धडाडीचे कार्यकर्ते, उत्तम वक्ते, प्रतिभाशाली नेतृत्व असणारे, अतिशय कौशल्याने काम करण्यात हातखंडा असलेले व सलग तिसऱ्यांदा पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेले धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणजे हेमंत रासने हे होत.
हेमंतजींचा जन्म आजोळी शिरवळ येथे १३ एप्रिल १९७० रोजी झाला. त्यांचे मुळ गाव संगमनेर. वडील नारायण केशवराव रासने तर आई ज्योती यांच्या उत्तम संस्काराची शिदोरी त्यांना लाभली. आईने जिद्दीने, अथक प्रयत्नातून त्यांना पुण्यातील अतिशय प्रतिष्ठीत अशा नूतन मराठी विद्यालय (नुमवी) शाळेत टाकले. मुलांनी चांगल्या शाळेत शिकावे हा आईचा आग्रह होता. त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हा मुख्य उद्देश होता. प्रामाणिकपणा, हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ न बसणे हे बाळकडू त्यांना पालकांच्या व शाळेच्या संस्कारातुन मिळाले.
आज वैभवशाली असलेले रासने कुटुंब पूर्वी पुण्यात दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहत असे. पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपतीच्या जवळच त्यांचे घर होते. त्यामुळे अगदी लहानपणापासून मंडळात जाऊन ते काम करत.
दिगंबर केशव रासने, दत्तात्रय केशव रासने व अप्पा रासने असा सर्व रासने परिवार अगदी पूर्वीपासूनच सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे समाज कार्य हे जणू त्यांच्या रक्तातच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
घरची परिस्थिती बिकट असल्याने वयाच्या अठराव्या वर्षी ते सुवर्णयुग सहकारी बँकेत रुजू झाले.
मात्र घरच्या मुख्य जबाबदाऱ्या पार पाडल्यावर १९९७ साली त्यांनी नोकरी सोडण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला.
हेमंतजी नोकरी सोडून बांधकाम क्षेत्राकडे वळले. चाळीस लाखाची पोकलँड मशीन खरेदी करून त्यांनी व्यवसायाला सुरवात केली. ही मशीन पाटबंधारे खात्याच्या धरणाच्या खोदकाम करण्यासाठी वापरली. पुढे व्यवसायात त्यांची चांगलीच भरभराट होत गेली.
व्यवसायाबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यही सुरूच होते. १९९८ पासून ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहू लागले. आपल्यावरची जबाबदारी उत्तम व चोखपणे पार पाडण्याकडे त्यांचा नेहमी कल असतो.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मार्फत अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या ट्रस्ट मार्फत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात
इ -शिक्षण सुविधा विकसित करण्यासाठी योगदान, ग्रंथालय अभ्यासिका उभारण्यासाठी सहाय्य, पुणे व पिंपरी चिंचवड साठी पाच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गेली २५ वर्ष सहभाग, १५ हजार वारकऱ्यांना अन्नदानातून सेवा, विद्यार्थी दत्तक योजना, ससून रुग्णालयात जेवणाची व्यवस्था या ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
उन्हाच्या तीव्र झळापासून नागरिकांना दिलासा लाभावा ह्यासाठी सिग्नलच्या चौकात नेट बसविण्याचा
अभिनव उपक्रम त्यांनी यशस्वी केला आहे.
दगडूशेठ मंडळात काम करताना अनेक मंडळांशी, पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडली गेली व आजही ते सर्वांच्या संपर्कात आहे. ती त्यांची विश्वासाची जागा आहे ह्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो.
‘संगठन मे शक्ती है’ हा संस्कार त्यांच्यावर खोलवर रुजला आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यातील संघटना, संस्थांची नाती जोडायची, ही कार्यपद्धती त्यांच्यात भिनलेली आहे. आज ही ते त्यांच्या वर्ग मित्रांच्या संपर्कात आहेत. ज्या बँकेत ते काम करत होते त्या सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष म्हणुन ही त्यांनी अतिशय चोखपणे जबाबदारी पार पाडली. बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी ते आजही जोडलेले आहेत.
हेमंतजींमध्ये अफाट संघटनात्मक ताकद आहे. ती त्यांच्याशी जेवढी जोडली गेली, तेवढीच पक्षाबरोबर ही जोडली गेलेली आहे. या संघटनात्मक कामाचा त्यांना अभिमान आहे. जुने पुणे अशी ओळख असणाऱ्या कसबा मतदारसंघात गणेश मंडळ ही मोठी ताकद आहे. ह्या मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांशी त्यांचा नित्य संपर्क असतो, जे त्यांचे बलस्थान आहे.
हेमंतजी जेव्हा प्रथम नगरसेवक झाले तेव्हा योगायोगाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचे स्थलांतर मोठया जागेत करण्यात आले. हे लाख मोलाचे कार्य जे अनेक वर्षांपासून प्रलंबित होते ते गणपती बाप्पाने त्यांच्या हातून करून घेतले या गोष्टीचा त्यांना अतिशय आनंद आहे. नगरसेवक झाल्या झाल्या मंदिराची नवीन जागेत स्थापना होणे हा त्यांना त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण वाटतो.
दर वर्षी संक्रांती निमित्ताने भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये महिलांचा मोठया संख्येने सहभाग असतो. हा कार्यक्रम गेली चार वर्षांपासून आयोजित केला जातो. आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यात ६००० महिलांचा सहभाग असतो. ‘स्त्री शक्ती सत्कार’ आयोजित केले जातात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते. त्यांच्या कार्याची जणू ती पोच पावती असते. सन्मानित महिलांच्या कार्यातून इतर महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते.
रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचा ही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला जातो. हजारोंच्या संख्येने लोक असतात. हजारो नागरिक रक्तदान करुन ‘रक्त दान श्रेष्ठ दान’ याचा अनुभव घेतात.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत.
कोरोनाच्या आपत्तीत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न घटत असताना, पुणे महापालिकेला गेल्या पाच महिन्यात २८०० कोटी रुपये विक्रमी उत्पन्न मिळाले, हे शक्य झाले पुणेकरांचा त्यांच्यावरील असलेल्या विश्वासामुळे असे ते आवर्जून सांगतात. या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे ८३७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
कोरोनाच्या कहरात ‘रेमडिसिवर इंजेक्शन’ मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू असताना हेमंतजींच्या प्रयत्नातून ८०० इंजेक्शन मिळाली व तो खूप मोठा आधार ठरला.
दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा आगळावेगळा उपक्रम हेमंतजींच्या पुढाकाराने कसबा मतदारसंघात करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेतर्फ़े ‘पुण्यदशम‘ ही बससेवा कल्पकतेने सुरू केली असून या योजनेद्वारे चांगला उपक्रम हाती घेतला गेला आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना उच्च दर्जाची सेवा अत्यल्प दरात मिळत आहे.
आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी या अनुषंगाने सर्वांना परवडेल अशी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला असून, कर्करोगावर उपचार करणारे आंतराष्ट्रीय दर्जाचे रुग्णालय बाणेर येथे उभारणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध सारस बाग ही देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याचा त्यांना मानस आहे. असे एक ना अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेऊन समाजाची प्रगती साधली आहे. ‘न भूतो न भविष्यती’ अशा त्यांच्या योजना आहेत.
मनुष्याची खरी ओळख ही त्याच्या केलेल्या कामावरून होते याचे ते उत्तम उदाहरण आहेत.
तुमचे प्रेरणास्थान कोण असे विचारल्यावर त्यांनी
स्वामी विवेकानंद, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय नितीन गडकरी, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील ह्यांचे नाव घेतले.
सामाजिक सेवा, आध्यत्मिक, राजकीय, यशस्वी उद्योजक ह्यांची पुस्तके वाचायला त्यांना आवडतात. तसेच चालायला ही फार आवडते.
कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन काम करणे, नवीन योजना राबवणे, संघटित होऊन संपर्क साधने व मोठया संस्थांची निर्मिती करून त्या बळकट केल्या पाहिजे असे त्यांना वाटते. समाजात देखील ते सर्वांशी नाते जोडून आहेत. ते सढळ हाताने दानधर्म ही करतात ही त्यांच्या मनाची श्रीमंती पहायला मिळते.
अंथरून पाहून पाय पसरण्यापेक्षा आपले अंथरून मोठे करा, धाडसी निर्णय घेऊन चिकाटीने व जिद्दीने आपले ध्येय प्राप्त करा असा सल्ला ते युवकांना देऊ इच्छितात.
हेमंतजी सारखा चौकटी बाहेर विचार करणारा कष्ठाळू, प्रामाणिक नेता जर प्रत्येक गावात अथवा शहराला लाभला तर देशाची प्रगती निश्चित आहे.
हेमंतजी ह्यांच्या पत्नी सौ मृणाली ह्या कुटुंबिक जबाबदारी चोख निभावतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येते. त्यांच्या यशात पत्नीचा मोलाचा वाटा आहे असे ते आवर्जून सांगतात. त्यांचा मुलगा श्रेयस हा एम बी ए करत असून त्यांच्या व्यवसायात मदत करत आहे. मुलगी श्रेया ही जर्मनीत एम एस करत आहे. त्यांच्या दोन्ही बहिणी सौ शीतल सचिन खुटाळे व सौ तृप्ती संदीप खुटाळे ह्यांची लग्न झाली असून त्या सातारा येथे स्थायिक आहेत.
हेमंतजींची धाडसी वृत्ती पाहून असे म्हणावे वाटते, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही
आणि…….अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही.
असा हा हेमंतजींचा अतिशय प्रेरणादायी व खडतर प्रवास जो दहा बाय दहाच्या खोलीतून सुरू झाला व आज स्थायी समितीचे अध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहचला. त्यांचे कार्य एवढे मोठे व विस्तारलेले आहे की त्याचे एक प्रेरणादायी पुस्तक निघू शकते. त्यांचा ह्या कार्याला मानाचा मुजरा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.