१. दीपावली
दीपावलीचा सण पहा सजला
नात्यांचा गोफ सुंदरसा विणला
दारातली रांगोळी घडवी किमया
फराळाची गोडी लागे रेंगाळाया
कंदिलाचा प्रकाश आणितो मांगल्य
लक्ष्मीच्या आगमनाने मिळो साफल्य
भावाबहिणींचे चाले प्रेमभरे हितगुज
पतिप्रेमाचे वाजे पाडव्यास अलगुज
रेशमी वस्त्रे लेवून सजल्या सुवासिनी
हास्यलकेरी कुठुनशा झंकारल्या कानी
दिवाळीच्या सणाने उजळे प्रकाश
परस्परांच्या साथीने परिमळे अवकाश
दूर होई निराशा प्रकाशल्या दिशा दिशा
गोड आठवणी फुलल्या देऊन नव्या आशा

– रचना : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
२. एक ओवाळणी अशीही…
आज दिवाळी पाडवा
साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस..
तुला ओवाळण्याचा दिवस..
तुझे आशीर्वाद घेण्याचा दिवस..
तुझ्याकडून मौल्यवान ओवाळणी लाटण्याचा दिवस..
मोबदल्यात तुला काय मिळणार ?
तर माझ्याकडून एक प्रार्थना
तुझ्या सुखी दीर्घायुष्यासाठीची..
तुझ्या भरभराटीसाठीची..
आपल्या अखंड सुखी संसारासाठीची..
आज मी तुझं सुख मागणार..,
तुझं दीर्घायुष्य मागणार..,
त्यात माझाच स्वार्थ असतो का रे ?
तुझ्याच सुखात तर शोधत नसते का मी,
माझं सगळं सुख..?
कसे एकरूप होत असतो ना आपण..,
आपल्याही नकळत..?
हे झालं माझ्या सुखाबद्दल..
पण तुझ्या सुखाचं काय ?
तुलाही माझ्याकडून काही तरी ओवाळणी
हवीच असेल ना रे..
मग कधी मागणार तू ?
मागून पाहा ना आज
एखादी तरी ओवाळणी, मला ही..
प्रयत्न तरी करू देत ना
तुला हवीशी ओवाळणी घालण्याचा..
थोडीशी परंपरा मोडीत काढून
ओवाळना आज मला..
घालीन मी तुला ओवाळणी,
तुला हवी-हवीशी..!
देईन मग मी ही तुला आशीर्वाद..
तुझ्या मनोकामनापूर्तीसाठीचा..!!
होऊ दे ना एखादा पाडवा..,
असाही..!!

– रचना : डॅा. मीना बर्दापूरकर. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800