मांडवगड
आजच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा म्हणजे मांडवगड. कुणी मांडव, कुणी मांडू असंही म्हणतात. हे धार जिल्ह्यात आहे.
मध्य प्रदेशातील हा एक भला थोरला किल्ला आहे. राणी रुपमती साठी इथे नर्मदा माई आली. रेवाकुंडात विराजमान झाली. सध्या कुंडाची बरीच पडझड झाली आहे. गडकऱ्यांना त्याचं काही वाटत नाही. पायी परिक्रमा करणारी मंडळी देखील हा किल्ला चढून येतात. परिक्रमा मार्गावरील हा एक कठीण टप्पा आहे. किल्ला बराच मोठा आहे. त्यांच्या कष्टास तोड नाही. पाणी नाही. निर्जन वन. तरीही माई वर श्रद्धा ठेवून चालतात. चालण्यातलं सुख अनुभवतात. गत जन्मातील चांगल्या वाईट कर्मांचं ओझ पाठीवर घेऊन.
इथेच चतुर्भुज राम मंदिर आहे. देवाची मूर्ती ११०० जुनी आणि देऊळ २०० वर्षे प्राचीन आहे. देवाचा शृंगार बघण्यासारखा असतो. यवनी राजवटीत यवनांचा उतमात याच मांडव गडाने उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. पण काळाच्या ओघात यवन गेले. त्यांचे राजवाडे जमीनदोस्त झाले. त्यांच्या राजवटी मातीमोल झाल्या. आज मांडवगडावर फक्त रेवाकुंड व चतुर्भुज रामराया आहेत.
आता आम्ही मांडव गडावर चतुर्भुज राम राया च्या मंदिरात आहोत. इथले रामराया हे चतुर्भुज आहेत. रामरायाच्या उजव्या हातात बाण व डाव्या हातात धनुष्य आहे. खाली डाव्या हाती जपमाला व त्याखाली मारुती राया आहेत. खालच्या उजव्या हाती कमल पुष्प व त्याखाली अंगद आहेत. त्याखाली सात वानरे आहेत. लक्ष्मणभय्याचे खाली नल व नील अशी दोन वानरे आहेत. सीता मय्या आहे. मूर्ती विक्रम संवत ९५७ म्हणजे १११९ वर्षांपूर्वी ची आहे. मंदिर सन १८२३ मध्ये बांधले गेले आहे. पुण्यातील रघुनाथदास महंत यांच्या स्वप्नात जाऊन.
मांडव गडच्या तळघरात यवनी आक्रमणांपासून वाचवून सुरक्षित ठेवलेल्या रामप्रभूंनी साक्षात्कार घडविला. याकामी धारच्या संस्थानिक शकुताई पवार यांनी सर्वोतोपरी सहाय्य केले. मंदिर भरभक्कम असून मूर्ती अत्यंत मनोहर आहेत. मुख्य संगमरवरी मूर्तींच्या समोर पितळी उत्सवमूर्ती आहेत.
मधोमध रामराया असून आपल्या डाव्या हाताला लक्ष्मणभय्या व उजव्या हाताला सीतामाई आहेत. परिक्रमावासी येथे राहतात. त्यांना भोजन दिले जाते.
स्थानिक लोक इथं जंगल असल्याने बरीच वनौषधी विक्रीस आणतात. इथल्या गोरख चिंचा व त्यांची भली मोठ्ठी झाडं प्रसिद्ध. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये इथं सिताफळांचा खच पडलेला असतो.
सीताफळ हे कमी पाण्यावर येणारं फळ… गोड मधुर…. पण अल्पजीवी…
गडावरील नीलकंठ धाम दर्शन करून भोजन करून आम्ही मजल दरमजल करत इंदोर शहरात आलो. इंदोरची स्वच्छता डोळ्यात भरते. इंदोर आपलं वाटतं. इंदौर शहर सातव्यांदा स्वच्छतम शहराचा किताब मिळविण्यासाठी सज्ज झाले आहे.
शासन आणि जनता दोघेही कंबर कसून कटिबध्द आहेत. दोघांचेही करावं तेवढं कौतुक थोडच आहे.
अन्नपूर्णा देवी मंदिर, बडा गणेश पाहिल्याशिवाय इंदोर पूर्ण होत नाही. अन्नपूर्णा मंदिर नव्याने साकारलं आहे.
होळकरांचा राजवाडा लोकांना बघता यावा म्हणून खुला केला आहे. आम्ही तो राजवाडा आतून पाहिला. अभिमानाने उर भरून येतो. त्याच्या मागे होळकरांच्या मालकीचं मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे. देवाचा सोन्याचा टाक आहे. शिवलिंग आहे. मंदिर भव्य आहे. होळकरांच्या वैभवाची त्यातून कल्पना येते. होळकरांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे संग्रहालय देखील इथं आहे.
राजवाडा हे इंदोरचं गौरवस्थान आहे. भूषण आहे.
चार ओळीत लिहावं इतकं इंदोर लहान नाही. इंदोर हे भारतातील स्वच्छतम शहर आहे.
इंदोरच्या सर्वांगीण विकासाचा पाया सतराव्या शतकाच्या मध्यावर अहिल्यादेवी होळकरांनी घातला हे बाकी नक्की.
अहिल्यादेवींना दूरदृष्टी होती. इंदोर ही मध्य प्रदेशची सांस्कृतिक राजधानी आहे. मराठीचा बोलबाला आहे. भारतातील सर्वोत्तम स्वच्छ शहर म्हणून इंदोर कडे पाहिले जाते.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अगदी नेमक्या शब्दात सश्रद्ध लेखन ज्यांनी ते ठिकाण पाहिले नाही त्यांचीही मानसिक परिक्रमा हे लेख वाचून निश्चित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बद्दल या माहितीमुळे आपोआप आदर वृद्धिंगत होतो. हे लेख म्हणजे नर्मदा परिक्रमेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक वाटतात. मांडवगडचा पण एक वेगळा विशेष लेख होऊ शकतो दोन-तीन ठिकाणांचा नुसता स्पर्शलेख झाला तरी एवढी माहिती मिळाली जर सेपरेट लिहिले तर अजून छान मार्गदर्शन मिळेल असे वाटते मानसी ताईंना मनापासून धन्यवाद.
लेखिका मानसी ताईंचे खूप खूप आभार.🙏
थोडक्यात पण सुरेख शब्दांत वर्णन.
अर्थात मांडवगड आणि होळकर हे दोन्ही स्वतंत्र लेखांचे विषय, पुढे कधीतरी विस्ताराने लिहावेत.