दिवाळी सण विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. त्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे फटाके फोडणे होय. तसेच एकमेकांस भेटवस्तू देणे होय. पण हा सण साजरा करताना, आपल्याकडून प्रदूषण रोखण्यासाठी काय केले पाहिजे, याचा उहापोह करणारा हा लेख, निश्चितच आपल्याला प्रेरणादायी वाटेल.
– संपादक
दीपावली हा सण सर्व हिंदू बांधव व भगिनी शेकडो वर्षांपासून अत्यंत भक्तिभावाने साजरा करतात. ही खूप छान आणि अभिनंदनीय बाब आहे. विसाव्या शतकापर्यंत हा सण साजरा करण्यासाठी कोणतीच बंधने नव्हती. पण, एकविसाव्या शतकाच्या दूस-या दशकापासून मात्र या व इतर सणांवर बंधने लागू होण्यास सुरुवात झाली. याचे प्रमुख कारण म्हणजे हवामानातील व पर्यावरणातील होणारा बदल कारणीभूत आहे. माणसाला आपले जीवन जगत असताना या बदलांमुळे विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते आहे. लहान मुलांपासून ते वृध्द माणसांपर्यंत सर्वच जण या आजारांनी त्रस्त आहेत. पण,मग यावर उपाय काय! तर यावर तज्ज्ञ डॉक्टर, वैद्य उपचार करतातच. त्याने ते आजार बरे होतातच. पण,
पून्हा पून्हा जर हे आजार होऊ लागले तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागते.
सध्या जगात सर्व प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण अत्याधिक वाढले आहे. त्यातल्या त्यात भारतात दिल्ली, मुंबई व पुणे या शहरातील मोठ्या प्रमुख शहरातील प्रदूषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याचे सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. त्यासाठी, राज्यस्तरावर व देशस्तरावर भरभक्कम अशी शासकीय, निमशासकीय व खाजगी यंत्रणा उभी करावी लागते. तसेच, ते त्यांच्याकडूनच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असते. ही अंमलबजावणी तशा पद्धतीने होते का! तर त्याचे उत्तर नाही असे आहे. तसेच, दिवसेंदिवस या घातक प्रदूषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशा शासकीय व खाजगी यंत्रणांकडून काहींच कार्यवाही होत नसल्यामुळेच प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे. खूप मोठ्याप्रमाणात जंगलातील वृक्षांची तोड होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन खूप मोठ्या प्रमाणात बदलले गेले आहे. तसेच, दोनचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक, मोठमोठे कंटेनर मधून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघत असल्याने तोच धूर वातावरणात पसरत आहे. जागतिक सर्वेक्षणानुसार अशा वाहनांतून कार्बनडायऑक्साइडचे उत्सर्जन काही ठिकाणी पन्नास ते साठ टक्के तर खूप ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त कार्बनवायूचे उत्सर्जन होत आहे. त्यामुळेच, भारतात व अनेक देशांमध्ये लोकांना श्वसनाचे, सर्दी पडसे, खोकला, व इतर व्हायरल इन्फेक्शनचे रोग होत आहेत. त्यामुळे, बहुतांशी माणसे निरनिराळ्या विकाराने आजारी पडत आहेत. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. खूप मोठ्या प्रमाणात भारतासह जगातील सर्व देशांमध्ये होत असलेली जंगलकटाई.
२. भारत देशासह जगात चारचाकी, दोन चाकी तसेच, ट्रक, रिक्षा, ट्रॅक्टर यांसारख्या प्रदूषित वाहनांचे फार मोठ्या प्रमाणात वातावरणात वाढलेले प्रदूषण त्यामुळे, पृथ्वीचे पर्यावरण संतुलन व सर्व ऋतूंचे कालावधी संक्रमण यात खूप मोठ्या प्रमाणात ढबदल झालेला आहे.
३. देशांतर्गत साजरे होणारे सर्व धर्मांतील धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव व समारंभ नवीन वर्षाचे स्वागत इत्यादी कारणांमुळे खूप मोठ्या आवाजांचे फटाके, शोभेचे दारु कामाचे फटाके खूप मोठ्या प्रमाणात उडवले जातात, तेही रात्री खूप उशिरापर्यंत उडवले जातात. वय वर्ष पाचच्या आतील काही लहान मुलेमुली असतात. काही वृद्ध आजारी माणसें असतात. रात्री उशिराने घडविल्या जाणा-या जास्त आवाजाच्या फटाक्यांच्या आवाजाचा त्यांना त्रास होतो. त्याच्या धूरामुळे बालकांना व वृध्दांना खूप त्रास सहन करावा लागतो. पण, गांभीर्याने याचा विचार कोणी करीत नाही. तसेच, त्यासंबंधित यंत्रणाही त्याकडे लक्ष देत नाही. विसाव्या शतकात दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज नियंत्रणात होता. तसेच, त्यावेळेस, कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणांचा विशेष असा त्रास नव्हता. त्यामुळे, त्या काळातील माणसांची, बालकांची दिवाळी आनंदाने व आत्मियतेने साजरी होत असे.
उडविल्या जाणा-या फटाक्यांचा कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक जण तेव्हा घेत असे. ही जाणीव प्रत्येकजण ठेवत असे. पण, सध्याच्या एकविसाव्या शतकात मात्र, परिस्थिती अगदी याच्या विरुद्ध आहे. सध्याच्या काळातील माणसे दूस-यांचा विचार अजिबात करीत नाहीत. सध्याच्या काळात चीनी फटाके व लाईटिंगच्या माळा खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक दूकानदार, स्टेशनरी दूकानदार विकत आहेत. चिनी मालावर विक्रीसाठी बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात तो विकला जातो व भारतीय लोक व विशेषतः महाराष्ट्रातील लोकही चिनी माल असतानाही कोणताही विचार न करता तो माल खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. चीन हा देश परदेशावर आक्रमण करण्यासाठी व घातक कारवायांसाठी कूप्रसिध्द असताना भारतीय लोक व महाराष्ट्रातील लोक अशा घातक देशाच्या मालाची खरेदी करतात. हे भारतातील व महाराष्ट्रातील लोकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे.
केंद्र सरकारने चीनी माल आयात करण्यास व विक्री करण्यास बंदी घातली असतानाही चोरीच्या मार्गाने गुपचूपपणे तो माल भारतात पाठविला जातो. व काही व्यापारी तो अवैधपणे स्वस्तात खरेदी करतात. तसेच, दूकानदार तो माल जास्त भावाने लोकांना विकतात. एकविसाव्या शतकातील भारतीय लोक व विशेषतः महाराष्ट्रातील लोक इतिहासाच्या घडलेल्या अनुभवाची आठवण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपले आचरण ठेवत नाहीत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन केल्यावर स्वराज्य वाढवताना त्यांच्याच अत्यंत जवळच्या नातेवाईकाने त्यांच्यावर घातक कारवाया केल्या. तसेच, छत्रपती श्री संभाजी महाराजांनाही स्वराज्य वाढविताना त्यांच्याच अत्यंत जवळच्या नातेवाईकाने थोड्याशा धनलाभासाठी व अधिकारासाठी संभाजी महाराजांशी फितूरी केली. त्यामुळेच त्यांचा घात झाला. हा इतिहास साक्षी असताना भारतीय लोक व विशेषतः महाराष्ट्रातील लोक चीनी मालाच्या सर्व वस्तूंची खरेदी करतात. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारों, लाखों स्वातंत्र्यवीरांना व क्रांतिकारकांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले होते. याचा गांभीर्याने व आत्मपरीक्षण करुन अखंड भारतातील सर्व नागरिकांनी विचार करुन मिळालेले स्वातंत्र्य अखंडपणे अबाधित ठेवले पाहिजे.
४. ध्वनीप्रदूषण : रस्त्यावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने चालवताना वाहनधारक कर्कश आवाजाचे हाॅर्न बसवून खूप वेळा वाजवतात. त्यामुळे, खूप मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. त्यामुळे, इतर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे, कानाने ऐकण्याच्या क्षमतेवरही खूप दूष्परिणाम होत आहेत.
५. प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकच्या वस्तू यांमुळे होणारे दूष्परिणाम : भारतात सर्वत्र प्लास्टिक वस्तूंचा व प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आलेला आहे. त्याचे दूष्परिणाम पर्यावरणावर, व सर्व जनतेच्या आरोग्यावर होत आहेत. शासनाने प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली असतानाही सर्रासपणे दूकानदारांकडून व ग्राहकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. या प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरुन बरेच लोक रस्त्यावर कचराकुंडीच्या ठिकाणी दूचाकीवर येऊन हाताने प्लास्टिकची पिशवी फेकून निघून जातात. त्या पिशवीत काही शिळे अन्नपदार्थही असतात. ते पदार्थ रस्त्यावरील कुत्रे, गाई खातात. पण ते खातानागाईच्या पोटात प्लास्टिकची पिशवीही जाते. काही लोकांच्या अशा निष्काळजीपणाच्या वागणुकीमुळे नाहक अशा गाईंना त्यांच्या प्राणास मुकावे लागते. याचा सर्वांनी अत्यंत गांभीर्याने विचार करुन आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनानेही अशा दूष्कृत्ये करणा-या लोकांवर अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे. बेशिस्तपणे वागणा-या अशा लोकांची संख्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, नद्यांमध्येही काही महानगरपालिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने अशा महानगरपालिकांस मोठा दंड ठोठावला आहे. काही निवासी लोकांच्या काही सोसायट्यांचे दूषित मैलापाणीही पाइपलाइनद्वारे सोडून दिले जाते. तसेच, कांही केमिकल कंपन्यांचे दूषित रासायनिक पाणीही नद्यांमध्ये सर्रास सोडून दिले जाते. या सर्व प्रदूषणामुळे शहरी भागातील व ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. तसेच, त्यामुळे नदीतील अनेक जलचर प्राणीही प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडतात. हजारों मासे मरतात. मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांची उपासमार होते. त्यामुळे, त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय बंद होतो. नद्यांमध्ये होत असलेल्या या प्रदूषणामुळे निसर्गचक्रावर व पर्यावरण संतुलनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे, पाऊस फक्त पावसाळ्यातच न पडता वर्षभर पडत आहे. तोही विषम प्रमाणात पडत आहे. देशाच्या काही भागांमध्ये जिथे पाऊस पडला आहे तिथे तिथेच पून्हा पून्हा पडत राहतो. दूस-या भागांमध्ये मात्र थोडाही पाऊस पडत नाही. म्हणजे बहुतांश राज्यांच्या काही भागात ओला दूष्काळ व काही भागात कोरडा दूष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते. याला कारण सर्व प्रकारचं प्रदूषणंच आहे.
पण, याबाबतीत विचार करायला आणि नीट वागायला बहुतांशी लोकांना वेळ नाही. अशा लोकांना फक्त, अमाप, अगणित पैसा हवा आहे. त्यामुळे, जगात घडणाऱ्या घटनांशी त्यांना काही देणंघेणं नाही असंच सध्याचं चित्रं आहे. राज्य शासनस्तरावर याबाबत काही ठोस उपाययोजना करुन त्याबाबत योग्य ती अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच, सर्व प्रकारच्या प्रदूषणाशी संबंधित गून्हे करणा-यांवर अत्यंत कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तरच, पृथ्वीचे पर्यावरण संतुलन स्थिर राहण्यासाठी व निसर्गचक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी मदत होईल. तरच, विश्वाचे अस्तित्व अबाधित राहील.
— लेखन. : मधुकर निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800