जागतिक सायकल दिन
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मित्र मंडळी मध्ये घरातील व बाहेरील खेळ कसे खेळायचे यांची चर्चा सुरु व्हायची….
उन्हाळा इतका कडक असायचा की दुपारी बाहेर पडणे मुष्कील व्हायचे. ऊन्ह किती कडक आहे हे पाहण्यासाठी आम्ही दुपारी पेलाभर पाणी बाहेरील फरशीवर टाकायचो, तर पाण्याची सेकंदात वाफ व्हायची. कधी कधी आईकडून पापड घ्यायचो. तोआमच्या ओट्याच्या फरशीवर ठेवला की मस्त भाजून निघायचा.
गोट्या, विटी दांटू, भोवरा, लिंगोरच्या, रप्पाधप्प्पी, पत्ते, कॕरम, व्यापार, चंपल, सापसिडी, बुद्धीबळ (कधीकधी) क्रिकेट, चोर पोलीस, लपाछपी, घोडा उडी असे एक ना अनेक खेळ मित्रांबरोबर खेळले जायचे व यात दिवस कसा निघून जायचा हे समजायचे पण नाही.
या खेळांबरोबर महत्त्वाचा खेळ म्हणजे सायकल खेळणे.
ही सायकल प्रत्येक घराचा एक महत्त्वाचा भाग होती. एका घरात कामा नुसार व माणसा नुसार एक दोन सायकली असत. घरात सायकल नसेल तर, ती भाड्याने घेऊन आपले काम भागवले जायचे.
त्या काळात आपण थोडे मोठे झालो की सायकल चालवता येणे व पोहायला येणे या दोन गोष्टी “मस्ट” असायच्या. या दोन्हीही गोष्टी ज्याला येत नसत, त्याची मित्रांमधे टर उडवली जायची.
एवढा घोडा झाला,
अजुन सायकल येत नाही!
चहाच्या कपात जीव दे !
असे मित्र म्हणायचे...
ही टर टाळण्यासाठी रविवारी वडिलांना सुटी असली की मग सकाळीच हळूच सायकल बाहेर काढायची. एक हातात हॕन्डलवर व दुसरा हात मधल्या दांड्यावर ठेऊन एक पाय पायडलवर व एक पाय जमिनीवर टेकवत पुढे जायचे व थोडा बॕलन्स आला की सायकलच्यामधे पाय टाकून दोन्हीही पायडलने सायकल चालवायची. ती चालवता यायला लागली की खूप आनंद व्हायचा…..
सुटीच्या दिवशी सायकल चालवायला मिळायची, पण इतर दिवसाचे काय ?
परदेशी गल्लीत घरं जवळजवळ असायची. बाजार जवळ होता. गल्लीत कोणी ना कोणी कामासाठी सायकलवर येत असायचे. त्याने घराजवळ सायकल लावली की, ये जरा लक्ष दे ! आलोच, पाच मिनिटांत !
आमचे लक्ष असायचेच. मग काय !
ती सायकल घेऊन आमच्यातला एक जण लांबवर एक चक्कर मारायला जायचा. तो माणूस बाहेर आला की,
अरे कुठंय माझी सायकल ! आम्ही एकमेकांकडे बघायचो….
तो पर्यत आमचा मित्र हातात सायकल घेऊन यायचा. तिची चेन पडलेली असायची. हाताला व शर्टला चेनचे वंगण लागलेले असायचे. हे बघून तो माणूस त्याच्या मागे लागायचा. आम्ही जोरात हसायचो..
एकदा सायकल शिकली की चिल्लर गोळा करायला सुरवात व्हायची. कधी कधी घरातले काही खास काम केले की घरातील मोठी मंडळी एक तासाचे सायकल भाडे देत असत.
आमच्या गल्लीत मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात कोण दर्शनासाठी येतं, तो मारुतीला किती पैसे वाहतो, यावर आमचे कायम लक्ष असायचे. त्यातून एकदोन मित्रांचे सायकलचे भाडे सहज निघत असे !
पूर्वी सायकली भाड्याने मिळायच्या. त्यात मोठ्या सायकली व लहान मुलांच्या सायकली अशी पण दुकानं असायची. काही दुकानात दुरुस्तीसह लहान मोठ्या सायकली पण भाड्याने मिळायच्या.
नगरमधे सायकली भाड्याने देणारे, दुरुस्त करणारे, फक्त पंक्चर काढणारे, सर्व प्रकारच्या नव्या सायकली व स्पेअर पार्ट विकणारे अशा प्रकारची दुकाने प्रत्येक भागात होती.
गल्लीतील परकर झंपर घालणाऱ्या मुली परकराचा कोचा मागे खोचून सायकल चालवायला शिकायच्या. त्या काळातील ही सायकल शिकण्याची मुलींमधील जिद्द वाखाणण्या सारखी होती.
ही सायकल शिकताना किती वेळेला पडझड झाली यांची गणती नसायची. एक जखम बरी झाली की दुसरी तयार असायचीच.
सायकल चालवताना माझा एक मित्र चांगलाच पडला होता. पायाला एकदोन ठिकाणी खरपूस लागले होते, खरचटले पण होते. आता घरी काय सांगायचे ही चिंता त्याला पडली होती. तो रडत आमच्या जवळ आला,
पडssलो यार सायकल वरुन ! घरी परत मार बसणार. अरे !नको घाबरु ! ये इकडे ! कुठे लागले बघू ? त्याने पाय दाखवला ! चांगले खरचटलेच होते.
आमचा मित्र लगेच दोन्ही हातावर मस्त थुंकला !
हात एकमेकांवर चोळून ते हात जखमेवर चोळले
छूssss ! झाले बरे, जा आता घरी !काही होणार नाही.
दोघेही मित्र मस्त हसायला लागले……..
लहान मुले अगदी छोट्या सायकलवर मस्त सैर करायचे. एका वेळेस चार पाच छोट्या सायकली गल्लीत फिरायला लागल्या की हा देखावा एखाद्या सर्कशीच्या वर्तुळात सायकली फिरतात तसे ते दृश्य दिसायचे. अगदी घामाघूम होई पर्यत हा खेळ चालायचा. यातूनच पुढे स्लो सायकलींग, सायकल रेस, लाॕग ड्राईव्ह हे खेळाचे प्रकार हळूहळू सुरु झाले होते.
चाँद सुलताना हायस्कूलच्या पुढे बेग सायकल मार्ट होते. तिथं लहान मोठ्या सायकली भाड्याने मिळायच्या. सुट्टीत लहान सायकलीसाठी त्यांच्या कडे नंबर लागायचे. त्यामुळे एक दोन सायकली एक तास होऊनही आल्या नाहीत, तर बेग काका सायकल वर येऊन आम्हाला शोधायचे. चला एक तास झाला असे सांगायचे. मुलं सांगायची, काका, अजुन एक तास संपलेला नाही !
अजून थोडा वेळ आहे !…….
आमच्या गल्लीच्या बाजुला गंजबाजार, बुरुडगल्ली, जुना बाजार, सांबर काठा, लाॕज पोलीस लाईन, माणिकचौक, बँकरोड, तसेच नगरच्या सर्वच भागात भाड्याने सायकल मिळत असत. एखाद्या दुकानात सायकल नसेल तर लगेच दुसऱ्या दुकानात जाता येत असे.
त्या काळात नगर हे सायकलचे माहेरघर होते. क्वचितच एखादी स्कूटर दिसायची. सायकलच्या दांड्यावर घरातील छोटू साठी छोटे सिट असायचे. तसेच मागे सौं. साठी मोठे कॕरिअर होते. अशा सायकल वरची फुल सवारी बघण्यात एक वेगळीच मजा असायची !
कित्येक वेळा सौं. ची साडी मागच्या चाकात अडकली की पायडल उलटे फिरवून अडकलेला साडीचा भाग काढावा लागे. साडीची पार वाट लागायची. तरी पण सायकल ही गरिबांची स्कूटरच होती.
ही सायकल चालवण्यासाठी म्युनसिपालटीला रोड टॕक्स द्यावा लागे. त्यांचा पिवळा बिल्ला सायकलच्या पुढील उभ्या दांड्यावर लावलेला असे.
त्या काळात हॕरक्युलस, फिलीप्स, हिरो, आॕटलाॕस, रॕली, ए वन, या सायकली प्रसिद्ध होत्या. फुल चेन कव्हरची मिलटरी हिरव्या कलरची रॕली लssई भारी दिसायची.
या सायकलींना डनलाॕप व रोड डस्टर हे टायर फिट बसायचे. टायर ट्युबची जोडी पाच रु.ला असायची.अशा या सायकलची आॕन रोड प्राईज होती फक्त रुपये २००/- माणसाच्या उंची नुसार कोणती सायकल पाहिजे हे ठरवले जायचे. १८, २० व २४ इंची सायकली बाजारात असायच्या. तसेच लहान मुलांसाठी दोन चाकी सायाकली पण दुकानात असायच्या.
सर्वसामान्य लोकांना सुद्धा सायकल एक रकमी घ्यायला परवडत नसे. तेव्हा हे सायकल दुकानदार सुलभ हप्त्यामधे सायकली देत असत.
नवीन विकत घेतलेली सायकल लोकं जिवापाड जपत असत. रविवार हा खास सायकलसाठी मेंन्टनंसचा दिवस असायचा.
तुम्हाला रात्री सायकल चालवयची असेल तर पुढे फिलीफ्स दिव्याचा गोल फोकस व मागील चाकाला लुकास किंवा मिलर कंपनीचा डायनोमो बसवावा लागे. डायनोमो चाकावर टाकला की घर्षणामुळे पुढे टाईट पडायचा. परंतु सायकलचे पायडल मारायला जरा जड जायचे. ही डायनोमो वाली सायकल जरा भारी लोकांकडेच असायची. तो अगदी ऐटीत ही सायकल चालवायचा.
मला एक किस्सा आठवतो. एका पोलीस इन्स्पेक्टरने सायकल लाईटचा फोकस दहा फुटावर पडला पाहिजे असे फर्मान काढले. एका हुशार वकिलाने एक शक्कल लढवली. दहा फुटाचा बांबू सायकलला समोर बांधला व पुढे कंदिल लावला. तो पोलिसासमोरुन आरामात सायकल चालवत गेला. त्याच्या लोकं बघतच राहिले !नव्या कापड बाजारातून सेंन्ट्रल बँकेकडे जाताना सायकलला नो एन्ट्री होती. पोलीस कोपऱ्यात उभे राहून पकडायचे व दंड करायचे.
रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड किंवा भिंगार वरुन त्या भागातील किंवा बाहेरची मंडळी तेथूनच सायकल भाड्याने घेऊन गावातील आपले सर्व काम आटोपून परत सायकल जमा करायचे व आपल्या परत गावी जात असत. एक आणा तास, “नगरची सायकल दुनिया” रुपया रोज व साधारणपणे १५ रुपये महिना असे सायकलचे त्या काळातील भाड्याचे दर असत.
या सायकल व्यवसायाचे एक वैशिष्ट्य होते. या व्यवसायात सर्व जाती धर्माची मंडळींनी सायकल चा व्यवसाय सुरू केला होता. व त्या प्रमाणे त्यांच्या दुकानाची नावे असत. सायकल दुकानाचा मालक मुस्लिम असेल तर, भाई भाई, झिक्रीया, बेग, नदीम, नाझ, सफर सायकल मार्ट अशी नावे असत. त्यातले भाईभाई हे नाव मला फार आवडत असे.
अगदी रेल्वे स्टेशन एसटी स्टँड पासून ही दुकाने सुरु व्हायची. त्यात दत्त सायकल, नवी पेठेत खामकर, कातकर ही मंडळी सायकल भाड्याने द्यायचे. आनंदी बाजार एव्हरेस्ट सायकल मधे लहान मुलांच्या सायकली ही मिळत असत. पत्की सायकल मार्ट व भाई भाई ही प्रसिद्ध सायकल दुकाने तेलीखुंटावर होती. सर्जे पुरात कपूर यांचे सायकल दुकान होते.
आपण पारशा खुंटावर आलो की बाॕम्बे सायकल तसेच हातमपु-यात नाझ ही दुकाने होती. सरोष टाॕकीज शेजारीच सफर सायकल मार्ट होते. इथून भिंगारची सायकल सर्व्हिस चालायची. मोची गल्लीतील झिक्रीयाच्या सायकली वेल मेंन्टेन असायच्या.
नगरच्या मध्य भागात म्हणजे बँक रोड माणिक चौक या भागात गोटीराम मिसाळ यांचे विजय, गुलशन जग्गीचे फ्रंटीअर, सुदर्शन, धर्माधिकारी, अमृतेश्वर, तांबोळी, मेट्रो ही सायकल दुकाने तयार सायकली विकण्यासाठी प्रसिद्ध होती. तसेच शर्मांचे, ‘शर्मा सायकल’ पोलिस स्टेशन मागे होते यांच्या कडे सायकलींची रांग असायची.
माळीवाड्यात लोंढे सायकल मार्ट, येलुरकर ही मंडळी भाड्याने सायकली द्यायची. परत आपण तेलीखुंटावर आलो की दारुणकर यांचे दुकान पण प्रसिद्ध होते. भिंगार मधे काळे सायकल मार्ट मिलीटरीच्या लोकांना सायकलची सर्व्हिस देत असत.
मला आठवते पोलिस स्टेशन जवळ एक मोठे लिंबाचे झाड होते, त्या झाडाखाली एक निळा डगला घातलेले काका झटपट सायकलचे पंक्चर काढून द्यायचे. त्यांच्या कडील स्क्रू ड्रायव्हर मोठी कैची, पिवळे सोल्युशन, ट्युब घासायची कानस, छोटी हातोडी, हवा भरण्याचा मोठा पंप हे साहित्य आज ही डोळ्यांसमोर आहे.
मित्रांनो लहान सायकल वरुन मोठ्या सायकल वर आलो. पुढे याच सायकल वरुन शाळा व काॕलेज मधील शिक्षण कधी पुर्ण झाले हे समजले सुद्धा नाही….
पुढे केडगाव, रेल्वे स्टेशन, बु-हाणनगर, भुईकोट किल्ला, चाँदबिबी महाल, डोंगरगण, इत्यादी ठिकाणी वनडे ट्रिपची मजा पण घेतली. तो मुक्त विहार आज ही मनाला उभारी देत आहे.
आज अनेक आधुनिक सायकली चालवल्या पण गल्लीत आलेल्या माणसाची सायकल पळवुन चालवायची मजा आज कुठेच नाही. हे मात्र १००% खरे आहे…..
पुर्वी असे म्हटले जायचे की ज्याने नगरमधे सायकल
चालवली, तो कुठे ही सायकल चालवू शकतो !
काय बरोबर ना ?
माहिती सहकार्य – शेषाद्री व फिरोजभाई तांबटकर

– लेखन : विश्वास सोहोनी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

सायकल शिकताना किती धडपडले…ते..आठवले
नगर ची सायकल दुनिया हा लेख खुपच छान लिहिलाय. सायकल बद्दल पडलेला विसर या लेखातून तो काळ डोळ्यांच्या समोर नकळत तरळला…..माझ्या आठवणीनं गालावर हास्य नकळत बहरुन आले. ओपन थियटर मधे सिनेमा पहायला रात्री 9 वाजता सायकलवर ओबडधोबड रस्त्याने 10 किमी अंतर प्रवास….सोबत हवा भरायला नेलेला नवीन पंप….सिनेमा सुटल्यानंतर पंप जागेवरच विसरुन येण्याचा प्रताप….घरच्यांना लक्षात यायच्या आधी सोबत आलेल्या मित्रांनी वर्गणी करुन नविन विकत घेतला. दहावी पर्यंत पायात चप्पल नसताना सायकल ला पायडल गट्टे नसले तरी पायाला कधी वेदना जणवत नव्हत्या इतके कौतुक होते सायकल चे. वडिलांना तर हुंड्यात मिळालेली सायकल किती प्रतिष्ठेची होती आणि ती आजही जतन करुन ठेवलीय तब्बल 60 वर्ष, मात्र लुना आल्यावर ती दुर्लक्षित होवुन भंगारवाल्यांच्या सायकलवर जाण्याची अनामिक भिती सुद्धा वाटतेय.
व्वा.. मस्त.. कोणालाही आपले सायकल शिकण्याचे दिवस आठवतील असे शब्दांकन.. मला पूर्वीच्या पोस्टमनला टपाल वाटपासाठी खास सायकल मिळायची ते आठवले. दिवसभर पायडल मारावे लागत म्हणून पोस्टमन पोटरीवर खाकी पट्टी बांधायचे ते आठवले… खूपच छान