Wednesday, June 18, 2025
Homeयशकथादिवाळी : काही कविता

दिवाळी : काही कविता

१. 🪔दिवा 🪔

दिवाळीचा दिवा
मला धार्जिना झाला
कडेवरी पुत्र बंधुराया
अंघोळीला चला 🪔

दिवाळीचा दिवा
लावते मी व्दारी
सुखशांती समृध्दी नांदो
साऱ्यांच्या घरी 🪔

दिवाळीचा दिवा
लावते अंगणी 🪔
सुखासमाधानात नांदो
साऱ्या माझ्या भगिणी 🪔

दिवाळीचा दिवा
लावते मी देव्हारी
सुखीसमृध्द ठेव देवा
माझे शेजारी पाजारी 🪔

दिवाळीच्या दिव्याभोवती
काढते मी रांगोळी
कधी न सुटो देवा
तुझी करंगळी 🪔

भावूबिजे दिवशी
औक्षण करीते मी भावा
जतन कर देवा
माहेरचा दिवा 🪔

दिवाळीच्या दिव्याची
काय सांगू श्रीमंती
पिवळ्याधमक सोन्याने
आसमंत प्रकाशती 🪔

आशा दळवी

– रचना : आशा दळवी. दुधेबावी, फलटण

२. “दीप”

ज्ञानदीप लावू या जगात
अज्ञानाचे तिमिर जावोत।।ध्रु।।

प्रेम ज्ञान देत दीपज्योत
त्याग एकाग्रता शिकवीत
सद्गुण अविचल रहात. ।।1।।

प्रकाश अंधार ना पहात
सूर्याला रात्र ना दिसत
चैतन्य देई दीप सतत ।।2।।

उंबर्‍यावर दीप ठेवूया तेवत
उजेड पडेल बाहेर आंत
मिळे वैराग्य शुद्धता सुखद।।3।।

लावतात दीप सर्व कार्यांत
तमोगुण विक्षेप जाळीत
प्रज्वलन हवा करीत शुद्ध ।।4।।

अरुण गांगल

– रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड

३. उनी दिवाई दिवाई…

दिवाईना दिवा लावा दिवाईना दिवा लावा
पडी उजाये उजाये अंधाराले लई जावा
दु:ख दैन्य नि दरिद्र याना काढी टाका काटा
वाटा उजाये उजाये अहो फक्त प्रेम वाटा ….

गरिबसले कपडा पाटी पेन्सिल नि वह्या
लाडू पेढा नि चिवडा वाटा जवारीन्या लाह्या
जुना चालतीन कपडा नवा तुमनी मरजी
बठ्ठा कटाई गयात रोज करी हांजी हांजी…

फरायना बरोबर रोज लागतीस चिजा
चादर गोधडी लुगडं त्यासले काही भी देत जा
स्वेटर चाली जुनंपानं जुन्या रजया भी द्या ना
दिना किराणा भरीन तरी त्यासले चाली ना ….

नका उधयू पैसा गोरगरीबले वाटा
सर्वा मी सनी काढूत त्यासना गरिबीना काटा
बरमाठं बांधा घर त्यासले करा ना अर्पन
कोठे लई जानं से हो बठ्ठ आठेज ऱ्हाईनं ….

करूत दिवाई साजरी गोरगरीबनी संगे
गोडधोड खातीन त्या रंगू त्यासनाचं रंगे
पोटभरी खावाले हो भेटी एकदोन रोज
मंग सेतस त्यासना रोज रोजनाच भोग …

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार, नाशिक

४. तेजोमय दिवाळी

दिवाळीच्या लक्ष ज्योतींसम
निघो आयुष्य आपुले उजळून
सुख समृद्धी शांती समाधानासह
उत्तम आरोग्याचे फुलो नंदनवन

आपल्या सद्विचारांचं उटणं
आणि प्रेम सेवा भक्तीचा साबण
करील जीवन सुवासिक
फुलेल जीवनी आनंदाचं उपवन

तेजोमय चैतन्याची दिवाळी
फुलवील फुलं प्रकाशाची
मंगलमय होवो पवित्र होवो
यशस्वी होवो पहाट नव्या स्वप्नांची

लाडू करंजी,अनारशाचा गोडवा
शेव चकलीचा रुचकरपणा
उत्साहाच्या फटाक्यांची आतषबाजी
लाभो सदैव आपणा, हीच देवाला प्रार्थना

राॅकेट ध्येयाचं, ज्ञान विज्ञानाच्या ज्योतींचं
नोकरी धंद्यातल्या, शिक्षणाच्या प्रगतीचं
घेवो उंच गगन भरारी
लाभो कृपा आपणा नित्य ईश्वरी

दिवाळीच्या रांगोळीचे रंग
लखलखत्या पणत्यांची रांग
अन दारी झुलणारा आकाश कंदील
भरत राहोत जीवनात नवा रंग

न येवोत जीवनी तुमच्या
कुठलेही दुःख संकट
सुंदर वैभवशाली आनंदमय होवो
तुमच्यासह कुटुंबाचा जीवनपट

आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर. मुंबई

५. नरक चतुर्दशी
स्वरचित दशाक्षरी काव्यरचना

दुष्ट राक्षस नरकासुर
असुरांचा एक अवतार
जन्म झाला त्याचा जेव्हा केला
महाविष्णूने पृथ्वी उद्धार……१

नरकासुर नामे राक्षस
केले प्रसन्न ब्रम्हदेवाला
आजीवन मागितला वर
कोणीही मारू ना शके त्याला……२

प्राग्यज्योतिषपूरचा राजा
करू लागला सदैव पाप
कृष्ण भगवान हस्ते वध
दिला वसिष्ठ ऋषींनी शाप…..३

प्राग्यज्योतिषपुरी निघाले
कृष्ण गरूड रथावर स्वार
नरकासूर दोन तुकडे
करता संपले अत्याचार…..४

ब्रम्हांडातील चंद्रनाडीचे
सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर
रज-तत्वात्मक हालचाली
नादयुक्त कंपन लहर……….५

वाईट शक्तींचे निर्दालन
अरूणोदयी अभ्यंगस्नान
लहरीतील ध्वनीकंपन
तेजतत्व दीपकाचा मान……६

वर्षा मुसळे

– रचना : सौ.वर्षा शरद मुसळे. नाशिक

– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?