Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : २४

दुर्मीळ पुस्तके : २४

खिरापत

इनामदार बंधु प्रकाशन, पुणे मार्फत २७ मार्च, १९६९ रोजी प्रकाशित ७५ पृष्ठांच्या खिरापत या छोटेखानी दुर्मीळ पुस्तकाची तेव्हाची किंमत होती तीन रुपये! आपल्याजवळच खंडीभर गोष्टी ठेवून लोणचं घालण्यापेक्षा हादग्याच्या कारणानं हीच खिरापत वाटावी,ही खिरापत खाऊन मनानं मोठं व्हायचं, असे लेखिकेला वाटते.

चांदोबा चांदणं भोगलंस का ? करवंदी निंबोणीचं झाड, अत्तरकत्तर पानांची सावली. पलीकडं लपलेला चांदोबा, शेजारी मामांचा चिरेबंदी वाडा, वैलीकडं गार वार्‍याची झुळूक आणि मधे लेखिका. भोवती टिपूर चांदणे. मनात आनंद भरलेला. खेळायला इष्टमित्रांचा मेळा. आधी कुणी खेळावं असा विचार. त्यातून भांडणं जुंपली. लिंबोणीच्या झाडामागे लपलेल्या चांदोबाला जरा पुंढं ये म्हटलं. चंदेरी राती लप्पा – छपी. भातुकली मांडली. दळण काढलं. सुपली निसटली. गंगा – यमुनांना पूर आला. चांदणं भोगतेले चांदोबा थंडावले. अशा शैलीत चांदण्यारात्रीचं व आठवणींचं सुंदर वर्णन केले आहे. कोजागिरीच्या आठवणी जागवल्या आहेत. चांदोबा पेक्षा त्या रात्रीचं चांदणं त्यांनी कसं पोटभर भोगलं ते ललित सुंदर शैलीत सांगितले आहे.

तशी मी खूप खेळायची त्या वेळच्या त्यांच्या पायाला नेहमीच भिंगरी बांधलेली असायची. हातात कचकून गजगे असायचे. बाभळीच्या फुलाची चमकी नाकात असायची. भुईमूगाच्या शेंगांचे झुबे कानाला असायचे. एकदा नऊखऊचा गजग्यांचा डाव आवरुन त्यांनी भावलाभावलीचं लगीन करायचा बेत करतात. सुनेला दागिने काय काय घालायचे याबाबत बोलणं होतं. त्यात त्यांचा सदू नाकातून बेंडबाजा वाजवतो आणि लग्नासाठी बनवलेले लाडू गपागप खातो. धिंगाणा घालतो. तेवढ्यात आई काम सांगते. वाटेत मैत्रिण भेटते. तिच्याबरोबरही ती खेळत बसते. लहानपणच्या खेळाच्या गंमती यात वर्णन केल्या आहेत.

चेंडूफळी कोण्याएके काळी गोकुळच्या अंगणी कृष्णदेव चेंडूफळीचा खेळ मांडतात. चेंडूला भला दांडगा टोला बसतो आणि तो चेंडू एकदम राईचं घर गाठतो. चेंडू आणायचा कसा? फळी सांगते वडीलांकडे जावा. ते आणून देतील चेंडू. कृष्णदेव हट्ट धरतात. वासुदेवराजा राईच्या घराकडे जातात. राई नाही म्हणते. ज्याचं त्याला धाडा म्हणते. मग कृष्णदेव यशोदामातेला गळ घालतात. राई तिच्याही हातावर तुरी देते. सारं गोकुळ राईच्या वाड्यावर जातं. पण कुणाचीच मात्रा चालत नाही. कृष्णदेव स्वतः जातात. राई सजून बसते. पण तेवढ्यात राईचा पती घरात येतो. कृष्णदेव लहान बाळाच्या रुपात रांगत जातो. राईचे व पतीचे डोळे दिपून जातात. कृष्णदेव चेंडूला हात घालतो. पण राई चेंडू घट्ट धरुन ठेवते. ती कृष्णदेवाच्या गळ्यातील नवलाखी हाराला हात घालते. तशी फळी तिला फटकारते व चेंडू घेऊन झुम ठोकते. अशी छान गोष्ट यात सांगितली आहे.

या मंडळी बसा खूप खूप मुलं जमलेली. त्यांनी गाणी म्हटली. कविता म्हटल्या. नाटक केलं. सोंग आणलं. भाषणं म्हटली त्यांच्या गमती सांगून तिथे बाळगोपाळांना तशा गमती करायला प्रवृत्त करतात. याचे अगदी बहारदार वर्णन यात केले आहे.
मुलांचं घर अगदी इवल्या इवल्याशा मुलांचं एक छानदार घर असावं. त्या घरासमोर सुरेखशी बाग असावी. त्या बागेत सुवासिक फुलांचे ताटवे दिसावे. तिथे मुलांना खेळायला झोके असावेत. दारात चिंचा – बोरांची चंगळ असावी. त्या घरातला सगळा कारभार मुलांचा असावा. तिथे आपण चाॅकलेटचे झाड लावावे असे लेखिकेला खूप वाटते. एकदा गावाला गेल्यावर लेखिकेला तसे घर अवचित दिसते. त्या बालभवनाचे तेथील गमतीजमतीचे यात रंजक वर्णन केलेले आहे.
खाऊ आमाला नको यात एक मुलगी आपल्या बाहुलीशी गप्पा मारते. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नसतो तशी बाहुलीही जागीच असते. तिला ती नवा झगा घालते. तिचं बुरकुलं रिबिनीने बांधते. नाकावर आलेलं काजळ पुसते.आपली गोष्ट ती बाहुलीला ऐकवते. आमाला खाऊ नको जा असे कसे सांगितले ते सांगते. एका लहान मुलीचं विश्व यात उभं केलं आहे.

सोनेरी पावलांचा मोर असंच एक गाव होतं. तिथं एक मुलगा राहायचा. त्याला ना आई ना बाप. ना घर ना दार. ना नात्याचं ना गोत्याचं. त्याचं मन कष्टी असायचं. जंगलात जावं. कंदमूळ खावं असं त्याचं जीवन होतं. तिथे एक मोर यायचा. त्याला भेटायचा. दोघांची गट्टी जमते. एके दिवशी मुलगा गावात येतो. मेवामिठाईच्या दुकानाजवळ थांबतो. टक लावून बघत बसतो. तोंडाला पाणी सुटते. दुकानदाराला तो भूक लागली म्हणतो. पण दुकानदार त्याला हाकलून लावतो. तो मग खडूने तेथील भिंतीवर मोर काढतो. तो नाचतो. नाच रंगतो तशी तोबा गर्दी उसळते. पैशांचा ढीग पडतो. मिठाईवाला त्याला जेऊ घालतो. दुकानदार मुलगा नसताना त्याच्याप्रमाणे टाळी वाजवून भिंतीवरील मोर नाचवून बघतो आणि फजिती पावतो. लोकांकडून मार खातो. अशी छान बालकथा यात सांगितली आहे.

आईची सुट्टी एका रविवारी मुलं ठरवतात की आई त्यांना जे नेहमी नेहमी सांगते की ते त्यांना जमायचे नाही ते तिचं म्हणणं खोटं ठरवायचं. आई उशिरा उठते. पाहते तो मुलं आपापल्या कामात गर्क. आज तुला सुटी असे आईला सांगतात. नेहमी आठवड्यातून एक दिवस ते तिला सुटी देणार हा बेतही जाहिर करतात. आईला त्यांचे कौतुक वाटते. तुम्हाला आवडेल ते करुन देऊन तुमचं हसरं तोंड पाहणं हीच माझी सुट्टी असे आई त्या मुलांना शेवटी सांगते व खेळायला सांगते.
मायबोलीचा नवस ही एक आकाशवाणीवर सादर झालेली नाटीका आहे.यात रुक्मिणी, विठ्ठल, मराठी, ज्ञानदेव, मुक्ताई, छबी,महदाईसा, जनी, नामदेव यांच्यातील माय मराठी बद्दल सुंदर संवाद आहे. मराठीचे आगमन होते त्या पार्श्वभूमीवर सर्वांचा संवाद आहे.

न लिहिलेली डायरी लेखिकेने पर्वतीच्या पायाशी बिलगून बसलेल्या पेशवे पार्कमधून बाहेर पडताना अर्धा तास पाहिलेला मोराचा नाच आणि तो पाहताना त्यांना झालेला आनंद डायरीत लिहून ठेवावा असे वाटले. त्यांच्या चिमण्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेला तो मस्त आनंद डायरीत उतरवून ठेवावासा वाटला. तेवढ्यात त्यांना आईने सांगितलेले काम आठवते आणि मग त्या डायरी लिहिण्याचा विचार मनातून काढून टाकतात. अशा या ना त्या कारणाने त्या डायरी लिहिण्याचा बेत पुढं ढकलीत आल्या. लिहून ठेवायसारख्या कितीतरी छान नि मजेदार गोष्टींची त्यांनी मनातल्या मनात नोंद केलेली आहे. डायरी लिहायची तर खरीखुरी. अनेक प्रसंग डायरीत कसे लिहावे असा त्यांना प्रश्न पडला. त्यांची डायरी कोरीच राहिली. ही न लिहिलेली डायरी वाचतानाही त्यांना आनंद होतो.

सणांच्या गोष्टी लेखिकेच्या आजीला देवादिकांचे व सणांचं भारी वेड. रोज रोज विदूषकाची गोष्ट हवी म्हणून हट्ट धरणारी लहानपणची लेखिका सणांची गोष्टीकडे वळते. शाळेतील बाई आर्य, द्रविड, त्यांच्या चालीरीती त्यातून नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी, गणेशोत्सव, शारदोत्सव, नवरात्र, दसरा यामागील गोष्टी सांगतात.
राजूला पण स्वप्नं पडतात एके दिवशी आईने लेखिकेला काळं निळं होईस्तोवर मारलं. वाड्यातली सगळी मुलं पोहायला गेली. लेखिकापण गेली. त्या राजूला म्हणजे आपल्या कुत्र्याला विचारतात की यात त्यांचं काही चुकलं का? त्याला स्वप्न पडतात का असे लेखिका राजूला विचारते. खूप खूप लांब पळावं. शर्यती जिंकाव्या. राजूला कशी स्वप्नं पडत असतील याची बेरीज त्या मांडत बसतात. राजूने दाढीवाल्या बैराग्याची धास्ती घेतली आहे.

खिरापत ही एकांकिका आहे. चिमणी, फिरकी, आत्याबाई, आरती व हादगा खेळायला आलेल्या सर्वजणी यातील हा संवाद आहे. ऐलमा पैलमा गणेशदेवा |माझा खेळ मांडू दे… असा हादग्याचा खेळ मांडला जातो. हत्तीच्या गळ्यात कोरांटीच्या फुलांची माळ घातली जाते. आत्याबाई फळा – फुलांच्या माळा करुन देतात. आरतीच्या घरी नागपूरची पाहुणी आलेली असते. ती फार गाणारी असते व हादगा घालायला येणार असते. त्या डेरा ग डेरा गाण्याचा सराव करतात. खिरापतीला काय आहे ते गुपित ठेवायचे असते. गुपित फुटू नये म्हणून त्या काळजी घेतात. पाटावर नीट हत्ती काढलेला असतो. काहींकडे भुलाबाई म्हणजे देवी पार्वती असते. फेर धरुन हादग्याची गाणी म्हटली जातात. खिरापत ओळखा बघू म्हणून विचारले जाते. पोरी हरतात. आधी देवाला खिरापत दिली जाते. हळदीकुंकू लावले जाते. कारळ्याची दोन दोन फुलं दिली जातात. हादग्याला नमस्कार घातला जातो. असे सुंदर वर्णन केले आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments