दारी दीप लावू जाता
माळ दिव्यांची सजली,
दूर सारण्या तमास
पाहा दिपावली आली.!!
हा उत्सव दिव्यत्वाचा
बंध जोडीतो नात्यांचे,
चैतन्याने ओसंडती
क्षण प्रेम मांगल्याचे.!!
थाट प्रकाशाचा न्यारा
उजळला परिसर,
दरवळ पक्वान्नांचा
हर्षे बहरले घर.!!
वसुबारस, बलिप्रतिपदा
पाडवा, भाऊबीजेचे,
सण उत्साहाचे न्यारे
लक्ष्मी पूजन आनंदाचे.!!
दारी तोरण सुंदर
सजे दारात रांगोळी,
वस्त्र, अलंकार नवे
सारी लेवुनी सजली.!!
नको दैन्य, दु:ख कुणा
सौख्य सर्वांशी मिळावे,
वैर, द्वेष भाव हरो
मन प्रेमात भिजावे.!!
सर्व सणांची सम्राज्ञी
हर्ष घेऊनिया आली
करू आनंदे साजरा
सण वर्षाचा दिवाळी.!!
🪔🪔🪔🪔🪔🪔
– रचना : प्रणाली म्हात्रे. विक्रोळी, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
