नाम माझे नभांगण
प्रश्न छेडीला गहण
काय सांगू तुम्हां जना
लागे कोठून ग्रहण
दोन बंधू विराजती
चंद्र रवी येती प्रांत
शितलेच्या गारव्यात
डोकावतो निशिकांत
सूर्य लोपता ढगात
चंद्र चांदण्या मिरवी
झाकोळता अंबरात
गाडी हरिणी फिरवी
निशिकांत सागरात
दश दिशा प्रतिबिंब
स्नान उरकवी जैसे
भास्कराचे पडे बिंब
कालचक्र बंधुत्वाचे
प्रेम जडे आकाशास
सूर्य किरणे पोचती
मोद दाटतो खगास
सूर्य अवतरे गिरी
डोकावून पाही जना
रश्मी सवे सोहळ्यात
कोणी सुप्रभात म्हणा
नभांगणी शाळा मोठी
चंद्र करी राज भारी
सत्तावीस नक्षत्रांची
राज सभा वाटे न्यारी
सौदामिनी कुसुमीची
रात्र जाई अवजड
काळजात पामराच्या
होई नित्य धडधड
वावटळ नभातून
काढी नागिनीचा फणा
जलधारा बरसता
पाढा गाई माता क्षणा
ऐसे नभांगण थोर
सप्त ऋषी मांदियाळी
काळ्या रंगांची काचोळी
वर विणतसे जाळी
चंद्रकोर अमावस्या
कोण दारिद्र्य का भासे
पुनवेच्या चंद्रावरी
शशांकाचे रुप ठासे
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800