छत्रपती शिवाजीमहाराज यांची कीर्ती त्रिखंडात गाजली; ती त्यांच्या कर्तृत्व, धाडशी वृत्ती, बालपणापासून त्यांच्यावर करणा-या त्यांच्या परमप्रिय मातोश्री जीजाबाई तसेच गुरुवर्य दादाजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी या़ंचे मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई तुळजाभवानी या देवतेचा दृष्टांतात्मक आशीर्वाद; यामुळे शिवाजी शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजीमहाराज हे नाव जगाच्या इतिहासात विशेषतः भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
शिवाजी महाराज यांच्या मर्दमुकीला साथ मिळाली ती त्यांना मिळालेले साथी, सवंगडी, एकनिष्ठ असे मावळे (शिवरायांचे सैनिक) हे होय.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या सैनिकात-मावळ्यात सर्व जाती धर्माचे लोक होते: बाजी प्रभू देशपांडे, येसाजी कंक, शेलारमामा आणि अर्थात मालुसरे परिवार यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.
जावळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोरे यांची पिढीजात सत्ता इ.न. १३४७ सालापासून ह़ोती. मराठी रयतेवर इस्लामी राजवट लादली गेलेली. जावळीचे चंद्रराव मोरे हे मोठे वतनदार घराणे. जावळीला निसर्गाचे वरदान लाभलेले. अशा या खोऱ्यावर मोरे यांच्या आठ पिढ्यांनी आपला प्रभाव राखून ठेवला होता. राजा सारखे राज्य करीत असत. या भागातील काही लोक चंद्रराव मोरे यांचे कडे चाकरी करीत होते. या परिसरात अनेक शूरवीर जन्माला आले.
गोडवली हे गाव शंभरेक उंबरठ्याचे. या गावातच मालुसरे घराणे पिढ्यान् पिढ्या नांदत होते. त्यांच्याकडे गावच्या पाटीलकीचा मान होता. शूरवीर निधड्या छातीचे अन्यायाला न्याय देणारे मालुसरे घराणे हे शिव भक्त होते. गावातील महादेवावर त्यांची नितांत श्रध्दा. गावावरील संकट आपलं संकट समजून ते निवारणासाठी आपलं सर्वस्व अर्पण करीत असत. देवाधिदेव महादेव हाच काळभैरव यास्तव मालुसरे यांनी आपल्या अपत्याचे ’काळभैरव’ हे नाव दिले असावे, असा एक तर्क.
मालुसरे यांच्या घराण्यांत एक मूल जन्मले, त्याच नाव ठेवले काळोजी. काळोजीचे वडील शिवभक्त. जसे ते श्रध्दाळू होते तसेच ते शूरवीर लढवय्ये सुध्दा होते. व्यक्तीवरील संकटाशी ते आपल्या प्राणासह सर्वस्व पणाला लावून लढत असत. काळोजीच्या पाठीवर भवरजीचा जन्म झाला.
छोट्या गावचा पाटील म्हणजे जणू काही राजाच म्हणाना. समाज सेवा करणे हाच मालुसरे घराण्याचा वंश परंपरागत गुण होता. पण या उलट बारा मावळ्यांतील देशमुख, मोरे यांचे वर्तन असायचे. साहजिकच मावळ्यात मालुसरे ख्यातकीर्द झाले.
त्या दरम्यान (बालपणी) मालुसरे बंधूंनी इतर मुलांप्रमाणे मर्दानी कला, खेळ, मल्लखांब, दांडपट्टा, घोडेस्वारी, लाठी, तलवारबाजी, या आत्मसात करून त्यात प्राविण्य मिळवले.
जावळीच्या खोऱ्यातील चंद्रराव मोरे हे सत्ताधारी वतनदार होते. त्यांच्यांत भाऊबंदकी होती. मोरे यांचा तोराच भारी. त्यांना चंद्रराव किताब मिळाला. त्यामुळे मोरे यांच्यात भाऊबंदकी, अरेरावी, जुलमी वृत्ती, एककल्ली, लहरी विक्षिप्तपणा, अवगुणादी स्वभावामुळे आम जनता जेरीस आली होती. हे सर्व पाहता मालुसरे यांनी त्यांच्याकडे चाकरी करणे शक्यच नव्हते. कारण त्यांना आपल्या सामर्थ्याची पुरेपुर जाणीव होती. अंगी युद्ध कौशल्य, उपजत गुण असलेल्या चांगल्या घराण्याची-संस्काराची जाणीवादीची पारखामुळे जावळीतील लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते लढत असत. त्यांना न्याय मिळवून देत असत.
साहजिकच गावात त्यांचा लौकिक झाला. इस्लामी आक्रमण होत आहे हे समजताच मालुसरे यांचा त्या गावकऱ्यांना आधार वाटायचा.
अशा या लढवय्या घराण्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म झाला. या शूरवीर तानाजीच्या जीवनावर चित्रपटही आला होता. नरवीर तानाजी यांच्या समग्र जीवनाचा यथार्थ मागोवा रमेश शांतिनाथ भिवरे यांनी ‘नरवीर तानाजी मालुसरे या चरित्रात्मक ग्रंथात घेतला आहे.
हा ग्रंथ शालिनी बुक्स, सांगली, यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथात ’शिवराय, स्वराज्य, नरवीर तानाजी मालुसरे-सह्याद्री, निजामशाही आणि आदिलशाही, लखुजीराजांची हत्त्या अन् शहाजीराजांचा उठाव, शहाजीराजांचे बंड- निजामशाहीचे पुनर्जीवन, गोडवली, येथपर्यंत तात्कालीन सामाजिक, राजकीयादी परिस्थितीचा समग्र असा मागोवा लेखक भिवरे यांनी घेतला आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीत तानाजीचा झालेला, काळोजीनी दिलेली झुंज, कोंडाजी शेलार, गोडवली गावात इस्लामी राजवटीत झालेले अत्याचार, अन्याय, हिंदुंची अमानुषपणे केलेली कत्तल त्यापायी तेथील स्थानिकांना नाईलाजास्तव महाड जवळील ’उमरठा’ या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं.
उमरठा हे दुर्गम गाव. तेथे त्यांना आप्पाजी पाटलांनी चंद्रगडच्या पायथ्याशी असलेली ओसाड जमीन दिली. अपार कष्ट, परिश्रम, निष्ठा, सहनशीलतेच्या जोरावर तेथे आपल्या उपजिविकेपुरते का होईना अन्न पिकविले.
तानाजी आणि सुर्याजी यांचे बालपण कष्टात गेली. शेलारमांमानी आपल्या भाच्यांवर’कष्ट हा जीवनाचा पाया आहे, त्याग जीवनाचा कळस आहे, हे जीवन सुत्र बिंबवले.
आपल्या वडिलांच्या अंगातील शौर्य, धैर्य पराक्रम साहसी, धाडसीवृत्ती अंगी बाळगण्याचे बाळकडू पाजले. ’शिवराया़ंच्या सानिध्यात’ या प्रकरणात लेखकाने जिजाऊ, शहाजी राजे यांच्या सल्ला मसलती तसेच शेलारमामा आणि तानाजी मालुसरे हे मावळे शिवरायांच्या सहवासात कसे आले, शिवबा़ंचे रयतेवरील प्रेम, विश्वास, आपुलकी, त्यांच्या अंगी-अडचणी समजावून घेतले.जीजाऊ, शेलार मामा, शहाजीराजे यांच्यांत चर्चा मसलत, विचारांची आदानप्रदान झाली. कृतीसाठी आराखडा तयार केला. कर्तबगार जिजाऊंच्या नेतृत्वाखाली शिवबाची जडणघडण झाली. लोकोपयोगी काम करुन रयतेचा विश्वास संपादन केला.
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी शिवबाचे स्वप्न होते आपले राज्य असावे. नंतर शहाजीराजे यांनी जिजाऊ आणि शिवबा कर्नाटकात बोलावून घेतले. खूप चर्चा मसलत केली. कृतीसाठी आराखडा तयार केला. त्यानुसार प्रसंगी बंड करावे लागले तर शिवबा तयारीत होते. स्वराज्यासाठी दुर्गम जागा शोधून काढली. ही जागा जहागिरीला लागूनच होती. बारा मावळ्यातील जनतेची पारख करून/नाडी ओळखून त्याप्रमाणे जिजाऊनी योजनेची अंमलबजावणी केली. जिजाऊ-शहाजीराजे यांना कानमंत्र दिला तो म्हणजे, ”जनतेला विश्वासात घेऊन आपलेसे करा. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी वतनदार मंडळीवर प्रभाव टाका”. शिवबानी त्याप्रमाणे योजना आखली. शेतीला प्राधान्य दिले. वतनदारांच्या जाचातून सामान्यांची सुटका केली.कित्येकांचे पुनर्वसन केले.
पाहता पाहता शिवबा लोकप्रिय झालेशिवबाची कीर्ती दूरवर पसरली. शिवबांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. जनतेला मान-सन्मान देत. प्रत्येकाशी कौटुंबिक स्नेहांचे नाते जोडले.
शिवबा जहागिरदार शहाजी राजे यांचे पुत्र असूनही जनतेत समरस झाले. शिवबानी आपल्या मित्रांना रोहिडा किल्यानजिक रायरेश्वर म़ंदिराच्या प्रा़ंगणात बोलाविले. तेथे त्यांनी आपल्या सवंगड्यांना स्वातंत्र्य आणि स्वराज्याची शपथ दिली. ही गोष्ट शेलार मामाच्या कानावर गेली. त्यांना खात्री होती, की शिवबा या उपऱ्या इस्लामी जलमी राजवटीपासून जनतेला मुक्त करणार आणि मराठी रयतेचे राज्य येणार. शिवबाचे मित्र-मावळ्यात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, समस्त देशमुख, शेलार मामा अन् तानाजी, सुर्याजी या मालुसरे बंधुंना खात्री झाली, की आता शिवबाच स्वराज्य स्थापन करणार. शिवबांचे करारी, करडी नजर, धाडशी नेतृत्व, राजबिंडा तेजस्वी असा हसरा चेहरा यामुळे त्या़चे व्यक्तिमत्व उठून दिसायचे. आम रयतेवर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली होती याचा रंजक इतिहास लेखकाने यात मांडला आहे.
‘मावळ्यातील मावळे’ या प्रकरणात शिवरायांचा आपल्या मावळ्यांना कसा प्रभाव पडला हे वाचताना शिवरायांच्या राजनीतिवर लेखकाने टाकलेला प्रकाशझोत वाचनीय झाला आहे. ’शिवबा राजांशी भेट’,’ रोहिड खोरे’- रायरेश्वर, तानाजीचे विचार, तोरणा, तानाजीचे लग्न, जावळीत शिवबाराजेंचा हस्तक्षेप, फत्तेखानची स्वारी, जावळी, संभाजी मोहितेमामा,
अफजलखानाचे सावट, पन्हाळा, शाहिस्तेखान मामा, कारतलबखान प्रकरणातून शिवरायांची रणनीती, त्यांच्या एकनिष्ठ मावळे आणि अन्य साथीदारा़ंच्या विविध व्यक्तीमत्त्वावर प्रकाश झोत टाकून त्याचे यथार्थ असे वर्णन केलेले वाचनीय झाले आहे.
तानाजी, सूर्यराव सुर्वे-कोकण स्वारी, शाहिस्तेखानावर छापा, चकवा, कोंडाणा, विडा उचलला या साऱ्या प्रकरणातून शिवबा राजे आणि तानाजी यांच्यातील विचारांचा एकोपा, शरीर दोन पण मन, भावना, जिद्दही एकच, एकाच नाणाच्या दोन बाजू म्हणजे शिवबा आणि तानाजी हे ह़ोत. शिवरायांची युद्ध नीती, गनिमी कावा, दूरदृष्टी याला जोड मिळाली ती तानाजींच्या कल्पक नियोजनाची.
तानाजी यांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साथीने कोंडाण्याकडे कूच केली. सोबत भाऊ सुर्याजी होता. अंधारी रात्री, अवघड अरुंद कडे-कपारीतून खाचा फटींचा, दोरखंडाचा आधार घेत गडावर पोहोचले.
तानाजी आणि सुर्याजी यांनी शत्रूंशी निकराने लढाई सुरू झाली. तलवार-ढाली यांच्या प्रचंड निनादाने तुंबळ लढाईला सुरुवात झाली. या झटापटीत तानाजीच्या हातातील ढाल मोडून खाली पडली. जखमी अवस्थेत ते एका हाताने या लढतीत शेवटपर्यंत लढत राहिले. युध्दाचे नेतृत्व करणारे तानाजी आणि उदयभान राठोड हे दोघे लढवय्ये सेनानी धारातिर्थी पडले खरे; पण गड मावळ्यांच्या ताब्यात आला.
’गड आला पण सि़ह गेला’,’ मरावे परी कीर्ती रुपे उरावे’ या उक्तीचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवबाचे मावळे तानाजी मालुसरे हे होत. मृत्युंजयी तानाजीच्या अंत दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः गडावर पोहोचले व या नरवीर तानाजी मालुसरे यांना त्यांनी मनोभावे मानवंदना दिली.
शिवबा यांनी मालुसरे परिवाराचे सांत्वन करतांना आपल्या कमरेची तलवार अन् डोक्यावरील शिरटोप उतरवून आपल्या भावना व्यक्त केल्या;आणि आज्ञा केली, की उमरठ्यास जेथे तानाजी वर अंत्यसंस्कार होतील तेथे समाधी उभी करा जेणेकरून कोंडाण्यावरील समाधी महाराष्ट्रातील तरुणांना स्फूर्ती देईल.
या ग्रंथाला डॉ शीतल शिवराज मालुसरे, (महाड रायगड) यांनी लिहिलेली साक्षेपी प्रस्तावना वाचनीय आहे. श्री.देवीदास पेशवे यांचे आकर्षक मुखपृष्ठ ल्यायलेला या ग्रंथात सिंहगड, उमरठ येथील समाधी स्थळ, तानाजीच्या देहावर शिवरायांनी अर्पण केलेली कवड्यांची माळ यांची आकर्षक छायाचित्रं ही या ग्रंथाचे खास वेशिष्ट्य आहेत. विविध शाळा, महाविद्यालय, वाचनालयात अवश्य ठेवावा असा हा अनमोल ग्रंथ आहे.

– लेखन : नंदकुमार रोपळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800