विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सांगली येथे “सीता स्वयंवर” हे नाटक सादर करून मराठी रंगभूमीचा पाया घातला. या घटनेचे स्मरण म्हणून, बरोबर १०० वर्षांनी, म्हणजेच ५ ते ७ नोव्हेंबर १९४३ दरम्यान मराठी रंगभूमीचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने नगर येथील “सप्तरंग” नाट्य संस्थेने गेल्या महिन्यात प्रकाशित केलेल्या “अहमनगर जिल्ह्याचा नाट्य आणि चित्रपटाचा १०० वर्षांचा इतिहास” या संग्राह्य स्मरणिकेत प्रसिध्द झालेला माझा लेख पुढे देत आहे….
अहमदनगर जिल्ह्यातील १०० वर्षांच्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय घटनांची नोंद घेणारी ‘स्मरणिका’ प्रकाशित होत आहे हे वाचून मला आनंद तर झालाच पण अभिमानही वाटला. तो अशा साठी की, बहुधा अशा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या जिल्ह्यातील महत्वाच्या क्षेत्राचे जतनीकरण होत आहे आणि त्यामुळे हा उपक्रम ईतर जिल्ह्यांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
या स्मरणिकेसाठी लिहिताना माझ्यातील औपचारिकता गळून पडली आणि आठवले ते ४० वर्षांपूर्वीचे जादूई दिवस… एका मोठ्या खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर असलेले माझे भाऊ नरेंद्र भुजबळ यांची अकोला येथून नगर येथे बदली झाली आणि त्यामुळे मी कॉलेज शिक्षणासाठी नगर येथे आलो. नगर कॉलेज मध्ये एस वाय बी कॉम ला प्रवेश घेतला. ते १९८२ चे वर्ष होते. थोर, लोकप्रिय नाटककार व अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल हे नगर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते याचा आम्हाला खूप अभिमान वाटायचा.
एक दिवस माझा वर्गमित्र किशोर सोनावणे मला म्हणाला, चल, आपण एका नाटकाच्या तालमीला जाऊ या. आणि आम्ही पोहोचलो, जिल्हा माहिती कार्यालयात. तिथे गेल्यावर कळाले, जिल्हा माहिती अधिकारी श्री भालचंद्र भिडे हे त्यांच्या ‘नाट्य विद्यालय’ ‘या संस्थेमार्फत ‘आग्र्याहून सुटका’ हे गाजलेले ऐतिहासिक नाटक बसवीत असून त्यांना त्यासाठी काही कलाकार हवे आहेत.
खरं म्हणजे तो पर्यंत मी कधी कुठल्या नाटकात काम केले नव्हते. नाही म्हणायला शाळेत असताना एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यामुळे माझ्या मनाची अजिबात तयारी नव्हती. पण किशोर सोनावणे याचा आग्रह आणि भिडे साहेबांनी दिलेला धीर यामुळे मीही दररोज संध्याकाळी नाटकाच्या तालमीला जाऊ लागलो.
जवळपास एकदिड महिन्यात नाटक बसले. आणि पुढे लगेचच येणाऱ्या गणेशोत्सवात सलग दहा दिवस निरनिराळ्या सहकारी साखर कारखान्यात रोज रात्री त्या नाटकाचे प्रयोग होऊ लागले. विशेष म्हणजे सर्व प्रयोगांना भरभरून गर्दी होत असे. प्रत्येक प्रयोगाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे आमचाही हुरूप वाढत असे.
या अनुभवामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांमध्ये असलेले नाट्यप्रेम मात्र मला जवळून अनुभवता आले. त्या वेळचे नाटकातील कलाकार म्हणजे किशोर सोनावणे, संजय भोगे, स्मिता व अजिता डांगरे भगिनी, डॉ रवींद्र यादवाडकर, वसंत लोढा आणि अर्थातच भिडे साहेब ! इतरही काही कलाकार होते, पण आता त्यांची नावे आठवत नाही. असो…
दुसरी आठवण म्हणजे, गेली ३६ वर्ष सप्तरंग थिएटर्सच्या माध्यमातून विविध नाटकं सादर करणारे व अनेक नाट्यस्पर्धांमध्ये पुरस्कार मिळविणारे आणि इतकेच नव्हे तर शॉर्ट फिल्म या विषयात पीएचडी मिळविणारे नाट्यकर्मी डॉ. श्याम शिंदे यांच्या सातभाईमळ्यातील घरातच आम्ही भाड्याने रहात होतो. त्यामुळे श्याम च्या शाळेत व कॉलेजमधील नाट्यवेडाचा मी जवळचा साक्षीदार आहे. त्या बद्दल मला त्याचे तेव्हा आणि आताही अपार कौतुक वाटत आले आहे.
आज त्याच्यामुळे आणि त्याच्या सप्तरंग थिएटर्समुळे किती तरी नवोदित लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि तंत्रज्ञ यांना मोठीच संधी मिळत आलेली आहे. त्याचे हे नाट्य क्षेत्रातील योगदान बघूनच मी मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत असताना, त्याला काही कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले होते. त्याच्या या नाट्यप्रेमातूनच ही स्मरणिका प्रकाशित होत आहे याचा विशेष आनंद होतो आहे. या निमित्ताने नगर जिल्ह्यातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला सुयश चिंतितो.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
माजी दूरदर्शन निर्माता,
निवृत्त माहिती संचालक तथा संपादक
न्यूजस्टोरीटुडे, मुंबई.
ईमेल:
devendrabhujbal4760@gmail.com
मोबाईल क्रमांक : 9869484800
डॉ. श्याम शिंदे यांनी सप्तरंग थियटरच्या माध्यमातून नाट्य चळवळ अविरतपणे सुरु ठेवलीय ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या लेखातून पुस्तक परिचय झाला. डॉ.श्याम यांना मित्र म्हणून पीएचडी साठी मार्गदर्शन करता आले याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या भावी योजनासाठी हार्दिक शुभेच्छा! साहित्यिक व नाट्य कलावंत म्हणून नगर जिल्ह्यातील नाट्य व चित्रपटांची तीन तपांची वाटचाल जवळून पहायला मिळाली. सैराटच्या आधी त्याच थाटनीचा ‘सारा गुताडा’ चित्रपट निर्मीती प्रकल्पात मी योग्य मार्गदर्शन अभावी व अद्न्यानापोटी अपयशी ठरलो ही खंत सतत मनात आहे. असो…..