दिवाळी आणि यक्षपूजा !
दिवाळी हा सण कृषी संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण होय. हिरवीगार बहरलेली राने आणि एकूणच निसर्गातील ऐश्वर्या संपन्न जीवन, अश्विन मासातील अल्हादायक वातावरण, कोजागिरीचा चंद्र, शरदाचे चांदणे या सर्वांच्या उत्तम वातावरणामध्ये आरोग्यकारी व क्रियाकारी असा दीपावली हा सण साजरा केला जातो.
दीपावली हा सण मुळचा कृषिवल संस्कृतीचा “यक्षरात्री” उत्सव आहे.vभारतीय प्राचिन वाड़:मयात दीवाळीचा उल्लेख यक्षरात्री असा प्रथमतः आला आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रावरून असे लक्षात येते की इस १ ते सुमारे इस ४०० पर्यंत दीपावलीला यक्षरात्री असे म्हटले जाते. दीवाळीचा उल्लेख माहिमानी, दीपमाला उत्सव पुढे आला आहे. लीळाचरित्रात व ज्ञानेश्र्वरीमध्ये दिवाळी हा शब्द आलेला आहे व तोच शब्द पुढे रुढ झालेला असावा. यावरून दीपावली संदर्भात यक्षरात्री हा शब्द प्राचीन असून दिवाळी हा सण “यक्षरात्री” उत्सव आहे. हा मुळचा कृषि संस्कृतीतील महत्वाचा सण.
यक्ष या शब्दाचा अर्थ प्रकाशमान असाही आहे. महाभारतात यक्ष हे ज्वाला अथवा सुर्यासारखे तेजस्वी असतात असे म्हटले आहे. या श्रद्धेतुनच दिपोत्सव यक्षांसाठी सुरु झाला व त्यांनाच यक्षरात्री असे म्हटले जावू लागले असे जी. बी कानुगा म्हणतात, (Immortal love of Rama, तळटीप. पृष्ठ-२७-२८) “धनसंपत्ती देणारे, रक्षक असलेल्या यक्षांना दिपोत्सव करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा उत्सव आहे.” ‘दीपावली हा सण मुळचा कृषिवल, पशुपालक संस्कृतीचा “यक्षरात्री” उत्सव आहे’ असे मत मांडत संशोधक संजय सोनवणी पुढे विस्तृत पण असे लिहितात, “कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. बुद्धपुर्व काळापासून भारतात देशभर “यक्ष” संस्कृतीचा मोठा प्रभाव होता हे आपल्याला सर्व धर्मीय म्हणजे जैन, बौद्ध, हिंदू लेणी-मंदिरांतील यक्ष प्रतिमांवरुन व यक्षाच्या नांवाने असलेली गांवे, जमीनी, तलाव यावरून लक्षात येते.”
दीपावलीचे मुळचे नांवही यक्षरात्रीच होते हे हेमचंद्राने व वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे.
शेती संबंधीत रक्षक देवदेवतांचे दिवाळीत पूजन महत्वाचे आहे. याच रक्षकदेवतांना यक्ष, संरक्षक देव, स्थानदेवता म्हणून आपल्या परंपरेत स्थान दिलेले आहेत. शिवारातील बांधावर असलेला म्हसोबा, पाणस्थळ विहिरीजवळ असलेल्या साती आसरा, गाव पांढरीतील गाव मारुती इत्यादी देवतांचे पूजन दिवाळीत होते.
उदा. गावागावातील विशेषत: गाव वेशीवरील देव मारुतीची पूजा होते. मारुतीला शेंदूर वाहण्याची प्रथा आहे. मारुतीला तेल लावतात व पूजा करून नारळ फोडतात.
पंचमहाभूतांप्रती व प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता हा आपल्या संस्कृतीतील महत्वाचा भाग. यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेलेला आहे. एकूणच त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून दिवाळीत विशेष यक्ष पूजा!यक्ष पुजा ही पुरातन आहे, एवढी की यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षिण भारतातत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही हिंदूसंस्कृतीत विशेषतः शैव परंपरा करत असतात. आपल्या पूजेतील यक्ष यावर प्रसिद्ध संशोधक संजय सोनवणी यांनी प्रकाश टाकलेला आहे. ते म्हणतात, ‘वीर मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवता या यक्षश्रेणीतीलच आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे शक्यतो शिवेबाहेर असते. कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा. त्यांना शिवाचेच अवतार अथवा अंश मानले जाते.’
आपल्या परंपरेत गाव मारुती मंदिरे ही गाव वेशीवर असतात. लग्ना अगोदर नवरदेव घोड्यावर बसून या संरक्षण देवतेचे दर्शन घेऊन शुभ कार्याला आशीर्वाद, संरक्षण मागत असतात.तर लग्नासाठी आलेले बाहेरील वऱ्हाड ही गाव मारुतीला मानपान देऊन, यथासांग पूजा करून शुभकार्याला संरक्षण मागत असतात.
लग्नाआधी मारुती दर्शन या व अशा परंपरेतून यक्ष ही संरक्षक देवता आहे व तिचा निवास जलस्थानी आहे, वृक्षवेली शेत पिके यात आहे असे आपल्या अनेक परंपरेत पुन्हा पुन्हा स्मरले जाते. महाकवी कालिदासाने मेघदुतात यक्षालाच आपले दूत बनवले. यक्षपुजा आजही आपण करीत असतो पण त्यातील अनेक देवता वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ मुळस्वरुपातील यक्षच आहेत याचे भान मात्र हरपलेले आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.
दिवाळी ही यक्षरात्री. दिवाळी अमावस्येला यक्षराज कुबेर पूजन असते. भगवान शिवा बरोबर कुबेर आणि त्याची पत्नी खरेदी यांची पूजा करण्याची परंपरा भारत वर्षात अनेक भागात आहे. कुबेर हा संपत्तीचा धन समृद्धीचा देव आहे. तो भगवान शंकराचा सेवक खजिनदार आहे. म्हणून सुख-समृद्धीसाठी संपत्ती भाग्य मिळण्यासाठी दिवाळीमध्ये कुबेराची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे.
यक्षरात्री उत्सव हा सांप्रत काळातील दीपावली उत्सव आहे आहे.दीपावली संरक्षण देवतांच्या यक्षांच्या स्वागतासाठीचा, वैभवप्राप्तीच्या प्रार्थनांचा दीपोत्सव आहे. तोच खरा आपल्या कृषी संस्कृतीचा आणि परंपरांचा सांस्कृतीक मुलाधार आहे.
— लेखन : राजेंद्र गुरव. औंध
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800