गंगा सिंधू सरस्वती च् यमुना
गोदावरी नर्मदा |
कावेरी शरयु महेंद्रतनया
शर्मण्वती वेदिका |
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी
ख्याता गया गंडकी |
पुर्णा पूर्ण जलै: समुद्र सरिता
कुर्यात् सदा मंगलम |
लहानपणापासून आपण सर्व लग्नांमध्ये ही मंगलाष्टके ऐकत आलो आहोत. सनातन धर्मात नदीची पूजा करतात हे आपल्याला माहीत आहे. गंगा नदीचे महात्म्य आपण सगळेच मानतो. परंतु नर्मदा नदी बद्दल मला काहीच माहिती नव्हती. परमेश्वराच्या ईच्छेशिवाय काहीही संभव नाही. ह्या नद्या त्यांच्या सभोवतालचा प्रदेश सुजलाम सुफलाम करतात.
जेव्हा ‘नर्मदा बचाव’ आंदोलन सुरु झालं तेव्हा मी नर्मदा नदी चे नांव प्रथम ऐकलं. १९८९ मध्ये हे आंदोलन सुरु झालं. नंतर हा वाद कित्येक वर्षे चालू होता. वास्तविकता पाहिली तेव्हा समजलं ह्या धरणाचे पाणी ५० लाख एकर पिक जमिनीला देण्यासाठी वापरले जाते. ह्या धरणामुळे मध्य प्रदेश ला ५३% महाराष्ट्रा ला १५% आणि बाकी गुजरात ला मिळते. जरी ६ वर्षे पाऊस पडला नाही तरीही दुष्काळ पडणार नाही इतकी या सरदार सरोवर धरणाची क्षमता आहे.
आता या नदी शी माझी नाळ कशी जोडली गेली ? हे सांगते. माझी मैत्रीण केतकी बाडकर गेली २/३ वर्षे
यु ट्युब चॅनल वर सतत नर्मदा परिक्रमा विषयाचे व्हीडिओ बघत होती. तिने बरीच माहिती गोळा केली. खुप लोकांचे फोन नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. मला तिच्या ह्या संशोधनाच्या टिप ती वेळोवेळी फोन करुन देत असे. मी पण उत्सुकतेने नाही पण तरीही तिच्या गोष्टी ऐकत असे.
पहिले ती अनिश व्यास यांच्याशी बोलली. मग तिला वाटलं आपण पण परिक्रमा केली पाहिजे. परंतु तीचं वय ६५ वर्षे आणि शारीरिक समस्यांमुळे परिक्रमा पायी करणे अशक्य आहे. मग अनिशजींने तिला बस ने होणाऱ्या परिक्रमेची माहिती दिली आणि कैवल्य धाम आश्रमाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला.
कैवल्य धाम आश्रम कटघडा गाव तहसील बडवाह जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथील नंबर मिळवून केतकी ताईने आश्रमाचे संचालक श्री.अनयजी रेवाशीष यांच्याशी संपर्क साधला. आणि सुरु झाली नर्मदा मैय्या ची प्रेम कहाणी.
जरा ऐकायला विचित्र वाटलं ना ? पण जो परिक्रमा करुन आला आहे त्याच्या साठी तर एक त्या मैय्या शी प्रेम कहाणी आहे. प्रत्येकाची वेगळी पण काहीतरी असीम ओढ आपुलकी आहे हे कोणीही परिक्रमा वासी सांगेल. मानसिक समाधान, एक वेगळीच ओढ असं वाटत की आपली पण तितकीच आहे ही जेवढी मध्य प्रदेश गुजरात वाल्यांची आहे. ही माझी आई आहे, जी मला संभाळते, माझी काळजी घेते. माझ्याकडे प्रेमाने बघते.
केतकी ताई ३ फेब्रुवारी २०२२ ला पहिल्या परिक्रमेला गेली. जाताना मलाही आग्रह केला परंतु तेव्हा माझे FHDAF तर्फे धनुषकोडी इथे होणाऱ्या रामतांडव साठी रामेश्वर चे तिकीट बुक झाले होते. नंतर २९ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर चे परिक्रमेचे बुकींग तिने परत माझ्या बरोबर केलं. अश्या प्रकारे मला मैय्याचं बोलावणं आलं.
मी पहिलंच सांगितले की त्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आम्ही १४ जण केतकी ताईच्या ग्रुप मध्ये आलो. तीन दिवस परिक्रमेच्या आधी आम्ही निघालो कारण आम्हाला माधांता परिक्रमा करायची होती. ह्याला ओंकारेश्वर परिक्रमा पण म्हणतात. ही सात किलोमीटर ची परिक्रमा आहे. ओंकारेश्वर चे भक्त कामना पूर्ण करण्यासाठी नर्मदेचे जल घेऊन माधांता पर्वताची परिक्रमा करतात. जर पायी परिक्रमा करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल तर जरुर पायी परिक्रमा करावी. हा मार्ग खुपच आल्हाददायक आहे. त्या परिक्रमेला ५ ते ७ तास लागतात. इथे नर्मदा आणि कावेरी नदी चा संगम खुप सुंदर आहे. ह्या संगमा वर गेल्या नंतर आपण मुक्तेश्वर मंदिराचे दर्शन करु शकतो. ऋण मुक्तेश्वर मंदिरात भक्तीने चणा डाळ चढवली तर मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. हे मंदिर कावेरी आणि नर्मदा नदीच्या दुसऱ्या आणि अंतिम संगमावर आहे. चणा डाळ अर्पण केली की विविध ऋणातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. ॐ पर्वत (माधांता पर्वत) परिक्रमा करताना ऋण मुक्तेश्वर मंदिर, गौरी सोमनाथ मंदिर, सिद्धनाथ मंदिर, आशापुरी देवी मंदिरांचे दर्शन होते. तुमची क्षमता असेल तर जरुर पायी परिक्रमा करा. मी ही परिक्रमा नावेने केली म्हणून सर्व मंदिरांचे दर्शन आणि अर्थातच त्या वाटेवरचा सुखद अनुभव घेऊ शकले नाही.
ॐकार पर्वतावर राजा माधांता च्या पुत्राने ४ प्रवेशद्वार बनवले आहेत. मुख्य प्रवेशद्वार “चांद सुरज प्रवेशद्वार” इथुन सुर्योदया च्या वेळेस सुर्य देवाचं दर्शन होते आणि सुर्यास्ताच्या वेळेस सुर्या सोबत चंद्राचं दर्शन होते. वास्तुकलेचा आणि विज्ञानाचा एक अतिशय सुंदर नमुना आपण बघु शकतो. राजा माधांता ईश्वाकु वंशाचे चक्रवर्ती सम्राट होते. श्री राम प्रभूंचे पूर्वज त्यांनी ओंकारेश्वर पर्वतावर शिव शंकराची तपश्चर्या केली आणि त्यांना भगवान शिव शंकर प्रसन्न झाले. आदि शंकराचार्य (पद्मपाठ) यांनी माधांता पर्वताची परिक्रमा केली आणि शिव शंकराने त्यांना अनुग्रह दिला.
आज मी इथेच थांबते. पुढच्या भागात आपण नर्मदा परिक्रमे बाबत विस्तृत माहिती घेऊ तोपर्यंत नर्मदे हर ….
“काल हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर
नर्मदे हर जिंदगी भर”….

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नर्मदा परिक्रमेची ओढ ,खरच खूप छान लिहील आहे ,नर्मदा परिक्रमा , या शब्दात काही वेगळीच जादू असावी ,नाही एवढ काही नाही ,बघू जमल तर जायच नाहीतर नाही ,असं म्हटल तरी कुठेतरी एक अंतरिक ओढ लागतेच हे मात्र खर 😄😊,आणि तूमच्या लिखाणाची जादू म्हणा ,पुढच्या लेखाची आतुरतेने वाट बघते आहे 😄