हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना रणभूमीवर पराजित करण्याचं धाडस कोणा मोगल बादशाहात नव्हतं. कारण सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे, अन् मरतात सिंहासारखेच, याला शिवकालिन इतिहास साक्षीदार आहे. महापराक्रमी, शत्रूंचा कर्दनकाळ राजे संभाजी यांचा जन्म महाराणी सईबाई यांच्या उदरी १४ मे १६५७ रोजी पुरंदर गडकिल्ल्याच्या शिखरावर झाला, अन् मराठा साम्राज्याचा जणू सूर्यच उदयास आला. संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून नावारूपाला आले.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच त्यांनी “बुधभूषण” नामक ग्रंथ लिहून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर प्रकाश टाकला. याशिवाय नायिकाभेद, नवशिख, सात सतक या ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्यांना संस्कृतसह १६ भाषा अवगत होत्या. अशाप्रकारे जगाच्या पाठीवर शिवकालीन कालखंडात त्यांनी पहिला बाल साहित्यिक होण्याचा मान मिळविला. चला तर, धर्मवीर संभाजी राजेंच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या शौर्यगाथेवर प्रकाश टाकू या…

संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे राजपुत्र असल्याने त्यांना रणांगणावरील मोहिमा अन् राजनितीतले डावपेच यांचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संभाजी राजे लहान असतानाच त्यांच्या शिरावरील मातेचं छत्र हरपलं. अत: संभाजी राजे यांचा सांभाळ आजी जिजाबाई यांनी केला. तर पुण्यातील कापूरहोळ येथील धाराऊ पाटील ह्या महिला त्यांच्या दूधआई बनल्या. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांचीही संभाजी राजेंवर खूप माया होती.
शिवछत्रपतींनी औरंगजेबच्या आग्रा भेटीच्या वेळी बाल संभाजी यांना आपल्या बरोबर नेलं होतं. त्यावेळी संभाजीराजे हे अवघे ९ वर्षांचे होते. त्याप्रसंगी औरंगजेब हे बाल संभाजी यांना म्हणाले,
“हमसे डर नही लगता क्या ? बाल संभाजी चटकन उत्तरादाखल म्हणाले की,
“हम किसीसे डरते नही,
बल्कि हमे देखकर सामनेवाले डरते हैं”.
हे धाड़सी उदगार ऐकून औरंगजेबची बोलतीच बंद झाली. धाडसीवृत्तीचं हे त्यांचं ज्वलंत उदाहरण शिवचरित्रात सुवर्णाक्षरांत कोरलं गेलं. त्यांना आम्ही वंदन करतो.
कालांतराने संभाजी राजे यांचा विवाह यसुबाई यांच्याशी झाला. पुढे त्या अष्टप्रधान मंडळात सदस्याही झाल्या. संभाजी राजेंच्या अनुपस्थितीत राणी यसुबाई ह्या राज्यकारभार सांभाळत असत. राजे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा शुभारंभ गोमंतक प्रांतापासून सुरू झाला. एका शिलालेखावर मराठी अंमलासंबंधी कोरलं आहे की, “आता हे हिंदू राज्य जहाले पासोन… पुढे याप्रमाणेच सकळही चालवावे. सहसा धर्मकार्यांना बाधा पोहोचवू नये. जर का करतील, त्यांसी महापातक आहे. जो राज्यात धामधूम करील, त्याला स्वामी जिवेच मारिन. राजश्री आबा साहेबांना जे संकल्पित आहे, ते चालवावे, हे आम्हास अगत्य”. लोकहिताचा विचार करून ते असे कडक फर्मान वेळोवेळी काढायचे.

शंभुराजेंची शिस्त अत्यंत करडी होती.अष्टमंडळातील आण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशव्यांनी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल राजद्रोहाखाली महाराजांनी या दोन्ही जणांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मृत्यूदंड दिला होता. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे शिवशंभू काळात गुन्हा करणाऱ्या आरोपीबद्दल दयामाया नसायची. त्याला कठोर शिक्षा व्हायची. संभाजी राजेंना न्यायाची चाड, तर अन्यायाची चिड होती. ते खरे न्यायदेवता होते.
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजीराजेंनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निरंतर २३ वर्षे शत्रूंशी समर्थपणे लढा दिला.हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगावर आपला अंगुठा कापून रक्ताचा अभिषेक केला, मात्र संभाजी राजेंनी एक पाऊल पुढे टाकून आपल्या स्वराज्यासाठी प्राणाचा अभिषेक करून जीवाची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाची पानं उलटून पाहिली तर, शिवरायांचे कर्तृत्व तर, शंभुराजेंचे मरणत्व ह्या दोन गोष्टींचे स्मरण होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी मोठ्या थाटमाटात संपन्न झाला. शंभुराजेंच्या जीवन चरित्रावर व्याख्यान देताना इतिहासकार प्रसाददादा वडके म्हणतात, “धर्मवीर संभाजीराजे यांनी देव-धर्माचं रक्षण करण्यात आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. त्यांचे राजकीय व आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता, धर्म रक्षा, कुशल प्रशासक ह्या सर्व राज्यकारभाराच्या बाबी पिताश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समान होत्या. शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेल्या मराठी स्वराज्याला तसूभरही धक्का पोहोचू नये, हा शंभूराजेंचा मानस होता.
धर्म अन् धर्मस्थाने रक्षणासंदर्भात त्यांनी सरदारांसाठी एक फर्मान काढले होते. ते म्हणजे “धर्म कार्यात खलेल न करणे अन् धर्म समारंभात अंतर पडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घ्यावी”. संभाजी महाराजांना साधूसंतांबद्दल नितांत आदरभाव होता. ते त्यांना मोठ्या दिलान दानधर्म करत असत.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या ३१ वर्षांच्या छोट्याखानी जीवनात सुमारे १२० युद्धे जिंकलीतं. पराभव हा शब्द तर त्यांच्या शब्दकोषात नव्हता. ते आजीवन अपराजित राजे म्हणून गणले गेले. त्यांना आम्ही सकल भूमिपुत्र नतमस्तक होतो.

छत्रपती संभाजी महाराजांचे भय राज्यात अन् राज्याबाहेर सर्वांच असायचं. अशा या जांबाज छावाचा सर्वदूर दरारा होता.केवळ मोगल बादशहांनाचं नव्हे तर, अंगावर धाऊन आलेल्या सिंहाला देखील शंभूराजेंनी सळो की पळो करून सोडलं. मोडेल पण वाकणार नाही हा त्यांचा क्षत्रिय बाणा त्यांनी अखेरच्या घडीपर्यंत जपला. औरंगजेबसारख्या राक्षसी बादशाहाकरवी देहाचे तुकडे-तुकडे झालेत, तरीदेखील दुष्ट व क्रूर मोगल बादशहासमोर राजेंनी आपली मान तुकवली नाही. त्यांच्यासह शंभुराजेंचे परममित्र कवी कलश यांचाही औरंगजेबने अतोनात छळ करून जीव घेतला. छलकपट-दगाफटका करुन दुष्ट औरंगजेबने शंभूराजेंना अटक करुन त्यांचा ठार मारले. शूरवीर, कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी, करारी बाणा असलेलं, कुशल प्रशासक, विद्वान, संस्कृतचे प्रकांड पंडित, शिस्तप्रिय, निस्सीम देशप्रेमी, जाज्वल्य राष्ट्राभिमानी असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही मराठीजन त्रिवार मानाचा मुजरा करतो.
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे भीमा, इंद्रायणी, भामा, आंद्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर त्यांचे समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. अशा या महापराक्रमी व साहसी राजाला आम्ही सकलजन जयंती दिनानिमित्त आदरांजली वाहून त्रिवार वंदन करतो.
कवी कलश यांनी शंभूराजेंच्या शौर्याविषयी गायिलेल्या ह्या दोन पंक्ती..
“हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी हैं!
पर जंजिरों में जकडा राजा अबभी सबपे भारी हैं!”
जय ⚔️ शिवशंभु !
जय 🏹 महाराष्ट्र !
— लेखन : रणवीरसिंह राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800