१. दिपावली
दिवाळीचा हा खरा सण भारी l
सुख – समृद्धी आली घरी ll
संस्कृतीची ही आनंद वारी l
जीवन उजळूनि देते खरी ll
दिव्या पणत्यांचा ज्ञानप्रकाश l
व्हावे जीवन तेजांकित आत्मस्वरूपास ll
दूर लोटोनी मनअंधकार l
माणुसकीचा उजळावा सुगंध फार ll
आनंदाचा वाढवा गोडवा,
यशकीर्तीचा कंदील लावा l
अपयशाच्या त्याच वातीला
मेहनतीचा डाग लावा ll
इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हावी
जपणुकीचं उटणं लावा l
उत्कर्षाच्या समाधानाचा
हा अमृत रस प्यावा ll
सोडा सोडा तो मनातील द्वेष,
तिरस्कार, गर्व, अहंकार l
आपुलकीचा, प्रेमाचा अंतरंगी
बहरावा बोधी वृक्ष फार ll
सोडूनी आळस चढवूनी
कळस सोनेरी ती उभार l
मनामनांची दीपावली ही
शरीर – मन अभ्यंग साकार ll
सद् विवेकाची काढा रांगोळी l
संकल्प तृप्तीची होईल गोड पुरणपोळी l
हाच दिवाळीचा सण खरा खरा l
आत्मस्वरूपाच्या संस्कृतीची
हीच आमुची परंपरा l
होईल पहाट त्या पाडव्याच्या
तेजोकिरणांने l
आरुढ होऊनी निघालो त्या
प्रकाशाच्या दिशेने l
शुभेच्छा संदेश देतो
आपणास गुरु कृपेने l
अस्मानीचा अजिंक्यतारा
लखलखतो आहे आपल्या प्रेमाने ll
— रचना : शाहीर अजिंक्य लिंगायत. छ. संभाजीनगर
२. लक्ष्मीपुजन
आली आली आज दिवाळी
लक्ष लक्ष दिप उजळती
करु चला लक्ष्मी पुजन
कुबेर लक्ष्मी प्रसन्न होती ॥१॥
शंख, चक्र, गदा, पदम
यांची करु पुजा
लक्ष्मी प्रसन्न होई
कुबेरासंगे करिता पुजा ॥२॥
वहीपुजन ही करु आज
लक्ष्मी नांदे सरस्वती संगे
विद्या, वाचा यांची पुजा करता
ज्ञान आणि लक्ष्मी नांदे संगे ॥३॥
घंटा, समई, शंख, चक्र
यासमवे आधी पुजावा श्रीगणेश
लक्ष्मी कुबेरासंगे पुजावी
प्रत्येक कार्याचा आरंभ श्रीगणेश ॥४॥
लक्ष्मी पुजन करता प्रसन्न होई लक्ष्मी
लक्ष्मी पुजन करावे घरी
फटाके फोडुन द्यावा फराळ
आप्तांना बोलवावे हो घरी ॥५॥
वर्ष मग जाईल हो सुखाचे
लक्ष्मी पुजनाने येईल समृध्दी
ज्ञान, धन येईल अपार
होईल मग व्यापारात वृध्दी ॥६॥
अशी ही दिवाळी समृध्द होवो
लक्ष लक्ष दिप लावता
लक्ष्मी ही प्रसन्न होवो
आत्मिय दिवाळी समृध्द होवो ॥७॥
— रचना : पंकज काटकर.
काटी. ता.तुळजापुर, जिल्हा धाराशिव.
३. दिवाळी
मस्त मजेची नवी-नवी
अशी दिवाळी हवी हवी
चमचमीत अन् शुद्ध चवीची
अशी दिवाळी हवी हवी
चकचकीत त्या घरोघरी
उजळित दीपांच्या ओळी
शुद्ध हवेची भोवताली
अशी दिवाळी हवी हवी
लखलखीत त्या शांत प्रकाशी
उजळी आनंदाच्या राशी
गंध फुलांनी बहरून जावी
अशी दिवाळी हवी हवी
सुगंधात बेधुंद होऊनी
शब्द सुरांनी मोहवणारी
नाविन्याच्या हव्यासाची
अशी दिवाळी हवी हवी
मनात तुमच्या मनात माझ्या
स्नेहबंध हे जागविणारी
हृदयामध्ये सदा वसावी
अशी दिवाळी हवी हवी
— रचना : सुनील देशपांडे.
४. रोषणाई कशासाठी ?
अन्तःकरणात अंधकार
दाटला आहे
मग, ही रोषणाई
कशासाठी ?
हृदयद्रावक गतस्मृती
तशाच आहेत
सुगंधाचे लेप कशासाठी ?
कटू अनुभवांचे घोट अजूनही
रेंगाळताहेत ओठांवर
मग, मिष्टान्नाचे भोग कशासाठी ?
आभाळच कोसळले असताना धरित्रीने
करावा शृंगार कशासाठी ?
तरीही मी जगतेच आहे
मला जगायलाच हवं आहे
मुठीत झाकलेल्या भविष्यासाठी
कदाचित, इतिहासाच्या क्षितिजावर उमटणार्या,
उद्याच्या, इवल्या इवल्या पावलांसाठी…..!
— रचना : सुरेखा पाटील. मुंबई
५. पणती
सण प्रकाशाचा
तम दूर सारण्याचा
मनातला
परिसरातला…
पणती आशेची
खचलेल्या मनास
देईल उभारी
शेतकऱ्यास…
पणती गोठ्यात
आयुष्य मागू
गाई वासरांसाठी
तनामनात…
पणती धन्वंतरीस
आरोग्याचे रक्षण
अकाली मृत्यू हरण
मागू वरदान…
पणती सात्विकतेची
भस्म नरकासुराचा
सुगंधी उटण्याची
अभ्यंगस्नानाची…
पणती सुख समृद्धीची
लक्ष्मी कुबेराचे पूजन
पाडवा सौख्याचा
नव संकल्पनेचा…
पणती भाऊबीजेस
बहिण ओवाळिते
उदंड आयुष्य भाऊरायास…
— रचना : काव्य प्रभा. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
