Wednesday, September 17, 2025
Homeसंस्कृतीदिव्यांची पूजा…

दिव्यांची पूजा…

आषाढ दीप अमावस्याला घरातील सर्व दिव्यांची आरास मांडून मनोभावे पूजा करतात. पण का ? का करावी दिव्यांची पूजा ? आषाढ अमावस्यालाच का करावी ? आजही ही रीत का टिकून आहे ? जाणून घेऊया यामागील शाश्वत शास्त्र.

आषाढ अमावस्या पासून सणसमारंभ, व्रतवैकल्ये सुरू होतातचं परंतु त्यासोबतच ऋतू चक्रानुसार दिवसही लहान होत जातो म्हणजे साहजिकच लवकर सूर्य मावळतो व दिव्यांची गरज भासते. आता जरी जगात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक दिवे सुसज्ज लाभलेत. बटन दाबले की सगळीकडे झगमगाट दिसतो. परंतु पूर्वी रात्री चे कामे घराघरातील असो वा सार्वजनिक ठिकाणचे कामे चिमणी, दिवली, कंदील, धेंडके, पणत्या, दिवे, मशाली इ. फक्त यांवरच अवलंबून होते. अशा वेळेस स्वच्छ प्रकाशाची गरज असायची.

वर्षभर जळत असलेल्या दिव्यांवर काजळी पसरायची व प्रकाश अंधूक पडायचा. वाती खराब व्हायच्या. मशालींचे फडके खराब व्हायचे अशा वेळी रात्री आजुबाजुचे स्पष्ट दिसत नव्हते त्यातचं पावसाळ्यात अनेक प्रकारचे किडे, किटक, प्राणी पावसाच्या पाणी त्यांच्या बिळात गेल्यामुळे ते बाहेर निघायचे व मार्ग मिळेल तितके जायचे. ते न दिसल्यामुळे घरात यायचे तर कधी अनावधानाने लक्ष नसले की दंश करायचे व जीवाला धोका निर्माण व्हायचा. ह्या सगळ्यांपासून सुरक्षितता म्हणून दिव्यांच्या स्वच्छची प्रथा सुरू झाली.

दिव्यांच्या उजळलेल्या ज्योतीतून सरपटणारे प्राणी आदी स्पष्ट दिसायचे. (तेव्हाच्या पिढीच्या नजराही तितक्याच तेज होत्याच शिवाय त्यांना सूक्ष्म अतिसूक्ष्मही दिसायचे. लांबलांबचे सुद्धा सहज दिसायचे. शेतीभातीतून येतांना, मंदिरात, पायवाटेने जातांना स्वच्छ दिव्यांच्या प्रकाशाने रस्ते सहज दिसायचे. (डोळ्यांचा चष्मा या वस्तू चा तेव्हा शोधही लागलेला नव्हता. तेव्हा पासून ही प्रथा सुरू झाली ती आजपर्यंत टिकून आहे.) विषारी किटकांमुळे अपाय टाळण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे घरातील समस्त दिव्यांना एकत्र घेऊन स्वच्छता करायची प्रथा सुरू झाली.

कंदिलाच्या काचा, कापसाच्या वाती वळून दिवे तेजाळायला सज्ज करायचे. लख्ख प्रकाशासाठी ही सगळी रेलचेल चालत आलेली आहे. पण मग अमावस्येलाच सगळ्यांनी मिळून हाच दिवस का ठरवलाय ? तर तो यासाठी दिलाय कारण; कुठलीही गोष्ट लक्षात राहण्यासाठी एका विशिष्ट चिरकाल स्मरणात राहणाऱ्या तिथीची गरज होती. म्हणूनच सर्वत्र अमावस्येच्या रात्री सर्वाधिक अंधार असतो त्याकरिता ही तिथी ठरवली. या दिवशी दिव्यांचा प्रकाश किती लांब पोहोचतो, कोणते दिवे किती लांबपर्यंत प्रकाश देऊ शकतात. हे दिव्यांच्या स्वच्छतेमुळे कळायचे. या सोबतचं ज्या दिव्यांमुळे संरक्षण होते त्यांच्याप्रती आदर, निष्ठा म्हणून त्यांंना पूजेत महत्व दिले गेले. कारण भारतीय संस्कृती ही आदर, कृतज्ञतेच्या पठडीवर चालत आली आहे. तिची माहिती पुढे देणे महत्त्वाचे मानले गेले.

ही प्रथा सुरू झाली त्यामागे कुठलीही अंधश्रद्धा नव्हती. उलटप्रती पुढच्या पिढीला उपयुक्त असे संस्कार दिले गेले. कोणी आपल्या मदतीला धावून येतो तेव्हा त्यांना कृतज्ञभावनेतून आदराने नतमस्तक व्हावे. आनंदाने सामोरे जावे हे संस्कृतीने शिकवलेय.

पूजेसाठी या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर भक्तीभावनेने बसवून पूजा करून प्रसाद दाखवला जातो. आपल्या घराला दिवे उजळवून टाकतात त्या प्रती, आमच्याकडून दीपकांना दिलेला हा मान असतो. असे मुलांना सांगून दीपत्काराला असेच उजळत रहावे म्हणून प्रार्थना म्हणायला लावायची.


“दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्यांना पाहून नमस्कार.” ही शुभंकरोती प्रार्थना रोज संध्याकाळी म्हणायची असते. असे हे दिव्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनात रूढ झालेले.

आषाढाचा हा प्रकाशझोत थेट दिवाळीच्या सणातही सर्वांच्या सोबतीने स्थिरावलेला राहतो. दिवाळीत तर उत्साह इतका शिगेला पोहोचलेला असतो. रात्रीचा तम आणि हिवाळ्याच्या थंडीतही हे दिवे अधिक साथ देतात. त्यामुळे आणखी जास्त मातीचे दिवे (पणत्या) पुजेसाठी आणून त्यांचीही पूजा केली जाते व आजवर तसा स्वच्छ प्रकाश दिलाय तसाच कायम देत रहावा ही प्रार्थना केली जाते.

दिवे उजळत असतात ते केवळ आपल्या सुरक्षेसाठी. तेल, वात, दिव्यात स्थिरावून वाऱ्यावादळातही तग धरून राहतात ही सुद्धा निरामय शिकवण त्यांच्याकडून मिळते. दिव्या असाच अखंड आमच्या जीवनात तेजोमय रहा व सगळीकडे स्वच्छ प्रकाश देत रहा हीच सदिच्छा आज दिव्यांकडे मागते.

प्रज्ञा कुलकर्णी

— लेखन : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !