पारिजात
‘पारिजात‘ हा दिवाकर गंधे यांचा पहिला कथासंग्रह, १९६६ मध्ये त्यांनी प्रकाशित केला. या पुस्तकास सोपानदेव चौधरी आणि ग. दि. माडगूळकर यांची प्रस्तावना आहे. १३५ पृष्ठांच्या या पुस्तकाचे मूल्य रु ३.५० होते.
दिवाकर गंधे यांचा जन्म २६/९/१९३९ रोजी झाला व १/३/२०१९ रोजी त्यांचे निधन झाले. मराठी नाट्य समीक्षक व चित्रपट विषयक लिखाण करणारे लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाचे ते संपादक होते. त्यांच्या काळात अनेक विशेषांक निघाले. चित्रगंध, जीवन एक उत्सव, झुंबर, नातं रुपेरी पडद्याची, रुपेरी पडद्यावरील सुवर्णाक्षरे, शतऋतू, स्वरगंध, स्वरधुंद आणि हुशेनचा घोडा ही त्यांची इतर पुस्तके प्रसिद्ध आहेत.
“पारिजात” या कथासंग्रहात १२ कथा आहेत. या संग्रहातील पारिजात या मनोविश्लेषणात्मक कथेत दिलीप आणि सुनंदा यांच्या विशुद्ध प्रेमाची कथा आहे.
बाहेर पाऊस पडतो आहे या कथेत न्यायाधीश पदावर आपल्या प्रेयसीला फाशीची शिक्षा देण्याचा प्रसंग येतो ते दाखवले आहे. हाक या कथेत एकट्या माणसाला कोणीतरी हाक मारावी वाटते त्याचे वर्णन केले आहे.
छाया या कथेत छाया हे नाव पत्नीला कसे दिले तो पूर्वोतिहास आहे. ती आझाद हिंद सेनेत कशी निघून जाते ते सांगितले आहे.
उपेक्षिता या कथेत एका लग्न न होऊ शकणार्या कुरुप मुलीची व्यथा मांडली आहे.

रंगावरची साय या कथेत लग्नाआधी काढलेले एका मुलीचे पोर्टेट हाती आल्यावर त्यावर कुंकू काढायचे कसे राहून जाते व नेमके तिचा नवरा विमानअपघातात कसा जातो ते वर्णन केले आहे.
शल्य या कथेत ज्या शिक्षकामुळे डॉक्टर होतो त्यांना वेळेवर मदत न केल्यामुळे त्यांची पत्नी दगावते त्याचे शल्य बोचते याची कथा आहे.
जेव्हा तिसरा पक्षी उडून जातो या कथेत मुलीला पहायला आलेला मुलगा तिच्या आयुष्यात दुसरे कोणी आहे हे समजल्यावर दूर निघून जातो अशी कथा आहे.
आरती या कथेत कार्तिकी एकादशीला श्रीरामाच्या रथाला आरती करण्याचा घराण्याला पहिला मान असलेल्या पण वय झाल्यामुळे व मुले ती परंपरा पुढे नेण्यास उत्सुक नसल्याने होणारी तगमग चित्रित केली आहे. तरीही आरतीसाठी गर्दीत जाण्याच्या प्रयत्नात दूर फेकले गेले तरी आरतीचे ताट विझू न देता एक भिकार्याचे पोर आरती करतं असे दाखविले आहे.
तडा या कथेत मुल होऊ न शकणार्या पण बाळ झाले आहे या आभासात जगणार्या पत्नीबरोबर पतीची होणारी तगमग आहे.
तुझ्या हाकेची वाट पहातो आहे या कथेत पुढे निघून गेलेल्या पत्नीला सर्व जबाबदाऱ्या कशा पूर्ण केल्या आहेत व फक्त तिच्या हाकेची कशी वाट पहात आहे ते स्वगत आहे.
न आळवलेला राग या कथेत मूलबाळ नसलेल्या गायकाचा सारंग हा आवडता राग असतो पण तो आपल्या मुलाला शिकविल्याशिवाय मैफिलीत आळवायचा नाही अशी प्रतिज्ञा केलेली असते. त्याला मुलगा होतो पण मुका आणि बहिरा. अशी व्यथा यात मांडली आहे.
दिवाकर गंधे यांच्या कथा विश्वातील चित्रात्मक व मनोविश्लेषणात्मक शैलीतील कथा आपल्याला आपल्याशा वाटत राहतात. आपलीच व्यथा त्या मांडतात. सध्या हा संग्रह दुर्मीळ आहे.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख पुस्तक परिचय.