फराळाच्या चावडीवर
आला नटून दिवाळसण
एक एक करत करत
भरलाय डब्यानी खण न खण……
आली आली दिवाळी दारी
आनंदती लहान सहान
आतषबाजी फटाक्यात
दिवाळी होतेय महान……..
नवनवं वसनास
परिधानतेचा हुरूप
कोऱ्या कोऱ्या कपड्याला
कोण वासाचे येई स्वरूप…….
फराळाच्या पंगतीला
पक्वांन्नांचे शाही थाट
रांगोळी उदबत्ती घमघमाट
आणि बसायला चौरंगी पाट…..
नक्षीदार वेलबुट्टी
कमानीला तोरण दारी
रंगबेरंगी दिव्यांतून
दिपावलीची अशी वारी…..
काजळलेल्या पहाटेला
नव्हती कोंबड्यांची बांग
न्हाणीघर सजलेली म्हणे
पहिला दुसरा क्रमांक सांग…..
सुगंधीत उटण्याला
केशरकाडीसह दरवळ
देवाजीही पूजेतून मग्न
लहान मुलांची वळवळ……
सुवासिक खमंग भाजण्या
त्यात बोलकी झाली चकली
कुडुम कुडुम वाजताना
दारावर कृत्रिम दिवा पतंग नकली……
गृहलक्ष्मी आनंदलेली
घरातून लक्ष्मि ने केला वास
हरवलेल्या मंतरलेल्या जत्रेत
दिवाळी आगमनात खास……
लाडू लाडू किती प्रकारचे
विचारायचे नाही हा बरं !
गोड गोड पदार्थ फराळात
यातच गृहिणींचे आदरातिथ्य खरं……

– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे. राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800