Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : १९

दुर्मीळ पुस्तके : १९

दाही दिशा-माक्झिम गोर्की

‘दाही दिशा’ हे माक्सिम गोर्की यांच्या आत्मचरित्रात्मक त्रयीमधील दुसरे पुस्तक. नऊ वर्षाचा पोरका अलेक्सेय जगाच्या गदारोळात सोडून दिला गेला. सुरुवातीला आजोबांनी त्याला एका बुटाच्या दुकानात चिकटविले. तेथे तो द्वारपालाचे काम करतो. त्याचा मामेभाऊ शास्का त्या दुकानात सेल्समन होता. त्या ओळखीवर त्याला नोकरी मिळाली. शास्का वयाने मोठा त्यामुळे त्याचे ऐकत जावे असे आजोबाने बजावले होते. मालकाने छोट्या अलेक्सेयला आधी काय करत होता म्हणून विचारले. त्याने रस्त्यावरच्या कचराकुंडीतील चिंध्या गोळा करत होतो म्हणून सांगितले. चोरीसुध्दा केली असे तो अभिमानाने सांगतो. तो मालकाकडे रहायचा. सकाळी स्वैपाकीणबाईच्या हाताखाली हरकाम्या खटपट्या अशी कामे करायचा. मालकाचे कपडे धुवायचा. दुपारभर दुकानात उभा रहायचा. संध्याकाळी पुन्हा घरकामाला जुंपायचा. बालपण संपले. भोवतालचे लोक कसल्या ना कसल्या तरी खुमासदार कंड्या पिकवून चघळत बसायचे. त्यांचे जग लहानग्या अलेक्सेयला अपरिचित होते.

एकदा चर्चमधल्या म्हातार्‍याने त्याला बुटांचा एक जोड चोरुन आणून देशील का म्हणून विचारले. चोरी करणे गुन्हा आहे असे तो सांगतो. तो तसली मदत करत नाही.
एक दिवस काम करीत असता स्वैपाकीणबाई त्याच्या देखत कोसळली व तिचा प्राण गेला. शास्काला भूताखेताच्या गोष्टी सांगायला आणखी स्फुरण चढले. त्यामुळे लहानगा अलेक्सेय अतोनात घाबरुन गेला. त्याला जरा खुलवण्यासाठी शास्काने आपला खजिना म्हणजे पत्र्याची मोडकी पेटी उघडली. तिला तो नेहमी कुलुप लावून ठेवी. त्यात बिनकाचेचा चष्मा, बटणे, मोडक्या फण्या, खिळे, दरवाजाचे हँडल अशा वस्तू होत्या. त्याच्या वैभवाबद्दल अलेक्सेयचा भ्रमनिरास झाला. त्यातली कोणती वस्तू भेट म्हणून देऊ असे तो विचारतो. त्यावर तो काही नको म्हणून सांगतो. नोकरी सोडून घरी परत जावे असे त्याला वाटायला लागते. त्याचे मन थार्‍यावर राहत नाही. स्टोववर त्याला भाजते. त्याची हाॅस्पिटलात रवानगी होते. तिथे नर्स मारेल अशी धास्ती. तिथले रोगी घाणेरडे किळसवाणे.. त्यांचे ओरडणे, विव्हळणे त्याला असह्य होते. तो तिथून पळून जायचा प्रयत्न करतो. पण तो प्रयत्न फसतो. तो गादीवर झोपतो. जाग आल्यावर पाहतो तो उशाशी आजी. ती त्याला घरी घेऊन जात होती. कोणतेही दुखणे परोपकार केला की बरे होते अशी तिची श्रध्दा होती.

त्याच्या घराजवळ लुद्मिला नावाची मुलगी नव्याने राहायला आली होती. ती पांगळी होती.पण अतिशय प्रेमळ व सुस्वभावी होती. तिच्या नजरेत भरावे अशी इच्छा अलेक्सेयच्या मनात असे. त्याकरिता तो स्मशानात रात्रभर राहून दाखवण्याचे आव्हान स्वीकारतो. एक रुबलची पैज होती. संध्याकाळी तो थंडीत थडग्यावर बसून राहतो.भीतीने त्याला घाम फुटतो. जवळच त्याच्या आईला पुरले होते ती जागा होती. आईच्या आठवणींचे मोहोळ उठते. एकदा सिगारेट ओढताना त्याला आईने पकडले. त्यावर त्याला शिक्षा केली होती. अलेक्स म्हणजे भावनाशून्य दगड असे ती आजीला सांगते. ती गोष्ट त्याच्या मनाला खूप लागते. पहाटे त्याची सत्त्वपरीक्षा संपते. आपण घाबरलो होतो हे कुणालाही सांगू नको म्हणून तो आजीला सांगतो. अलेक्स आता या जगात स्वतःच्या अनुभवानेच तुला सारे शिकायचे आहे असे आजी त्याला सांगते.तो घरी येतो आणि एका दिवसात गल्लीतला हिरो ठरतो. लुद्मिन त्याच्याकडे कौतुकाने पहायची.

एक दिवस त्याचा धाकटा भाऊ निकोलस अचानक मरण पावतो. आजी ग, दफन केल्यावर आपण सर्वजण कुजून मातीत मिसळून जातो का असे तो आजीला विचारतो. आजी सांगते फक्त संताचे शरीर जसेच्या तसे राहते. त्यांच्या घरात खाण्यापिण्याची भ्रांत होती. आजोबा पहाटे उठून रानात लाकूडफाटा आणायला जायचे. त्यांच्याबरोबर लहानगा अलेक्सेय व आजीही जाऊ लागली.
लवकरच आजोबांनी त्याच्यासाठी नोकरी शोधून काढली. आजीची एक दूरच्या नात्याची सधन बहीण होती. नवरा काॅन्ट्रॅक्टर होता. त्याच्या हाताखाली ड्राफ्टस्मन म्हणून अलेक्सेयला काम शिकवावे असे ठरते. त्याबदल्यात त्याने घरगडी म्हणून पडेल ते काम करायचे होते. प्रत्यक्षात तो फक्त घरगडी हरकाम्याच होता. जीव तोडून मेहनत करावी तरी समाधान नव्हते. त्याच्या आईला कधीतरी त्या मालकीणबाईने वापरलेला कपडा दिला होता, त्याचा ती वारंवार उल्लेख करायची. त्याला मिंधे वाटायला लावायची. मालकाजवळ चहाड्या सांगायची. आज ना उद्या आपल्याला ड्राॅफ्टींग शिकविण्यात येईल अशी त्याला आशा होती. मालक त्याला काॅपी काढायला सांगतात पण कसे ते सांगत नाही. तो पावसाचं चित्र काढतो. तो चित्र काढायला बसला की मालकीणबाईची तळपायाची आग मस्तकात जायची. ती त्याचे डोके भिंतीवर आपटायची. काहीतरी खुसपट काढून उठायला लावायची व फालतू काम करुन घ्यायची. तिथले लोक त्याला क्रूर, राकट, संवेदनाहीन, अडाणी व कमालीचे संस्कारशून्य वाटायची. त्याचे मन मोडून जाते, तो बैचेन व हताश होतो. आजी यायची तेव्हा त्याला आणखी वाईट वाटायचे. तिचे थंडे स्वागत व्हायचे. अपमान सहन करायची. मालक मात्र म्हणायचे ‘तुझी आजी ही फार चांगली बाई आहे बरं का ‘. महिना ६ रुबल देण्याचे कबूल केलेले पण सहा महिने झाले अलेक्सेयच्या घरकामाचे काहीच दिलेले नव्हते.

कालचक्र फिरत होते. वसंत ऋतू आला. त्याला घरगड्याचे बंदिस्त काम नकोसे झाले. असह्य झाले की तो बंदरावर फिरत. बोटीवरच्या स्वयंपाक घरात तो मेस बाॅय म्हणून नोकरीला लागला. तिथे बशा भांडी घासणे, पाने मांडणे, उष्टी पुसणे अशी असंख्य कामे असत. नवा प्रदेश दिसत होता व सतत प्रवास करायला मिळत होता याची त्याला झिंग चढे. त्याला वाचता येते हे कळल्यावर त्याला पुस्तक मिळे. बोटीवर नाना प्रकारचे प्रवासी असत. कोणतेही दुष्कृत्य करण्याची त्यांना दिक्कत वाटत नसे. एकदा लहानग्या अलेक्सेयवर चोरीचा आरोप आला. त्याला त्याची बाजू ठासून सांगता आली नाही. परिणामी चोरीचा ठपका ठेवून ८ रुबल देऊन त्याला बोटीवरुन हाकलण्यात आले. आता आजीला काय सांगायचे असा त्याला प्रश्न पडतो.
एकदा सिगारेट ओढल्याबद्दल अलेक्सेयला आजोबा रागावले होते. तो चिडतो. आजोबांना दूर लोटतो. आजोबा कांगावा करतात. ताबडतोब आजीने अलेक्सेयला (लागणार नाही अशा बेताने) दोन थोबाडीत लगावल्या होत्या. आजोबांना समजून घेतले पाहिजे. त्यांना आवडणार नाही असे वागता कामा नये असे आजी त्याला समजून सांगते.

नवा काही तरी उद्योग बघायला हवा म्हणून अलेक्सेयने पहाटे रानात जाऊन पक्षी पकडून आणायला सुरुवात केली. आजी बाजारात जाऊन ते पक्षी विकून येई. पक्ष्यामागे १ रुबल मिळे. पक्ष्यांना पिंजर्‍यात कोंडतांना त्याला वाईट वाटे. पण शिकारीची नशा आणि पैशाची गरज यापायी तो ते सारे दु:ख पचवे. ऋतू बदलला. पक्षी स्थलांतरित झाले आणि त्याचा व्यवसाय बंद पडला. आजोबांनी त्याला पुन्हा आजीच्या बहिणीकडे पोहचविले. तिचा पुस्तकांवर मुळीच विश्वास नव्हता. पुस्तके वाचण्याचे फारच भयंकर परिणाम होतात असे ती अलेक्सेयला सांगत. त्याच्या बोटीवरील अनुभवाबद्दल तिला खूप कुतूहल होते. शेवटी अलेक्सेय म्हणाला ” अगदी काटेकोरपणे (strictly speaking) सांगायचे झाले तर त्याबद्दल सांगण्यासारखे काही नाही. तो शब्दप्रयोग त्याने बोटीवर असताना पुस्तकात वाचला होता.
घरात दोन तान्ही मुले होती. त्यांची घाणेरडी दुपटी त्याला धुवावी लागे. कपड्यांचे बोचके घेऊन तो रोज नदीकाठी जाई. तिथे येणार्‍या बायकांशी त्याची ओळख झाली. त्यांची पत्रे तो लिहून देत. त्यांची आलेली पत्रे वाचून दाखवी. एका सुशिक्षित बाईकडून त्याला पुस्तके मिळू लागली.
घरात उघड उघड वाचणे अशक्य होते. रात्री देवाजवळच्या दिव्याच्या उजेडात तो चोरुन पुस्तके वाचायचा. घरातील माणसे त्याला वर्तमानपत्र वाचायला सांगत.

एका रविवारी मालक मंडळी चर्चला गेलेली. अलेक्सेयने शेगडीवर काहीतरी शिजायला ठेवलेले होते. तो वाचनात रंगून गेला. इकडे शेगडीवर पदार्थाची राखुंडी झाली. भांडे करपले. त्याबद्दल त्याला लाकडाने फोडून काढले. त्याला दवाखान्यात न्यावे लागले. डॉक्टर पोलीस केस करायचे म्हणत होते पण अलेक्सेयने त्याला नकार देत बरे करण्यासाठी विनवले. त्यामुळे त्याला घरात किंचित सवलत मिळू लागली.
बाल्झॅक, गाॅन्काॅर्ट, स्टॅण्डेल, वाॅल्टर स्काॅट, व्हिक्टर ह्युगो यांचे साहित्य त्याला वाचायला मिळाले. त्या आनंदावर त्याने बाकीच्या पार्थिव अडचणी सहन केल्या.
त्यांच्या शेजारी एक नवे बिर्‍हाड येते. त्यांच्या छोट्या मुलीला अलेक्सेयचा लळा लागतो. तो तिला खेळवत असे. त्या निमित्ताने तिच्या आईशी परिचय झाला. तिच्याकडे पुष्कीनचा कवितासंग्रह होता. तो वाचून अलेक्सेय झपाटून गेला. त्याचा उत्साह पाहून त्या बाईंनी त्याला पुष्कीनच्या व्यक्तिजीवनाविषयी माहिती सांगितली. तो इतरही साहित्य वाचत होता. त्याला तेव्हा घरगड्याचे जीवन नकोसे वाटे.

अलेक्सेय पुन्हा बोटीवर स्वैपाक्याची नोकरी धरतो. पगार होता दरमहा ७ रुबल. सतत भट्टीशी राहावे लागे.अंगावर कोळशाचा थर अन काळजीचा राप चढे. बोटीवरचे कर्मचारी अगदी रासवट होते. जनावरांच्या पातळीवरुन त्यांचे सारे व्यवहार चालत. वाचनात गोडी होती म्हणूनच अलेक्सेयचा अध:पात झाला नाही नाहीतर तो वाममार्गाला लागला असता.
थंडीच्या दिवसात बोटीवरची वाहतूक थंडावल्यामुळे त्याला दुसरे काम शोधणे भाग पडले. एका दुकानात धार्मिक मूर्ती रंगवण्याचे त्याला काम मिळते. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी कधीकधी त्याला दुकानाबाहेर जाहिरातवजा मजकूर म्हणावा लागे.विशिष्ट संतामुळे विशिष्ट रोग – संकट नाहीशी होतात या लोकांतील समजूतीनुसार तो ओरडत असे. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या व्यापाराचा त्याला उबग येतो. असेल नसेल तेवढी श्रध्दा उडून जावी असाच तो प्रकार होता. दिवसभर तो दुकानात राबायचा आणि रात्री धार्मिक मूर्ती रंगवायचा. तो केवळ १२ वर्षांचा होता त्या वयात धर्माचे विडंबन पाहून सुन्न होऊन जात असे. त्याच्या वाचनाबाबत सर्व मंडळी त्याला एकमुखाने मूर्खात काढत. पण त्याने वाचन सोडले नाही. सहकार्‍यांना खूष ठेवण्यासाठी तो त्याच्याजवळील खास युक्त्या वापरत त्यांना निरनिराळ्या नकला करुन दाखवी. मंडळींची हसून हसून पोट दुखत. त्या अज्ञानी, मख्ख वातावरणात सारा जन्म जाणार की काय या विचाराने तो अत्यंत उदास होई.

या सुमारास त्याला सिगारेटचे खूप व्यसन जडले. आजीला त्याने आपली व्यथा सांगितली. आजी त्याची समजूत घालते. पण तो फुरंगटून बसतो. सगळ्या परिस्थितीवर कमालीचा नाराज होतो. अगतिक होतो. त्याला काही सुचत नाही. सुन्न मनाने तो नदीच्या किनाऱ्यावर पडून राहतो.
अगदी योगायोगाने त्याला पूर्वीच्या मालकाचा पुतण्या भेटतो. तो अलेक्सेयला आपल्याकडे बोलावून घेतो. तो काॅन्ट्रॅक्टर होता. ५ रुबलवर तो ओव्हरसिअर म्हणून अलेक्सेयची नेमणूक करतो.
अलेक्सेय नव्या कामावर हजर होतो. ओका व व्होल्गा या नद्यांच्या संगमाच्या दुआबात जत्रेसाठी काही कामचलाऊ दुकाने बांधायच्या कामात तो काम करतो. त्याचा संबंध मजुरांशी येई. तो कामगारवर्ग फालतू बडबड करण्यात विलक्षण पटाईत होता.प्रत्येक मजूर स्वतःचे प्रेमाचे पराक्रम रसभरीत वर्णन करुन सांगे व अलेक्सेयला लग्न लवकर करु नको म्हणून उपदेशही करीत.

अलेक्सेयला आता पूर्वी पुस्तके देणार्‍या सुशिक्षित व सुसंस्कृत बाईकडे पुन्हा जाता येऊ लागले. तिने त्याला सबंध टर्जिनिव्ह वाचायला दिला. त्याने डोस्टोयव्हस्कीचे ‘दि हाऊस ऑफ डेड’ हे पुस्तक वाचले व तो मंत्रमुग्ध झाला. टाॅलस्टाय, डिकन्स, स्काॅट यांचेही लिखाण त्याने वाचले.
दुपारी विश्रांतीच्या वेळी अलेक्सेय कामगारांना चर्चच्या वाचनालयातून आणलेली चांगली चांगली पुस्तके वाचून दाखवी. मजुरांची करमणूक होई. पाप, पुण्य, पश्चाताप, मुक्ती असल्या विषयांवर ते अडाणी दारुडे मजूर सपाटून चर्चा करत. वाद, भांडणे व मारामारी होत. वाचनामुळे काही सुधारणा होऊ शकते यावर त्यांचा कधीही विश्वास बसला नाही. ते त्याला त्यांचे तत्वज्ञान ऐकवत राही. त्याच सुमारास त्याला काव्यरचना करण्याचा छंद जडतो. पूर्ण ३ वर्षे तो कामगारबंधूंच्या सहवासात होता. त्यांचे निराशावादी तत्वज्ञान त्याला घेरुन टाकत होते. सबंध वातावरण साकळलेले, मृतप्राय होते. कामही त्याला बिनडोकपणानेच करावे लागे. तो मुकादम होता. वस्तू गहाळ झाल्या की चौकशी करायचा. मुकादमपणाचा तो अनुभव त्याला नकोसा वाटला. तेथले सर्व जीवन अत्यंत क्षुद्र, घृणास्पद, व्यर्थ होते. पुस्तकांच्या जगात तो चिवटपणाने दिलासा शोधीत होता.

एकदा त्याला एक भयंकर दृश्य दिसले. एक माणूस बायकोला गाडीला बांधून फरफटत नेत होता. ती ठेचकाळत, सोलपटत होती. गाडीवान हृदयशून्य होता. अलेक्सेय त्याला प्रतिकार करतो. पण दुसर्‍या दिवशी तो गाडीवान एक मांजर घेऊन येतो आणि दगडावर धुणे आपटावे त्याप्रमाणे तो मांजराला दगडावर आपटतो. मांजराचे डोके फुटून सर्वत्र रक्ताच्या चिळकांड्या उडतात. सांग आता काय करशील तू म्हणून तो अलेक्सेयला विचारतो. ते राक्षसी दृश्य आठवले की त्याला शहारा येतो. उन्मळून जाते. त्या क्षणी वेड कसे लागले नाही किंवा कुणाचा तरी खून कसा करुन टाकला नाही असे त्याला वाटते. त्याचे मन तेथे स्थिरावणे अशक्य होते. तो बैचेन होता. सैरभैर झाला होता. अगतिक होताच. एक दिवस योगायोगाने त्याला त्याचा मामा भेटतो. त्याने अडाण्यांच्या राक्षसी सहवासात राहण्यापेक्षा कझानला जावे आणि कष्ट करुन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असे मामा सुचवतो. तिथेही कष्ट पडणारच होते, पण निदान संस्कारी माणसांच्या सहवासात त्याला राहता आले असते. शिक्षण घेण्याची अंधुकशी आशा दिसताच अलेक्सेय कझानला जाण्याचे ठरवतो. ज्ञानाची आवड व जिज्ञासा त्याला त्या दिशेला खेचून नेते. इथे ही आत्मचरित्रात्मक त्रयीमधील ‘दाही दिशा’ ही दुसरी कादंबरी संपते.

अलेक्सेय मॅक्झिमोविच पेश्कोव्ह (२८ मार्च, १८६८ – १८ जून, १९३६) यांचा कडवट आणि खडतर जीवनप्रवास या आत्मचरित्रात्मक कादंबर्‍यांमधून त्यांनी कथन केला आहे. गोर्की या रशियन शब्दाचा अर्थ कडवट असा आहे. तेच त्यांनी टोपणनाव आपल्या लिखाणासाठी घेतले आहे.
हे प्रकाशन आता बंद झाल्याने हे पुस्तक दुर्मीळ झालेले आहे.

विलास कुडके.

— लेखन : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments