माजी लष्करी प्रमुख श्री मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावर सध्या राजकीय गदारोळ चालू आहे. खरे पाहिले तर संवेदनशील जबाबदारीच्या पदावर कार्य करणाऱ्या अधिकारी व्यक्तींना नेहमीच विशेष दक्षता घ्यावी लागते. कुठे, काय, किती बोलायचे, लिहायचे याचे भान असावे लागते. किंबहुना काय बोलू नये, लिहू नये याचे तर जास्तच भान असावे लागते. इथे तर संरक्षण खात्याचा, दोन देशाच्या सीमेवर घडलेल्या प्रसंगाचा प्रश्न आहे. अशा गोष्टी गुंतागुंतीच्या असतात. जास्त सेन्सिटिव्ह असतात. संरक्षण खात्याबाबतच नव्हे तर उद्योग, व्यापार, आय टी, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात स्पर्धेच्या दृष्टीतून गुप्तता पाळणे आवश्यक असते. नोकरीच्या टर्म्स अँड कंडीशनस मध्ये तसे स्पष्ट नमूद केलेले असते. अगदी परदेशातील नासा, के जी बी किंवा राष्ट्राच्या गुप्तचर संस्था यांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनाही हे गुप्ततेचे संकेत पाळावेच लागतात. असे असताना सीमेवर नेमके काय घडले, का घडले याची उघड पुस्तकातून चर्चा करण्याचे औचित्य समजत नाही.
पुस्तक प्रकाशनापूर्वी संरक्षण खात्याची परवानगी घेणे हे प्रकाशकाचे काम नाही. ती लेखकाची जबाबदारी आहे. कारण जे लिहिले त्याच्या परिणामाची जबाबदारी लेखकाची. प्रकाशकाची नव्हे !
दुसरे असे की जो भाग प्रसिद्ध झाला, त्यात नेमके हरकत घेण्यासारखे काय हेही या गदारोळात स्पष्ट होत नाही. कशाबद्दल कुणाला जबाबदार धरायचे, कुणाला नेमके दोषी ठरवायचे हे प्रसंग घडून गेल्यानंतर आता ठरवायचे, त्याची चिरफाड करायची यामागचे कारण देखील उलगडत नाही. कदाचित आमच्या सारख्या सामान्य नागरिकाचे मर्यादित राजकीय अज्ञान याला कारणीभूत असू शकते !
मी स्वतः मायक्रोवेव्ह रडार या क्षेत्रात संशोधन केले आहे. जे बहुतांशी संरक्षण खात्याच्या उपयोगाचे आहे. आधी दहा वर्षे आय आय टी अन् नंतर तीस वर्षे उस्मानिया विद्यापीठात मी डी आर डी ओ, इस्रो च्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. त्याच्या करार पत्रातच यातील स्पेसिफिकेशन्स, उपयोगिता याबद्दल कुठे वाच्यता करणार नाही अशी ग्वाही द्यावी लागते. माझ्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी पी एच डी साठी काम केले त्यातील पन्नास टक्के विद्यार्थी संरक्षण खात्यातील प्रयोगशाळेतले सायंटिस्टस होते. त्यांचे पी एच डी संशोधनाचे विषय देखील त्यांच्याच प्रयोग शाळेतील समस्यावर आधारित असायचे म्हणजे केलेल्या संशोधनाचा फायदा (पदवी मिळविण्याबरोबरच) त्या प्रयोग शाळेला देखील व्हावा हा प्रामाणिक उद्देश. इथेही प्रॉब्लेम, त्याचे स्पेसिफिकेशन्स, प्यरामिटर्स, एप्लिकेशन्स याबद्दल गुप्तता पाळणे गृहीत धरले जायचे. पी एच डी चे संशोधन जर्नल मध्ये मान्यतेसाठी प्रकाशित करणे गरजेचे असते. असे पेपर्स प्रकाशित करण्यापूर्वी आम्हाला (विद्यार्थी सायंटिस्ट आणि मार्गदर्शक) ते लिखाण दिल्लीच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात पाठवून परवानगी घ्यावीच लागे. यात बराच वेळ वाया जात असे. पण ते गरजेचे होते. आवश्यक होते.
एकदा डॉ कलाम यांच्याच प्रयोग शाळेतील सायंटिस्ट माझ्या मार्गदर्शनाखाली काम करीत होता. डॉ कलाम अधूनमधुन त्याच्या पी एच डी प्रगती विषयी चौकशी करीत असत. त्यावेळी मी त्यांना ही दिल्लीच्या परवानगीची, त्यात होणाऱ्या विलंबाची कल्पना दिली. तेव्हा त्यांनी मला मोलाचा गमतीशीर सल्ला दिला. डॉ कलाम म्हणाले, तुम्ही पेपर लिहिताना जो प्रॉब्लेम सोडवता त्यातील काही पिरॅमिटर्स चा स्पष्ट उल्लेख करू नका. फ्रिक्वेन्सी,किंवा विशिष्ट फ्रिक्वेन्सी बँड हा उल्लेख टाळा. तसेच समस्या सोडविण्याच्या गणिती पद्धतीवर, नाविन्यावर भर द्या. ऍप्लिकेशन मध्ये रडार, मिसाईल हे शब्द यायला नको पेपर मध्ये किंवा प्रबंधात. जनरल कम्युनिकेशन असे ऍप्लिकेशन लिहा. चटकन परवानगी मिळेल दिल्लीची” आश्चर्य म्हणजे डॉ कलाम यांचा सल्ला खरेच मोलाचा ठरला. आमच्या सेन्सिटिव्ह प्रोजेक्ट वरील संशोधनाला देखील पब्लिकेशन साठी ची परवानगी लवकर मिळायला लागली. याला स्ट्रॅटेजी म्हणतात ! अगदी सेन्सिटिव्ह बाबतीत देखील काय कसे बोलायचे (लिहायचे) किंवा काय टाळायचे याला फार महत्व असते. सांगितले तर आश्चर्य वाटेल, पण आय आय टी त पी एच डी करताना बहुतेक मार्गदर्शक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या संशोधन विषयासंबंधी गुप्तता पाळायला सांगतात. कारण तुमच्या कडून माहिती घेऊन, तिचा वापर करून तुमच्या आधी ते पब्लिश करण्याची चलाखी या क्षेत्रात सर्रास चालते !
आजकाल गुगल, फेसबुक, इन्फोसिस, टी सी एस अशा कंपन्यात देखील विविध प्रोजेक्टच्या कार्यान्वित प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळली जाते. सध्या चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत तर सगळेच देश जास्त जागरूक आहेत. कमालीची गुप्तता पाळली जाते. डेटा ला सोन्यापेक्षा किती तरी पटीने जास्त भाव आहे आय टी क्षेत्रात !
अर्थात मूळ मुद्दा हा राजकीय कुरघोडीचा आहे. एकमेकांना अडचणीत आणण्याचा आहे. चिखल फेक करण्याचा किंवा चारित्र्य हनन करण्याचा आहे. सत्य शोधण्याचा, देश हिताचा, राष्ट्र प्रेमाचा नाही.. हेही समजून घेतले पाहिजे. अन् त्यानुसार कशाला, कुणाला, किती महत्व द्यायचे हे विवेकाने ठरवले पाहिजे. देशहीतावर चर्चा करताना सर्वांनीच तारतम्य बाळगायला हवे.
ताजा कलम : आजकालच्या जगात माहितीची उपलब्धता इतकी अधिक झाली आहे की तसेही काही गुप्त राहत नाही. उदाहरण द्यायचे तर आधुनिक शस्त्रांचे देता येईल. कुणाकडे कोणती शस्त्रे आहेत याची प्रत्येक देशाला उत्सुकता असते. या बहुतेक अत्याधुनिक शस्त्रांची सर्व माहिती देणारे जेम्स वेपन सिस्टीम हे पुस्तक सहज उपलब्ध असते. त्यात सर्व आधुनिक शस्त्रांची क्षमता, स्पेसिफिकेशन्स, प्यारमिटर्स दिले असतात. अर्थात कोणाकडे काय किती हा प्रश्न अर्थातच गुलदस्त्यात असतो.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
