Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यधाडसी "समाजभूषण"

धाडसी “समाजभूषण”

आज माझ्या हाती एक छान पुस्तक लाभले. सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तुत्वाने उत्तम यश संपादन केलेल्या आणि एवढेंच नव्हे तर स्वतःबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी जीवाचे रान करणाऱ्या पस्तीस कथा नायक नायिकांचा अतिशय सुरेख रीतीने परिचय या  ‘समाजभूषण’ पुस्तकात करण्यात आला आहे. त्यासाठी अविरत शोधकष्ट घेऊन संपादन करणारे लेखक श्री देवेंद्रजी भुजबळ यांचा आणि त्यांच्या सर्व सहकारी लेखकांचा मला गौरव करतांना अभिमान वाटतो.

कासार‘ या शब्दाची व्युत्पत्ती ‘संस्कृत कास्यकार‘ अशी केली गेली आहे. “धातूशी निगडित व्यवहार करणारा तो कासार” अशी या समाजाची ओळख करून देण्यात आली आहे. काळाच्या ओघात कास्यांची भांडी जाऊन तांब्यापितळीच्या भांड्याच्या निर्मिती करण्याकडे समाजातील तरूण व्रुध्दांचा मोठ्यासंख्येने कल दिसून आला.त्यातील काही तरुण तरूणींनी परंपरागत व्यवसायात सहभागी होत,    जीवनात संघर्ष करून उच्च शिक्षणाबरोबरच विविध उद्योग क्षेत्र, व्यवसायात कमालीचे यश संपादन केले. त्यातील या ३०-३५ विभूतींच्या परिचयाबरोबरच त्यांनी समाजाला केलेले उत्तम मार्गदर्शन मला या पुस्तकातून अधिक भावले.

विद्याव्रती प्रा.स्मीता दगडे यांनी सोशल मिडियाचा उपयोग विद्यार्थ्यांनी जरुर केला पाहिजे परंतु त्याच्या आहारी मात्र जाऊ नये. आज सर्वच समाजात विद्यार्थ्यांचा पालक, आप्त, शिक्षक आणि जेष्ठ व्यक्तींशी संवाद तुटत चालला असून विद्यार्थ्यांनी स्वतःच सावरून आपले जीवन घडविण्याचा हितोपदेश केला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे.

धडाडीचे कार्यकर्ते व प्रभावी नेते म्हणून पुणे शहरात लोकप्रिय असलेले श्री हेमंतराव रासने यांनी सलग तिसऱ्यांदा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. पुणे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणाकरिता अनेक योजना त्यांनी अत्यंत धाडसीपणाने अंमलात आणल्या आहेत. ‘अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा आपले अंथरूण मोठे करा. ‘धाडसी निर्णय घेऊन चिकाटीने व जिद्दीने आपले ध्येय प्राप्त करण्याचा सल्लाही त्यांनी युवकांना दिला आहे. दहा बाय दहाच्या खोलीतून सुरु झालेला हेमंतरावांच्या कार्याचा विस्तार पुणे महापालिकेच्या अत्यंत महत्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पदा पर्यंत पोहचला या शब्दात रश्मी हेडे यांनी त्यांचा प्रेरणादायी कार्याचा सुरेख परिचय करून दिला आहे. तो संपूर्णतः वाचलाच पाहिजे

मानसरोगतज्ञ डॉ. नीलम मुळे यांनी संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते हे समजून ताणतणावांना दूर ठेवण्यासाठी आपल्या आवडीनुसार छंद जोपासले पाहिजेत असे त्यांचे मोलाचे विचार श्री देवेंद्रजी यांनी आवर्जुन दिले आहेत. स्वतः नीलमजी यांना अभिनयाचा, माँडेलिंगचा कविता करण्याचा छंद आहे. आजपर्यंत दहा मराठी चित्रपटातून त्यांनी विविध भुमिका केल्या असून पन्नासाहुन अधिक जाहिराती केल्या आहेत. त्यांनी व्यक्तीमत्व विकासावर एक पुस्तक लिहिले आहे.

समाजात सातत्याने आशावादी द्रुष्टीकोन निर्माण करण्यासाठी अविश्रांत झटत असणारे आणि इतरांना जगण्याची प्रेरणा देणारे ‘माझे मार्गदर्शक माझे गुरू ‘म्हणून श्री. देवेंद्र भुजबळ यांच्या खडतर जीवनप्रवासाचे मनोज्ञ दर्शन रश्मी हेडे यांनी केले आहे ते संपूर्ण वाचलेच पाहिजे. बिकट परिस्थितीशी सामना देत धैर्याने, आणि निर्भिडपणे यशाचे शिखर ते गाठू शकले यांचे प्रासंगिक टिपण उत्तम प्रकारे केले आहे. देवेंद्र यांच्या स्वभावातील चिकाटी, कष्टाळूपणा, जिद्द, धाडस आणि स्वाभिमानाचे दर्शन निश्चितपणे प्रेरणा देणारे आहे. नम्रता, माणूसकी, व सर्वांना मदत करण्याची भावना असल्याने ते आजही सर्वांशी विनम्रतेने जोडले गेले आहे हे मला तर देवेंद्रजी यांच्या प्रदीर्घ सहवासातून देखील दिसले आहे, अनुभवास आलेले आहे.

दिव्यांग, गतिमंद मुलामुलींसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. प्राजक्ता कोळपकर यांच्या सर्वांगीण कार्याचा परिचय अतिशय सुरेखपणे विषद केला आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या प्राध्यापक, अभिनेत्री, पत्रकार, समुपदेशक, निवेदिका म्हणून कार्य करू शकल्या असत्या. पण त्यांनी बिकट वाट निवडली.
त्यांनी लिहिलेला ‘परिवर्तन’ हा अनुबोधपट चांगलाच गाजला. कोरोनाकाळात गतिमंद मुलांकडून ५० हजार पणत्या तयार करून त्या प्रत्यक्षात विकल्याचा संकल्पाचे सर्वत्र कौतुक झाले.

अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या सौ.अलका देवेंद्र भुजबळ यांचं अभिनय, नाट्य, चित्रपट, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक कार्य, आरोग्य जनजागृती, प्रसारमाध्यमे, अशा विविध क्षेत्रात सातत्याने केलेले कार्य प्रशंसनीय तर आहेच, परंतु चार वर्षापूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाच्या आजाराला ज्या धैर्याने, न डगमगता त्यांनी जे तोंड दिले त्याला तोड नाही. त्यांचा परिचय लेख पूर्णपणे वाचलाच पाहिजे म्हणजे त्यांच्या कार्याची कल्पना येईल.

ज्ञानयोगिनी प्रा.डॉ. स्मीता होटे, समाज सेवी स्मीताताई धारूरकर, रश्मी हेडे, रणरागिणी कांचन दोडे, महाराष्ट्र शिवरत्नपुरस्कार विजेत्या चित्रकार प्रतिभा रावळ या महिलांच्या सर्वांगीण गुणांचा परिचय या पुस्तकातून निश्चितपणे होतो.

याशिवाय सौर ऊर्जा उद्योजक सुनील टोंगे, पोपटलाल डोर्ले, चंद्रकांत शेट्ये, विठ्ठल अक्कर, संजय वजरीणकर या उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा परिचय उत्तम झाला आहे.

तरूणांचे प्रेरणादायी आनंद डांगरे, हेमंत कासार, राजेंद्र गोसावी, रविंद्र लाळे, अशोक जवकर, मनीष बोबडे, महेश कोकीळ, योगेश व प्रियांका, सेल्फमेड अनिल नागपूरकर यांचे तसेच शाहीर हेमंतराजे मावळे, नाणी संग्राहक गौरव रासने, आदर्श शिक्षक क्रुष्णकांत सासवडे, आदर्श डॉक्टर सचिन पाथरकर, डॉ. संतोष मोहिरे, राजेंद्र अचलारे, मलेशियातील प्रशांत टंकसाळे यांच्यावरील लेखांमुळे सर्वांचे कार्य चांगले लक्षात रहाते.

वाळू माफिया या ज्वलंत सामाजिक विषयावरील “रेती” या चित्रपटाचे निर्माते श्री प्रमोद गोरे, व्रुक्षप्रेमी दांपत्य शेखर व सम्रुध्दी वैद्य, सोन्यासारखी माणसं कुंदप काकाकाकू यांच्या कार्याचा परिचय या ‘समाजभूषण‘ पुस्तकामुळे झाला.

या सर्वांचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व बदलत्या काळानुसार बदलले. सर्वांनी शिक्षणाची कास धरली. मळलेली वाट सोडून, धाडसाने नवीन मार्ग निवडले आणि संघर्ष करून उत्तम यश संपादन केले.

विस्तारभयास्तव मी या पुस्तकावरचे परिक्षण आटोपते घेतो. मात्र एक गोष्ट “समाजभूषण” सारखे पुस्तक समाजातील सर्वच थरात पोहचले पाहिजे. सर्व नायक, नायिकांना आणि उत्कृष्ट संपादनाला माझा मानाचा मुजरा…!!

सुधाकर तोरणे

– लेखन : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. श्री देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीत आणि सुंदर शब्दांत साकार केलेल्या ‘समाज भूषण’ ह्या पुस्तकाचे परिक्षण नव्हे तर पुस्तकाचं सार व्यवस्थितपणे श्री सुधाकर तोरणे सरांच्या लेखणीतून उतरलेलं आहे. लेखक व परिक्षक दोघांचेही खूप खूप अभिनंदन.

  2. समाजभूषण हे वाचलेच पाहिजे असेपुस्तक आहे
    सुधाकर तोरणे यांनी छान परीक्षण केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments