‘मरण सोसावे, परि पहिले चुंबन घ्यावे..’ असं कविश्रेष्ठ गोविंदाग्रजांनी लाख मोलाचं म्हणून ठेवलं असेलही, पण साक्षात् मृत्यूचं चुंबन घेण्याचं हे धारिष्ट्य जगावेगळंच की ! अर्थात् गळ्यात साखळी बांधलेली असेल, तर पोटासाठी असले डंखही सोसावे लागतातच म्हणा !!
फोटोतल्या माकडिणीच्या गळ्यातली साखळी निदान दिसते तरी, पण नियतीनं तुम्हा- आम्हा साऱ्यांच्या गळ्यात बांधलेल्या अदृश्य साखळ्या कशा दिसाव्यात ? त्यामुळंच मग, नियतीचं नाटयही निमूट सोसण्यापलिकडं हाती काही उरत नाही !
धो – धो पाऊस कोसळतोय, पण कळशी काही भरत नाही !! हे रितेपण नेमकं कळशीचं …की लल्लाटाचं ? शब्दच्छल करत राहू… दीडवितीच्या पोटासाठी जगता – जगता कणाकणानं … क्षणा – क्षणानं मरत राहू.
सोलापूरच्या सात रस्ता चौकातील एका कोपऱ्यात रंगलेला हा गारुड्याचा खेळ माझा छायाचित्रकार मित्र यशवंत सादुलनं रस्त्यानं जाता जाता त्याच्या कॅमेऱ्यात पकडला. तसा हा खेळ कोणत्याही गावातल्या कोणत्याही चौकात दिसेल.
पण बाकी काही म्हणा, परस्पर विसंगत गोष्टींची युती ही केवळ राजकारणातच असते, असं नाही. भवतीचा निसर्गही अशा परस्पर विसंगत गोष्टींनी खच्च भरलेला असतोच की ! कवड्या जहरील्या नागाचं त्याच्या सोबतीच्या माकडिणीला हे डसणं, की चुंबन घेणं ? कुणास ठाऊक ! दिसत राहतात, ते फक्त बावरलेल्या माकडिणीच्या डोईवरले भयानं ताठरलेले केस… तिच्या डोळ्यांत दाटून आलेली ‘ छप्पन सशांची व्याकुळता ‘… अन् नागाच्या विस्फारल्या डोळ्यातलं अंगार ओकणारं क्रौर्य !
ही असली चमत्कारिक युती…
सहन करीत दिवस काढायचे तरी किती ?
अर्थात् या सवालाचं, निदान ह्या फोटोतल्यापुरतं तरी उत्तर ‘ ‘गारुड्याच्या तोंडाला पुंगी नि हाती डमरू असेतोवर ‘ असं देता येईलही. एकदा का गारुड्याच्या ह्या ‘दूर नियंत्रणा’ चं नादबंबाळ गारूड संपलं, की नाग पुन्हा टोपलीत नि माकडीण पुन्हा गारुड्याच्या खांद्यावर !!
पुढल्या चौकात आणखी वेगळा खेळ सुरू. खेळांना अंत नाही… भुकेला तरी कुठं असतो ? गारुडी तोच. नाग तोच. माकडीणही तीच. फक्त पाहणारे नि टाळ्या पिटणारे बदललेले ! चौकही बदललेला. बघणार्यांचं काय हो ? बघायचं… टाळ्या वाजवायच्या… जमल्यास चार – दोन रुपये फेकायचे. पैसा फेको, तमाशा देखो. पैसाही फेकायलाच पाहिजे असं नाही. तो न फेकताही तमाशा बघता येतोच. दे उसका भला, न दे उसका भी भला.
मागं कधी काळी A snake in the monkey’s shadow नावाचा इंग्रजी चित्रपट पाहिल्याचं स्मरतं. हा फोटो पाहताना अनेकांना चित्रपटाच्या त्या शीर्षकाचीही कदाचित् याद येईल. पण चित्रपटातला तो कराटेचा डावपेच होता. फोटोतल्या ह्या डावपेचाला काय म्हणणार ? मुळात त्याला ‘डावपेच’ तरी म्हणावं काय ? दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे नाव ! की डावही तोच अन् पेचही तोच, असं काही आहे ?
बऱ्याचदा होतं काय, की आयुष्याचं ‘तेच’ असणं हेही एक पेच बनून राहतं. असं जेव्हा होतं, तेव्हा हटकून आठवते भीमराव पांचाळेंनी गायलेल्या एका गझलेतील अस्वस्थ करणारी ओळ…
आयुष्य तेच आहे…
अन् हाच पेच आहे !

– लेखन : जयप्रकाश दगडे
ज्येष्ठ पत्रकार, लातूर
– संपादन:देवेंद्र भुजबळ ☎️ 9869484800