पुरुष प्रधान व्यवस्थेत महिलांना सर्व स्तरावर संघर्ष करावा लागतो. त्यामुळे महिलांचा संघर्ष समाजातील सर्वच घटकाला प्रेरणादायी असतो. “स्ट्रगल सागा ऑफ वूमन ऑफिसर्स” या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील महिलांचा संघर्ष देश, जागतिक पातळीवर पोहचणार आहे असे असे गौरवोद्गार आयकर सहआयुक्त डॉ. संजय धिवरे यांनी काढले.

युवा साहित्यिक किरण सोनार लिखित ‘महिला अधिकाऱ्यांची ‘संघर्षगाथा‘ या मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सौ प्रतिभा सोनार यांनी केला असून “द स्ट्रगल सागा ऑफ वूमन ऑफिसर्स‘ इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन नाशिक येथील प. सा. नाट्यगृहाच्या मु.शं. औरंगाबादकर सभागृहात नुकतेच झाले. त्याप्रसंगी डॉ. संजय धिवरे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

व्यासपीठावर डॉ वेदश्री थिगळे, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. दिलीप पवार, प्रकाशक नरेशचंद्र काठोळे, प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे, अशोका स्कूलच्या मुख्याध्यापिका मिनल जोशी, डॉ बी जी वाघ, प्रकाशक विलास पोतदार निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, सावळीराम तिदमे, उपस्थित होते.

डॉ. धिवरे यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा प्रवास अत्यंत खडतर असल्याचे सांगून नवीन पिढीतील पालकांचे आपले पाल्य आयएएस ऑफिसर व्हावे असे स्वप्न असते मात्र आपल्या मुलांना त्यांचा कल आणि गती असलेल्या क्षेत्रात फूलू द्या आणि निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी प्रेरणा, शक्ती द्या असे आवाहन केले.
डॉ वेदश्री थिगळे यांनी सांगितले की, हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल आणि पुस्तक 21 व्या शतकावर कोरलेला शिलालेखासारखी शाश्वत टिकणारी नोंद असल्याचे उद्गार काढले.
श्री. जातेगांवकर यांनी पुस्तक हा लेखकाच्या आयुष्याची कमाई असल्याचे सांगून हे पुस्तक किरण आणि प्रतिभा सोनार यांच्या मेहनतीची कमाई आहे, असे उद्गार काढले.
प्रा. डॉ. पवार यांनी अनुवाद, भाषांतर ही कला असल्याचे सांगून एका अत्तराच्या कुपीतील अत्तर सुगंध न उडू देता दुसर्या कुपीत भरण्यासारखे आहे असे सांगून प्रतिभाताईंनी मुळ पुस्तकाचा सुगंध इंग्रजी अनुवाद कायम ठेवला असे सांगितले.

निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सांगितले की, इच्छाशक्ती असल्यास अपंगत्वावरही मात करता येते. पण सध्याच्या युवावर्गात मानसिक हतबलता वाढलेली असून सक्षम समाज निमितीसाठी असे पुस्तक महत्वाचे आहे.
कवी राजेंद्र उगले यांनी प्रास्ताविक केले. आभारप्रदर्शन संजय गोराडे तर सूत्रसंचालन रविंद्र मालुंजकर यांनी केले.

यावेळी नाशिकचे साहित्य संस्था युवा साहित्य मंच, अक्षरबंध प्रकाशन, कादवा शिवार, नाशिक कवी, साहित्यकणा फाउंडेशन, कविवर्य नारायण सुर्व वाचनालय, अखिल भारतीय प्रकाशक संघ नाशिक शाखा यांनी कार्यक्रम बहारदार केला
– टीम एनएसटी. 9869484800
