अभ्यंग व नरकचतुर्दशी
दीपावली मध्ये अनेक धार्मिक बाबी समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य, आहार, कृषीप्रधान विधी इत्यादी विविध परंपराही दिवाळीशी निगडित आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभंगस्नान. दिवाळीत असलेली थंडी, शरीराला हवी असलेली सिग्धता इत्यादी बाबी पाहता अभ्यंग स्नान ही परंपरा महत्त्वाची आहे.
अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करणे. दिवाळी सणात पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंगी केले जाते.
अभ्यंगस्नान प्रथमता तेलाची शरीरभर मालिश, त्यानंतर गरम पाण्याने स्नान व दरम्यान उटणे लावणे अशी सोपस्कार असतात. यामागे त्वचेचे आरोग्य सुधारणे, शरीराची कांती तजेलदार व्हावी, शरीरातील स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत या सर्व उद्देशाने अभ्यंगस्नान केले जाते. उत्तम आरोग्यादायी शरीराचे पोषण होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे दिवाळीच्या दिवसांत तर करावेच पण ते दिवाळीपासून सुरुवात करून वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात.
अभ्यंगामध्ये विविध तेलांचा वापर होतो. खोबरेल तेल आता सामान्यपणे वापरतात. नारळाचे तेल बरोबर, तिळाचे तेल, बदाम तेल, मोहरीचे तेल इत्यादी तेल अभ्यंगसाठी वापरतात. या प्रत्येक तेलांचे विशिष्ट असे गुणधर्म आहेत. उदा.तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि हाडांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते.
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडत चाललेली असते. तेलाच्या मालिश मुळे शरीराला स्निग्धता प्राप्त होते. तर उत्तम आरोग्यदायी उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडी पडत असलेली त्वचा मऊ राहते.
अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते.
महाराष्ट्रात तिळाचे तेल,
केरळात खोबरेल तेल तर
उत्तर भारतात मोहरीचे तेल
अंगाला लावून अभ्यंग केले जाते. यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते. त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते. त्यानंतर गरम पाणी स्नान केले जाते. थंडीमध्ये उष्णोदक शरीराला पोषक व शक्ती देणारे आहे. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे थंडीची भावना कमी होते आणि शरीराला आरामही मिळतो.
उष्णोदकाने अंघोळ केल्यामुळे थकवा दूर होतो आणि शरीर ताजेतवाने होते. एकूणच शरीराचा थकवा दूर होणे, म्लानता दूर होणे व शरीराचा आरोग्यदायी विचार या दृष्टीने दिवाळीतील अभ्यंगस्नानाला आपल्या परंपरेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
नरक चतुर्दशी :
धार्मिक ग्रंथ व इतर कथेप्रमाणे भागवतानुसार नरकासुर हा भूदेवीचा पुत्र आहे. इतिहास संशोधक श्री संजय सोनवणी म्हणतात, ‘आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरूपावर सत्ता गाजवणाऱ्या अनेक घराण्यांनी आपला पूर्वज नरकासुरास मानले आहे. गुवाहटीच्या दक्षिणेकडील एका पर्वतास त्याचे नाव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा निगडित आहेत. शैव संस्कृती प्रबळ असताना आसाममध्ये नरकासूर होऊन गेला असावा. त्या कीर्तीवंत, नीतिमान असूर श्रेष्ठाची आठवण लोकांनी स्वयंस्फूर्तीने ठेवली असावी.
दुसरे असे की व्रतराज या धार्मिक ग्रंथामध्ये नरक चतुर्दशी या कामव्रताची माहिती येते. हा एक अत्यंत उत्तरकालीन व्रत असणारा ग्रंथ असला तरी यात नरकचतुर्दशीला नरकासुराच्या नावे दिवे लावतात. या व्रताची सांगता शैव पुरोहितांना वस्त्रालंकार व भोजन देऊन करावी असे म्हटले आहे. अर्थात परंपरेत नरकासुराला धार्मिक महत्त्व होते.
— लेखन : राजेंद्र गुरव. औंध
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800