इंदोर ते श्रीक्षेत्र नेमावर
मय्या कृपेने इंदोरचा मुक्काम छान झाला. नेहमीप्रमाणे आज सकाळी लवकर आवरून आरती व बालभोग उरकूनच इंदोर सोडलं. आज अयोध्येत राम मूर्ती विराजमान होणार असल्याने सर्वत्र वातावरण भगवामय झालेले पाहायला मिळत होते. रामलल्ला च्या स्वागतासाठी सगळीकडे मिरवणुका, जल्लोष होत होता. सगळीकडे भगवे झेंडे गाड्यांना लावलेले होते तर इमारती, रस्ते भगवेमय झालेले होते. फुलांनी मंदिरे सगळी सजवलेली होती.आमचे सकाळी सकाळी आज उज्जैन दर्शन होणार होते.
मध्य प्रदेशात उज्जैन व ओंकारेश्वर येथे दोन ज्योतिर्लिंगे आहेत. तुम्ही कोणतीही परिक्रमा करत असलात तरी परिक्रमेत तेथे सगळे जण जातात. Vip दर्शन पास काढून छान दर्शन घेतले. खरे तर सोमवार असूनही गर्दी नव्हती. पूर्वी अगदी महांकाल शिवलिंगास हात लावून दर्शन घेता यायचे. आता मात्र लांबूनच हात जोडावे लागतात. दर्शन व्यवस्था छान आहे. देवळात स्वच्छता आहे. पायाखाली जाजम अंथरले आहेत. मंदिर परिसर प्रशस्त आहे. वॉशरूमची सोय आहे.मंदिर परिसरात
कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उज्जैन कुंभमेळ्याचे स्थान आहे. क्षिप्रा नदीच्या काठावरील उज्जैन हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. उज्जैन ही मोक्षदायिनी सप्तपुरी आहे. राजा विक्रमादित्याची नगरी आहे. ज्यांनी विक्रम संवत सुरू केले आहे. उज्जैन नगरीचे विद्यमान राजे श्री महांकाल आहेत. आता उज्जैन नगरीत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि हे काम सतत चालूच आहे.
उज्जैन दर्शन करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही.याठिकाणी खूप मंदिरे आहेत ती पाहण्यासारखी आहेत. तिथून जवळच असलेल्या सांदीपनी ऋषींचा आश्रम हरसिद्धी माता आदी महत्वाची दर्शने आम्ही घेतली. उभ्या भारत वर्षातून इथे लोक येतात. व्यापार उदीम मोठा आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कुंडेश्वर व सर्वेश्वर या नावाची दोन शिवलिंगे आहेत. कुंडेश्वर महादेवाच्या कळसाला श्रीयंत्र आकार आतून दिला आहे.
इथेच दगडी शिळेवर कृष्ण बलराम व सुदामा व त्यांचे गुरु सांदीपनी यांच्या मूर्ती आहेत. त्यांची गादी आहे. उभा नंदी आहे. अंकपात क्षेत्र आहे.गोमती कुंड आहे. इथेच कृष्णदेव ६४ कला व १४ विद्या शिकले. इथेच हरी व हर यांची भेट झाली आहे.
द्वापार युगातील कितीतरी गोष्टी इथे आजही दृष्टोपत्तीस पडतात. याच ठिकाणी आम्ही सर्वानी दुपारी बारा वाजता रामरक्षा पठण केले.
हरसिद्धी माता मंदिर मराठा राजवटीत बांधले असून तसा प्रभाव मंदिर बांधकामात आढळतो. परिसरात दोन दिपमाळा आहेत. देवदर्शन करताना क्षिप्रा नदी भेटते. उज्जैन ही तांत्रिक मांत्रिक यांची देखील नगरी आहे.
उज्जैन शहर आता सर्वार्थाने कात टाकत आहे. पुढे सोयीच्या स्थळी भोजन घेऊन आम्ही नेमावरला मय्या तीरी गेलो. नेमावरला नर्मदा दर्शन घेतले. काहींनी हात पाय धुतले. काहींनी स्नान केले. हे नर्मदा मातेचे नाभिस्थान आहे.
इथून अरब सागर व अमरकंटक ही दोन्ही स्थाने समान अंतरावर आहेत. घाटावर या ठिकाणी खूप रोषणाई करण्यात आली होती. लोकांचा आनंद यातून व्यक्त केला होता. राम लल्ला च्या स्वागतासाठी सगळ्या घाटावर दिवे लावण्यात आले होते. आम्हीही दिवे लावले. आरती केली. त्यानंतर तिथे असणाऱ्या सिद्धेश्वराच्या देऊळात जाण्याआधी आपणास श्री गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी सहित भेटतात. त्यांचे दर्शन घेऊनच आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात गेलो.
याठिकाणी पांडवकालीन शिवलिंग आहे. मंदिर व परिसर खूप प्राचीन आहे. दर्शन घेतले. मंदिर परिसरातील शिल्पकला मनोहारी आहे.केवळ अप्रतिम असे शिल्पकाम इथे मंदिर परिसरात आतून आणि बाहेरून पहायला मिळते.हे मंदिर तीन प्रकारच्या दगडांमधून बांधल्याचे जाणवते. काळा, पिवळा आणि तांबडा असे तीन रंगाचे दगड तिथे ठळकपणे दिसतात. सर्व देव दर्शने पूर्ण करून आम्ही आता खातेगाव या ठिकाणी मुक्कामी आलो.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800