धुव्वाधार ते नर्मदापुरम..
आज सकाळी आम्ही लवकरच उठलो. आज स्वच्छ सूर्यप्रकाश होता. आम्ही चहा घेतला. आम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो ते हॉटेल 7 एकर परिसरात उभारलेले होते. परिक्रमा वासीयांसाठी या ठिकाणी खास करून व्यवस्था केलेली आहे. हॉटेलच्या परिसरातच अगदी मैया किनाऱ्यावर छान असे शिवमंदिर होते. त्याच ठिकाणी आमची आरती होणार होती. साधारण 60 पायऱ्या उतरून गेले की समोरच नर्मदा नदीचे विस्तीर्ण पात्र पाहायला मिळाले. किती एकांनी खळखळ वाहणाऱ्या नर्मदा पात्रात स्नानाचा आनंद घेतला. नर्मदा स्नान खुप छान वाटले. आरती झाली. बाल भोग झाला. परिसर अत्यंत रमणीय असल्याने खचितच इथे 1 दिवस पुरणार नाही हे लक्ष्यात येतेच पण आमची परिक्रमा असल्याने वेळेच्या नियोजनेनुसार निघावे लागले. पण मन त्या परिसरातून निघायला तयार न्हवते मग परत कधीतरी 4 दिवस शांत रहायला येण्याचे मनाने ठरवले आणि मग आम्ही निघालो दक्षिण तटावरील धुव्वाधार धबधबा बघण्यासाठी.
नर्मदा मय्येचे हे अतिसुंदर रूप जितके मनोहारी तितकेच भयकारी. तिच्या त्या रौद्र रूपास पाहून काठावरील व पात्रातील काळे कभिन्न खडक पांढरे फटक पडले असा साक्षात्कार गोनीदांना झाला. अगदी रोरावत वाहणाऱ्या मय्येस पुढे भेडाघाट याठिकाणी निसर्गाने असं काही शांत केलंय की तिचा तळ दिसतो. मनाचा तळ दिसणं त्याचंच नाव परिक्रमा आणि हीच का ती असा प्रश्न पडतो. धुव्वाधार याठिकाणी दिसणारी मय्या पाहताना चित्त वृत्ती पुलकित होतात. तिथून हलावसं वाटतंच नाही. अंगावर नर्मदा जलाचे तुषार उडत होते. पण जड अंतकरणाने निघावं लागतच. खुप फोटो काढले आणि निघालो.
दुपारचे भोजन वाटेत घेऊन तवा नदीवरील पुलावरून आपण नर्मदा पुरमला पोचलो.
नर्मदा पुरम चे पूर्वीचे नाव होशंगाबाद होतें परंतु 2022 मध्ये मध्यप्रदेश सरकारने तेथील अनेक ठिकाणचे नामांतर केले त्यात होशंगाबाद चे नाव नर्मदापुरम ठेवण्यात आले. याठिकाणी जाताना आपल्याला तवा नदीचं पात्र लागते. जवळ जवळ साडेतीन चार किलोमीटर नर्मदेपेक्षाही विस्तीर्ण हे पात्र आहे. तवा नदी पात्रात प्रचंड वाळू आहे. पाणी सद्या तरी तुरळक होते. येथील वाळू मऊ सुत रेशमा सारखी. याच वाळू पात्रात उत्तम कलिंगडे पिकवली जातात. ही कलिंगडे अतिशय प्रसिद्ध आहेत.
इथं आल्यावर थेट खर्रा घाटावरील दत्त मंदिरात गेलो. जिथे पद्मासनातील दत्त मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय प्रसन्न मूर्ती पाहुन तिथेच बसून राहावे असे वाटते. येथे कल्पवृक्ष आहे. समोर नर्मदा माईचं विस्तिर्ण पात्र आहे. टेंबेस्वामी स्वतःचा आजार घेऊन बरं होण्यासाठी इथेच आले. टेंबेस्वामींना संग्रहणीचा आजार होता. त्यामुळे स्वामी महाराज जितक्यांदा शौचास जायचे तितक्यांदा स्नान करायचे. महाराजांचं सोवळं खूप कडक होतं. त्या वारंवार नर्मदा स्नानांमुळे त्यांचा देह दिव्य झाला. आजार गेला. कल्पवृक्षाच्या छायेत त्याच्याच ढोलीत त्यांनी मुक्काम केला होता.
लौकिक जगापासून दूर राहतात त्यांना साधू म्हणावं, संत म्हणावं. दत्तप्रभुची खूप सुंदर मूर्ती टेंबेस्वामी यांनी या ठिकाणी स्थापित केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती पद्मासनात बसलेली आहे. मैया किनाऱ्यावर दत्तप्रभूंना देखील वैराग्य प्राप्त झाले.
इथेच गुळवणी महाराजांना स्वामी लोकनाथ तीर्थ या बंगालच्या तरुण साधूने शक्तिपात दीक्षा दिली. खरे सद्गुरु शिष्याच्या ठायी वसत असणाऱ्या परंतु शिष्यास ठाऊक नसणाऱ्या सर्व जाणीवा प्रेरित करतात. खऱ्या शिष्याची सद्गुरू वाट बघतात. या शक्तिपात दिक्षेचा उपयोग पुढे जाऊन गुळवणी महाराजांनी समाजाच्या हितासाठी केला. याच ठिकाणी चितळेताई आपल्या स्वतःच्या गाडीने परिक्रमावासीयांची सेवा करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी श्रीराम जोशी नावाच्या तरुण परिक्रमावासीच्या निमित्ताने त्यांना शंकर महाराजांचे दर्शन घडले. असा हा पुण्य पावन खर्रा घाट.
परिक्रमेच्या निमित्ताने आपण या स्थानावर आवर्जून जातो.. इथेच आरती केली. त्यानंतर सेठाणी घाट पाहिला. अतिशय सुंदर घाट होता त्याठिकाणी दिवे लावले. मय्या ला नमस्कार केला. इथली सगळी छान देवदर्शने व आरती पूर्ण करून आम्ही मुक्कामी पोचलो. मुक्काम नर्मदा पुरम.
क्रमशः
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नर्मदा परिक्रमा : खूप छान लेखन. लेख वाचताना प्रत्यक्षात
प्रवास केल्या सारखे वाटले. घरात बसून देव
दर्शन आणि निसर्ग पाहण्याचे भाग्य
लाभले. खूप खूप धन्यवाद.