नमस्कार मंडळी.
आपण दररोज दुर्गेच्या रूपांबाबत माहिती वाचतोय. या लेख मालेला छान प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल आपले तसेच लेखिका सौ पौर्णिमा शेंडे यांचे मनःपूर्वक आभार.
काल पोर्टल ला सुट्टी असल्याने भाग ४ व ५ असे दोन्ही भाग आज एकत्र प्रसिद्ध करीत आहे.
– संपादक
दुर्गेचे चौथं रूप : कुष्मांडा माता
नवरात्री दुर्गादेवीचे चौथं रुप, या देवीचे नाव ‘कुष्मांडा’ माता आहे. आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. ब्रह्मांडाची, सृष्टीची रचना या आदिशक्ती देवीने केली आहे.
या दिवशी भक्तगण अत्यंत पवित्र आणि शांत मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना करतात. सृष्टीचे अस्तित्वामुळे ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती या देवीमध्ये आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या दिव्य तेजाने दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील चैतन्य देवीच्या कृपेमुळे आहे.
अशी ही तेजस्वी कुष्मांडा देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळ असून ती वाघावर आरूढ आहे. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम करणारी कोहळा वनस्पती कुष्मांडा देवी माताशी संबंधित आहे. या देवीला मालपोहा हा नेवैद्य म्हणून दाखवला जातो.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्ताने पूर्णपणे देवीला शरण गेले पाहिजे, तर त्या भक्ताला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला सर्व रोगापासून मुक्त करते. भक्ताला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.
कुष्मांडा देवीचे स्थान अनाहत चक्राशी संबंधित आहे.
‘अनाहत चक्र’ जे मानवी शरीरात छातीच्या मागे पण ह्रदयाच्या जवळपास मेरूदंडा पाशी स्थित आहे.
हे चक्र पंचमहाभूतातील वायु तत्वाशी निगडित आहे. मानवी रूपातील पाच कोषातील मनोमय कोषात तिचे स्थान आहे.
मनोभावे हृदयापासून देवीला शरण गेल्याने तिची कृपा दृष्टि होते. अनाहत चक्राचे बीज मंत्र ‘यं’ आहे. बारा पाकळ्या असलेले लाल रंगाचे कमळाचे फुलं आहे.
उत्तर प्रदेशात कानपूर मध्ये घाटमपूर येथे कुष्मांडा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. तिकडील पौराणिक कथा अशी आहे की एक गाय रोज एका खास ठिकाणी दुध द्यायची काही लोकांनी ती जागा खोदली तर तिथे खोलवर एक मूर्ती मिळाली पण तिचा खालपर्यंत शोध घेता आला नाही म्हणून तिकडे एक मंदिर उभारण्यात आले. तेच मंदिर कुष्मांडा माता देवीचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
……………………………..
दुर्गेचे पाचवं रूप स्कंद माता
दुर्गादेवीचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. भगवान कुमार कार्तिकेय’ स्कंदची आई पार्वती असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.
स्कदमाता देवीला केळ्याचा प्रसाद दाखवला जातो. महिलाच्या सर्व आजारावर रामबाण अशी अळशी किंवा जवस ही वनस्पती या देवीची निगडित आहे.
स्कंद मातादेवी ही मानवी शरीरातील मानेच्या मध्ये कंठाच्या जवळपास ‘विशुद्ध’ चक्रात स्थित असते. या चक्राचे बीज मंत्र ‘हं’ आहे. सोळा पाकळ्या असलेले कमळाचे फूल आहे. स्कंद माता आकाशतत्वाशी निगडित आहे. मानवी शरीरात विज्ञानामय कोषात ती स्तिथ आहे. देवीला पिवळा रंग प्रिय आहे.
नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी विशुद्ध चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पद्मासनातील स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकात परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते.
सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केल्यास या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळते.
वाराणसी मध्ये जगतपूर बागेश्वरीदेवी मंदिर दुर्गा मंदिर हे दुर्गादेवीचे पाचव्या दिवशीची स्कंद माता आहे.
क्रमशः
— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप च छान माहिती मिळाली,
धन्यवाद ताई,आज, अशी माहिती मिळाली,जी बहुतेक
जणाणा माहीत नाही….,.. कोटी कोटी प्रणाम…..
या देवी सर्व भतेशु शांती रुपेण संस्थिता या,
नमो नमः
धन्यवाद ताई………