आनंद सोपान
कुलकर्णी ग्रंथागार, पुणे मार्फत १९६५ मध्ये प्रकाशित कथाकार पु. भा. भावे यांच्या १३६ पृष्ठांच्या “आनंद सोपान” या ललित लेख संग्रहाची किंमत ६/- इतकी होती.
आनंद सोपान या पहिल्या ललित लेखात आनंदाची व्याख्या काय, आनंदाची वरची प्रत, खालची प्रत, मोठा आनंद, लहान आनंद, उच्च विनोद, नीच विनोद अशी प्रतवारी कुठल्या आधारावर लावली जाते? आनंदाचे वेगवेगळे प्रकार कुठल्या मापाने मोजले जातात ? शारीरिक आनंद, भावनिक व बौद्धिक आनंद, रसोत्कर्ष, उदात्त, भव्य, सूक्ष्म व उत्कट आनंद, शब्दातीत आनंद, दुर्मीळ आनंद, मोठी कृती मोठी मूल्य यातून होणारा मोठा आनंद, ब्रम्हानंद,भौतिक आनंद, नैतिक आनंद, उच्च प्रतीचा आनंद अशा आनंदाच्या पायर्या, आनंदाचे सोपान लेखकाने ललितरम्य शैलीत मांडले आहे.

मी पाहिलेले काही चमत्कार या ललित लेखात ज्याला चमत्कार म्हणावे असे आलेले अनुभव लेखकाने कथन केले आहेत. मार्च १९२९ मध्ये अकोला रेल्वे-ठाण्याच्या बाहेरील आवारात भगवे कपडे परिधान केलेल्या साधूने मोकळ्या आकाशाकडे हातवारे करुन पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी गोळा केल्या व त्याच्या हाताच्या इशार्यावर त्या आकाशात फिरत राहिल्या व त्याच्या इशार्यावर निघूनही गेल्या. नागपूर मध्ये केवळ धोतर आणि जाणवे असलेल्या एका व्यक्तीने मोकळ्या हातातून पाहता पाहता बुक्का व कुंकू काढले होते. मुरलीधर मुळे व नारायण पेंटर मोकळ्या मुठीतून नानाविध वस्तू काढत. डिसेंबर १९५३ मध्ये सासर्यांच्या निधनानंतर ते नागपूर येथे जातात तर त्यांना व त्यांच्या पत्नीला मध्यरात्री सिगरेटच्या धुराचा अनुभव येतो.
स्त्री आणि पुरुष समान? नव्हे विषम या ललित लेखात स्त्री पुरुष समतेची कल्पना भ्रामक असल्याचे म्हटले आहे. स्त्री पुरुषांनी सारखे असावे असा निसर्गाचा हेतू नाही. स्त्री – पुरुषांचे सौंदर्य सामर्थ्य व अस्तित्व परस्परांस पूरक आहेत, मारक नव्हे हा विचार यात फुलवला आहे.
संघर्ष या ललित लेखात मोठी राष्ट्रे मोठ्या युध्दाच्या सिध्दतेत सतत मग्न असतात, मोठे युद्ध मात्र होणारच नाही, आपण कुणाची खोडी काढली नाही तर कुणी आपली खोडी काढणार नाही या गमतीदार विधानांचा परामर्श घेतला आहे. युध्द हा मानवी इतिहासाचा व मानवी स्वभावाचा अटळ भाग आहे. भांडण, स्पर्धा, मत्सर इ. तात्विक चिंतन यात मांडले आहे. माणसामाणसातील संघर्ष याबद्दल चिंतन आहे. प्रेम, दया, त्याग हा जसा मानवी जीवनाचा भाग आहे तसाच द्वेष, स्वार्थ, संघर्ष हा त्याच्या जीवनाचा दुसरा भाग आहे. जगणे आणि जगू देणे या बरोबर मरणे व मारणे असे दोन्ही न्याय आहेत याचा यात उहापोह केला आहे.
व्यक्ति आणि प्रकृति या ललित लेखात ‘प्रेम-संन्यास’मधील विसरभोळा गोकुळ, ‘भावबंधन’मधील सैल जीभेचा आणि मोठ्या मनाचा धुंडीराज या संस्मरणीय भूमिका, शेक्सपियरचा संवेदनाक्षम व अंतर्मुख ‘हॅम्लेट’, लेडी मॅकबेथ, आयागो, आॅथेल्लो, निस्पृह रामशास्री, राघोबा, आनंदीबाई यासारख्या अपवादात्मक व्यक्तिरेखांबद्दल चर्चा केली आहे. लेखकाचे लक्ष अशा अपवादात्मक व्यक्तिरेखा वेधून घेतात. प्रत्येक माणसाने वेगळे असावे हा निर्मितीचा चमत्कार आहे.
अपघात – ललित वाङमयातील या ललित लेखात प्रवासाला जावयास निघालेल्या माणसाच्या ऐनवेळी ध्यानात येते की आपली प्रवासपत्रिका व पैसे हरवले आहेत. लागोपाठ लहान लहान अपघातांची जणू काही एक मालिकाच लागते आणि त्यांचे परिणाम मोठे होतात. कधी दैव तुम्हाला वाचवते. कधीकधी योगायोग जुळून येतो. अशा मौजेच्या अपघाताबद्दल, ललित वाङमयातील अपघाताबद्दल आपल्या खास शैलीत विचार मांडले आहेत.
सुवास या ललित लेखात युकॅलिप्सचा पेपरमिंट सारखा वास येण्याचा, धूपाचा सुगंध येण्याचा गूढ, अतर्क्य आणि अद्भुत अनुभव वर्णन केला आहे.
एक चूक – चूक, अधिक चुका – बरोबर! या ललित लेखात माणसाने एक चूक कधीही करु नये त्याने नेहमी दोन चुका कराव्या असे म्हटले आहे. पहिली चूक न करण्याच्या खटाटोपाऐवजी त्याने स्वतःला दुसरी चूक करण्याची संधि द्यावी म्हणजे त्याला असे आढळून येईल की त्याच्या दुसर्या चुकीने त्याच्या पहिल्या चुकीला सावरुन घेतले आहे. चुका न करणार्या माणसापेक्षा निरागस विश्वस्तपणे चुका करीत जाणाऱ्या मूर्ख माणसावरच नियतीची कृपादृष्टी असते म्हणून मी चूका करणार व स्वतःला वारंवार चुका करण्याची संधि देईन असे विचार लेखक मांडतो.
स्वातंत्र्य आणि समता या ललित लेखात स्वातंत्र्य राखावयाचे तर समता राखता येत नाही, व समता राखावयाची असेल तर स्वातंत्र्य राखता येत नाही असा विचार मांडला आहे. तंतोतंत समता व तंतोतंत स्वातंत्र्य ही एक भूलभुलैया आहे. हे जग वैचित्र्याच्या व विविधतेच्या सौंदर्याने नटलेले आहे. त्यात समानतेचा आग्रह अनाठायी होईल. प्रत्येकाला आपलं स्वत्व फुलविण्याचे स्वातंत्र्य आहे.
बिघडलेले व बिघडविणारे या ललित लेखात जे जे सवंग व हीन त्याचीच जणु आज तहान लागलेली आहे. सवंग व भडक पुस्तके, बोलपट यावर लोकांच्या उड्या पडतात. त्या तुलनेत उत्तम पुस्तके खपत नाही, उत्तम चित्रपट चालत नाही. एकप्रकारे लोकच लेखकाला वा बोलपटवाल्याला बिघडवतात मात्र ओरड काय होते की पुस्तके, बोलपट समाजाला बिघडवतात. बिघडणारे बिघडण्यास पात्र आहेत व बिघडलेल्या वाचकांना बिघडलेले लेखकच मिळणार आहेत. तेच त्यांचे पारितोषिक व तीच त्यांची शिक्षा आहे असे विचार मांडले आहेत.
आरंभ आणि अखेर या ललित लेखात जुनी विस्मृत पुस्तके चाळताना त्यावर मुखपृष्ठे नसली तरी अर्पण पत्रिका, प्रत्येक प्रकरणाला दिलेले शिर्षक, प्रकरणाच्या पहिल्या ओळीची बेलबुट्टीदार सजावट, प्रकरणाच्या शेवटी चित्रांचे ठसे, उपसंहार, जुन्या कादंबर्यांचे शेवट इ वैशिष्ट्ये मांडली आहेत.
पणत्या या ललित लेखात गडकरी यांच्या नाटकातील लीला, सिंधू, लतिका, वसुंधरा, शिवांगी किंवा सुशीला, मालती, कालिंदी या नायिकांची वैशिष्ट्ये मांडली आहेत. ह्या पणत्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यातील ज्योत एक आहे! पाश्चात्य नाटकातील नायिकांशी त्यांची तुलना केली आहे.
दाखवावयाचे दात या ललित लेखात अगदी एकांतातल्या कुणालाही न कळणार्या गलिच्छपणामुळेही जो माणूस अस्वस्थ होऊन जातो त्यालाच स्वच्छतेचा खरा भक्त म्हटले पाहिजे. ढोंगी लोकांचे खायचे दात वेगळे आहेत व दाखवायचे दात वेगळे आहेत. आपल्या नैतिक हस्तिदंताचे हे बाहेर प्रदर्शन करतात व किडक्या दातांनी आतला व्यवहार चघळतात.
बाई, बाटली आणि बोरु या ललित लेखात एक पोरसवदा लेखक दारु पितो आणि बाजारु बायकांच्या वस्तीत जातो. एका ठिकाणी दंगामस्तीही करतो. लेखक विचारतात तेव्हा तो कारण सांगतो की त्याला वेश्याजीवनाविषयी लिहायचे आहे म्हणून. पण वेश्यांचा संपूर्ण अनुभव न घेताच त्यांच्या जीवनाविषयी कसं काय लिहिणार ? बाई आणि बाटली यांचाच अनुभव का घ्यावासा वाटला. अन्य अनुभव का घ्यावेसे वाटले नाही. बाई किंवा बाटली ही यशस्वी लेखनाची अपरिहार्य अट नाही. बोरुची बहादुरी केवळ बाई – बाटलीच्या सीमित वर्तुळात गहाण टाकू नका. रोमहर्षक अनुभवाचे केवढे तरी विश्व पसरले आहे असे लेखक सांगतो.
रहाटगाडगे या ललित लेखात रहाटगाड्याच्या क्रमाने फिरत येणाऱ्या त्याच त्याच गोष्टींचे उदा. विविध फॅशन, दाढी मिशा ठेवणे काढणे इ. आपण मोठ्या गर्विष्ठ आंधळेपणाने कौतुक करीत सुटतो व स्वत:ची पाठ थोपटून घेतो असे विविध दाखले देऊन स्पष्ट केलेले आहे.
बुडबुडे या ललित लेखात काल जे ज्ञान होते, ते आज अज्ञान, व आज जे ज्ञान आहे ते उद्या अज्ञान! म्हणजे अज्ञानालाच श्रध्दापूर्वक ज्ञान मानण्याचा प्रकार! विज्ञानवचने पुष्कळदा अगदी विसंगत, परस्परविरोधी व क्षणभंगुर असतात. अज्ञानाच्या अफाट सागरावर उमटत राहणाऱ्या व फुटत राहणाऱ्या बुडबुड्यांपेक्षा त्यांना अधिक स्थैर्य नसते. All knowledge is provisional! असे विचार यात मांडलेले आहेत.
यशाची गुरुकिल्ली या ललित लेखात जो यशस्वी असतो तो चांगलाही असतो हे समीकरण पूर्णपणे चुकीचे आहे, जो खरं बोलतो त्याचं लोक ऐकतातच असं नाही असे विचार मांडले आहेत.बुवाबाजीतील ढोंगीपणा त्यांनी यात मांडला आहे. बुवांच्या यशाची गुरुकिल्ली वेगळीच आहे. चांगुलपणाशी किंवा समाजहिताशी तिचा काही संबंध नाही हे परखड सत्य यात मांडले आहे.
पु भा भावे यांची शैली या लेखांमधून आपल्या मनावर वेगळा ठसा उमटवते. प्रखर आणि तेजस्वी ओघवती शैली आपल्या मनावर गारुड करत राहते.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पु.भा.भावे यांचे ललित लेखन,कथा दुर्दैवाने वाचनात आलेच नाही. वाचकाच्या मनात लेखकाची एक प्रतिमा दृढ होते आणि वाचक त्या चष्म्यातूनच लेखकाचे लेखन वाचनासाठी निवडतो.