या रांगोळीला कुठलीही फुले घेऊन चालत नाही.पांढरी वास असलेली फुलं , गुलाब कितीही नाजूक , छान दिसली तरी ती लवकर कोमेजतात. त्याऐवजी देवपूजेसाठी , पूडीतली, हारातली फुलं जास्त वेळ टिकतात. ती वापरावीत.
उदा. झेंडू, शेवंती, पांढरी स्पायडर लिली, गुलछडी, अस्टर, कण्हेरी ..ही फुलं वापरावीत.


तशीच जी पानं जाड असतात, ती टिकतात.
मी भाजीतला शेपू पानांसाठी वापरते. त्याचा डार्क हिरवा रंग टिकतो, बारीक कापून छान रांगोळीच्या आकारात भरता येतात. झिप्रीची पानं पण छान दिसतात.
फुलांची रांगोळी जास्त वेळा साठी ठेवायची असल्यास टॅावेल ओला करून, किंवा ओला स्पंज, वर्तमानपेपराचा गठ्ठा थोडा ओला करून, त्यावर फुलं पान ठेऊन रांगोळी काढतात.

झेंडू ची फुलं सुकवून, त्याच्या पाकळ्या काढून, काळी रेती वापरून रांगोळी काढता येते. तसेच खोटी प्लॅस्टिकची फुलं, हार, तोरणं वापरून, सुपारी चा वापर करून, स्टेनसिल वापरून, पट्ट्या वापरून छान रांगोळी काढता येते. समुद्राची वाळू, भुसा, पांढरे बारीक, जाड मीठ, डेसिकेटेड खोबरे, मणी या गोष्टी वापरूनही रांगोळी काढता येते.
धान्य, कडधान्य वापरूनही रांगोळी काढतात. गरम मसाले, भाज्या, फळं वापरूनही रांगोळी काढतात. तांदूळ रंगवून एकेक दाणा जमिनीवर ठेऊन, खूप वेळ घालवून सुरेख रांगोळी काढली जाते.

मुलुंडचे मोहनकुमार दोडेचा गेली ६० वर्षे गणपतीची, साबुदाणा वापरून रांगोळी काढतात. घरातल्या एका मोठ्या खोलीत ही रांगोळी काढायला त्यांना ३ ते ४ महिने. २५०० च्या वर तास लागतात. २५ ते ४० किलो साबुदाण्याला ते रंग देऊन २०० शेड्स तयार करतात. आणि ही अप्रतिम रांगोळी पहायला हजारो लोक येतात.
पाण्यावरची, पाण्याखालची रांगोळी सुध्दा घरी काढता येते. बडोद्याला काही आर्टिस्ट पाण्यावर अप्रतिम रांगोळ्या काढतात.

हल्ली रांगोळी साठी जास्त वेळ द्यायला कोणाकडे वेळ नसतो. अशावेळी तांदूळाच्या पिठी प्रमाणे, मैदा आदल्या दिवशी भिजवून ब्रशनी अशा डार्क बॅकग्राउंडवर नक्षी काढली तर ती एक दिवसांत सुकते. मग त्यात आयत्यावेळी रांगोळीचे रंग घालता येतात.

लहान मुलंही रंग घालू शकतात.

मी हल्ली ओरिगामीची रांगोळी काढते. ओरिगामीचे वेगवेगळे, सोपे आकार तयार असले कि आयत्यावेळी टेबलावर, ताटा पाटा भोवती, हॅालमध्ये कुठेही पटकन रांगोळी काढता येऊ शकते.

संस्कार भारतीच्या रांगोळ्या हल्ली जास्त प्रमाणावर काढल्या जातात. त्यात काढल्या जाणाऱ्या, चैत्रांगण मध्ये काढल्या जाणाऱ्या प्रत्येक आकाराला नाव आहे, पवित्र अर्थ आहे.
आपल्याला येतील तशा रांगोळ्या काढून आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि त्यातला सणाचा आनंदही घेतला पाहिजे.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा