‘तुकाराम’ बोलपटातील ‘आधी बीज एकले’ या सुप्रसिद्ध पद्याने शांताराम आठवले यांचा खरा परिचय महाराष्ट्राला झाला. महाराष्ट्रात हे पद अतिशय लोकप्रिय झाले व देशाच्या कानाकोपऱ्यात हरेकाच्या तोंडी ते खेळत राहिले. कवि शांताराम यांची इतर अनेक पद्ये अशीच लोकप्रिय झाली पण त्यांच्या कीर्तीचा खरा प्रारंभ आहे ‘एकले बीज’ पासून !
य. गो जोशी प्रकाशनाने दि. 26/11 /1938 रोजी ‘एकले बीज‘ हा शांताराम आठवले यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे. No man can be a good Poet without first being a good man ! असे बेन जाॅन्सन यांचे सुवचन सुरुवातीला आहे. दीड रुपया ही तेव्हाची किंमत. पुठ्ठा बांधणी, जाड कागद आणि गुलाबी शाईतील सुबक मुद्रण ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये ठळकपणे डोळ्यात भरतात.

जीवनात कवितेचे स्थान ही शांताराम आठवले यांना गुरुस्थानी वाटणारे ना ह आपटे यांची 30 पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना तसेच के. नारायण काळे यांची ‘बीज’ भूमिका आणि खळ्यावर – म्हणून शांताराम आठवले यांचे दि 24/10/1938 रोजीचे मनोगत हे सर्व वाचनीय व चिंतन करण्याजोगे आहे.
‘एकले बीज‘ द्विदल आहे. पहिल्या खंडात कवींनी वेळोवेळी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. दुसऱ्या खंडात ज्यांच्यामुळे कवींचे नाव सर्वतोमुखी झाले ती बोलपटातील पद्ये आहेत.
पहिल्या खंडातील कवितांची संख्या अवघी 65 आहे. ईशस्तुतीपर 2, तत्त्वचिंतनपर 6, प्रेमविषयक 21, जीवनविचाराच्या 19, उद्बोधक /प्रोत्साहक 9 आणि सर्वसामान्य विषयक 7 अशी त्यांची वाटणी आहे. पहिल्या खंडात नवकाल, उध्दारक प्रलय, उज्ज्वल तिमिर, क्रांति, आराम कधी ? उल्हास, जन्मणाऱ्या बालकास, उद्याची चिंता, कवि आणि अनुभूति, मुक्तेश्वरी, जीवनयज्ञ, चंचलता, जीवनकलह, आभास, परोपजीवी जग, ईश्वरी काव्य, मधुहास्य, वृत्तिवैचित्र्य, दंभिकता, प्रेममय जीवन, ‘सुमती’ संपदा, शारदा आणि प्रमदा, प्रेमभंग, भावना आणि व्यवहार, प्रेमदैवत, समाधान, विफल संयम, प्रभुपदी, दैवाचे खेळणे, ‘करु नको प्रेम’, नटीचे मनोगत, कटुसत्य, आत्मवंचना, दोन हदये, विपरीत उत्तर, पत्त्यांचा खेळ, पशु आणि प्रिया, कठिणहदय बायका, दोन प्रवाह, एक रम्य स्मृति, अद्वैतक्षण, रहस्य, यशाचे रहस्य, कर्मयोगी, शांतीचे पाईक, युध्दलालसा, वीरप्रसू अंगना, मरणांत अमरपण, पाटील, देशभक्त, पूर्ववैभवाचे कलेवर, उध्वस्त वाडा, कोलंबस, वीर पत्नीची इच्छा, उपवनांतील दोन प्रसंग, दोन मंदिरे, नदीचे गाणे, दोन भगिनी, भगवा मुनी, वृध्द गाईचे गाणे, दोन सौंदर्ये, सैनिकांचे गाणे, अहिल्योध्दार, संध्याकाल व प्रार्थना अशा 65 कविता आहेत.

दुसर्या खंडात माझा मुलगा – 9, कुंकू – 9, गोपाळकृष्ण – 14, तुकाराम – 6, अमृतमंथन – 13, संकीर्ण पद्यरचना – 6 व हिंदी पद्ये – 3 असे आहेत.
ना. ह. आपटे आपल्या प्रस्तावनेत नमूद करतात की या संग्रहातील डोळ्यात भरण्यासारखा पहिला गुण म्हणजे आटोपशीर रचना हा होय. कोलंबस आणि देशभक्त या 2 कविता फक्त प्रदीर्घ आहेत. कवितांची लघुता मोठी हृद वाटते. दुसरा गुण भाषेची शुचिता, शुध्दता व सुलभता होय. मनाला कसेसे वाटणारा ओंगळपणा कुठेही नाही. भाषा ओघवती व शुध्द आहे. वाक्यांचे अपप्रयोग, यतिभंग, अर्थांची ओढाताण, दुरान्वय, शब्दांची मारुन मुटकून केलेली चिरेबंदी आणि कर्णकटुता इत्यादी अवगुण सहसा आढळत नाही. तिसरा गुण म्हणजे काव्यविषयांची निवड करताना कवीने आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केलेला नाही. जीवनक्रम आक्रमतांना त्याला जेवढे दिसले, भासले, समजले व अनुभवास आले त्याचाच विचार केला आहे व तोही तोल राखून.
ना ह आपटे यांनी प्रेमविषयक कवितांमध्ये प्रेममय जीवन, भावना आणि व्यवहार, नटीचे मनोगत, अद्वैतक्षण या कविता श्रेष्ठप्रतीच्या असल्याचे नमूद केले आहे. त्यात भावना आणि व्यवहार व नटीचे मनोगत ही 2 भावगीते सुंदर आहेत.
जीवनविषयक भागात जन्मणाऱ्या बालकास, जीवनकलह, संपदा – शारदा, दोन भगिनी, भगवा मुनि, अहिल्योध्दार यांची चव घेण्यासारखी आहे. अहिल्योध्दारातील विनोद वा उपहास कोणालाही सहज हसवील.
प्रोत्साहक कवितांमध्ये उल्हास, जीवनयज्ञ, मधुहास्य, सैनिकांचे गाणे या कविता चांगल्या असून शेवटचे गाणे आवेशपूर्ण आहे.
ना. ह आपटे यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे की प्रणयप्रभा व मंजिरी ही 2 वृत्तेच कवीची मोठी लाडकी दिसतात. काही ठिकाणी परंपरेने चालत आलेल्या काही समजुती कवीने तशाच अनुसरल्या आहेत. उदाहरणार्थ रुपसंपन्नतेखाली मळकट मन आणि रुपहीनतेखाली सुंदर हदय असते. एक प्रतिभासंपन्न कवि ऐश्वर्यात लोळत असता कविता रचतो पण ती कृत्रिम ठरते आणि त्याच्याच उलट तो जीवनकलहाने गांजून जाताच त्याची रचना रसपूर्ण होऊ लागते.
दुसर्या खंडातील पद्यरचना गेय व काव्यरसपरिपूर्ण आहे. अमृतमंथनमधील ‘सुखदा निशा संजीवनी, राही मम मानसात, हाय दैवा ही पदे, कुंकूमधील सृष्टिसौंदर्य, कां?, रचिले प्रभुने, प्रभुराया ही पदे वाखाणण्यासारखी आहेत असे ना ह आपटे यांनी नमूद केले आहे. रचिले प्रभुने व प्रभुराया ही दोन्ही पदे शांत करुण रसपूर्ण आहेत.
तुकारामांतील एकले बीज, वांनु कितिरे, ढगावांचून आभाळ ही ओवी, गोपालकृष्णातील प्रात:काल, गोदोहन, घास, किस्नाची माया ही पदे लोकांच्या तोंडी खिळण्यासारखी गोड आहेत.

आधी बीज एकले
बीज अंकुरले
रोप वाढलें
माझा मुलगा मधील उसळत तेज भरे गगनांत, पाहू रे किती वाट ?, आभाळी पुनवेचा चांद ही भावगीते व भृंङग आणि फुलराणी हे नाट्यगीत फारच सरस व लोकप्रिय ठरले.
एका बीजा पोटी
तरु कोटी, कोटी
जन्म घेती सुमने फळे
व्यापुनि जगता
तूंहि अनन्ता
बहुविध रुपें घेसी
परी अन्ती-
ब्रम्ह एकलें !!
‘आधी बीज एकले’ या ‘तुकाराम’ बोलपटातील अभंगामुळेच शांताराम आठवले यांच्या काव्यलेखनाकडे रसिकांचे लक्ष प्रथमच जोराने खेचले गेले. या अभंगाची स्वयंपूर्ण अर्थगर्भ रचना, प्रासादिक शब्दयोजना व बांधेसूद जडणघडण यामुळे हा अभंग तुकारामबुवांचाच असावा असा संभ्रम तुकोबारायांच्या अनेक भक्तांना आणि अभ्यासकांना त्याकाळात झालेला होता. के. नारायण काळे आपल्या प्रस्तावनेत नमूद करतात की शांताराम आठवले हे एक आत्मनिष्ठ कवि आहेत. त्यांच्या बहुतेक कवितांतून प्रतीत होणाऱ्या प्रवृति आजच्या परिस्थितीच्या व आजच्या तरुणांच्या मनोवृत्तींच्या प्रातिनिधिक स्वरुपाच्या आहेत असे के. नारायण काळे म्हणतात. एका बाजूला उच्च आकांक्षा व जीवनविषयक उदात्त, भव्य अपेक्षा आणि दुसर्या बाजूला त्यांना गोठून मृतवत करुन टाकणारी निराशाजनक अशी राजकीय व सामाजिक परिस्थिती या दोहोंच्या झगड्यांतून आजच्या ध्येयवादी तरुणाच्या भावनाक्षम हृदयांत उत्पन्न होणारी आंदोलने श्री आठवले यांच्या कवितांतून उमटली आहे हे त्यांचे निरीक्षण आहे.
इ स 1925 ते 1938 या एक तपाच्या अवधीत वेळोवेळी लिहिलेल्या व ‘शांताराम’ या नावाखाली प्रसिद्ध झालेल्या निवडक कविता या संग्रहात आहेत. इ. स. 1933 पासून 1938 पर्यंतच्या कालात ‘प्रभात’ च्या अमृतमंथन, तुकाराम, कुंकू, गोपालकृष्ण आणि माझा मुलगा या 5 बोलपटांसाठी लिहिलेली व लोकप्रिय झालेली पद्ये यांचा हा संग्रह आहे.

आज हे पुस्तक सहसा कोठेही उपलब्ध होत नाही. जुन्या काळातील मागील पिढीचे हे अक्षरधन आहे ! याचे जतन होणे गरजेचे आहे. या अक्षरधनाकडे आजच्या व येणाऱ्या पिढींचे लक्ष वेधणे हाच या लेखांचा उद्देश आहे.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खरच खूप सुंदर . एका दुर्मिळ पुस्तकाची खूप सुंदर ओळख
दुर्मिळ पुस्तकाची सुंदर ओळख, हे अक्षर धन आपले संचित आहे ते जपले पाहिजे.