गारगोट्या
गारगोट्या हा दि. ल. देवधर लिखित लघुनिबंध संग्रह केशव भिकाजी ढवळे यांनी १९४५ मध्ये प्रकाशित केलेला आहे. मुखपृष्ठ रघुवीर मुळगांवकर यांनी केले आहे. उगीच, आगामी वाङमय, खिलाडू वृत्ति, ३१ तारीख, प्रश्नचिन्ह, डूल, गम्मत म्हणून, सफाई, फिटंफाट, त्रासदायक गोष्टी, भेट, शिष्टाचार, सूचना फलक, गाडीतील कोपरा, खट्याळपणा, द्राविडी प्राणायाम आणि हसण्याच्या तर्हा अशा हलक्या फुलक्या विषयांवरील १७ लघुनिबंध यात आहेत.
“उगीच” या लघुनिबंधात इंग्रजी भाषेला आपली मायबोली मानणारा एक गृहस्थ लेखकाचा मित्र आहे. तो म्हणत की तुमच्या मराठी भाषेत इंग्रजी भाषेची सफाई नाही. इंग्रजी भाषेइतकी ती अर्थवाही नाही. इंग्रजी भाषेत असे छोटे छोटे शब्द आहेत की त्यांचं मराठी भाषांतरच करता यायचं नाही. लेखक त्यांना मराठीतील अर्धांगी, इश्श, उगीच या शब्दांचे इंग्रजी भाषांतर विचारतात तर तो निरुत्तर होतो. यातील उगीच या शब्दाच्या वापरावर हा मजेशीर लघुनिबंध आहे. ओशाळणे, लाजणे, चीड येणे, राग येणे या प्रसंगातून उगीच शब्द कसा वापरला जातो त्याची मनोरंजक पध्दतीने उदाहरणे दिली आहेत.

“आगामी वाङमय” या लघुनिबंधात नवीन पुस्तकाच्या वेष्टणावर आगामी संकल्पित वाङमयाची यादी लेखक देतो त्याबद्दल लिहिले आहे. अशा प्रकारची यादी म्हणजे लेखकाने वाचकांना दिलेले अभिवचन असते. प्रतिथयश लेखकाने अशी यादी दिली तर वाचक सुखावतात व वाट पाहतात पण होतकरु लेखकाची यादी पाहिली की त्यांची अगदी वेगळी भावना होते. आधीच्या पुस्तकांनी त्यांची निराशा झाली की आगामी यादी नकोशी होते. दोन्ही लेखकांच्या आगामी वाङमय यादीतील फरक विनोदी पद्धतीने मांडला आहे.
“खिलाडू वृत्ती” खिलाडी वृत्ति म्हणजे एक ढोंग असते. सर्व भावना दाबून उसनं हास्य आणून हदय सूड सूड असा आक्रोश करीत असताना अभिनंदन करण्यासाठी खिलाडी वृत्तीचं ढोंग करावे लागते. हे ढोंग इतकं लोकप्रिय कसं झालं, ते एक सामाजिक ढोंग कसं ठरलं त्याचं खुसखुशीत वर्णन यात केले आहे.
“३१ तारीख” खिशांचा ठणठणाट करणारी ही तारीख एक तारखेइतकीच किंबहुना तिच्यापेक्षा अधिकच महत्त्वाची कशी आहे ते यात मनोरंजक शैलीत पटवून दिले आहे. विवाहीतांच्या आयुष्यात ३१ तारीख म्हणजे तहाची तारीख असते. महिन्यातील मूर्खपणाचा आढावा घेण्याचा आणि नवीन निश्चय करण्याचा हा दिवस असतो. महिन्याभरातला पश्चाताप करण्याचाही हा दिवस असतो.
“प्रश्नचिन्ह” विरामचिन्हांतील प्रश्नचिन्हावर हा गंमतीदार लघुनिबंध आहे. प्रश्नचिन्हांची ढंगबाजी, त्याची आकर्षकता, ते कागदावरच नाही तर चेहर्यावरही कसे उमटते, केव्हा केव्हा ते आपल्यापुढेही कसे उभे राहते? चित्रपटाची जाहिरात करताना थोडे कथानक सांगून पुढे काय होते ते चित्रपटात पहा असे सांगून प्रश्नचिन्ह ठेवले जाते. बातमीमधील प्रश्नचिन्ह, प्रेयसीच्या पत्रातील लाडीक प्रश्नचिन्ह असा हा हलका फुलका रंजक लघुनिबंध आहे.
“डूल” आणि “गंमत म्हणून ” हे दोन लघुनिबंध यातील पाने गहाळ असल्याने वाचावयास मिळाले नाही.
“सफाई” या लघुनिबंधात आंगी नुसतं कौशल्य असून भागत नाही तर सफाईही हवी याचं महत्त्व सांगितले आहे. ड्रायव्हरची गाडी चालविण्यातील सफाई, सिगारेट पिण्यातील सफाई, सायकल चालविण्यातील सफाई, वस्त्र प्रसाधनातील सफाई अशी विविध उदाहरणे देऊन सफाईमुळे कौशल्य आकर्षक दिसतं व त्यात गोडवा नि मोहकपणा येतो हे पटवून दिले आहे. कौशल्य ही कला आहे पण सफाई हा नैसर्गिक गुण आहे हे सांगितले आहे.
“फिटंफाट” माणसाच्या स्वभावातील फिटंफाट करण्याच्या प्रवृत्तीवर हा लघुनिबंध आहे.
“त्रासदायक गोष्टी” नेहमी लागणार्या लहान लहान वस्तू वेळेवर न मिळाल्याने कसा त्रास होतो याचे गंमतीदार वर्णन यात केले आहे.
“भेट” या लघुनिबंधात लग्न, बारसं, मुंज अशा विविध प्रसंगी भेट वस्तू द्यावी लागते त्याबद्दल वर्णन केले आहे.
“शिष्टाचार” या लघुनिबंधात छोट्या छोट्या रीतीभाती, शिष्टाचार याबद्दल कथन केले आहे. आभाराची अपेक्षा ठेवणे, आजारी माणसाला भेटायला जाणे इ. शिष्टाचाराचे यात गंमतीदार वर्णन केले आहे.
“सूचना – फलक” ‘कारणाशिवाय शिंगं वाजवू नये’, ‘येथे घाण टाकू नये ‘, ‘गाडी थांबवण्यासाठी साखळी ओढावी’ अशा सूचना – फलकांवरील सूचनांचे प्रत्यक्षात पालन होत नाही. वक्तशीरपणे वागा अशी सूचना असते पण तसे कोणी वागत नाही.
“गाडीतील कोपरा” प्रवासात गाडीत कोपर्यातील जागा प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असते त्या वृत्तीवर हा लघुनिबंध आहे.
“खट्याळपणा” खट्याळ वृत्तीवर हा हलकाफुलका लघुनिबंध आहे. खट्याळपणा आंगी असणं हे आनंदी मन प्रवृत्तीचे द्योतक ठरते. तरुणवयातील खट्याळपणा, बालवयातील खट्याळपणा इ. चे यात गंमतीदार वर्णन केले आहे.
“द्राविडी प्राणायाम” साधी सोपी नि सरळ मार्गाने करता येण्यासारखी गोष्ट लांब पल्ल्याच्या किंवा आड मार्गाने करण्याच्या लोकांच्या सवयींबद्दल हा मजेशीर लघुनिबंध आहे.
“हसण्याच्या तर्हा” हास्य म्हणजे हृदयसागरावरील आनंदोर्मीचं प्रतिबिंब. ते मधूर असायलाच हवं. हास्यातील नाजुकता, ओठात हसणं, मंदस्मित, गालांना खळ्या पडणारं गोड हास्य, गंमत करतांनाचं मोठ्याने हासणे, राकट हास्य, खेकाळणं अशा विविध प्रकाराचे यात वर्णन केले आहे.
असा हा अवघ्या ७० पृष्ठांचा छोटेखानी लघुनिबंध संग्रह आहे.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
लघुनिबंध हा मराठीतील आकाराने लहान पण साहित्य या अंगाने वाचनीय आणि नवीन दृष्टीकोन देणारा साहित्यप्रकार. या लघुकथा संग्रहाचेही अंतरंग उलगडून दाखवणारा लेख.सुंदर पुस्तक परिचय