गरुडेश्वर ते महेश्वर
उत्तर तट परिक्रमा……
आज सकाळी आम्ही जरा लवकर उठून सर्व आन्हिके उरकून गरुडेश्वरी दत्त मंदिरात सकाळी सकाळी गेलो.टेम्बे स्वामींशी बोलणाऱ्या दत्त मूर्तीस (तीन शिरे सहा हात) आणि इंदिराबाई होळकर यांना टेम्बे स्वामींनी दिलेल्या एकमुखी दत्त मूर्तीस नर्मदा जलाचा जो अभिषेक घालतात तो पाहिला. अभिषेक सांगितला. तेथील मंदिरात असणाऱ्या गुरुजींनी बरीच माहिती दिली.
गरुडेश्वर च्या मुख्य दत्त मंदिरात दत्तप्रभूंच्या शेजारी एका बाजूला आद्य गुरु शंकराचार्य व दुसर्या बाजूस देवी सरस्वती यांच्या पद्मासनातील मूर्ती आहेत. टेंबेस्वामी हे आद्य गुरु शंकराचार्य यांचीच परंपरा सांगत होते आणि ते दंडी स्वामी होते.
आद्य गुरु शंकराचार्य यांनी हिंदू धर्माची संहिता लिहिली. त्या संहितेत कालानुरूप काही दोष दुरुस्त्या करण्याचं महनीय कार्य टेंबे स्वामी यांनी केलं. म्हणून शंकराचार्य हे दत्त मंदिरात विराजमान आहेत.तर टेंबेस्वामी यांनी लिहिलेलं साहित्य हे संस्कृतप्रचुर आहे. त्यांच्या जिव्हाग्रांवर देवी सरस्वतीचा निवास होता त्यामुळे देवी सरस्वती देखील दत्त मंदिरात पाहायला मिळते.
दत्तप्रभूंच्या समोर उत्सव मूर्ती सुद्धा विराजमान आहे.टेम्बे स्वामी हे नृसिंह सरस्वती यांचाच अवतार आहेत.
गरुडेश्वर चा घाट १९४० सालात इंदोरची महाराणी इंदिराबाई होळकर यांनी बांधला होता. परंतु तीनेक वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तो वाहून गेला.तदनंतर दोन वर्ष नर्मदेवर जाताना मोठी कसरतच करावी लागत होती. आता मात्र पुन्हा तेथे नवा घाट बांधलेला आहे. उतरायला आणि चढण्यास सोपा. वर येताना घाटाच्या पायर्या कमी उंचीच्या केल्याकारणाने ते अजून सोपं झालं आहे.
सर्वांनी नर्मदा स्नान केले. इथली नर्मदा नितळ निर्मळ आहे.
स्वामी नृसिंह सरस्वती यांचा प्रत्यक्ष अवतार होते. स्वामींनी कलियुगात दत्त पुराण लिहिले.हे १९ वे पुराण आहे.महाराजांचे घोर कष्टोधरण स्तोत्र सुप्रसिद्ध आहे.
महाराजांनी नद्यांवर स्तोत्रे लिहिली.
स्वामींचं गरुडेश्वरी १४ महिने वास्तव्य होतं. ते दंडी स्वामी होते त्यामुळे त्यांच्या देहास जलसमाधी दिली गेली.
स्वामींनी २३vचातुर्मास केलें.महाराजांकडे असणारी पंच धातूची दत्त मुर्ती त्यांच्याशी बोलायची.
स्वामींनी उभ्या आयुष्यात पायात जोडे घातले नाहीत.
डोक्यावर छत्री धरली नाही. तसेच स्वयंचलित वाहनात बसून कधीही प्रवास केला नाही.
महाराजांचं सोवळं खूप कडक होतं. ज्या ठिकाणी स्वामींनी देह सोडला त्या ठिकाणी स्वामींचं समाधी मंदिर बांधलेलं आहे.
समाधी स्थान पाहिलं.
सामूहिक आरती केली.
इथं स्वामींच्या निर्गुण निराकार अशा चरण पादुका आहेत.
अभिषेक प्रसाद घेतला.
दत्त मंदिरातील दत्त मूर्ती पुनः पुन्हा पाहिली तरी मन तिथेच अडकून राहते.
इंदिराबाई होळकर यांना स्वामींनी दिलेली एकमुखी दत्तमूर्ती आहे.
रंगपूरच्या आश्रम शाळेत दुपारचं भोजन घेतलं.
ही आदिवासी मुलांसाठीची निवासी आश्रम शाळा आहे.
रंगपुर ते महेश्वर या प्रवासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र कन्यकेबद्दल प्रकाश काकांनी संवाद साधला. त्यांच्या जीवनातील ठळक घटनांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. तो सर्वांनाच आवडला.
महेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महनीय अशी कारकीर्द घडली आहे.
त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा महेश्वरात आजही जागोजागी पाहायला मिळतात.
संतपदाला पोहोचलेली इंदोरची महाराणी म्हणजे अहिल्यादेवी.
मजल दरमजल करत आम्ही महेश्वर मुक्कामी आलो. हॉटेल वर जाऊन नेहमीप्रमाणे हरिपाठ गुरुपाठ आरत्या मग भोजन प्रसादी घेऊन दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम माहिती घेऊन झोपायला गेलो.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800