नवरात्री पूजेच्या सहाव्या दिवशी ‘कात्यायनी’ रूपात देवीमातेची उपासना केली जाते. कात्यायनी देवीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात कमळाचे फुल आणि खालच्या हातात तलवार आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करतात कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करतात.
कात्यायनी देवी अंबाडी वनस्पतीच्या संबंधित आहे. जी शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रणात आणते, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते.
कात्यायनी देवी ‘आज्ञा चक्रा’ शी संबंधित आहे. दोन भूवयांच्या मध्ये या चक्राचे स्थान आहे. या आज्ञा चक्राचे बीज मंत्र ‘ओम‘ आहे. दोन पाकळ्या असलेले कमलपुष्प आहे. आज्ञा चक्राचा ‘ॐ’ हा बीज मंत्र आहे.
भक्त आज्ञा चक्रावर ध्यान करतात तेव्हा या साधनेने भक्तांना दिव्य अनुभव येतात त्याच्या इच्छा पूर्ण होतात मन शांत समाधान पावते. सकारात्मक विचारांना संतुलित करते आणि व्यक्तीला स्थिर ठेवते. हे सर्व गुण मिळविण्यासाठी भक्त या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करतात.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची प्राप्ती होते तसेच अलौकीक तेज प्राप्त होते. रोग, भय पासून मुक्तता मिळते
हिंदू धर्मात, महिषासुर हा एक शक्तिशाली अर्धा-मानव अर्धा म्हशीचा राक्षस होता. त्याच्या विकृत मार्गांमुळे क्रोधित होऊन, सर्व देवतांनी माता कात्यायनी तयार करण्यासाठी आपली शक्ती समक्रमित केली. देवी आणि राक्षस यांच्यातील युद्ध हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला गेला. विश्वासघातकी राक्षसाचा वध करणारी माता कात्यायनी महिषासुरमर्दिनी म्हणूनही ओळखली जाते.
माता कात्यायनी देवीला पिवळी आणि केशरी रंगाची झेडुंची ताजी फूले अर्पण करतात. भक्तगण मातादेवी ला मधाचा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून करतात आणि मंत्र आणि प्रार्थना म्हणताना कमळाचे फूल हातात घेतात.
कोल्हापूरला बालिंगेला ग्रामदैवत कात्यायनीचे प्रसिद्ध मंदिर आहे तसेच मथुरा, वृंदावन राधाबाग जवळ आणि दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायनी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे.
क्रमशः
— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800