चोरीचा मामला अन्… !
सायंकाळची वेळ नातेवाईकाला भेटून सुबोध बसस्थानकावर आला. बस लागलेली होती. एका सीटवर एकटेच बसलेले सावज त्यान हेरले. त्याने त्या सीटजवळ जात विचारले, “बसू का ?”
“बसा” ती मधूर आवाजात म्हणाली.
सुबोध तिच्याशेजारी बसला. काही वेळाने बस सुरु झाली. वाहकाचे तिकीट देऊन झाले. वाहकाने डबल बेल दिली. चालकानज बसमधील लाईट बंद केले. वातावरण कसे वेगळेच झाले. बसमध्ये अंधार, शेजारी अनोळखी, सुंदर तरुणी सुबोध अस्वस्थ झाला. त्याची हुरहुर वाढली. काय करावे ? कसे करावे ? तो विचारात असताना दुसऱ्या बाजूने वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या. सुबोधला आश्चर्य वाटले. तो तसाच बसून राहिला. शेजारचे चाळे वाढले. सुबोधला स्वर्गात गेल्यासारखे झाले. तो प्रवास संपूच नये, बसमधले लाईट लागुच नयेत, असे त्याला वाटू लागले. चालकाने अचानक लाईट लावले. ती तरुणी घाईघाईत उठली. सुबोधला नको तितके खेटून ती सीटच्या बाहेर आली. थांब्यावर बस थांबली, तरुणी उतरली. सुबोध प्रचंड उदास झाला. तशाच अवस्थेत त्याने उरलेला प्रवास केला. त्याचाही थांबा आला. तो खाली उतरला परंतु काही तरी हलकं हलकं, विसरल्यासारखं त्याला वाटू लागलं. त्याचा हात खिशाकडे गेला आणि त्याला गरगरायला लागले. त्याचा खिसा रिकामा होता. त्याच्या फुगलेल्या खिशावर त्या तरुणीने हात मारला होता. नातेवाईकाकडील उसनवारीची वसुली त्या तरूणीने सुबोधकडून वसूल केली होती. सुबोधची स्थिती ‘चोरीचा मामला अन् कधीच नाही बोंबला…’ अशी झाली…
ध चा मा…
सुबोधच्या शेजारी बसलेल्या माणसाने वाहकाने दिलेले तिकीट खिशातून बाहेर काढले. तिकीटाच्या मागे पाहत तिकीट सुबोधजवळ देत त्याने विचारले, “साहेब, किती पैसे लिहिलेत हो ?”
सुबोधने तिकीट पाहिले तो म्हणाला, “चार रुपये.”
“कंडक्टर भलतेच चालू असतात हो. बघा, त्याच्याजवळ का चार रुपये नसतील ? परंतु मुद्दाम लिहिले. कसे होते पहा, उतरताना माणूस फार घाईत असतो. पैसे घ्यायचे विसरतो. यांची तेवढीच कमाई होते बघा. हा साऱ्यांना लुबाडतो, याला मी कसा लुबाडतो तेही बघा…”
“कसं ?”
“हे बघा… पेन द्या…” असे म्हणत त्या इसमाने सुबोधजवळची पेन घेतली आणि त्या तिकीटाच्या मागे त्या वाहकाने जसे इंग्रजी ४ लिहिले होते. अगदी तसेच त्या चारच्या आजूबाजूस त्याने ४ लिहिले. ते झाले ४४४ रुपये. त्याचे गाव येण्यापुर्वी तो प्रवासी उठला वाहकाजवळ जात म्हणाला, “साहेब, उतरायचे आहे पैसे द्या.” इसमाजवळील तिकीट बघत वाहकाने विचारले,
“हे…हे.. काय ? तुम्ही कितीची नोट दिली होती ?”
“कितीची म्हणजे पाचशेची ! विसरलात ? मला वाटलेच. तुम्ही लोक लिहिता कशासाठी ? आता मला सांगा, मी जर गडबडीत उतरुन गेलो असतो तर लागला असता की नाही पाचशेला चुना ?”
“अहो, पण तुम्ही पाचशेची नोट ..’ ”
“यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. विचारा त्या साहेबांना…” सुबोधकडे बोट करीत प्रवासी पुढे म्हणाला, “त्यांच्यासमोर मी तुम्हाला पाचशेची नोट दिली होती.. तुम्ही बऱ्या बोलाने देता का नाही ? का करु तक्रार ? सांगा. चोर अन् शिरजोर.” बराच वाद झाला परंतु शेवटी वाहकाला ती रक्कम परत द्यावीच लागली… वाहकासोबत सुबोधलाही ४४० नव्हे ४४४ चा विद्युत झटका बसला…
क्रमशः

– लेखन : नागेश शेवाळकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
