छोट्या मित्रांनो, कसे आहांत ? दीड वर्ष कठीण गेलं म्हणतां ? खरं आहे, सर्व जगालाच या अदृश्य करोनाने वेठीला धरले. पण मला खात्री आहे की तरीही तुम्ही या संकटाला तोंड देत, नवीन परिस्थितीशी जुळवून घेत, ऑनलाईन अभ्यासाचे तंत्र आत्मसात करून उत्तम यश मिळविलेच असणार. आहातच तुम्ही हुशार आणि शूर.
जानेवारी महिना उजाडला की मुलांना वेध लागतात २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे ! तुम्हीही दरवर्षी मनापासून तो सोहळा, ती परेड बघतां नां ? (मी सुद्धा वर्षानुवर्षे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचा तो सोहळा अभिमानाने डोळे भरून पहाते.) हा दिवस तुमच्या कौतुकाचाही असतो. त्या निमित्ताने मी तुम्हां सर्व मुलांचे अभिनंदन करते, कौतुक करते आणि तुम्हांला तुमच्यासारख्याच शूर, बुद्धिमान मुलांच्या पुरस्कारबद्दल सांगते.
भारतातील ५ ते १८ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी केले जाते. हा पुरस्कार १९५७ पासून सुरु केला गेला.
त्याचे असे झाले,
२ ऑक्टोबर १९५७ रोजी, नेहमीप्रमाणे दिल्ली येथील रामलीला मैदानावर तोबा गर्दी होती. मैदानावर चाललेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालिन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जगजीवनराम आणि इतर मान्यवरही पहात होते. त्यावेळी अचानक शॉर्टसर्किटमुळे शामियान्याला आग लागली.तेव्हां हरिश्चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ १४ वर्षांच्या मुलाने स्वतःकडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून शेकडो लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली. न पेक्षा मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली असती. हे करतांना हरिश्चन्द्रचे दोन्ही हातही पोळले गेले. त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती नेहरू यांना प्रशंसनीय वाटली आणि अशाप्रकारे देशांत अशी अनेक शूर मुले असतील की जिवाची पर्वा न करता अशी धाडसी कृत्ये करत असतील असा विचार करून, भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली. हरिश्चंद्र मेहरा हाच या राष्ट्रीय शौर्यपुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. यानंतर त्यामध्ये पुढीलप्रमाणे इतर पुरस्कारांचा समावेश करण्यांत आला :
• राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (१९५७ पासून)
२. भारत पुरस्कार (१९८७ पासून ) ४. संजय चोपडा पुरस्कार (दोन्ही १९७८ पासून)
आपल्या अपहरणकर्त्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या गीता आणि संजय चोपडा या भावंडांच्या स्मरणार्थ शूर मुलगा आणि मुलगी यांना अनुक्रमे संजय आणि गीता चोपडा पुरस्कार देण्यात येतात.
५. बापू गायधनी पुरस्कार (१९८८ पासून)
नाशिक येथे लागलेल्या आगीत अडकलेली दोन लहान मुले आणि गोठ्यात अडकलेल्या गायी यांना वाचवताना जखमी झालेल्या आणि त्यामुळे पुढे मृत्युमुखी पडलेल्या बापू गायधनी यांच्या स्मरणार्थ ‘बापू गायधनी पुरस्कार’ देण्यात येतो.
१४ नोव्हेंबर, बालदिनाच्या दिवशी पुरस्कारप्राप्त मुलांच्या नावांची घोषणा केली जाते.
भारत सरकारने पुरस्कारप्राप्त मुलांसाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच पॉलीटेक्निक महाविद्यालयांमध्ये काही जागा आरक्षित ठेवल्या आहेत. काही राज्य सरकारेसुद्धा या मुलांना आर्थिक मदत करतात.
मुलांनो, २०२१ मध्ये, २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ३२ जिल्ह्यांमधील मुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ७ पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रात, ९ पुरस्कार इनोव्हेशन क्षेत्रात आणि ५ पुरस्कार शैक्षणिक कामगिरीच्या क्षेत्रात देण्यात आले आहेत. तर क्रीडा प्रकारात ७ बालकांना, ३ बालकांना शौर्यासाठी तर एका बालकाला समाजसेवेच्या क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चला, तर या शूर मुलांचे कर्तृत्व आपण थोडक्यांत पाहू या…
करोनाच्या कालखंडात १५ वर्षीय ज्योती कुमारी हिने आपले जखमी वडील मोहन पासवान यांना सायकलवर डबलसीट घेऊन सलग ७ दिवस गुरुग्राम ते बिहार असा तब्बल १२०० किलोमीटरचा प्रवास केला आणि त्यांना वैद्यकीय मदत मिळवून दिली.
उत्तर प्रदेशमधील लखनौचा रहिवासी असलेल्या कुंवर दिव्यांश सिंह या १३ वर्षांच्या मुलाने अन्वर झालेल्या सांडाच्या हल्ल्यातून केवळ आपल्या ५ वर्षांच्या बहिणीचेच नव्हे तर ८ जणांचे प्राण वाचवले.
महाराष्ट्रातील कमलेश वाघमारे या मुलानं बुडत असलेल्या दोन मुलांचे प्राण वाचवले. या तिन्ही मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला.
४. उत्तर प्रदेशमधील लखनौचा रहिवासी असलेला व्योम अहुजा हा बासरी, ड्रम, माऊथ ऑर्गन यांसारखी तब्बल नऊ वाद्य वाजवण्यात पारंगत आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यानं हे प्राविण्य मिळवलं आहे. त्याबद्दल त्याला संगीत क्षेत्रासाठी बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
५.कला क्षेत्रातील अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी मणिपूरच्या केंद्रीय विद्यालयातील अकराव्या वर्गात शिकणाऱ्या वेणीश कैशम हिला हा पुरस्कार देण्यात आला.(कला आणि संस्कृती)
६. हिस्टोरिकल फिक्शनचे लेखक, संडे गार्डियन आणि लोकमत टाइम्स झेस्टचे एक कला, वारसा इतिहास आणि संस्कृती स्तंभलेखक, पॉडकास्टर आणि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ जीआर ब्रिटन आणि आयर्लंडचे फेलो असलेल्या पश्चिम बंगाल मधील सौहार्द्य डे ने अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा लिहिल्या आहेत.त्याला कला आणि संस्कृती अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार दिला.
७.उत्तराखंडच्या अनुराग रमोला याने कला क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्याने आतापर्यंत 235 पुरस्कार मिळवले असून, त्याच्या कला क्षेत्रातील कामगिरीसाठी त्याला ही हा पुरस्कार देण्यात येत आहे.
८.वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम् आणि कुचिपुडी नृत्याचं शिक्षण घेणाऱ्या आंध्र प्रदेशमधील 12 वर्षांच्या अमेया लागुडू हिने भारतात आणि अनेक देशांत 100 हून अधिक कार्यक्रम केले असून तिच्या या कामगिरीसाठी पुरस्कार दिला.
९.वयाच्या अवघ्या दीड वर्षांपासून कला क्षेत्रात रमणाऱ्या आसाममधील एस. ई. आर. एस पब्लिक स्कूलमधील तनुज समद्दार याला फाईन आर्ट्समध्ये अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.सन्मानित (कला आणि संस्कृती)राष्ट्रीय पुरस्कार.
१०.केरळच्या ह्रदया आर. क्रिष्णन या मुलीनं अगदी लहान वयात वीणा वादनात प्राविण्य मिळवून अनेक पुरस्कार मिळविले , तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले.
११. पंजाबच्या लुधियानामधील नम्या जोशी या १३ वर्षांच्या मुलीने गेमच्या माध्यमातून एक अभ्यासक्रम तयार केला आहे आणि १०० हून अधिक शिक्षकांना त्याचे ट्रेनिंग दिले. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी देखील यासाठी तिचा सन्मान केला आहे.
१२ . कर्नाटकमधील राकेश कृष्णा या मुलाने शेतकऱ्यांसाठी सिडोग्राफर नावाचे यंत्र तयार केलं आहे. बियाणे पेरण्यासाठी याची मदत होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होणार आहे
१३. हैदराबादमधील हिमेश चडालवाडा या १४ वर्षांच्या विद्यार्थ्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन केलं आहे. नुकतेच त्याने अल्झायमरच्या रुग्णांसाठी मनगटी घड्याळाचे संशोधन केलं आहे.
१४ .जम्मूमधील हर्मनज्योत सिंग या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/झोनल स्तरावरील ऑलिम्पियाडमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. एक उत्कृष्ट कोडर, त्याला सर्वात तरुण गेम, Android आणि IOS ऍप डेव्हलपर म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. महिला सुरक्षेवर आधारित त्यांचे ‘रक्षा’ अँप प्रतिष्ठित सिलिकॉन व्हॅली कोड ऑफ ऑनर सर्टिफिकेटसाठी निवडले गेले आणि Google Play Store वर प्रकाशित झाले.
१५.उत्तर प्रदेशच्या नोयडामधील रहिवासी असलेल्या चिराग भंसाळी या विद्यार्थाने विविध प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशन्सची निर्मिती केली आहे. त्याने SwadeshiTech.in नावाची वेबसाइट सुरू केली, जी मुळात चिनी अॅप्स आणि उत्पादनांचे पर्याय शोधण्याचे एक साधन आहे आणि ते चीनी अॅप्सवर सरकारने केलेल्या कारवाईनंतर लगेचच आले. गणित ऑलिम्पियाडमध्ये त्याने सलग ३ वर्षे सुवर्णपदक जिंकले आहे.
१६. सिक्कीम येथील दहावीतील आयुष रंजन या मुलाने विविध प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याचे 10 पेक्षा जास्त अँप्स हे गुगल प्ले स्टोअरवर आहेत.त्याचे बक्षिसपात्र अँप्स उदा. DigiSmart BIn , ALOS ( Automated LPG Ordering सिस्टिम,Mushroom Arc
१७. महाराष्ट्रातील जळगाव येथील १४ वर्षीय अर्चित राहुल पाटील ने पोस्टपार्टम हेमोरेज कप’ (PPH कप) नावाचे नाविन्यपूर्ण, जीवन वाचवणारे, अत्यंत कमी किमतीचे सिलिकॉन उपकरण विकसित केले आहे. प्रसूतीनंतरच्या रक्ताची कमतरता अचूकपणे आणि रिअल-टाइममध्ये मोजण्यात मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे जागतिक स्तरावर माता मृत्यू दर कमी करण्यास मदत करू शकते.
१८.केरळच्या कोचीमधील पाचवीत शिकणाऱ्या वीर कश्यपने कोरोना युगा नावाचा बोर्ड गेम तयार केला आहे.
१९ .नागपूर (महाराष्ट्र) येथील चांद देवी सराफ शाळेतील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी, श्रीनाभ अगरवाल याने आपल्या नाविन्यपूर्ण शेती तंत्राने हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे.त्याचे २०० हून अधिक वैज्ञानिक लेख, २ पुस्तके आणि ७ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
वरील ९ ही मुलांना नवकल्पना (Inovation ) अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
२० .पुणे (महाराष्ट्र) येथील सोनित सिसोलकर हा भारतातील सर्वात तरुण ज्वालामुखीशास्त्रज्ञ आणि ग्रह भूवैज्ञानिक आहे. मंगळ ग्रहाच्या मातीच्या लालसरपणावर आयनीकरण किरणोत्सर्गाच्या परिणामांवर त्याने केलेल्या संशोधनाने NASA CIS स्पर्धा जिंकली . वयाच्या 11 व्या वर्षी त्याला ‘बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड’ मिळाला.
२१. उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील मोहम्मद शादाब याने अमेरिकेतील प्रसिद्ध youth exchange and study ही स्कॉलरशिप मिळवली आहे.
२२.भुवनेश्वर,ओरिसा येथील अन्वेश प्रधान सध्या इयत्ता IX मध्ये शिकत आहे आणि त्याला जवळपास 400 प्रमाणपत्रे आणि शिष्यवृत्ती मिळाली आहे. सिंगापूर आणि आशियाई स्कूल मॅथ ऑलिम्पियाडमध्ये सलग 3 सुवर्णपदके आणि थायलंड आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकांसह इतर अनेक गौरव त्याच्या नावावर आहेत.
२३.मध्य प्रदेशमधील अनुज जैन याने जागतिक पातळीवर अनेक विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.आणि ३ स्पर्धांमध्ये त्याला सुवर्ण , रजत आणि कास्य पदक प्राप्त झाले आहे.
२४. राजस्थानच्या आनंद कुमार याने गणितामध्ये अनेक नवीन प्रमेयांचा(Theorem) शोध लावला आहे. त्याने गणितामध्ये विविध पुरस्कार मिळवले असून, ‘स्पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिप अवॉर्ड २०२० ,USA मिळविणाऱ्या जगातील १४ विद्यार्थ्यांपैकी तो एक आहे.
या चारीजणांना शैक्षणिक अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
२५ . रांची, झारखंड मधील सविता कुमारी , विशेष प्राविण्य: तिरंदाजी. 2014 पासून ती तिरंदाजीमध्ये आपले प्रावीण्य दाखवित असून विविध पुरस्कार देखील मिळवले आहेत.
२६ .त्रिपुरा मधील अर्शिया दास :वयाच्या पाचव्या वर्षी इंटरनॅशनल चेस स्पर्धेत सहभागी होणारी ही एकमेव मुलगी आहे आणि उजबेकिस्तानमध्ये झालेल्या शालेय आशियाई चेस स्पर्धेत नॉर्थ इस्ट राज्यांतील सहभागी एकमेव स्पर्धक !
२७. मध्य प्रदेशमधील पलक शर्मा हिने लहान मुलांच्या वयोगटातील आशियाई जलतरणपटू म्हणून २०१९ मध्ये सुवर्णपदक मिळविले.
२८.महाराष्ट्रातील काम्या कार्तिकेयन ही 13 वर्षीय मुलगी सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. तिने विविध शिखरे आणि पर्वत सर केले असून,एक्सप्लोररचे ग्रँड स्लॅम पूर्ण करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती बनण्यासाठी ती ‘साहस’ नावाच्या मिशनवर आहे.
२९.अलाहाबादच्या 16 वर्षीय मोहम्मद रफीने 2019 मध्ये मंगोलियात झालेल्या पहिल्या आशियाई आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकले.त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि चॅम्पियनशिपमध्येही अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
३०.खुशी चिराग पटेलने वयाच्या ४ व्या वर्षी स्केटिंगला सुरुवात केली आणि तेव्हापासून तिने अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलात्मक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
या साहीजणांना खेळ या विभागातील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले.
३१. तामिळनाडूतील महिंद्रा वर्ल्ड स्कूलची इयत्ता 3 री ची विद्यार्थिनी, प्रसिध्दी सिंग ही फॉरेस्ट फाऊंडेशनची संस्थापक आहे. येत्या दोन वर्षांत १ लाख फळझडे लावण्याच्या मोहिमेवर ती आहे. तिने आधीच 13,500 फळझाडे लावली आहेत आणि पक्ष्यांना, खारींना खायला देण्यासाठी आणि प्रत्येकाला ताजी फळे देण्यासाठी फळांची 13 जंगले तयार केली आहेत. वयाने सर्वात लहान वन निर्माण करणारी म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये तिला स्थान मिळाले.तिच्या या सामाजिक कार्यासाठी तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
३२.मार्च 19 मध्ये अबू धाबी येथे झालेल्या World Summer Games-विशेष ऑलिम्पिकमध्ये गुजरातमधील मंत्र जितेन्द्र हरखानीने जलतरणात दोन सुवर्णपदके जिंकली.भारतीय टीम मधील सर्वात लहान असलेल्या मंत्राने दाखविलेल्या जिद्दीसाठी त्याला बाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
खूप कौतुक आणि अभिमान वाटतो या सर्व मुलांचा, त्यांच्या पालकांचा आणि गुरुजनांचा ! ही झाली पुरस्कारप्राप्त मुलांची माहिती पण मुलांनो तुम्हीही काहीतरी उपक्रम करत असालच, कला, खेळ जोपासत असालच नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त! यशस्वी व्हा, उत्तम नागरिक व्हा आणि स्वतः बरोबरच भारत देशाचा कीर्तीसुगंध जगीं पसरू दे .
जयहिंद !

– लेखन :नीला बर्वे, सिंगापूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
नमस्कार सर, खुपच छान माहिती ,आतापावेतो माहिती नव्हती. खुपच छान ,सर्वोत्तम उपक्रम. धन्यवाद सर.
खरोखर फार फार कौतुकास्पद आहेत हि सर्व मुले/मुली. इतक्या लहान वयांत केवढा मोठ्ठा पल्ला त्यांनी गाठला आहे. त्यांनी असेच खुप शिकावे व त्यांचे ध्येय मिळवावे. व भारताचा मानाचा तिरंगा जगभर फडकवावा. त्यासाठी भरघोस शुभेच्छां व शुभ आशिष. माहितीबद्दल नीला बर्वे यांना धन्यवाद.