“वेचलेले क्षण” हे वा. गो. मायदेव यांचे आत्मचरित्र. व्हीनस प्रकाशनने १९६२ मध्ये प्रकाशित केले. ३१७ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत तेव्हा आठ रुपये इतकी होती. वा. गो. मायदेव यांनी हे पुस्तक गुरुवर्य डॉ महर्षि अण्णासाहेब कर्वे यांना समर्पण केले आहे. बालपण, पुण्यात पदार्पण, उच्च शिक्षण, सेवेचा प्रारंभ, बरेवाईट प्रसंग, अकल्पित घटना, नवे उद्योग व उपद्व्याप, प्राध्यपकाचा प्रचारक बनलो, गोडकडू अनुभव, आश्रम. निवृत्तीनंतरचे कांही, तीन महत्त्वपूर्ण घटना, पुन्हा प्राध्यापक, गेली चार वर्षे व उपसंहार अशा १४ प्रकरणांमध्ये हे आत्मचरित्र आहे.

या भागात “वेचलेले क्षण” या पुस्तकातील, नवे उद्योग व उपद्व्याप, प्राध्यपकाचा प्रचारक बनलो, गोडकडू अनुभव या ३ प्रकरणाचे परीक्षण दिले आहे.
नवे उद्योग व उपद्व्याप
गैरसमजामुळे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टि किती कलुषित होते याचे त्यांनी यात उदाहरण दिले आहे. त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती पार्वतीबाई आठवले ह्या आश्रमातील बागेतून तोंडलीच्या वेलाची कडी विनामूल्य घेऊन आल्या. ते पाहून त्याचे इतके पैसे द्यावे लागतील असे मायदेवांनी त्यांना सांगितले. त्याचा त्यांना भयंकर राग आला व त्यांनी पैसे दिले. त्यावेळी त्यांनी आश्रमासाठी केलेल्या सेवेची व सोसलेल्या खस्तांची यथार्थ कल्पना मुळीच आली नव्हती. त्याच वर्षी ते अध्यापिकाशाळेचा प्रमुख म्हणून नेमले गेले. तेथे ते मराठी शिकवीत असे. लहान मुलांना झेपतील अशा त्यांच्या आटोक्यांतील विषयावरील सोप्या भाषेत लिहिलेल्या लहान लहान कवितांची त्यांना जरुरी वाटली म्हणून त्यांनी मुलींकरिता काही शिशुगीते लिहिली. १९२७ मध्ये त्यांनी ग्रामस्थांसाठी एक रात्रीची शाळा काढली. ती त्यांनी १९३१ पर्यंत चालविली. त्या काळात त्यांनी प्रचार कार्यावर जास्त नजर ठेवली. चिटणीसाचेही त्यांनी काम केले. त्या दरम्यान श्रीमती पार्वतीबाई आठवले यांची थोरवी प्रत्ययास आली व त्यांच्या प्रती आदर दुणावला. त्यांच्याविषयीचा गैरसमज दूर झाला. विद्यापीठातील एका होतकरु मुलीला गंगूबाईला परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्याची त्यांनी सोय केली.
कविवर्य बी यांच्या कविता संग्रहरुपाने छापण्याबद्दल त्यांनी पत्रव्यवहार सुरु केला होता पण त्यांनी नकार धाडला होता. १९२७ मध्ये त्यांनी तांबे यांच्या कविता भाग २ छापला. १९२८ मध्ये त्यांनी त्यांचा भावतरंग हा कविता संग्रह प्रकाशित केला. १९२९ मध्ये बेळगाव येथे मराठी साहित्य संमेलन शिवराम महादेव परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली भरले. कोल्हापूर येथे १९३० मध्ये कविसंमेलनाच्या वेळी मुक्कामांत भा रा तांबे यांनी त्यांना त्यांच्या “अशी कशी धुंद मस्तीत चालशी मुली” ही कविता म्हणण्याची फर्माईश केली होती. “मजला काय वाटते व्हावे” या कवितेचा आग्रह मुलांनी धरला होता. या वेळी प्रथमच रजतपटावर यशवंत, गिरीश, संजीवनी, सोपानदेव चौधरी, अत्रे आणि मायदेव यांचे काव्यगायन मुद्रित झाले. १९३० मध्ये मडगाव येथील साहित्य संमेलनात त्यांनी “भास” ही कविता म्हटली. बंगला बांधून होताच ते राहावयास गेले. ३०० रु. खर्चून त्यांनी फादर स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण मराठीत तयार केले. भावकुसुमांजली या नावाने सौ रमाबाई नावलेकर यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होण्यात त्यांनी हातभार लावला. १९३१ मध्ये त्यांनी “गरिबांची गोष्ट” हे १००० ओळींचे खंडकाव्य लिहिण्याचे ठरवले.
प्राध्यापकाचे प्रचारक बनले
१९३१ मध्ये नानांची बदली कराचीला झाली. वडील मिरज संस्थानांत मोडलिंब येथून फेब्रुवारी १९३२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यावेळी त्यांना ६० रुपये पगार होता. त्या दरम्यान मायदेव यांच्याकडे श्री नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे प्रचारकार्य सोपविण्यात आले. ३ जून, १९३२ रोजी रात्री दूध प्यायल्यावर आंबा खाण्याचे निमित्त झाले आणि वडीलांना एकाएकी रक्ती आंव सुरु झाली. त्यात त्यांचे ६ जूनला निधन झाले. २४ फेब्रुवारी, १९३५ रोजी सुधाचा जन्म झाला. कविता गायनासाठी त्यांना बोलवले तर ते विनामूल्य जात असत. १९३२ मध्ये त्यांचे बालांकरिता लिहिलेल्या कवितांचे “अभिनयगीत” हे पुस्तक छापले. त्यातील चित्रे श्री नी. म. केळकर यांनी काढली होती. “भावविहार” या कविता संग्रहात त्यांची अंधबंधूस ‘या कवितेची पार्श्वभूमी त्यांनी वर्णन केली आहे. “भावनिर्झर” या कविता संग्रहातील’ टाकू पाऊल ‘या कवितेची पार्श्वभूमी वर्णन केली आहे. ‘दिन ढळला तरिहि घडा अजुनि भरेना ! ‘ही कविता त्यांनी अण्णांवर लिहिली. ८ सप्टेंबरला ते देणगी मिळवायला सिमल्याला गेले. सिमल्यास लेडी विलिंग्टन यांस भेटताच तशी बातमी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये छापून आली. ज्यांनी अण्णासाहेब कर्वे यांना जपानच्या स्त्रियांचे विद्यापीठाची पुस्तिका पाठवून महिला विद्यापीठ काढण्याची स्फूर्ति दिली आणि ज्यांनी काशी विद्यापीठ स्थापन केले होते तो महात्मा बाबू शिवप्रसाद गुप्ता यांना बनारसमध्ये भेटले. नंतर पंडित मदनमोहन मालवीय यांना भेटले. भारतमाता मंदिर पाहिले. काशी विद्यापीठ पाहिले. तेथे धर्मानंद कौशंबी यांची भेट घेतली. नागपूरला दादासाहेब खापर्डे यांना भेटले. १९३५ च्या आॅक्टोबरमधल्या सिमल्याच्या सफारीवरुन परतल्यावर महिला विद्यापीठाच्या चॅन्सलरसाहेबांशी त्यांचा खटका उडाला. श्री न र फाटक यांची मुंबईच्या ठाकरसी महिला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक होण्यासाठी प्रयत्न केले. १९३६ च्या जुलै महिन्यात त्यांनी त्यांचे बालगीतांचे “शिशुगीत” नावाचे दुसरे पुस्तक छापले.
“गोडकडू अनुभव“
१९३६ च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचा धाकटा इंजिनिअर भाऊ नाना आजारी पडून अत्यवस्थ झाला . डॉ भडकमकर यांनी चांगले बरे केले. त्यांना ३०० रुपये देऊ केले पण त्यांनी केवळ १०० रुपये घेतले. त्यांची आपुलकी विसरणे शक्य नाही असे ते नमूद करतात. त्यांचे वडील अण्णा १९३५ मध्ये वारले. त्यांनी सर्वात धाकट्या बहिणीस कुसुमच्या लग्नासाठी काही पैसे बँकेत ठेवले होते. त्याच्या प्राॅमिसरी नोटा घ्यायला नानांना सांगितले होते. लग्नासाठी खर्च करुनही त्यात पैसे उरले. १९३५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रा गोकाक यांना इंग्रजी शिकवण्यासाठी घेण्यात आले. त्यांचे कानडी बोलणे विनोदी व गमतीचे असे. ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजन्मसेवक झाले. त्यांना आॅक्सफर्डला जाण्यासाठी खटपट केली. पदरचे २००० रु. उसने दिले. चुलतभाऊ वामन लक्ष्मण मायदेव टाटा आॅईल मिल्समध्ये साबणाच्या कारखान्यात लावले. कुसुमचे लग्न ८ मे, १९३७ रोजी डॉ बापूसाहेब थत्ते यांच्याशी झाले. मार्च १९३६ मध्ये त्यांची थोरली मुलगी सिंधू (बबन) मॅट्रिक पास झाली. ४ जानेवारी १९३८ रोजी यवतमाळचे चुलते भाऊकाका वारले. ३० सप्टेंबर १९३९ रोजी त्यांची थोरली मुलगी सिंधूचा त्रिंबक महादेव जोशी यांच्याशी प्रेमविवाह झाला. १९४१ मध्ये डोळे दाखवले. त्याकरता सारे दात काढावे लागले. ३१ आॅगस्ट, १९३७ रोजी ते आश्रमाच्या सेवेतून निवृत्त झाले. ठाकरसी महिला विद्यापीठाचे ध्येय वाक्य ‘संस्कृता स्त्री:परा शक्ति:’ हे त्यांनी जुळवले. ते सर्वमान्य झाले. १६ एप्रिल, १९३६ रोजी कविवर्य भा. रा तांबे यांचा मुलगा विनायक हा विषमाने गेला. १९३८ च्या एप्रिलमध्ये त्यांचा “भावनिर्झर” हा कविता संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. १९३९ मध्ये “बालविहार” हा बालगीतांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यातील चित्रे नी म केळकर यांनी काढली. १९४० मध्ये त्यांनी “सुधा” हे दीर्घ खंडकाव्य छापले. ८ डिसेंबर, १९४१ रोजी राजकवि भा. रा. तांबे हे वारले.
“वेचलेले क्षण” पुस्तकातील पुढील परिक्षण भाग क्रं.: ४ मध्ये वाचावे….
क्रमशः

परीक्षण: विलास कुडके
संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800