Sunday, September 8, 2024
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : ६

नर्मदा परिक्रमा : ६

शहादा ते अंकलेश्वर

नेहमीच्या पद्धतीने आम्ही आज भल्या पहाटे 4 वाजता लवकर उठून सर्व आन्हीके उरकून चहा घेऊन शहादा सोडलं. सर्वांनी वेळेचं नियोजन करण्यात मदत केली. गाडीमध्ये भल्या पहाटे प्रकाश काका यांनी जनलोकांचा सामवेद…..
अर्थात लोकसाहित्यात ग्रामीण स्त्रियांचे योगदान या विषयावर सलग जवळपास दोन तास चर्चा केली. अनेक जण भावुक झाले. डोळे पाणावले. गतकाळातील स्मृती जाग्या झाल्या. लोकसाहित्य हे अस्सल देशिकार सोनं आहे. अशिक्षित अडाणी स्त्रियांनी मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केलेलं हे स्त्रीधन आहे. उतायचं नाही, मातायचं नाही …
सगळ्यांशी प्रेमाने अदबीने वागायचं..
मर्यादा पाळायच्या आहेत..
परिस्थितीचा बाऊ न करता तिच्याशी दोन हात करायचे आहेत..
हसत खेळत जीवन जगायचं आहे….
असं सर्वसमावेशक तत्वज्ञान या ओव्यांमधून सांगितलं आहे….
ओवी म्हणजे ओवनं..
मनीचा भाव गुंफनं….
अनेक मोठे धर्मग्रंथ चाळूनही जे सहजी सापडणार नाही असं सुलभ जीवनामृत या साहित्यात आहे….
या निमित्ताने परिक्रमा मार्गावरील एक पहाट संस्मरणीय झाली….

जनलोकांनी देवादिकांविषयी व्यक्त केलेल्या भावना या रोजच्या जीवनाशी साम्य पावतील अशा आहेत….
काहीतरी भव्य दिव्य सांगून त्यांनी देवाची भलावण केली नाही…
त्यामुळेच ही लोकगीतं साधी भोळी असली तरी हृदय स्पर्शी आहेत….
ईथे काळीज काळजाशी बोलतं…मनाचं दारिद्रय नाहीसे करून परमेश्वराच्या राऊळात मानसिक श्रीमंतीचे भांडार लुटायला येण्याचं आवाहन संत साहित्यानं केलेलं आहे….
मानसिक भाव जलाचं शिंपण करून महाराष्ट्र भूमी संत महात्म्यांनी समृध्द केली आहे….
हे अस्सल देशिकार मौखिक शब्द भांडार आपल्या पर्यंत लिखित स्वरूपात पोचविण्याचे मोठे अवघड कार्य डॉक्टर सरोजिनी बाबर आणि सुप्रसिद्ध कवयत्री शांताबाई शेळके, इंदिरा संत आदी विदुषींनी केलं आहे….
या सर्वांनी याकामी अपार कष्ट घेतले आहेत.
त्यांचे आपल्यावर अशा अर्थी फेडता येणार नाहीत ईतके उपकार झाले आहेत.या सर्व जणी लोक साहित्याच्या अभ्यासक संशोधक उपासक आणि संपादक होत्या…..

डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी संपादित केलेले लोक साहित्य तत्कालीन महाराष्ट्र शासनाने छापून प्रकाशित केले होते….
परंतु काळाच्या ओघात आता नव्यानं त्या साहित्याची छपाई होत नाही…..
ज्या कुणी त्यांची पुस्तकं त्यावेळी विकत घेतली आणि संग्रही ठेवलीत अशाच काही भाग्यवंतांकडे आणि काही ग्रंथालयांकडे ते साहित्य थोड्या बहुत प्रमाणात उपलब्ध आहे…..
बाकी सर्व दूर ते सहज उपलब्ध होत नाही याची खंत वाटते….
मात्र आनंदाची गोष्ट अशी आहे की सुप्रसिद्ध मराठी कवयत्री इंदिरा संत यांनी संपादित केलेले लोकसाहित्य आजही
मालन गाथा भाग ०१ आणि ०२..या नावानं उपलब्ध आहे…..
संत साहित्य आणि लोकसाहित्यया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत……

वाटेत पोहे चहा कण्हेरी असा बालभोग झाला….आज मकर संक्रांत .गुवारच्या मय्या किनाऱ्यावर गुजरात मध्ये उत्तरवाहिनी नर्मदा पात्रात स्नान केले…
हा तसा निर्जन किनारा आहे..…
निर्मळ पण वेगवान….
आज नर्मदा पात्रात पाणी कमी होते….परंतु मकर संक्रांत पर्व काळ….छान स्नान घडले….
ओट्या भरल्या…दिवे लावले…..
आनंद झाला….
चैत्रात लोक आवर्जून उत्तर वाहिनी नर्मदेची पायी परिक्रमा करतात…..
ते आज आपल्या बसच्या परिक्रमेत सहजी घडलं….
उत्तर वाहिनी नर्मदेत आज स्नान अपूर्व जाहले….

इथली नर्मदा निवळ शंख..तिथून जवळच काठावर रामानंद आश्रम आहे…इथे अत्यंत सुंदर राम सीता हनुमंत नर्मदा व वैष्णोदेवी माता आदी देवता व मुख्य म्हणजे पाऱ्याचे अतिसुंदर शिवलिंग आहे. त्यावरही नर्मदेचे जलाने सर्वांनी जलाभिषेक केला. परिसर रमणीय आहे…
इथे परिक्रमावासी राहू शकतात… चालत परिक्रमा करणाऱ्यांना इथे राहायची आणि जेवणाची सोय केली जाते. इथला परिसर खूप मोठा असून मोठ्या मोठ्या झाडांनी भरलेले आहे.जवळच तपोवन आश्रम आहे…
हसमुख साईबाबा व दत्त प्रभू तसेच हनुमंतराय यांची इथे मंदिरे आहेत….

इथे स्वामी पूर्णानंद सरस्वती हे महात्मे आहेत… त्यांनी क्षेत्रसंन्यास घेतला आहे..
म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आश्रम सोडायचा नाही…
ही कठोर साधना ते करत आहेत.
हे पूर्वी खिडकीतून दर्शन देत…
म्हणून त्यांना खिडकीतला देव असंही म्हणतात….महात्मा खूप मोठा आहे.
या महात्म्यास एकदा एकाने प्रश्न विचारला होता…
महाराज तुम्हाला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते..
तुम्हाला भेटल्यानंतर त्याची पूर्तता होते का ? यावर या महात्म्याने उत्तर दिले.. आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर येतो तेवढेच आंबे येतात का ?

नर्मदेच्या काठावर असे अनेक साधनामस्त अवलीये आहेत..
संत सज्जनांच्या सहवासात जीवाचा उद्धार होतो.परिसरात
आंब्याची वडाची पिपळ औदुंबर याची मोठी मोठी खूप खूप झाडे आहेत…समोर नर्मदेचे विस्तीर्ण पात्र असून परिसर रम्य आहे….
तुळस कमळ पुष्पे विपुल प्रमाणात आहेत….
शुलपानेश्वर येथे मंदिरात दर्शन घेतले.
आरती केली….आणि नंतर त्याचं परिसरात भोजन प्रसादी घेतली.

मूळचं शूलपाणी मंदिर महाराष्ट्रात मनिबेली या गावात होतं.
परंतु सरदार सरोवर धरणात पाणी साठविल्या नंतर हे मंदिर व शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.. याच मंदिरात अक्कलकोट स्वामींनी चातुर्मास केला होता..
आता मूळचे मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर गुजरात राज्यात गोरा कॉलनी याठिकाणी नवे शूलपानी मंदिर बांधलं आहे..

हे नवे मंदिरही अत्यंत आकर्षक व प्रशस्त आहे ..इथे शिवलिंगास स्पर्श करून नर्मदा जलाचा अभिषेक करता येतो..आम्हालाही ते भाग्य मिळाले.

अंतिम टप्प्यात आम्ही अंकलेश्वर च्या दिशेनी निघालो.
अंकलेश्वर हे गुजरात राज्यातील एक मोठे शहर आहे.
या शहरामध्ये एका उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये आमचे वास्तव्य असल्याने आजचा मुक्काम अंकलेश्वर..
मुक्कामी पोहचल्यावर सगळे रूम मध्ये गेले. सव्वा सहा वाजता चहा घेण्यासाठी सगळे एकत्र आले. त्यावेळी प्रकाश काका यांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या प्रवासा बाबत माहिती दिली. नंतर 8 वाजता रोज प्रमाणे हरिपाठ गुरू पाठ नर्मदा अष्टक रामरक्षा असे होऊन आरती झाली. नंतर नेहमी प्रमाणे भोजन करून सगळे झोपायला गेले. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे 2.30 वाजता उठून साडेतीन वाजता निघायचे होते.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments