अष्टपैलू अभिनेता श्री मोहन जोशी यांचे ‘नटखट’ हे आत्मचरित्र नुकतेच वाचले. या आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे या मोहन जोशींच्या नाट्य कलाकार मित्राने केले आहे.
तशी अभिनेत्यांच्या जीवनावर बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र या पुस्तकात मोहनजींच्या जीवन यात्रेची संघर्षमय मनोज्ञ कहाणी स्वतः जोशींनी अतिशय रसाळपणे निवेदन केली आहे.
तसं पाहिलं तर मोहन जोशी यांनी त्यांच्या २०१७ पर्यंतच्या एकूण कामाचा तपशील यात दिला आहे.
माझ्या हातात ‘नटखट’ची चौथी आवृत्ती आहे. याचा अर्थ हे आत्मचरित्र खुपच लोकप्रिय झालेले दिसते.
मोहन जोशी हे अष्टपैलू अभिनेते आहेत. त्यांनी आता पर्यंत ५५० मराठी, हिंदी, आणि इतर भाषेतील चित्रपटातून विविध भुमिका केल्या आहेत. मराठी व हिंदीत ६० हून अधिक मालिकांमधून कामे केली आहेत. तसेच १७२ हिंदी चित्रपटातही त्यांनी खलनायकापासून तर चरित्र अभिनेत्यांच्या भुमिका केल्या आहेत.
व्यावसायिक नाटकांची संख्याच ४०-५० वर आहे. हौशी, प्रायोगिक स्पर्धेतील नाटकं, एकांकिका यांची तर गणतीच नाही. आणि हे सर्व या एकाच अभिनेत्याने ४० वर्षात केले आहे. गेल्या या वर्षातील झी टी.व्ही वरील अलीकडच्या गाजलेल्या मालिकेत देखील त्यांच्या प्रभावी भूमिका मी स्वतः पाहिल्या असल्याने, त्या बरोबरच या कर्तबगार अभिनेत्याचे आत्मचरित्र वाचण्याचा मनस्वी आनंद घेतला आहे.
हे आत्मचरित्र वाचताना त्यांची जबरदस्त स्मरणशक्ती, बारीकसारीक तपशील, तारखा, घटना, प्रसंग, माणसं त्यांची नावे त्यांचं व्यक्तीत्व, स्वभाव सगळं सगळं धडाधड सांगितलं आहे, हे मी आत्मचरित्राचे एक वैशिष्ट्य मानतो.
नाट्य चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अभिनय कारकीर्दीत एकाच आयुष्यात ते काही काळ अनेकांची आयुष्य जगले आहेत. त्यांचे विलक्षण अनुभव त्यांनी मनापासून उतरविलेले आहेत.
या पुस्तकाचा लेखनकाळ २००८ ते २०१३ असा, असून शब्दांकन करणारे त्यांचे मित्र जयंत बेंद्रे आता हयात नाहीत. मोहन जोशींनी भुमिका केलेले व गाजलेले जवळजवळ १०० च्या वर मराठी चित्रपट असून त्यांच्या काही भुमिकांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राज्य सरकार व इतर नामवंत संस्था ची पारितोषिके मिळाली आहेत.
हिंदीतील ‘म्रुत्युदंड’ या दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या चित्रपटासाठी मोहनजींच्या अभिनयाला तर फिल्म फेअर व स्क्रीन अँवाँर्ड मिळालेले आहेत.
‘नटखट’ आत्मचरित्रात अगदी बालपणापासून तर पुण्याच्या बी एम सी सी महाविद्यालयातून बी काँम झाल्यानंतरचा तपशील मोहनजीनी रंजक पध्दतीने सांगितला आहे. पदवीधर झाल्यानंतर मुकुंद नगर येथील एन एम व्ही कंपनीत तब्बल १५० रू.दरमहा पगारावर नोकरी सुरु केली. त्या काळाच्या द्रुष्टीने भक्कम पगार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
९ महिन्यानंतर ते किर्लोस्कर आँईल कंपनीत लागले.
मोहन जोशी ज्या घरात राहत होते त्यांच्या गल्लीत २/३ घरापुढेच राहणाऱ्या ज्योती बरोबर प्रथम प्रेम व नंतर विवाह संपन्न झाला. ज्योती त्याच काँलेजात एक वर्ष ज्युनिअर होती. अख्या काँलेजात त्यांचे प्रेमप्रकरण गाजत होते. बालपणात बालनाट्य आणि नोकरीत कामगार नाट्यात ते भाग घेत होतेच त्यानंतर हौशी नाटकातहि ते काम करीत होते. पगार १२०० वर गेला होता.
नाटकामुळे नोकरीत खाडे होत होते. एक तर नोकरी नाही तर नाटक असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी नोकरी सोडल्यानंतर स्वतःचा टेंपो खरेदी करून मुलगी गौरीच्या नावाने ट्रान्सपोर्ट सेवा सुरु केली. मालवाहतूक चालू केली.ड्रायव्हर ठेवला. पण बरेचदा लांब लांबच्या शहरात स्वतः ड्रायव्हिंग करून तांतडीने माल पोहचवला. पुढे ड्रायव्हर चालवत असतांना एका रात्री घाटात टेंपोस मोठा अपघात झाला. त्याचा तपशीलवार उल्लेख मोहनजींनी प्रामाणिकपणे केला आहे.
नंतर मात्र त्यांनी पुर्ण वेळ नाटकांना दिला. या सर्वच काळात संघर्षमय जीवन व्यतीत केले. नाट्य सिने जगतात खंबीरपणे पाय रोवून उभे राहण्यासाठी कोणा गाँडफादरची गरज असते, हा प्रचलित समज खोडून काढत हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा जिद्द आणि अविश्रांत मेहनतीच्या जोरावर या झगमगाटी दुनियेत नुसते टिकूनच दाखवत नाही, तर सर्व भाषामिळून ५५० चित्रपट, ६० मालिका तसेच ५० वर व्यावसायिक नाटकात भूमिका करत राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळवतो. या शिखरापर्यंतच्या संघर्षमय जीवनप्रवासाची रंजक सफर ‘नटखट‘ मध्ये मोहन जोशींनी रंगविली आहे.
या काळातल्या सर्व जेष्ठ कलाकारांपासून तर अगदी पडद्यामागील काम करणाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच मनोज्ञ आठवणी शब्दांकित केल्यामुळे या काळातील एक चालता बोलता इतिहासच डोळ्यापुढे येतो.
श्री मोहन जोशी अखील मराठी नाट्यपरिषदचे अध्यक्ष होते. त्यांच्या या काळात आठ नाट्यसंमेलने संपन्न झालीत. एक तर अमेरिकेत न्यु जर्सी मध्ये विश्व संमेलन पार पडले. परिषदेत अनेक वाद विवाद संवाद झाले. त्यांचा परामर्ष देखील त्यांनी घेतला आहे.
सर्व आठवणीत आपल्याकडून गौरवाबरोबरच काही चूका झाल्याचे प्रांजळपणे मोहनजींनी सांगितले आहे. त्यामुळे ‘नटखट’ ची ही सफर स्पष्टवक्तेपणा बरोबरच नम्रता, शालिनता, एक तत्वचिंतक म्हणून लक्षात राहते. छंद म्हणून जोपासलेली कला माणसाला कुठे नेऊन सोडते यांचे अत्यंत प्रामाणिकपणे केलेले चिंतन वाचलेच पाहिजे असे म्हटले तर मुळीच वावगे होणार नाही.
लता मंगेशकर यांनी या ‘नटखट’ ला चांगल्याप्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. मोहन हे गायकहि आहेत हे देखील एक वैशिष्ट्य त्यांनी नमूद केले आहे.

– लेखन : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
तोरणे सर, ‘ नट खट ‘चे परिक्षण सुंदर. भट्टी छान जमली.टोकदार लिखाण आज देखणेपण घेऊन ऊतरले आहे. शुभेच्छा