Saturday, March 15, 2025
Homeलेखदिव्यत्वाची जेथे प्रचिती

दिव्यत्वाची जेथे प्रचिती

प्रत्येक कार्य श्रद्धापूर्वक आणि तन्मयतेने करणारे महान नेते महात्मा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन
– संपादक
आपल्या या मराठी मातीनं असंख्य समाजसुधारकांना जन्म दिला. त्यापैकी
“जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे !
महंत लीला स्वभावे
अंगी बाणावे” या समर्थ वचनांची सार्थकता सिद्ध करणारे महात्मा ज्योतीराव फुले
म्हणजे त्या काळातील समाजासाठी,
“जणू सुखाचे आगर, नीती तत्वांचे माहेर”

विद्येविना मती गेली
मतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
सारे अनर्थ एका अविद्येने केले…
असे सांगणाऱ्या
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील ‘कटगुण’ या गावी 11 एप्रिल 1827′ रोजी ज्या घरात विद्येचे वारे सुद्धा लागलेलं नव्हतं अशा कुटुंबात झाला.

गोविंदराव फुले यांनी बालवयात मायेचे छत्र हरवलेल्या या बालकाला प्रेमानं वाढवलं.
परंतु त्यांना शिक्षणासाठी बराच संघर्ष करावा लागला..
‘ज्ञान ही एक शक्ती आहे’ अशी श्रद्धा बाळगणारे ज्योतिबा पुढे उच्च कोटीचे मानवतावादी समाज सुधारक बनले.

महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना करून सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू करताना वर्तमानातील समाजात आढळणाऱ्या दोष, त्रुटी दूर करून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी त्यांनी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल केली. समाजातील जातीभेद, अज्ञान, स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना सहन होत नव्हती. यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी इतर धर्माचा तौलनिक अभ्यासही केला होता.

मानवता म्हणजे माणुसकी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे म्हणजे मानवता धर्म ही मानवताधर्माच्या शिकवणुकीची संजीवनी त्यांनी अमानवी रुढीच्या परंपरे खाली जखडलेल्या समाजाला प्रथमता देण्याचं काम केलं. त्यामुळे आज मागासवर्गीय समाज ताठ मानेने जगत आहे.

स्त्री ही अबला राहिली नसून ती सबला म्हणून मिरवते आहे, याचं देखील श्रेय त्यांनाच द्यायला हवं. म्हणून त्यांना ‘मानवतेचे थोर उपासक’ असंही म्हटलं जातं..

संत ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी लिहिलेल्या पसायदानातून
“सर्वे पि सुखिनः सन्तु
सर्वे सन्तु निरामया”
या उक्तीप्रमाणे ते वास्तवात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले जीवन खर्ची घातलं.
‘जिच्या हाती
पाळण्याची दोरी
ती जगाते उद्धारी’
या उक्तीप्रमाणे समाजातील मुलींना, स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांनाही या सेवा कार्यात सहभागी करून घेतलं.

सावित्रीबाईंनी समाजात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.त्यांनी शैक्षणिक कृती, जाती, पद्धती स्त्रियांचे व विधवांचे जीवनमान उंचावण्याचे भरीव काम केले त्यामुळेच आज स्त्री जातीचा खऱ्या अर्थाने उद्धार झाला. स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने उभी राहू लागली आहे.
उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव यातल अंतरही कमी करण्याच कार्य महात्मा फुले यांनी केलं.

महात्मा फुले यांनी अनेक विचार प्रवर्तक, मौलिक पुस्तके लिहिली.
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा सहन न झाल्याने “शेतकऱ्यांचे आसूड” नावाचा ग्रंथ लिहून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले ते आज ईतक्या वर्षांनंतरही आपल्या अर्थव्यवस्थेत लागू पडतात. यातून त्यांच्यातील द्रष्टेपणा दिसून येतो.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचणाऱ्या या समाज प्रवर्तकाला लोकांनी “महात्मा” ही पदवी दिली. शिक्षण हा जसा जीवनाचा आधार आहे तशीच ती जगण्याची गुरुकिल्ली आहे.

आज एकविसाव्या शतकात शिक्षण घेणारा समुदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण त्यातून जीवन विषयक शिक्षण मिळते का ? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आणि समस्या निर्माण करणारा ठरत आहे. पण जर या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण करायचं ठरवलं आणि उत्तम जीवन जगायचं ठरवलं तर प्रामुख्याने म. फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिशादर्शक, मार्गदर्शक ठरतील म्हणून आपल्या अभ्यासक्रमातही त्यांचा समावेश केलेला दिसून येतो.

महात्मा फुले यांचे विचार स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे असेच आहे. इंग्रजांचे शिक्षण विषयक धोरण ‘आधी कळस मग पाया’ म्हणजेच आधी वरचा वर्ग शिकला पाहिजे नंतर खालच्या वर्गातील लोकांना शिकवावे असे होते.
पण म.फुले यांचे धोरण मात्र आधी कळस मग पाया नाही तर ‘आधी पाया मग कळस’ असे होते. म्हणून ‘प्रथम उपेक्षितांना शिक्षण’ आणि नंतर अपेक्षितांना शिक्षण हे सूत्र त्यांनी अमलात आणले.

स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत, शिक्षण प्रणालीत अमूलाग्र बदल, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण, त्रिभाषा सूत्राचा अवलंब, शिक्षण विषयक ज्ञान व विचार अशा अनेक योजना त्यांनी मांडल्या.
महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन.

अनिता व्यवहारे

– लेखन : सौ अनिता व्यवहारे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments