Thursday, September 18, 2025
Homeलेखधमाल किस्से

धमाल किस्से

ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर, हे विनोदी लेखक म्हणून सुपरिचित आहेत. आज वाचू या, त्यांनी लिहिलेले धमाल किस्से
– संपादक

१) अशी ही बनवाबनवी !
सुबोध नेहमीप्रमाणे धमाल करण्यासाठी शहरात निघत असताना पत्नीने विचारले, “मी येऊ का हो ?”
पत्नीला नकार देऊन तो बसस्थानकावर आला. काही वेळाने बस येताच तो आत शिरला. एका तरुणीजवळची जागा रिकामी दिसताच त्याने विचारले,
“बसू का?”
“बसा ना…” मुरका घेत ती म्हणाली. हळूहळू दोघांचे बोलणे सुरु झाले. काही वेळातच ती स्त्री वेगळीच आहे हे त्याला समजले. बोलता बोलता रीगल सिनेमा, पंचवटीचे जेवण आणि इंद्रप्रस्थमध्ये खोली, असा त्यांचा बेत ठरला. तितक्यात सुबोधचे केस मागून कुणी तरी ओढले. कोण आहे हे तो पाहू शकला नाही. “रीगल, पंचवटी, इंद्रप्रस्थ हीच तुमची कामे आणि हेच तुमचे भनभन फिरणे. थांबा दाखवतेच तुम्हाला. तुमच्या मागेच बसमध्ये आले आणि या सटवीसोबत तुम्ही काय केलं ते मी पाहिले. काय बोललात तेही ऐकले. याच्यासाठी नेहमी एकटे एकटे फिरता ?” म्हणत ती स्त्री पुढे आली. आपल्या शांत पत्नीचा दुर्गावतार पाहून सुबोधची वाचा बंद झाली…

२) भारी खट्याळ ग बाई !
प्रकाश नेहमीप्रमाणे शहरातील बसस्टँडवर उतरला. बाहेर आल्याबरोबर त्याला सिटीबस मिळताच आत चढला. दाराजवळच्या सीटवर तो बसला. हळूहळू बस भरली. बस निघणार इतक्यात एक सुंदर तरुणी घाईघाईने बसमध्ये चढली. दुपारची वेळ, कडक ऊन आणि त्यात धावपळ. सुंदर चेहरा लालेलाल झालेला, घामेजलेला! प्रकाश त्या तरुणीकडे पाहातच राहिला. बस सुरु झाली. कडेवर घेतलेल्या मुलासह ती तरुणी प्रकाशला खेटून ऊभी राहिली. प्रकाशला तो स्पर्श भावला. तो हलकेच, नकळत तरुणीच्या दिशेने सरकला. त्याने डोके तरुणीच्या शरीराला भिडवले. बसचे हेलकावे, रस्त्यातले खड्डे यामुळे प्रकाशचे भलतेच फावले. सिटी बसचा तो प्रवास कितीसा… पण तो संपूच नये असं वाटत असताना अचानक प्रकाशच्या डोक्यावर कोमट कोमट काही तरी पडलं. प्रकाश ने वर पाहिलं आणि त्याने ‘आ’ वासला. त्याच्या तोंडातही काही तरी पडले….
“भारी खट्याळ बाई, माझं छकुलं…” प्रकाशकडे पाहात ती तरुणी म्हणाली, “माफ करा हं लहान बाळ आहे, कुठे ही शू- शी करते हो. तुमचे नशीब चांगले, आत्ता शू केली… शी केली असती तर ?”

३) मिरचीचा प्रवास !
अजयची बस सुरु होताच अचानक सारे प्रवाशी शिंकू लागले. कुणी नाकावर रुमाल धरले, कुणी नाकावर हात लावले. कुणी नाक पुसू लागले. कुणाच्या नाकातून पाणी, कुणाच्या डोळ्यातून पाणी, कुणाच्या तोंडातून पाणी गळू लागले.
‘हे…हे…ऑं… छी..’
नाक, चेहरा पुसताना लालीलाल झाले.
एक प्रवासी बसमधून उतरताना पिशवी वाहकाला दाखवत म्हणाला, “आँच्छी ! लैच तिखट मिरची गावली व्हो… आँच्छी…’

४) विसरली बायको !
सुबोध हा मध्यमवयीन कुटुंबवत्सल माणूस! सुबोधला प्रवास फार आवडत असे. तो राहत होता ते गाव एक छोटे खेडे होते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी आणण्यासाठी सुबोधला नेहमीच गावाशेजारी असलेल्या शहरात जावे लागे. शहरात जाण्यासाठी सुबोध एका पायावर तयार असे. जशी त्याला प्रवासाची अत्यंत आवड होती, तशीच त्याला अजून एक सवय होती. प्रवासात सुबोध कोणती ना कोणती गोष्ट हमखास विसरत असे. चष्मा, वर्तमानपत्र, पिशवी, छत्री किंवा वाहकाकडून येणे असलेले सुट्टे पैसे यापैकी तो काही तरी नक्कीच विसरत असे.

दुपारचे साडेतीन वाजत होते. दूरवरच्या प्रवासाला गेलेला सुबोध सहकुटुंब शहरातील बसस्थानकावर उतरून गावाकडे जाणाऱ्या बसची वाट बघत ऊभा होता. सुबोधसोबत त्याची पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा होता. उतरल्याबरोबर तिघांनी छान जेवण केले आणि बसची वाट बघत उभे राहिले. बसची वाट पाहून कंटाळलेली पत्नी सुबोधला करंगळी दाखवून म्हणाली,
“अहो, जाऊन येते हं.”

पत्नीसोबत मुलगाही गेला. सुबोध सामानाजवळ थांबला. ते दोघे जातात न जातात तितक्यात बस आली. सुबोधने घाईगडबडीत सारे सामान आत टाकले आणि तो जागा धरून बसला. खूप वेळानंतर बस लागली असल्यामुळे गर्दीही बरीच होती.  सारे प्रवासी बसतात न बसतात तोच वाहकाने घंटी वाजवली. चालकाने ही जास्त वेळ न गमवता बस सुरू केली. हलकेच बस स्थानकाच्या बाहेर पडली. शहर मागे पडले. वाऱ्याची मस्त अशी झुळूक खिडकीशेजारी बसलेल्या सुबोधला एका वेगळ्या विश्वात घेऊन गेली. काही क्षणातच नेहमीप्रमाणे सुबोधला झोप लागली. गर्दी जास्त असल्यामुळे वाहकाला तिकीटे द्यायला वेळ लागत असताना बस एका छोट्या थांब्यावर थांबली. एक प्रवासी खाली उतरत असताना वाहकाला म्हणाला,
“साहेब, थांबा जरा. माझ्या बायकोला उतरू द्या…..”

तो प्रवासी तसे सांगत असताना झोपेतूून खाडकन जागा झालेला सुबोध ओरडला,
“साहेब, गोंधळ झाला हो. मा..मा.. बायको आणि मुलगा तिथेच विसरला की हो….”
त्याचे ते बोल ऐकून सारे प्रवासी एखाद्या वेड्याकडे पाहावे त्याप्रमाणे सुबोधकडे बघत होते….

५)  प्रवास अंधारातला :
बस सुरू झाली. पुस्तक वाचण्यात दंग असलेल्या सुबोधने मोठ्या आशेने शेजारी पाहिले, शेजारी जख्खड म्हातारा बसलेला पाहून त्याची प्रचंड निराशा झाली. त्याने पुन्हा पुस्तकात मान खुपसली. काही क्षणात चालकाने बसमधील दिवे मालवले. सुबोधने चालकावर रागावून पुस्तक बंद केले आणि मान समोरच्या आसनाच्या दांंडीवर टेकवून डोळे बंद केले. लाईट गुल, शेजारी म्हातारा अशा परिस्थितीत जाम वैतागलेल्या सुबोधच्या कानावर लाडीक आवाज आला,
” नको ना, सोडा ना….”
” ऐ …ऐ चिमटा घेऊ नको हं…”
“मग सोडा ना, मिश्या टोचतात ना.”
” ये हे…चि ..चिमटा….” तो संवाद ऐकणाऱ्या सुबोधला वेगळाच संशय आला. समोर काही तरी गडबड चालू हे ओळखून काय आहे ते बघावे या उद्देशाने बसमध्ये अंधार असूनही त्याने समोर जास्तीतजास्त डोकावण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी खाली वाकून काहीतरी करतोय हे त्याला अस्पष्टपणे दिसत होते.

सुबोध मान उंच करून, एक डोळा आणि एक कान ताणून इच्छित काहीतरी बघण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करीत असताना कोणते तरी मोठे गाव येण्याची चिन्हे दिसू लागली. बसस्थानक येण्यापूर्वी दिवे लागणार आणि चाळा करणारे जोडपे सावध होणार हे सुबोधने ओळखले. ते सावध होण्यापूर्वी बरेच काही पाहायला मिळणार या आशेने सुबोध सावरून बसला. एखाद्या मांजराने उंदराच्या बिळसमोर बसल्याप्रमाणे !
काही वेळात बसस्थानक आले तसे चालकाने गाडीतले दिवे लावले. सुबोधच्या रूपात बसलेल्या मांजराने चपळाईने डोके वर काढले तेव्हा पुढच्या आसनावरील ‘ती’ म्हणाली,
“बघा तर, किती मिश्या टोचल्यात ते. गाल लालेलाल झाले असतील….”
“बरे, बरे. झोप आता….” टोपीवाले आजोबा त्यांच्या  सहा वर्षाच्या नातवाला सांगत असताना बस स्थानकामध्ये शिरत असताना चालकाने अचानक ब्रेक दाबले आणि सुबोधचा चेहरा समोरच्या आसनावर जोरात आदळला…

नागेश शेवाळकर.

– लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. मा. भुजबळ सर,
    खूप खूप धन्यवाद!
    खूप छान मांडणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा