“दुधाची घागर”
‘पुनर्भेट’मधील शेवग्याच्या शेंगा, वहिनीच्या बांगड्या इ कथांमुळे सुपरिचित य. गो जोशी यांनी आईच्या आठवणी, आईचे शब्दचित्र ‘दुधाची घागर’ या 175 पृष्ठांच्या छोटेखानी पुस्तकात आपल्यापुढे उभे केले आहे.
दुध म्हणजे वात्सल्य आणि भरभरुन वात्सल्य म्हणजे दुधाची घागर ! हे माझे आत्मचरित्र नव्हे असे यात शेवटी य गो जोशी म्हणतात. त्यांना आठवली तशी आणि साधली तशी त्यांच्या आईची ‘व्यक्तिरेखा’ त्यांनी चितारली आहे आणि आईशेजारी जसे ते वावरले तेवढेच दुधाच्या घागरीत त्यांचे प्रतिबिंब दिसते आहे असे त्यांनी शेवटी म्हटलेले आहे. दुधाची घागर मराठी वाङमयात त्यांनी आपल्या आईच्या आठवणींनी भरुन ठेवली आहे! या दुधाच्या घागरीत आपल्यालाही आपल्या आईचे प्रतिबिंब दिसेल. साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’, उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’ यासारखी पुस्तकेही नकळत आठवून जातात.
या ‘दुधाच्या घागरी’ला जी गोडी आली आहे ती त्यांनी लिहिली म्हणून नव्हे ; त्यात केवळ त्यांच्या आईच्या आठवणी आहेत म्हणून नव्हे तर मातृहदयाच्या अपेक्षारहित प्रेमामृतधारांनी ही दुधाची घागर भरली आहे म्हणून आली आहे असा ते शेवटी उल्लेख करतात.
त्यांचे स्नेही आर्टिस्ट श्री पु. श्री. काळे यांनी त्यांच्या आईचे रेखाचित्र काढून दिले ते या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. ता 29 जानेवारी, 1954 हा आयुष्यातील अत्यंत भाग्याचा दिवस, या दिवशी अत्यंत शांतपणे त्यांच्या आईने आपला शेवटचा नि:श्वास सोडला. त्यांच्या आईचे वय 81 वर्षांचे होते. य गो जोशी यांनी तेव्हा भराभर खोलीतले दिवे लावले.
प्रसाद या घरावरील नावावरचा दिवाही लावला. त्यावेळी जणू दाही दिशा ‘यान्तु देवगणा:सर्वे पूजामादाय पार्थिवीम् |इष्टकामप्रसिध्दयर्थं पुनरागमनायच ! ||गुणगुणत असल्याचा त्यांना भास होतो. पुनरागमनायच, आठवणींच्या – स्मृतींच्या रुपाने त्यांची आई त्यांच्या घरात पुन्हा वावरु लागली आहे. घरात असे एकही ठिकाण नाही किंवा वस्तू नाही की जी ‘मातृ – स्पर्शाने’ पुनीत झालेली नाही किंवा तिच्या आठवणीचे फूल तिथे उमललेले नाही असा सुंदर उल्लेख ते सुरुवातीला करतात आणि त्या दरवळलेल्या स्मृती सुगंधाची एकेक आठवण वेचू लागतात.
या आठवणींच्या रुपाने एकप्रकारे त्यांचेच थोडेसे आत्मचरित्र आलेले आहे. य गो जोशी यांचा जन्म 1901 चा. त्यांचे वडील गावरजिस्ट्रार होते. तेव्हा त्यांची बदली या गावाहून त्या गावी नेहमी व्हायची. जुन्नर केंदूर कळस भिगवण ही गावे त्यांना आठवतात. त्यांचा जन्म भिगवण येथे झालेला. आईला वैद्यकीतली थोडीफार माहिती. गावात त्यांना प्रतिष्ठा होती. आठवणी सांगताना लालुकाकाची आठवण सांगितली आहे कारण तो य गो जोशी यांच्या आईला ‘आई’ म्हणून हाक मारी.
दुसरी एक आठवण लक्षणीय आहे. रस्त्याने धावत धावत येत असताना वाटेत धुळीत नाणे चकाकते, ते उचलतात व तसेच धावत घरी येऊन आईला दाखवतात. ते जिथे सापडले तिथे नेऊन टाक असे आई सांगते. या छोट्याशा प्रसंगातून आईचे संस्कारी व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभे राहते. वडील सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांचा काही जमीनजुमला शेतीवाडी झाली नव्हती. या एकाच गोष्टीवरुन त्यांच्या वडिलांच्या चारित्र्याची थोडीफार कल्पना येते. भिगवणला असताना त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले. तेथून ते पुण्याला आले. भिगवण येथील वाडा, ‘सावित्रा’ नावाची मोलकरीण जिच्या एका डोळ्यात वडस वाढलेला होता पण त्यातील प्रेमळपणा आणि सौहार्द, गावदेव बहिरोबा या जन्मगावाच्या आठवणी उभ्या केल्या आहेत. पुण्याला आल्यावर आपण तिथे शिकत असलेल्या भावाच्या तडाख्यात सापडलो कारण तो सारखा अभ्यासास बसवी. भावाचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उभे केले आहे.
आपल्या पुढील आयुष्याची शिदोरी दादाने नकळत त्यांच्या पदरात बांधली असा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यांची थोरली बहिण ‘ताई’ म्हणून होती. तिच्या मुलीवर ‘दुधाची साय’ म्हणून त्यांनी गोष्ट लिहिली आहे. तिचे लग्न झाले त्या लग्नाची गंमत सांगितली आहे. भिकारदास मारुतीरस्ता तेव्हा निर्मनुष्य असायचा. संध्याकाळी येताना भीती वाटायची. नातूबागेत चिंचेच्या झाडावर भूते आहेत असे सांगायचे. दादाने तसे काही नसते म्हणून भीती घालवली. योगायोग असा की दादा नाही, तिथला मामांचा वाडा राहिला नाही ती नातूबागही राहिली नाही चिंचेचे झाड तोडले गेले. त्या जागेचे प्लाॅट पडले. त्यातील एका प्लाॅटवर आपला ‘प्रसाद’ बंगला उभा राहिला ही आठवण अतिशय रंजक आहे. पुण्यात प्लेगची साथ आली. भाऊबीजेच्या रात्री य गो जोशी यांचा दादा वासुदेव गोपाळ जोशी प्लेगच्या साथीला बळी पडला. तेव्हा दादाचे वय 23 होते आणि य गो जोशी 15 – 16 वर्षांचे.
दादा कवि लेखक चित्रकार होता. तो गेल्यावर आपला आता एकच मुलगा म्हणून आई पाहू लागली. ‘मला वकील व्हायचे आहे’ असे तेव्हा एकदा त्यांनी खडूने घराच्या एका दरवाज्यावर लिहले. आईने ती अक्षरे आपल्या हाताने पुसून टाकली व म्हणाली ”तुला काय व्हायचे असेल ते हो ; पण मी अमुक होणार, मी अमुक करणार, असे म्हणून आम्हाला आशा लावून ठेवू नकोस !”. शाळेत नादारीचा अर्ज करणार नाही असे सांगून घरी रागाने मुसमुसत आल्यावर ‘भाऊ, अशी कोणचीही गोष्ट आपण अभिमानाने सांगू नये. “माणसाचा कोणचाही अभिमान टिकत नाही.” असे आई सांगते. त्यांच्या आईचे माहेरचे नाव दुर्गा आणि सासरचे रखमाई. 1930 मध्ये त्यांचे वडील गेले आणि 1954 मध्ये आई. दादाला मुलगा होतो पण तोही जातो.
य. गो जोशी आपल्या आईविषयी सांगतात त्यांची आई शिकलेली नव्हती, तिला फक्त अक्षरओळख होती ;पण माणसांची ओळख तिला फार चांगली असे. त्यांच्या घरी काही मित्र येत. ती अंदाजाने ‘याच्या नादी लागू नकोस’, ‘हा बरा आहे’ ‘तो चांगला आहे’ असे सहज म्हणे. दादा गेला तसे वडीलांनी घरातले लक्ष काढून घेतले. मुलींनी शिकणे वडिलांना आवडत नसे पण आईनेच त्यांच्या बहिणींना शाळेत घातले होते आणि दादा गेल्यावर आपल्या सुनेलाही! य गो जोशी इंग्रजी चौथी पास होऊन पाचवीला गेले. नव्या वर्गाची पुस्तके परिस्थितीमुळे लौकर घेणे शक्य झाले नाही. पुस्तक नाही म्हणून वर्गमास्तरांनी वर्गाबाहेर उभे केले. ते तसेच घरी गेले. तोच त्यांचा शालेय शिक्षणाचा शेवटचा दिवस!
शाळेत असताना शाईच्या पुड्या करुन विक, दिपावलीची सुगंधी तेले घरी करुन पहा वगैरे धंदे करु लागले होते. त्या काळातील त्यांच्या उद्योगप्रियतेमुळे आईला घरात होते नव्हते ते सर्व विकावे लागले. अशा परिस्थितीत आईने धीराने धिम्मेपणाने संसार चालवला. य गो जोशी यांची थोरली बहिण ताई आजारी म्हणून घरी आली. दोन महिने उलटले तशी ती ही दादाच्या पाठोपाठ निघून गेली आणि गेली ती आईला वाईट वाटू नये म्हणून एक लहान मुलगी ‘विमल’ मागे ठेवून – जिच्यावर ‘दुधावरची साय’ ही कथा त्यांनी लिहिली आहे.
पहिल्या महायुद्धात मिलिटरी अकौंटसमध्ये, काही दिवस, येरवडा सेंट्रल जेलमध्ये, काही दिवस रेल्वे मध्ये अशा त्यांनी सरकारी नोकर्या तर काही खासगी नोकर्या त्यांनी केल्या. श्री नाना खरे वडीलांचे स्नेही होते. त्यांची पुतणी लग्नाची होती. य गो जोशी यांचे लग्न ठरले व झाले. घरात पुन्हा आनंद नांदू लागला. थोड्याशाच आजारानंतर वडीलांचे आयुष्य संपले. वडील गेल्यावर य गो जोशी रोज थोडे लिहू लागले आणि आईला वाचून दाखवू लागले. वडील गेल्यावर नऊच महिने गेले तोच त्यांची सासुबाई प्लेगच्या साथीला बळी पडली.
नंतर सासरे, एक मेव्हणा आणि त्यांची नवविवाहित पत्नीही त्या साथीत गेल्या. पत्नी गेल्यामुळे आईचे पुन्हा निराळे आयुष्य सुरु झाले. तिला य गो गीतारहस्य वाचून दाखवू लागले. आईने य गो यांचे पुन्हा लग्न ठरवले आणि त्यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या कथेतील उत्तरार्ध त्यांच्या आईच्या देखतच झाला. एका घरातील भांडण झालेली बहीणभावंडे त्यांच्या घरात एकमेकांना भेटली. यशवंत मासिकाने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत शेवग्याच्या शेंगा ही पहीली ठरली व य गो एकदम पहिल्या नंबरचे कथालेखक ठरले. आईच्या दृष्टीने हा नव्या सुनेचा पायगुण ठरला. आईने काय पेरले होते तर सात्विक जीवनाकांक्षा, धैर्य, सदभिरुची, सात्विकपणा आणि प्रामाणिकपणा असा य गो कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. सुखदु:खापैकी कशाचीही नवीन चाहूल लागली तर आई देवासमोर निरंजन लावून त्या प्रकाशाकडे पहात आपले मन स्थिरस्थावर करीत. अशा आईच्या अनेक आठवणींनी य गो यांनी ही दुधाची घागर भरुन ठेवली आहे.

– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800