Friday, December 27, 2024
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : २७

दुर्मीळ पुस्तके : २७

मन्वन्तर वाचनमाला

‘बालभारती’ ची स्थापना २७/१/१९६७ रोजी झाली. त्यापूर्वी शाळेत खासगी प्रकाशनाची पाठ्यपुस्तके होती. त्यापैकी एक दुर्मीळ पाठ्यपुस्तक हाती आले. मन्वंतर वाचनमाला पुस्तक सातवे. बाबूराव गणपतराव जगताप, पुणे यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील सातव्या इयत्ते करिता हे २७५ पृष्ठांची पाठ्यपुस्तक संपादित केले असून दि. ७/३/१९५२ रोजी प्रकाशित केले आहे व त्याची त्यावेळची किंमत होती १रु ४ आणे ! या पुस्तकाचे पाठ्यपुस्तक बा. ग. जगताप यांनीच सजवले असून आतली चित्रेही बहुतेक त्यांचीच असावी.

२. या पाठ्यपुस्तकात वसंत -बडोद्याचे राजकवि चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांची ही नादमधुर कविता. यात ऋतुराज वसंताचे वर्णन कवीने केले आहे.
सोन्याची घेउनि करि झारी
ही ग्वाल्हेरचे कविवर्य भास्करराव रा. तांबे यांची कविता. सोन्याच्या झारीने अमृताचा सडा शिंपणारी पहाट पाहून कवीला ही कविता लिहिण्याची स्फूर्ति झाली. हातांत सोन्याची झारी घेऊन अमृत देण्यासाठी ही पहाट दारी उभी आहे, पण अंधारात जांभया देत लोळणार्‍या आळशास त्याचे काय? अशी सुवर्णसंधि वाया घालविणे चांगले का? ही सोन्याची पहाट जरतारी गाणे गाते.
विष्णूदास
हे संत तुकाराम यांचे अभंग. ‘विष्णूदास’ कोणास म्हणावे हे यात सांगितले आहे.
आवाहन
ही बालकवि ठोंबरे यांची कविता. कवि रजनीस आवाहन करीत आहे. बाळ आईला हाक मारते, भक्त देवाच्या भेटीसाठी आतुर झाला आहे, त्याप्रमाणे कवि रजनीची वाट पाहात आहे. तिला तो बोलावीत आहे. ‘ये ये, जगदेकमाउली रजनी ये लवलाही ये’, अशी वत्सल हाक कवि मारीत आहे. कारण रजनीशिवाय मनाचा शीणभाग हरण करुन नवजीवन देईल अशी दुसरी कोण माता आहे? रजनी येणार नाही तर ब्रम्हांडाचा प्रलयकाळ येईल. खरेच! रजनीचे आपणांवर केवढे उपकार आहेत.
माउली
या ओव्या ‘स्त्री-जीवन ‘भाग पहिला यातील’ माय लेकरे’ या प्रकरणातून निवडल्या आहेत. आईच्या प्रेमाची महति यात गायली आहे. या ओव्यांचा संग्रह करण्याचे काम साने गुरुजी यांनी केले आहे.
चल उडुनि पांखरा – हे माधव ज्युलियन यांचे सुंदर भावगीत आहे. त्यात पितृ-वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. जगाच्या रम्य विस्तीर्ण उद्यानात आपल्या बाळाने विहार करावा, निळ्या नभात उड्डाण करुन गोड गाणी गावी व अमृत हरण करावे, अशी पित्याची महत्त्वाकांक्षा आहे, आणि हीच प्रेरणा तो आपल्या मुलाच्या मनात भरवून त्यास तो ‘मुशाफर’ होण्यास सांगत आहे.

गोंधळ
या कवितेत ग. ल. ठोकळ यांनी गोंधळ्यांच्या मैफलीचे बहारदार वर्णन केले आहे. रात्रीचे टिपूर चांदणे पडले आहे. गोंधळ्यांचा ताफा डफ तुणतुणे सरसावून उभा आहे. भोवती लोकांचे कडे पडले आहे. शिवशाहीपासून पेशवाईच्या अखेरपर्यंत ठळक ऐतिहासिक प्रसंगावरील प्रसिद्ध पोवाडे एकामागून एक चढत्या वीरश्रीनं गायले जात आहेत. श्रोते तल्लीन होत आहेत. पोवाड्यांतला वीररस ऐकणार्‍यांच्या नसांनसांतून संचारला आहे. लोक खूष होऊन शाहीरांच्या अंगावर नाणी फेकत आहेत. चंद्र मावळला, डफ थांबला. बैठक संपली म्हणजे गोंधळ थांबला पण लोकांच्या डोक्यांतला गोंधळ थांबत नाही.

दंवाचे थेंब
ही केशवसुत यांची कविता. आईचे हृदय कसे असते याचे वर्णन यात केले आहे. ते वाचून हृदय गहिवरुन येते.
पाहुणे
हे केशवसुतांच्या ‘दवाचे थेंब’ या कवितेचे केशवकुमार (प्र. के. अत्रे)यांनी केलेले विडंबन होय. यात पाहुण्यांच्या उपद्रवी स्वभावाचा उपहास केला आहे.
अभंगांजलि-रे. टिळक यांचे अभंग आहेत. त्यातून त्यांच्या हृदयाचा कोमलपणा व वत्सलवृत्ति उत्कटतेने पाहावयास मिळते. घरोघर बाप, घरोघर आई |घरोघर ताई भाई माझे
माझिया ममत्वे व्यापियेले नाही |असे न एकही स्थान कोठे असे कवि यात म्हणतो.

रानजाई
ही ग. ह. पाटील यांची कविता. हिवाळ्यात एका पडक्या किल्ल्यावरच्या बुरुजावर कवी पांढर्‍याशुभ्र फुलांनी बहरलेली रानजाई पाहतात. ती पाहून कवीचे मन विशुद्ध आनंदाने भरुन येते. तिच्या ठिकाणी कवीला स्वातंत्र्यदेवी उभी असल्याचा दिव्यभास होतो.

सज्जनांचे मनोरथ – या मोरोपंत यांच्या आर्या. सज्जन लोकांच्या काय मनीषा असतात त्या निरनिराळ्या उपमा योजून कवीने मोठ्या खुबीने सांगितल्या आहेत.
क्रांति
ही शान्ताराम आठवले यांची कविता म्हणजे क्रांतीचा ओजस्वी पोवाडाच आहे. क्रांति म्हणजे बदल, जुन्याची जागा नव्याने घेणे, एक स्थिति जाऊन दुसरी येणे. क्रांतीचा निसर्गनियम कवीने ओजस्वी शब्दात सांगितला आहे.

मुद्रिका
हा संत एकनाथ यांच्या भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील उतारा आहे. रावणाने सीतेला अशोकवनात ठेविले. रामाने सीतेचा शोध करण्याकरिता मारुतीस लंकेत पाठविले व त्याबरोबर खूण म्हणून आपल्या हातातील मुद्रिका दिली. ती मुद्रिका सीतेने पाहिल्याबरोबर तिच्या मनांत विविध भावना उचंबळून आल्या. तिच्या मनाची अवस्था त्या वेळी कशी झाली याचे भावपूर्ण वर्णन यात केलेले आहे.

चिन्तातुर जन्तु
या गोविंदाग्रज यांच्या कवितेत आकुंचित मनोवृत्तीच्या माणसांचा उपहास केला आहे. अशी माणसे की ज्यांना कोणत्याही गोष्टीत राम वाटत नाही. ती माणसे उगीचच चिंता करीत बसतात व मनातल्या मनात कुढत बसतात. देवाने या जगात सौंदर्याचे अलोट भांडार खुले ठेवले आहे, पण या वेड्या जीवांना देवाची ही उधळपट्टी वाटते. असल्या या चिंतातुर जन्तूंना देवाने कायमची मुक्ति द्यावी – त्यांची या जगातून सोडवणूक करावी असे कवीने विनोदाने सुचविले आहे.

हंस आणि दमयंती – हे रघुनाथपंडित यांचे आख्यान. निषध देशाचा राजा नळ याने पकडलेला हंस दमयंतीच्या स्वरुपाचे वर्णन करुन आपली सुटका करुन घेतो व दमयंतीकडे नळाचे गुणवर्णन मोठ्या चातुर्याने करण्यासाठी कुंडिन नगरात जातो. तेथील उपवनात विदर्भ राजाची कन्या दमयंती सख्यांसह विहार करीत होती. तिने हा सोन्याचा हंस पाहिल्यावर स्वाभाविकच त्याला पकडण्याची तिला इच्छा झाली. या श्लोकांमधून चतुर हंसाची विविध व मोहक हालचाल व दमयंतीचे त्याला धरण्याचे प्रयत्न यांचे अलंकारयुक्त वर्णन केलेले आहे.

पितृ-स्मृति
हे कवि गिरीश (शंकर केशव कानेटकर)यांचे सुनीत. गिरीश एका कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पुण्याहून आपल्या घराकडे जावयास निघतात.त्यांचे हृदय भावनेने भरुन येते. त्यांना रम्य बालपण आठवते. सगेसोयरे सुखात आढळतात पण घर जवळ येताच ते थबकतात. हृदयात कालवाकालव होते. हुरहुर वाटते. डोळ्यात अश्रु येतात. दारी धावुन कोण वत्सलपणे आता कडी काढिल? |कोणाचे खळतील अश्रु? कुठले कौतुक नेत्रांतिल? अशी हृदयस्पर्शी कविता आहे.
अन्योक्तिमुक्ताञ्जलि-ए. पां. रेंदाळकर-यात भ्रमरान्योक्ति, मेघान्योक्ति, चंद्रान्योक्ति, सिंहान्योक्ति, आम्रान्योक्ति, जंबूकान्योक्ति व धत्तूरान्योक्ति अशा संस्कृत मधून मराठीत रुपांतरीत केलेल्या अन्योक्ति आहेत. अन्योक्ति हा अर्थालंकार असून’ लेकी बोले सुने लागे’ या धर्तीवर असतो. अन्योक्ति म्हणजे एकाला उद्देशून जी गोष्ट बोलावयाची तिचा रोख वास्तविक दुसरीकडे असतो.

पाणपोई
राजकवि यशवंत दिनकर पेंढारकर यांची कविता. कवीने आपल्या काव्याची पाणपोई सर्व लोकांसाठी उघडली आहे. पूर्व कवींच्या काव्यगंगेत कावडी भरुन ही पाणपोई भरली आहे.
अशा ह्या १९ कविता आहेत.

पाणकळा हा रघुनाथ वामन दिघे यांच्या पाणकळा या कादंबरीतील उतारा. पाणकळा म्हणजे पावसाळा. शेतकऱ्यांचा खरा जीवनाधार. पावसाच्या येण्याजाण्यावर शेतकऱ्यांची हृदये हेलकावे खात असतात. मृगापासून स्वाती नक्षत्रापर्यंत महाराष्ट्रातील पावसाळ्याची विविध दृश्ये लेखकाने रंगवली आहेत. पाणकळा म्हणजे शेतकऱ्यांचे जीवन, सुखाचं स्वप्न, आनंदोत्सव. मातीत राबणाऱ्या व काबाडकष्ट करणार्‍या जीवांचे पाणकळा म्हणजे विश्वसंगीत!
दोन मेणबत्त्या हा अनंत काणेकर यांचा लघुनिबंध. मनुष्याच्या आयुष्यांतील सर्वात सुखाचा क्षण कोणता?असा प्रश्न एका मुलाने लेखकाला विचारलेला असतो.एका श्रीमंत मित्राच्या घरी लेखकाला आलेला अनुभव व नंतर आगगाडीच्या डब्यात भेटलेला, मजूरवर्गाची सेवा करणारा त्यांचा पदवीधर मित्र आणि घरी आल्यावर दोन मेणबत्त्या.. एक मुंग्यांनी कुरतडलेली व दुसरी जळून गेलेली या अनुभवांतून हा खरा सुखाचा क्षण! स्वतःसाठी जगलास तर मेलास ;दुसर्‍यासाठी जगलास तरच जगलास! हा संदेश यातून लेखक देतो.
छायाप्रकाश हे कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेले शब्दचित्र. शहरातील श्रीमंत लोक निरनिराळ्या ऋतूत निरनिराळ्या प्रकारचे सुख उपभोगत असतात. पण हे सुख ज्यांच्या श्रमामुळे प्राप्त होते तो शेतकरी व मजूरवर्ग मात्र त्या त्या वेळी काबाडकष्ट करण्यात गढून गेलेला असतो हे लेखिकेने या गोष्टीत सांगितले आहे.
महात्मा गांधी हे दिनकर वासुदेव दिवेकर यांनी रेखाटलेले स्वभावचित्र,महात्मा गांधींचे जणू अंतरंगच या निर्मळ आरशात स्वच्छ प्रतिबिंबित झाले आहे. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वाची ओळख लेखकाला महात्माजींच्या रोजच्या जीवनक्रमात पटते त्याचे चित्रण यात केलेले आहे.

सत्ययुगाला सुरुवात ही य. गो. जोशी यांची लघुकथा. सार्वजनिक पुढारी बनलेल्या एका वकीलाची ही गोष्ट आहे. त्यांच्या एका वकील मित्राला वाटले ‘हा केवढा मोठा पुढारी!’ पण हे सर्व ‘दुरुन डोंगर साजरे’ या नात्यानेच. अंदरकी बात निराळीच असते. त्या भोळ्या मित्रास वाटते की वकीलाच्या गणपतीच्या मूर्तीची आर्डर नाकारण्यात मूर्तिकारांनी सत्ययुगाची आठवण करुन दिली. पण खरा प्रकार मागाहून कळून येतो व मग त्या पुढारी वकीलाच्या मोठेपणाचा भोपळाही फुटतो.

गोपाळ कृष्ण गोखले हा न. चिं. केळकर यांनी केसरीत त्यांची स्मृति म्हणून लिहिलेला चरित्रपर लेख. त्यांचा प्रांजळपणा मृदलपणा, त्यांचे वकृत्वातील गुण, उज्वल देशभक्ति, कर्तव्यनिष्ठा, स्वार्थत्यागबुध्दी, त्रासिक, हळवा व चिरचिरा स्वभाव इ. गुणांचे यात वर्णन केले आहे.
संत ज्ञानेश्वर हा ‘संत ज्ञानेश्वर’ या प्रभात सिनेटोन कंपनीच्या पटकथेतील शिवराम वाशीकर यांनी लिहिलेला एक प्रवेश. संत ज्ञानेश्वर यांच्या आयुष्यातील एक उज्ज्वल प्रसंग यात आहे. निवृत्तिनाथ संत ज्ञानेश्वरांना सांगतात की समाज आज तुला आपल्यात घेत नाही ;तर समाजच आपल्याकडे येईल असं तू कर. परमेश्वरावर भाव ठेवणार्‍या लोकांत तुझ्या कार्याला प्रथम सुरुवात कर.

मराठीचे बाळपण हे ना. गो. नांदापूरकर लिखित ‘मायबोलाची कहाणी’ या पुस्तकातील एक कहाणी आहे.महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाऊ लागल्यापासून तुकारामाच्या काळापर्यंत मराठीची वाढ कसकशी झाली याचे काव्यमय वर्णन लेखकाने कहाणीच्या रुपाने केले आहे.
हरिनामाचा गजर हा वर्ध्याचे एक राष्ट्रसेवक प्रभाकर दिवाण यांच्या ‘गांधीजींच्या सान्निध्यात’ या पुस्तकातील उतारा. वर्ध्यापासून पांच मैलावर असलेले शेगांव बापूजींच्या वास्तव्यामुळे सेवाग्राम झाले. गांधीजींच्या रोजच्या दिनक्रमांपैकी सकाळची व सायंकाळची प्रार्थना हा एक त्यांचा कधी न चुकणारा दिनक्रम होता. त्यांच्या प्रार्थनेचे स्वरुप व ते प्रार्थनेला देत असलेले महत्त्व याचे उद्बोधक वर्णन यात केले आहे.
नव्या जगाचा शोध हा श्रीपाद महादेव माटे यांच्या ‘पाश्चिमात्य पुरुषश्रेष्ठ ‘ या पुस्तकातील कोलंबसवरील उतारा. पश्चिम दिशेने जहाजे हांकरली तर आपण हिंदुस्थानला पोहचू असे कोलंबसला वाटते व तो नवा जलमार्ग शोधण्याची तयारी करतो. बरेच महिने सफर केल्यावर त्याला हिंदुस्थानच्या ऐवजी एक नवीनच अज्ञात खंड सापडतो. ते म्हणजे अमेरिका. या नव्या जगाच्या अचानक व अनपेक्षित शोधामुळे त्याला हर्ष होतो. त्याला कोणकोणत्या संकटांतून जावे लागले याचे यात वर्णन केले आहे.
गांवगाड्याचे भरित हा त्रिंबक नारायण अत्रे (मुलकी खात्यातील मामलेदार) यांच्या ‘गांवगाडा’ या पुस्तकातील उतारा. गांवगाडा म्हणजे गावाचा एकंदर कारभार किंवा व्यवस्था. खेडे कसे बनले. खेड्याची रचना, उद्योगधंदे, जाती व त्यांचे परस्पर संबंध इ. तपशीलवार वर्णन ज्याला ते भरित असे म्हणतात ते केले आहे.
गप्पा हा विष्णू सखाराम खांडेकर यांचा वायुलहरी या लघुनिबंध संग्रहातील लघुनिबंध. गप्पा मारण्यात काय लज्जत आहे व गप्पा मारणे ही मानवी स्वभावाची नैसर्गिक प्रवृत्ति कशी आहे हे यात लेखकाने पटवून दिले आहे.
चारुदत्त हा गोविंद बल्लाळ देवल यांनी मृच्छकटिक (मातीचा गाडा) या शूद्रक कवीच्या संस्कृत नाटकाच्या भाषांतरातील एक प्रवेश. चारुदत्त हा उज्जयिनी नगरीतील एक श्रीमान गृहस्थ. तो अत्यंत उदार व परोपकारी असल्याने त्याची संपत्ति लवकर नष्ट होऊन त्याला गरिबी येते. त्याचे आप्तमित्र सोडून जातात पण तो आपले औदार्य, दानत व शील यांचा त्याग करत नाही. या स्वभावाचे या प्रवेशात दर्शन होते.
रायगडावरील संपत्ति ही शिवराम महादेव परांजपे यांच्या रायगडावरील संपत्ती या गोष्टीतील उतारा. रायगडाच्या पायथ्याशी छत्रीनिजामपूर हे गाव आहे. तेथील दौलती नावाचा मुलगा ‘रायगडावर सोने पुरले आहे व ते सोने लोक लुटून आणतात’ या समजुतीने एका रात्री पहार व कुदळ घेऊन रायगडावर जातो व एका बुरुजाच्या पायाशी खणू लागतो. रात्रभर खणून तो थकतो पण सोने काही सापडत नाही. त्याला झोप लागते. पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्याला जाग येते आणि त्याला ईश्वरनिर्मित सोन्याचे भांडार सर्वत्र दिसते तेव्हा त्याला रायगडाची खरी संपत्ती कळते व महाराजांनी रायगडालाच राजधानी म्हणून का पसंत केले ते उमगते.
वैर ही लक्ष्मणराव सरदेसाई यांच्या ‘सागराच्या लाटा’ या कथासंग्रहातील कथा. दोन घराण्यांत पिढ्यान् पिढ्या चालत आलेले वैर मोठी माणसे मोठ्या अहमहमिकेने पुढे चालू ठेवतात. त्यांतच त्यांना पुरुषार्थ वाटतो. निष्पाप व निर्मळ मनाच्या कोवळ्या मुलांना हे कसे कळावे ?
पेच हा वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘दुसरा पेशवा’ या नाटकातील नाट्यप्रवेश. पहिला बाजीराव शूर, उमदा व राजबिंडा पुरुष. त्याचे ‘मस्तानी’ या यावनी स्त्रीवर अतिशय प्रेम होते. तिच्यापासून समशेरबहाद्दर हा मुलगा होतो. मस्तानीवरील प्रेम व बंधुप्रेम यांच्यात लढा सुरु होतो. कर्तव्य की प्रेम असा पेच बाजीरावपुढे उभा राहतो.
अब्बूखाँकी बकरी ही डाॅ. जाकिर हुसेन यांनी लिहिलेली व साने गुरुजी यांनी भाषांतरीत केलेली गोष्ट. बकरीने लांडग्याशी लढा देऊन आपले बलिदान दिले. यात पुष्कळ लोकांना वाटते की हा लांडग्याचा जय आहे. पण एक म्हातारी सांगते की बकरीने जिंकले.
पंत मेले – राव चढले या शंकर काशिनाथ गर्ग ( दिवाकर) यांच्या दोन नाट्यछटा. एकाचे जे दु:ख तेच दुसर्‍याचे सुख हा अनुभव या नाट्यछटेत व्यक्त केला आहे.
येशू ख्रिस्ताचा अंत हा गो ग तळवळकर यांच्या ‘आशियाचे धर्मदीप’ या पुस्तकातील उतारा.येशू ख्रिस्ताचा अंत कशा रीतीने झाला याचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. थोर पुरुषांचा अंत असा शोचनीय व्हावा ना?
शान्ति हे कवि शशांक ( बाळकृष्ण मार्तंड दाभाडे) यांच्या ‘वर्तिका’ या पुस्तकातील गद्यकाव्य. बारा वर्षे तपश्चर्या करुनही एका तपस्व्याच्या आत्म्याला अखेर शांति मिळाली नाही. त्याला एका झाडाखाली एक तेज:पुंज मूर्ति दिसते. ती त्या तपस्व्याला उपदेश करते. हजारो दीनदुबळ्यांचा आक्रोश ऐक. अखिल मानवजातीच्या सेवेसाठी जगात चल, असे सांगते.
सहा चाकांचे जग हा आचार्य काकासाहेब कालेलकर यांच्या ‘जीवनसंस्कृति’ या पुस्तकातील निबंध. मानवी समाजाची संस्कृति ही चक्र संस्कृति आहे. गरज ही कल्पकतेची जननी आहे. त्यातूनच चक्राचा शोध लागला. निसर्गातही ही चक्र परंपरा आहे. दळणाचे , कुंभाराचे, गाडीचे, चरखा, रहाटगाडगे, धार लावण्याचे असे सहा चाकांचे यात वर्णन केले आहे.
चिमुकला दिवा हा राम गणेश गडकरी यांच्या’ राजसंन्यास’ या नाटकातील उतारा. औरंगजेबाच्या सरदाराने संभाजीस पकडून त्यास तुळापूरच्या छावणीकडे नेले. हे समजल्यावर संभाजीच्या सरदारांवर संभाजीची सोडवणूक करणे व येसूबाई आणि बालराजा शाहू यांना सुखरुप रायगडी पोंचविणे असे दुहेरी जोखमीचे काम येऊन पडते. त्यांचे एकनिष्ठ सेवक साबाजी शिर्के व खंडोबल्लाळ चिटणीस हे ही कामगिरी अंगावर घेतात. येसूबाईस व बालशाहूस रायगडी सुखरुप पोंचवावे म्हणून साबाजी शिर्के त्याला सांगत असून तो स्वतः संभाजीची सुटका घेण्यासाठी येसूबाईंची आज्ञा घेत आहे. आपला चिमुकला कुलदीपक मालवू नये, तो पदराखाली झाकून रायगडी सुखरुप पोंचता व्हावा म्हणून येसूबाई शिवनेरीच्या शिवाची – शिवाजी महाराजांची प्रार्थना करत आहे असा हा हृदयद्रावक नाट्यप्रवेश आहे.
माझे भिक्षेकरी मित्र हा यशवंत नरसिंह केळकर यांच्या ‘विनोदलहरी ‘या पुस्तकातील विनोदी लेख. या लेखात भिक्षेकर्‍यांचे गमतीदार वर्णन केले आहे. भिक्षेकर्‍यांच्या पोषाखांच्या विचित्र तर्‍हा, भिक्षा मागण्याच्या पध्दति यांचे सूक्ष्म व विनोदी वर्णन या लेखात केलेले आहे.
महात्माजींचे आवडते कार्य हा द. वि. काळे यांचा लेख. या लेखात दारुच्या व्यसनाचा फैलाव इंग्रजी राजवटीत कसा झाला व राजकीय चळवळीत महात्माजींनी दारुबंदीच्या कार्यक्रमावर कसा जोर दिला व त्यासाठी त्यांनी कसकसे प्रयत्न केले हे सांगितले आहे.
हिंदू लोकांचा व्यापार हे सरदार गोपाळराव हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्या ‘शतपत्रातील ‘दि. २२/४/१८४९ रोजी लिहिलेले ५६वे पत्र. या पत्रांत त्यांनी हिंदू लोकांनी स्वदेशात तयार झालेला मालच विकत घ्यावा, परदेशी जिन्नस वापरु नयेत, व्यापार वाढवावा, अशा तर्‍हेचा उपदेश केला आहे.
नकोत त्या गोष्टी हा वामन भार्गव पाठक यांच्या ‘नकोत त्या गोष्टी’ या लघुनिबंधसंग्रहातील लघुनिबंध. ज्या गोष्टींना आपण नकोत त्या गोष्टी अगर उठाठेवी म्हणतो त्या पुष्कळ वेळा महत्त्वाच्या गोष्टींच्याच उगमांना कारणीभूत होतात, हे तत्त्व त्यांनी यात सांगितले आहे.
शनिदेव हा गोपाळ गणेश आगरकर यांचा लेख. हा लेख वास्तविक शनिग्रहाची माहिती देण्यासाठी लिहिला, पण शनिसंबंधी समाजात ज्या रुढ कल्पना व समजुती आहेत, त्यांचे अगोदर मोठे विनोदी उपरोधिक वर्णन केले आहे.
छोटा जगू ही आनंदीबाई शिर्के यांची गोष्ट. या गोष्टीत एका गरीब निराधार म्हातारीवर मुलगा व सून अकाली मरण पावल्याने एकुलत्या एका नातवाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी कशी येऊन पडली, याचे करुणाजनक वर्णन केले आहे. छोट्या जगूची जिज्ञासा व त्याचे आजीवरील प्रेम हृदयाला चटका लावते.
चोरांच्या संमेलनाची तयारी हा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या’ सुदाम्याचे पोहे’ या विनोदी लेख संग्रहातील विनोदी लेख. हल्लीचा काळ सभा-संमेलनांचा आहे. जो तो उठतो व संमेलन भरविण्याचे बाबतीत पुढाकार घेतो. हे सभा-संमेलनांचे पेव फुटलेले पाहून चोरांनाही आपले एक संमेलन भरवावे असे वाटते. चोरांच्या संमेलनाची तयारी कशी झाली हे लेखकाने अत्यंत विनोदी लेखनशैलीने सांगितले आहे. ते वाचून हसून हसून पोट दुखून येईल.
हिंदुस्थानचे लष्करी शिक्षण हा बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे यांचा लेख. काॅलेजात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक तरुण विद्यार्थ्यास लष्करी शिक्षण मिळाले पाहिजे असे मत यात मांडले आहे.

अशा १९ कविता व ३० धडे असे या पुस्तकाचे अंतरंग आहे. पाठ्यपुस्तके सतत बदलत राहतात. नवीन पाठ्यपुस्तक आली की जुनी पाठ्यपुस्तके बाद होतात. ती काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त होऊन जातात. अशी पाठ्यपुस्तके अचानक डोळ्यासमोर आली की ज्या पिढीने ती शालेय वयात अभ्यासलेली असतात त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ही पुस्तके नाॅस्टलजिक ठरतात. अशा पाठ्यपुस्तकांचे जतन व्हायला हवे. मध्यंतरी निरनिराळ्या काळातील पाठ्यपुस्तकांचे संग्रहालय उभारण्याची मा. शिक्षण मंत्री महोदयांनी घोषणा केली होती. तसे संग्रहालय उभे राहिले तर प्रत्येक पिढीला मागील पिढीतील पाठ्यपुस्तके कशी होती ही जिज्ञासा तृप्त करुन घेता येईल तसेच त्या त्या पिढीतील लोकांना आपले स्मरणरंजनही करुन घेता येईल.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. समीक्षक विलास कुकडे सर ऐतिहासिक गद्य पद्य पुस्तकांची समिक्षा वाचून ज्ञानात भरच पडली आपली समीक्षा फार अभ्यासू आहे.
    अभिनंदन व शुभेच्छा सरजी…

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९