मनामध्ये आपुलकीचा व चेहर्यावर नेहमी स्मितहास्य असणारे देवमाणूस उद्योजक श्री चंद्रकांत शेटे म्हणजेच आपले अण्णा. जाणून घेऊ या त्यांची प्रेरक कथा….
सातारा जिल्ह्यातील कासार शिरंबे या खेडेगावातून मुंबईत येऊन आपले यशस्वी अस्तित्व निर्माण करणारे श्री चंद्रकांत शेटे यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
गरिबीमुळे इच्छा असूनही एस एस सी पर्यंत शिक्षण घेऊन ते त्यांना अर्धवट सोडावे लागले. शहरातील राहणीमान पाहता स्वतःचे उत्पन्न असणे जरुरीचे आहे या विचारामुळे त्यांचे काका श्री. बी बी शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत इमिटेशन ज्वेलरी या व्यवसायाचे धडे त्यांनी घेतले व काही वर्षातच व्यवसायाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केले.
आपले लहान बंधू श्री शशिकांत शेटे व ज्येष्ठ बंधू श्री.सुधाकर शेटे यांच्या साथीने अण्णांनी 1967 साली
स्वतःचा इमिटेशन ज्वेलरीचा “शृंगार ज्वेलर” या नावाने अगदी छोटासा व्यवसाय राहत्या घरात सुरू केला. ज्वेलरीच्या बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून उत्कृष्ट दागिने निर्माण करून ज्वेलरीच्या व्यवसायात स्वतःचा शृंगार ज्वेलरी नावाने ब्रँड तयार केला. मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग, होलसेलिंग अशा विभागातून छोट्या व्यवसायाचे एका नावाजलेल्या व्यवसायात रूपांतर झाले.
चार माणसांना रोजगार देणारा व्यवसाय शंभराहून अधिक लोकांना रोजगार पुरवू लागला. अण्णांनी स्वतःच्या गावातील अनेक मुलांना आपल्या कंपनीत कामास लावून त्यांचेही संसार उभे केले. दागिन्यांमध्ये सुबकता यावी म्हणून वेळोवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान, सामुग्री याचा वापर केला. कालानुरुप स्वतःमध्ये व व्यवसायामध्ये बदल करत व्यवसायाची यशस्वी गोल्डन ज्यूबली पार केली.
स्वतःचा उत्कर्ष करता-करता आपल्या कंपनीतील कामगारांचीही आर्थिक प्रगती कशी होईल याकडे लक्ष देत त्यांनी समाजसेवेचे ही कार्य हाती घेतले. समोरील व्यक्ती कितीही सामान्य असली तरीही त्याच्याकडे असलेला चांगला गुण आत्मसात करणे व त्यानुसार वागणे हा त्यांचा स्वभावच आहे. हातात घेतलेले काम उत्साहाने पूर्ण करणे व अखंड कार्यरत राहणे त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांचे काका श्री बी बी शेटे यांच्याकडून समाजकार्याचा वसा घेऊन तन-मन-धन ह्यांनी समाज सेवेसाठी स्वतःला वाहून दिले.
एकत्र कुटुंबात राहून घरातील बंधू व त्यांच्या मुलांना व्यवसायात सामावून घेतले. एका खांद्यावर व्यवसाय व दुसऱ्या खांद्यावर समाजसेवा सांभाळत समाजातील तळागाळातील लोकांना एकत्र आणण्याचे बहुमूल्य कार्य ते आजही करत आहेत.
माणूस कितीही लहान असो त्याच्याशी आपुलकी व प्रेमाने वागून त्याला संकटसमयी धीर देणे अथवा गरजे वेळी मार्गदर्शन करणे ही त्यांच्यातील नम्रता आपण शिकण्यासारखी आहे.
समाजासाठी असलेली तळमळ बघून समाजाने जवळजवळ वीस वर्ष सो. क्ष. कासार समाजाच्या मुंबईचे अध्यक्षपद त्यांना बहाल केले. पुढे 1994 साली अखिल भारतीय कासार समाजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. अण्णानी त्यांच्या कारकिर्दीत समाजोन्नती मासिकात सकारात्मक बदल करून मासिक अधिकाधिक समाजाभिमुख केले. समाजातील महिलांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी व सर्व स्तरावर महिलांची प्रगती व्हावी ह्यासाठी कै. श्री. यशवंत दोडे सर, श्री.दिनानाथ चिमणपुरे, कै.सुमनताई कासार यांच्या साह्याने
अनेक उपक्रम राबवून महिलांना प्रोत्साहन दिले.
अध्यक्षपदाच्या अण्णांच्या कारकीर्दीत १९९५ साली डिसेंबर महिन्यात, विधान मंडळाच्या नागपूर अधिवेशनादरम्यान अखिल भारतीय स्तरावरील प्रचंड मोठा मेळावा महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव राजाभाऊ झरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली भरविला होता.
अण्णांच्या अध्यक्षतेखाली मलाही काही काळ मुंबई मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गरीब समाज बांधव, महिला यांच्या विकासाची तळमळ, कार्य तत्परता, धडाडीने काम करण्याची सवय, कमीतकमी बोलून प्रत्यक्ष कृतीवर भर, नम्रता, संवेदनशीलता हे त्यांचे गुण सर्व प्रवासादरम्यान व एरव्हीही दिसून येत. त्यावेळी अथक प्रयत्न करून आम्ही मुंबई व परिसरातील ७५० समाज बांधवांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक असलेली “कासार संवादिनी” प्रकाशित केली होती.
स्वतःला सतत कार्यरत ठेवण्याच्या स्वभावामुळे व्यवसाय मुलावर सोपवून, अण्णांनी स्वतः गावच्या शेतीचे कार्य हाती घेतले. वयाच्या सत्तरीत सुद्धा समाज बांधिलकीची जाण ठेवून गरीब शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे फायदे व आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती दिली. शेतकरी गटाच्या सहाय्याने गावकऱ्यांच्या उत्कर्षासाठी ते झटत आहेत. कासार शिरंबे येथील कालिका देवीच्या देवळात सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे म्हणून कालिका प्रकट दिन, चैत्र शुद्ध नवमी उत्सव, नवरात्र उत्सव, लहान मुलांसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धा असे उपक्रम त्यांनी चालू केले. मोकळ्या वेळेत स्वस्थ न बसता घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती करून घराच्या गच्चीवर सुद्धा अण्णांनी सुंदर बाग फुलवली आहे.
विलेपार्ले येथील पार्लेकर वृक्षमित्र या मंडळाचे सदस्य होऊन अनेक ठिकाणी त्यांनी वृक्षारोपणही केले आहे.
शहरातील लोकांची खाण्याची आवड व गरज ओळखून, आपल्या पत्नीस व सुनेस, घरगुती खाद्य पदर्थांच्या व्यवसायासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. सुरुवातीस चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी अशा फराळाच्या पदार्थांची ऑर्डर घेता घेता संपूर्ण जेवणाच्या ऑर्डर घेण्याससुद्धा सुरुवात केली. घरगुती छोटा व्यवसाय बघता-बघता कालिका फूड्स ह्या नावाने नावारूपास आला. चकली व पुरणपोळी चोखंदळ पार्लेकरांची पसंत आता विदेशातील लोकांच्याही आवडीची झाली आहे. अण्णांची पत्नी सौ जयश्रीताई यांची त्यांना सर्व व्यावसायिक व कौटुंबिक बाबीत नेहमीच मोलाची साथ लाभली आहे.
अण्णांनी यशस्वी जीवन नौका चालू असताना चारित्र्यावर स्वार्थ, खोटेपणा, अहंकाराचा डाग कधी पडू दिला नाही. आज वयाच्या 76 व्या वर्षीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कार्यरत राहणे हा त्यांचा स्वभाव नवीन पिढीला विचार करण्यास लावणारा आहे.
अण्णांची कन्या अनिता कुंदप हिने त्यांच्यावर लिहिलेली अत्यन्त समर्पक कविता इथे देण्याचा मोह आवरत नाही….
अण्णा आमचे देवमाणूस
अण्णा आमचे फादर
न्हवे खरं तर गॉडफादर
कळले नाही इंग्रजी
सांगते आता मराठीत
कारखान्यावर अण्णांची
फारच निष्ठा
शून्यातून उभे राहण्यासाठी
केली प्रयत्नांची पराकाष्टा
दुसऱ्यांना मदत करणे
हा मनाचा संस्कार
स्वतःबरोबर फुलवले
अनेकांचे संसार
कर्तव्या बरोबर जाणले
समाजाचे ऋण
समाजकार्य करताना
दाखवले नेतृत्वगुण
समाजोन्नतीची उचलली धूरा
दिवस पडू लागला अपुरा
रात्रीचा केला दिस
कामाचा पाडला किस
कधी नाही करत
कुणाचा हेवा
शांत निर्मळ सतशील मनाचा
आहे अनमोल ठेवा
शेतीची आहे त्यांना
भारी आवड
विज्ञानाची घालतात
नेहमी सांगड
सतत काम अन् काम
हाच मनीचा भाव
झोप अन् आळस
कधी ना त्यांना ठाव
न कधी राग
न कधी संताप
सर्वांना आपलेसे करतात
हाच त्यांचा प्रताप
थोर विचारी हा
माणूस माणूस
म्हणून सारे म्हणतात
अण्णा आमचे देव माणूस l
– रचना : अनिता कुंदप (शेटे)
अशा या देवमाणूस व उद्योजक अण्णांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
गावाकडे अण्णांचे घर आमच्या घराच्या अगदी समोरच ,मी स्वताला भाग्यवान समजतो की अण्णांचे समाजकार्य मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय …आण्णा मुंबईवरून गावी आले की कधीही न भेटता जात नाहीत.समाज्याबद्दल असलेली त्यांची तळमळ नेहमीच त्यांच्या कार्यातून बघायला मिळते.आण्णा गावाकडे आले की सगळ्यांची विचारपूस करून अडचणीत असलेल्याना नेहमीच ते दिलासा देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात..आजच्या या धावपळीच्या जीवनात कोणीच कोणासाठी वेळ देत नसताना आण्णा मात्र वयाची 70 वर्षे पार केलेली असतानाही जमेल तेवढे समाजकार्याचे पुण्य आपल्या पदरात पाढुन घेत आहेत.आण्णांच्या या कार्याला सलाम .आणि आई कालिकामाता त्यांना निरोगी आरोग्य देवो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य असेच तेवत ठेवो !! हीच इच्छा…
त्यांच जीवन खरोखर आनंद देउन जाते
अण्णांचा हा अखंड प्रेरणादायी प्रवासाला सलाम, आम्हाला पण प्रेरणा मिळाली, फार छान वाटले अण्णांचा जीवन प्रवास आम्हाला ऊर्जा देणारा आहे
🙏 🙏 💐 🙏 🙏
होय खरंच देवमाणुसच आहेत आण्णा. त्यांनी त्यांच्या व्यवसाया बरोबर आपल्या समाजकार्याच भान ठेवून समाज बांधवाना व्यवसाया आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज त्याच धंद्यात आहोत. त्यांना शतशः नमन.👏
खुपच छान लेख वाचणेस मिळाला !!
शेटेआण्णा यांचा जीवनप्रवास वाचून खरोखरच छान वाटले .त्यांचे जीवन प्रेरणादायीच आहे.आण्णा सतत हसतमुख असतात .व समाजकार्याचे वेळी देहभान विसरून काम करतात .
शेटेआण्णा यांना मानाचा मुजरा !!!
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक
मदन
कोकीळ .कराड .
आण्णांविषयी भरपूर ऐकून होते. आज मात्र त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास वाचून खरोखरच छान वाटले. प्रेरणादायी जीवन. अण्णांना मानाचा मुजरा व खुप खुप शुभेच्छा.
खरंच देवमाणूस. खडतर प्रवास करून शुन्याला महत्व प्राप्त करून, तळमळीने समाज कार्य करण्याची भावना, साक्षात दंडवत! खूपच छान लेख वाचावयास मिळाला.
शेटे आण्णा हे कसारशिरंबे गावचे एक अनमोल रत्न आहेत,स्वछ्य आणि गंगेसारखे निर्मळ मन असलेले ते एक देवस्वभावी व्यक्ती,सतत हसतमुख आणि उत्साही असणारे आण्णा देहभान विसरून समाजकार्य करतात
त्यांना कालिका माता उदंड आयुरारोग्य आयुष्य देवो ही नम्र प्रार्थना
कासारशिरंबे गावाचे भूषण अण्णांना मानाचा मुजरा.
चंद्रकांत शेटे यांच्याविषयी ऐकून होते पण आत्ता जे सविस्तर कळले ते वाचून नतमस्तक झाले. उत्तुंग व्यक्तिमत्त्व. आणि पत्नी, सुनां चेही कौतुक की एक व्यवसाय उत्तम असताना आराम, चैन करण्याची सोडून स्वतःचा दुसराच व्यवसाय सुरू करून तो यशस्वी केला. शेटे कुटुंबास सलाम. भारतात आले ki त्यांना भेटायला nakki आवडेल आणि देवेंद्र जी यांचे आभार की त्यांनी yanchi ओळख करून दिली.
वा खुपच छान सुंदर शेटे अण्णांची जीवन गाथा खुपच सुंदर शब्दांत सांगितली 👍
Newsstorytoday चे हे खुप छान वेगळे पण आहे.
इथल्या बातम्या व लेख सुंदर विचार करायला लावणारे असतात हेच वेगळे पण मनाला भावते.
असेच छान माहिती पुवॅक लेख नेहमी वाचाला मिळो.
आमच्या कडून खुप खुप हादीॅक हादीॅक शुभेच्छा 👍💐
अण्णांचा जीवनप्रवास खरोखरच स्फूर्तिदायक.