Friday, October 18, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : २०

दुर्मीळ पुस्तके : २०

माझी विद्यापीठे

माक्सिम गोर्की यांच्या आत्मचरित्रात्मक त्रयीमधील हे तिसरे पुस्तक. अलेक्सेयला शिक्षण क्षेत्रात झेप घ्यायची होती. कझानला जाण्यापूर्वी आजीचा निरोप घेण्यासाठी तो घरी आला. “अलेक्स, आता काही आपली भेट व्हायची नाही. बरं! तू हा असा फिरत राहणार.. मी आपली इकडे भरुन जाईन!” असे आजी म्हणते तेव्हा तो बेचैन होतो. जीव घट्ट करुन तो निघतो.
कझानला तो जुन्या पडक्या खोलीत राहतो. निकोलस एरव्हेनाॅव्ह या विद्यार्थ्यांशी त्याचा परिचय होतो. तोच त्याचा पहिला शिक्षक. त्याला जिम्नॅशियम (माध्यमिक शाळा) मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी धडपड केली. प्रतिकूल परिस्थितीचा प्रतिकार करता करताच माणसाचे ‘माणूस’ पण घडत जाते असा त्याने पहिला धडा दिला.
व्होल्गाच्या काठावरील एका गोदीत गोदीकामगार म्हणूनही अलेक्सेयने कामास सुरुवात केली. पोटापुरता पैसा मिळायला लागल्यावर त्याने सामान हलवले. जी जागा मिळाली ती वेश्यांची वस्ती होती. एक गणितज्ज्ञ तिथे राहत.त्याला गणिताच्या सहाय्याने परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करायचे होते पण हेतू अपुरा ठेवूनच तो मरुन गेला.
अलेक्सेयबरोबर एक प्रूफरीडर राहत असे. एकच काॅट तो दिवसा व अलेक्सेय रात्री वापरत. एक दिवस तो एक कागद एके ठिकाणी पोहचवून येण्यास सांगतो. त्या गुप्त कामगिरीसाठी त्याची निवड करुन बहुमान केला असे त्याला वाटले. क्रांतिकार्यातील हे पहिले पाऊल होते. हळूहळू त्याचाही गुप्त क्रांतिकारकांच्या मंडळात समावेश झाला. तेव्हा अलेक्सेयचे वय अवघे १५-१६ वर्षे होते. अपरिपक्व आणि अजाण असे.
एके दिवशी त्याने फॅरडेचे चित्र पाहिले. तो विलक्षण प्रभावित झाला. फॅरडेला देखील शालेय शिक्षण मिळालेले नव्हते. तो साधा कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करता करता त्याने संशोधन केले. फॅरडेच्या चित्राने अलेक्सेयच्या आशावादाला जिवंत प्रेरणा दिली.
तो अॅडम स्मिथ, चेर्निशेवस्की, मार्क्स इ. तत्ववेत्त्यांचे भरपूर लिखाण वाचत होता . बैठकांना हजर राहून चर्चा लक्षपूर्वक ऐकत होता . दिवसा बोटीवर मोठमोठी ओझी वाहून मजुरी करत होता.
थोडेसे पैसे साठवून एकदम विद्यापीठातच प्रवेश घ्यावा असा त्याचा बेत होता पण प्रवेश मिळत नव्हता. परंतु इतर विद्यार्थी, क्रांतिकारकांचे मंडळ, पोलीस यांचा सहवास हेच त्याचे विद्यापीठ ठरले.
कझानच्या उपनगरात एका बोळात एका वाण सामानाच्या दुकानात आक्षिप्त पुस्तकांचे ग्रंथालय होते. तेथील आक्षेपार्ह क्रांतिवाङमय वाचायला गुप्त क्रांतिकारक येत. अलेक्सेय त्यांना विश्वसनीय वाटे म्हणून त्यालाही त्यांच्यात प्रवेश मिळाला. ते मंडळही त्याचे एक विद्यापीठ होते. तेथील चर्चा होत असलेले प्रश्न त्याला आपले प्रश्न वाटे. मार्क्सच्या तत्वज्ञानाचा त्याला परिचय झाला.

तो एका बेकरीत कामाला लागला. १४ तास कामाने त्याचे शरीर पिंजून जाई. काहींच्या दृष्टीने तो गमत्या विदूषक होता तर काहींच्या दृष्टीने विश्वासू हरकाम्या. तो इतरांना गोष्टी सांगे. प्रबोधन करी. भुकेल्या पोटाला ज्ञानापेक्षा अन्नाची जास्त गरज आहे हे अनुभवाने त्याला कळाले. बेकरीच्या कामात तो तरबेज झाला. डेरेन्काॅव्ह नवीन बेकरी काढतो. तेथे अलेक्सेय मास्टर बेकरवर लक्ष ठेवण्यासाठी त्याची नियुक्ती होते. बेकरीतील कामगार रासवट होते आणि ते सरसकट चोरी करीत. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ब्रेड पोहोचविण्याचे काम त्याच्याकडे येते. ब्रेडच्या टोपलीतून आक्षेपार्ह पत्रके त्यांना पोहचवत. ओव्हनमध्ये ब्रेड भाजायला टाकून तो एकीकडे वाचत राहत.

पुस्तकातले जग व वास्तवातले जग यात तफावत होती. त्यावेळी तो थोडीफार काव्य रचना करायला लागला होता.
बेकरीचा व्याप वाढला. नव्या जागेत अलेक्सेयवर मुख्य जबाबदारी आली. १० रुबेल पगार. रोज ६०० ते ८०० पौंड कणीक भिजवून मळून द्यावी लागे.भट्टीपाशी उभे रहावे लागे.फावल्या वेळात तो वाचत असतो हे कळताच गुप्त पोलीसांचा ससेमिरा मागे लागला. संतांची चरित्रे आणि बायबल वाचत असल्याचे त्याने सांगितल्यावर त्यांची निराशा झाली.
एक दिवस आजी निर्वतल्याचे पत्र येते. तो विषण्ण होतो. आठवणींचे मोहोळ उठते. स्त्रीची फुंकर, तिची सोबत त्याला हवीशी वाटते. विमनस्क अवस्था झालेली होती. तो १८९० चा काळ. टाॅलस्टाॅयवादी कामगारांशी बोलायला येत. वयाची विशी उलटली. अलेक्सेय कमालीचा अगतिक बनला होता. हवे ते मिळत नव्हते. पुस्तकांची ओढ अनिवार झाली. मी काय करु? या प्रश्नाचे आवर्त थांबत नव्हते. रात्र रात्र तो तळ्याकाठी बसून राही. त्या उदासीन मन:स्थितीत तो व्हायोलिन शिकायला लागला.
एके दिवशी त्याच्या व्हायोलिन शिक्षकाला त्याने बेकरीच्या गल्ल्यातून पैसे उचलताना पाहिले. तो संतापला पण शिक्षकाला गरजेपुरते पैसे देऊन कायमचे वाटेला लावले व ती सुरांची दुनिया पारखी झाली.
एकविसाव्या वर्षी रोमास या क्रांतिकारकाशी अलेक्सेयचा परिचय झाला. त्याने उत्तम साहित्य वाचायला दिले. एकदा स्फोटक द्रव्याची क्रांतिकारक विद्यार्थी चाचणी करीत असताना एक झोपडी पेटली. आगीत सभोवतालच्या ४ झोपड्या भस्मसात झाल्या. अलेक्सेय स्वैपाकघराच्या खिडकीतून निसटला म्हणून बचावला. लोकांना त्याने भराभर मदत केली. कापणी – मळणी – निंदणी अशी सुध्दा त्याने कामे पत्करली. बटाट्याच्या शेतावर त्याने मजुरी केली.
बेकरीतले काम सोडले. बोटीवर नोकरी पत्करली. समारा – कॅस्पिअन समुद्र स्थानिक कोळी यांचा त्याला सहवास लाभला.त्याने मासेमारी केली. डोंब्रिंका स्टेशनवर त्याला गुदाम – रखवालदाराची नोकरी मिळाली. रात्रीबेरात्री गुदामातून धान्य चोरणाऱ्या भुरट्या कोसॅक्सांचा त्याला बंदोबस्त करावा लागे. चोरी करु देण्यासाठी ते लाच देऊ करत पण अलेक्सेय लाच घेत नसे व त्यांना चोरीही करु देत नसत.
रात्रीबेरात्री गस्त घालतांना त्याला सैल नीतिमत्तेच्या बायका दिसत. त्याला ते पाहणे असह्य होई.तेथे नरपशूंची गर्दी तर होतीच पण स्त्रियांमधील पशूही जागा असे. त्याचे ह्रदय घायाळ होत. तो स्टेशनवर पथारी टाकायचा. स्टेशनमास्तराची स्वैपाकीण अलेक्सेयला तिचा नोकर समजू लागली. दिवसभर तिचा छळवाद असायचा. तो वैतागला. त्याने बदलीसाठी प्रांतिक कार्यालयाकडे ‘कवितेत’ अर्ज केला. त्याची बोरिसोलब्स्क गावी बदली झाली. तेथे क्रांतिकार्यार्थ एकत्र आलेले अनेक तरुण होते. त्यांच्याकडून क्रांतिविषयक वाङ्मय वाचायला मिळाले. जोडीला त्याने शेक्सपियरचा अभ्यास केला. मधून मधून कविता करण्याचा त्याला छंद जडला. पिठाची पोतीही तो एकीकडे पाठीवरुन नेत हमाली करत होता. चौघांमिळून एक खोली घेतली होती. इतर तिघांना तो ज्यू वाटायचा. ते संशय घेत. एके दिवशी त्याने मारामारी करुन खोली सोडली.
अगदी अभावितपणे एकेक विद्यापीठ अलेक्सेयला गवसत होते. विद्यापीठातून क्रांतिविषयक संशयावरुन हाकलून दिलेल्या विद्यार्थ्याशी त्याची मैत्री होते. तो अलेक्सेयला अनुमानशास्राचा इतिहास शिकवीत. काही दिवसांनी त्याने आत्महत्या केली.
भोवतीच्या रेल्वे कामगारांचे व इतर कामगारांचे पाशवी चाळे त्याला घृणास्पद वाटत.पशुत्वात स्त्रिया पुरुषांनाही मागे टाकत. त्याचा भ्रमनिरास झाला. त्याने ते थांबवण्याचा प्रयत्नही केला पण त्याला बेशुद्ध होईपर्यंत अतोनात मार बसला.
तो २२ वर्षांचा झाला होता. मिलिटरीत दाखल होण्याचे ते वय होते. त्यासाठी निझनीला जायचे होते. तो वाटेत माॅस्कोला उतरतो. काऊंट लिओ टाॅलस्टाॅय यांना भेटण्याची उत्कंठा होती पण ते घरी नव्हते. त्यांची पत्नी सोफाया अॅण्ड्रीव्हॅना होत्या. त्यांनी अलेक्सेयची वास्तपुस्त केली. काॅफी वगैरे दिले. पण त्यांनी त्याचा अंतर्भाव टाॅलस्टाॅय यांना भेटणार्‍या ‘फालतू’ लोकांमध्ये केला. निझनीपर्यंतचा प्रवास त्याने रेल्वेने केला. तिकीटाला पैसे नव्हते. अधिकार्‍यांना विनवणी केली तेव्हा गुरांच्या डब्यातून विनामूल्य जागा मिळाली. ८ बैल सहप्रवासी होते. त्यांना कडबा खाऊ घालावा लागत. ३४ तास जीव मुठीत धरुन तो प्रवास होता.जवळ होती फक्त त्याच्या कवितांची वही. त्यात त्याचे खरं धन, सर्वस्व आणि मास्टरपीस The Song of the Old Oak ही दीर्घ कविता होती.

तोंडी परीक्षेत लष्करी नोकरीसाठी सैन्यभरती करणार्‍या अधिकार्‍यांच्या लक्षात आले की तो काव्यरचना करतो. ते त्याला कोरोलेंकोना या साहित्यिकाला भेटायला सांगतात.
लष्करी नोकरीसाठी तो पात्र ठरला नाही. मिलिटरी इंजिनिअरिंगसाठी त्याची पात्रता तपासण्यात आली. पण राजकीयदृष्ट्या संशयास्पद असा निष्कर्ष काढून त्याला नोकरी देण्यास नकार देण्यात आला.
काही वर्षांनी क्रांतिकारक गुप्तमंडळात सहभागी झाल्याच्या आरोपावरुन त्याला लष्करी अधिकाऱ्यांसमोर उभे रहावे लागले. जनरलसमोर चौकशी झाली. चौकशीत त्याने त्याला आवडणार्‍या गाणार्‍या पक्ष्यांविषयी माहिती दिली.
दहा वर्षांनी त्याला पुन्हा त्या तुरुंगात डांबण्यात आले. अकरा वर्षांपूर्वीच्या जनरलने मृत्यूपूर्वी त्याच्या नावाने बिल्ले ठेवले होते. ते तुरुंगवास संपल्यावर घेऊन त्याने निझनीच्या म्युझियमला भेट म्हणून दिले.
कोणीतरी त्याला टाॅलस्टाॅय फार्मवर जाण्यास सुचवले. त्याने त्यांच्याकडे कसायला जमीन मागितली होती पण उत्तर आले नाही. क्रांतिकारकांमध्ये राहून त्याला टाॅलस्टाॅय यांचे तत्वज्ञान मिळमिळीत वाटू लागले.
कोरोलेंकोने त्याच्या कवितांवर दिलेल्या अभिप्रायाने तो इतका दुखावला गेला की निझनीच्या २ वर्षांच्या मुक्कामात त्याने लेखणी हातात धरली नाही. नंतर तो स्कोर्टोव्ह या मार्क्सवादी विचारसरणीच्या अभ्यासमंडळात रुजू झाला. याच मंडळातून सोशल डेमोक्रॅटिक पार्टी स्थापन झाली व त्यात बोल्शेविक व मेन्शेविक असे २ भाग झाले. निश्ते, हेगेल, जाॅर्ज हेन्री ल्युईस यांच्या तत्वज्ञानाशी परिचय झाला. मनावर ताण आला की तो नदीवर पोहायला जात.

ए. इ. लेनिन या वकीलाकडे त्याला कारकूनाचे काम मिळाले. पण तो अस्वस्थ होता. एकदा त्याने वकीलाच्या कागदावर कविता लिहून ठेवली त्यामुळे वकील संतापले.
त्याला निद्रानाशाचा विकार जडला होता.त्याची जणू कोंडी झाली होती. त्याने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. एका मनोवैज्ञानिकाशी त्याचा परिचय होतो. एखाद्या प्रसन्न वृत्तीची मुलगी शोधून काढ असा सल्ला तो देतो. त्याची कल्पनाशक्ती विलक्षण प्रभावी असल्याचेही तो सांगतो. अलेक्सेय कारकूनी सोडण्याचा निर्णय घेतो व सिम्ब्रिस्क येथे टाॅलस्टाॅय फार्मवर काम करायला निघतो. तेथे मित्रमंडळासह बोटींगला जाण्याचे एकदा ठरते. त्याचा निरोप एकाला देण्याची कामगिरी अलेक्सेयवर येते. तो त्याच्या घरी जातो तेव्हा त्याच्या गबाळ्या गमतीदार व विचित्र पोषाखावर त्या व्यक्तीची बायको हसते.त्याला मात्र त्या बाईचे बोलके डोळे, दाट केस आणि कुतुहल दर्शवणारी नजर वेधक वाटते. त्याने तो झपाटून जातो. तिचे नाव ओल्गा होते. ती त्याच्याहून १० वर्षांनी मोठी होती. शालांत परीक्षा झालेली व चांगली सुशिक्षित होती. राजवाड्यातील नोकरीचा तिला अनुभव होता. पॅरिसच्या जीवनाचा सराव होता. तिच्या आईने अलेक्सेयच्या जन्माच्यावेळी सुईणीचे काम केले होते. त्यांच्यात मैत्री होते.
तिला एक ४ वर्षांची मुलगी होती. ओल्गा उत्तम चित्रे काढत. हॅट्स तयार करीत. नवरा पुस्तकी विद्वान होता. मानसिक आरोग्यावर त्याला माहिती होती.

एकदा पोहताना अलेक्सेयला कपार लागते. ओल्गा त्याला भेटायला जाते. ती त्याच्या बिछान्यावर बसते. प्रेमाची कबुली देते. ओल्गाचा नवरा तिला कायदेशीर मोकळीक द्यायला तयार नव्हता. अलेक्सेयने गाव सोडले. कॅस्पिअन समुद्राजवळ तो व्होल्गाच्या परिसरात भटकला. दोन वर्षांनी तीही टिफलिसला त्याच्यासाठी आली. त्याला विलक्षण आनंद झाला. त्याने रीतसर मागणी घालून तिच्याशी लग्न केले. तिच्या मुलीची जबाबदारी पत्करली. बाथरुममध्ये संसार मांडला. तो वकिलाकडे कारकूनी करत होता. फावल्या वेळात कथा लिहित होता. एक दिवस ती म्हणाली की त्याने कोवळ्या मुलीपासून सुरुवात करायला हवी होती. त्याचे – तिचे जमणे कठीण आहे असे ती त्याला सांगते.
ओल्गाला रंगभूमीचे वेड होते. ती लहानसहान भूमिका करीत असे. त्यांच्या साहित्यविषयक आवडी-निवडी भिन्न होत्या. त्याला फ्लाॅबर्ट, बाल्झॅक यांचे वेड तर तिला हलकेफुलके टारगट लिखाण आवडे. २-३ वर्षांनंतर त्यांच्यातील विसंगती तापदायक वाटू लागली. तिला त्याच्या लिखाणात काहीही रस नव्हता. प्रोत्साहन सोडा पण अलिप्तपणा होता. प्रत्येक नव्याने भेटलेल्या व्यक्तीबद्दल तिला कमालीची जिज्ञासा असे. ती वासनाधीन व सुखवादी होती. अशा स्त्रीबरोबर राहणे हेही अलेक्सेयला एकप्रकारचे शिक्षण वाटते. शेवटी ते फारकत घेतात.
कथेचे हस्तलिखित तो निझनीला एका संपादकाकडे पाठवून देतो. लेखकाच्या नावाच्या ठिकाणी आद्याक्षरे लिहितो. संपादक त्याला नाव लिहायला सांगतो तेव्हा तो लिहितो ‘माक्सिम गोर्की’. गोर्की याचा अर्थ कडू. तिखट. जीवनातले आलेले अनुभव कटुतेने भरलेले होते. ते अत्यंत तिखट होते. त्या अनुभवांना शब्दरुप देण्यासाठी तो साहित्याच्या माध्यमाकडे वळला होता. त्यामुळे गोर्की हे नाव त्याला औचित्यपूर्ण वाटते. माक्सिम हे त्याच्या वडीलांचे नाव. स्थानिक वर्तमानपत्रात त्याच्या कथा छापून येऊ लागल्या. लोक त्या आवडीने वाचत.

एकदा त्याच्या टोपणनावाचे गुपित कोरेलेंकांना कळते. ते त्याला बोलावून घेतात. त्याला लिखाणात प्रेमपूर्वक मार्गदर्शन करतात. त्याच्यासारख्या बलदंड माणसाने नाजूकसाजूक कविता लिहायची? असे विचारतात. काही बालकविता त्यांना प्रसिध्द करण्याजोगी वाटते. ती प्रकाशित करण्याची जबाबदारी ते घेतात. ते भाषेचे व्याकरण शिकायला लावतात. त्यांच्या काही कथा नॅशनल मॅगेझिनमध्ये छापवून आणू असे उत्साहवर्धक अभिवचन देतात.ते त्याला लिहिण्यास प्रवृत्त करतात.एका दीर्घ कथेवर(Chelkash) अलेक्सेय खरोखर वास्तववादी लेखक आहे अशी प्रतिक्रिया ते देतात. जीवनाचा मार्ग बदलून टाका, समारात जा सांगतात. १८९५ मध्ये अलेक्सेय समारात जातो. Yagudiil Khlamida या नावाने लिहू लागतो. लवकरच तो प्रसिद्धीच्या झोतात येतो. नुसत्या लिखाणाने त्याला समाधान नव्हते. साहित्य आणि क्रांती यांची सांगड घालण्याचा त्याचा प्रयत्न सुरु होता आणि या प्रयत्नातून त्याच्या जीवनग्रंथाचे नवे पान उलगडले जाणार होते. इथे माझी विद्यापीठे ही माक्सिम गोर्की यांची आत्मचरित्रात्मक त्रयीतील तिसरी १८६ पृष्ठांची कादंबरी संपते.
प्रगती प्रकाशन, मास्को या पूर्वीच्या सोविएत संघातील प्रकाशनाने हे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशित केले आहे. अनिल हवालदार यांनी मराठीत अनुवाद केला आहे. आता हे प्रकाशन अस्तित्वात नसल्याने मराठी अनुवाद असलेले हे पुस्तक दुर्मीळ आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन