Friday, January 3, 2025
Homeपर्यटननर्मदा परिक्रमा : ८

नर्मदा परिक्रमा : ८

दहेज ते गरुडेश्वर.

दहेज येथील मुक्काम करून समुद्र प्रवास करून उत्तर तटावरील परिक्रमेतील पहिला टप्पा सुरू झाला.समुद्र प्रवासानंतर उत्तर तटावरील श्री नर्मदा परिक्रमा प्रारंभ होते.उत्तर तट हा स्वमोक्षार्थ सांगितला आहे.

आज आम्ही सकाळी लवकर उठून सर्व आवरून, आरती करून आणि बालभोग घेऊन भरूच कडे निघालो.

मोक्ष कुठं मिळतो ?
असं म्हणतात.
मोक्ष नर्मदेच्या काठावर मिळतो.
नर्मदा मोक्षदायिनी आहे.
मोक्ष कोणी पाहिला ?
मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष !
प्रापंचिक जीवनाची आसक्ती कमी होणे आणि ईश्वरभक्तीकडे आपण ओढले जाणं म्हणजे मोक्ष..
प्रापंचिक जीवन मिथ्या वाटणं आणि ईश्वर सत्य वाटणं म्हणजे मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू होणे..
आणि यासाठी आपण कृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचं समर्पक उदाहरण देतो..
यमुनेच्या काठावर मोक्ष मिळतो..
मात्र आपण सुदाम्याएवढे निरपेक्ष असायला हवे..
काही मागायचंच नाही…..
गंगेच्या काठावर मोक्ष हवा तर
मृत्यूची वाट पाहायला हवी..

गंगाकिनाऱ्यावर मृत्यू आला म्हणजे आपण शिव तत्वात विलीन झालो आणि पर्यायाने मोक्षाचे धनी झालो…..हे दोन्ही मार्ग सोपे नाहीत याची आपल्याला कल्पना आहे…
त्यामुळे आपण मैया किनाऱ्यावर आलो आहोत..नर्मदेच्या केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो…
हा मार्ग सर्वांना सहज शक्य आहे…
म्हणून नर्मदा परिक्रमा करायची…
तिच्या सहवासात अधिकाधिक काळ घालवायचा..असं सगळं निरूपण गाडीमध्ये प्रकाश काका यांनी केले.

बघता बघता आम्ही भरूच शहराच्या बाहेरील नीलकंठ धाम येथे आलो..
या स्थानाचा उल्लेख नर्मदा पुराणात आहे.इथे निलकंठेश्वर नामक शिवलिंग आहे..समोर हनुमंत आहेत…मंदिराचे आवार प्रशस्त आहे. पायी परिक्रमा करणारे येथे मुक्काम करतात…त्यांना आवश्यक व्यवस्था याठिकाणी दिल्या जातात….इथे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आश्रम आहेत. ज्याठिकाणी पायी परिक्रमा करणाऱ्यांना रात्री राहायला जागा, जेवण दिले जाते.
अंकलेश्वर ते भरूच असा नर्मदेच्या पात्रावर भलामोठा ब्रिज देखील आहे..इथे नर्मदेने खूप गाळ वाहून आणला आहे..या सर्व गोष्टी पाहून आपण आता नारेश्वरकडे निघालो आहोत..तासाभराच्या प्रवासात आम्ही श्री रंगावधूत स्वामी या महात्म्याविषयी प्रकाश काका यांनी सर्वांना खूप छान सविस्तर माहिती सांगितली .आम्ही मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होतो.

रंगावधूत स्वामींचं मूळ नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असं आहे.. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवळे गावाशी त्यांचा वडिलोपार्जित संबंध आहे….स्वामींचा जन्म…२१/११/१८९८ चा.स्वामींच्या वडीलांचे नाव विठ्ठलपंत तर आईचे नाव रुक्मिणी तर आजोबांचे नाव जयराम भट्ट.
अवधूताच्या रंगात रंगले म्हणून पांडुरंगास रंगावधूत स्वामी हे नाव त्यांचे सद्गुरु टेंबे स्वामी यांनी बहाल केले…. खरं सांगायचं तर जग नावं ठेवतं…आणि सद्गुरु नाव ठेवतात.
रंगावरून स्वामींचा दत्तसंप्रदायातील अधिकार बहुत मोठा आहे….
नारेश्वर ते गरुडेश्वर अशी पायी परिक्रमा करण्याची संकल्पना रंगावधूत स्वामींचीच आहे….
शिष्य स्थानापासून गुरु स्थानापर्यंत पायी चाललात तर संपूर्ण परिक्रमा पूर्ण केल्याचे फळ मिळेल अशी आपल्या गुरु स्थानावर रंगावधुत स्वामींची नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे…..नारेश्वर खरंतर दहा गावांचं स्मशान…..परंतु रंगावधुत स्वामींचे येण्यामुळे तिथे स्वर्ग अवतरला…..
दत्त संप्रदायामध्ये विशेषता गुजरात मध्ये रंगावधूत स्वामींना बापजी म्हणून संबोधतात….
त्यांनी आयुष्यभर दत्त नामाचे स्मरण करत देह देवापाशी वाहिला….
त्यांनी हरिद्वार येथे १९/११/१९६८ रोजी आपला देह ठेवला आणि याच नारेश्वरी २१/११/६८ त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार केले गेले……

परिक्रमेत नारेश्वर या स्थानास विशेष महत्त्व आहे.नारेश्वर ते गरुडेश्वर अर्थात शिष्य स्थान ते गुरूस्थान अवघे ९० किलोमीटर ची ही परिक्रमा जे चाललात त्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याचं पुण्य पदरी पडेल असे सांगितले आहे.

बघता बघता नारेश्वर आलं..
आम्ही नारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन रंगावधूत स्वामींच्या समाधी स्थानी पोचलो.आज मंदिरात गर्दी नव्हती…दर्शन अगदी छान झालं. त्यांच्या आईसाहेबांचं देखील दर्शन घेतलं….घाटावर स्नान केलं……
आपल्या बसने कोहना या ठिकाणी गेलो….इथे दुपारचं वनभोजन झालं..आजूबाजूचा परिसर खूप छान होता.

आमच्या या परिक्रमेत जे आम्हाला छान चवीचे जेवण बनवणारे आमचे महाराज यांच्या हाताला खरंच खूप चव आहे . स्वयंपाक घरात अन्नपूर्णेचा निवास आहे असेच वाटते.
इथे आम्ही हसमुख हनुमंत राय आणि स्फटिकाचे शिवलिंग पाहिलं..
दुपारी चार वाजेपर्यंत आम्हाला केवडिया कॉलनी येथे पोचायचं होते.आज आम्हाला जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा पाहायचा होता. आमचा नियोजित मुक्काम केवडीया कॉलनीत होता.

नर्मदा परिक्रमेत आपले गुजरात राज्यात एकूण चार मुक्काम होतात.
पहिला अंकलेश्वर दुसरा दहेज आणि तिसरा व चवथा केवडिया कॉलनी येथे होतो.आज सकाळी आम्ही गुजरात राज्यातील नर्मदा उत्तर तटावरील श्री क्षेत्र नारेश्वर येथे….
दत्त संप्रदायातील अधिकारी पुरुष रंगावधुत स्वामींच्या दर्शनास गेलो होतो..प्रत्येक परिक्रमेत परिक्रमावासी येथे जातातच.
यंदाचे वर्ष म्हणजे मणीकांचन योग.. रंगावधुत स्वामींचा १२५ वा जन्मदिन.शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सुदिन…२१/११/१८९८ या दिवशी स्वामींचा जन्म झाला….त्या घटनेला आता बरोब्बर सव्वाशे वर्ष पूर्ण झाली…..आणि या अलभ्य घटनेचे साक्षीदार होत आम्ही नारेश्वर येथे दर्शनासाठी आलो….हे आमचे भाग्यच होते.
जगत कल्याणासाठी संत महात्मे जन्माला येतात.जगाच्या कल्याणाा संतांच्या विभूती…
आज नारेश्वर मध्ये बापजींच्या जन्मदिनी भक्त भाविकांची गर्दी होती..भजन पूजन कीर्तन असं सगळं काही छान चाललं होतं……
वातावरण अतिशय प्रसन्न होते.आम्ही स्वामींचे दर्शन घेतले.स्वामी आजन्म अवधूत राहिले….

काही काळ बडोदा अहमदाबाद येथील शाळा महाविद्यालयात त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले….
गुरूचरित्र, दत्तपुराण या पवित्र ग्रंथांचे प्रत्येकी १०८ वेळेस पारायण केले….
नर्मदा परिक्रमा १०८ दिवसात निव्वळ गूळ पाण्यावर पूर्ण केली…
५२ अध्याय असणाऱ्या गुरू चरित्रातील सार दत्तबावनी या सुलभ ग्रंथात आणलं….
गुरुलीलामृतसार, गुजराती भाषेतील गुरुचरित्र, वासुदेव सप्तशती , गुरुमुर्तीचरित्र आदी विपुल ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं.

त्यानंतर आम्ही दुपारच्या सत्रात लोहपुरुषाचा जगातील सर्वात उंच पुतळा पाहायला निघलो. या अलौकिक पुतळ्याने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो हे बाकी नक्की…
कारण जगातील सर्वोच्च पुतळा आज हिंदुस्थानात आहे….
सरदार वल्लभभाई पटेल यांचं या देशाप्रतीचं योगदान फार उच्च कोटीचं आहे….
त्यांना लोहपुरुष म्हणतात…
संस्थाने खालसा करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या हातून घेतला गेला….
अखंड भारताचं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी प्रसंगी कठीण कारवाई करण्यात अग्रभागी असणारे सरदार वल्लभभाई पटेल आमच्या अभिमानाचा विषय आहेत…
त्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा त्यांच्या प्रति समस्त भारतीयांनी प्रकट केलेला आदरभाव आहे….
पुतळा व परिसर केवळ अवर्णनीय आहे…

या पुतळ्याच्या लिफ्ट मधून वरती गेलो की आपल्याला नर्मदा नदीचे पात्र पाहता येते. चारी बाजूने सभोवतालचा परिसर पाहता येतो..समोरच असणारे विस्तीर्ण नर्मदा सरोवर धरण ही पाहायला मिळते.या परिसरातील जी गावे विस्थापित झाली त्या लोकांना इथे कामामध्ये सामवून घेण्यात आले आहे .इथे या परिसरात सर्व बॅटरी रिक्षा महिला चालवताना पहायला मिळतात.तसेच या परिसरात असणाऱ्या गाईड ही महिलाच आहेत. हे पाहून अभिमान वाटतो.तसेच या नर्मदा सरोवरमुळे नक्की काय फायदा झाला ते धरण कसे बांधले याचा सविस्तर वृत्तांत सांगणाऱ्या फिल्म इथे दाखवल्या जातात. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा सर्वोच्च पुतळा बनवण्यासाठी साडेतीन वर्षात काय काय केले, त्यासाठी किती गोष्टी लागल्या याचाही सविस्तर वृतांत दाखवणाऱ्या फिल्म इथे दाखवल्या जातात.सर्व परिसर स्वच्छ सुशोभित असलेला पाहून इथेच बसून राहावे असेच वाटते.इथला ध्वनी प्रकाश कार्यक्रम पाहून सरस….डोळ्यांचे पारणे फिटते…
खूप खूप समाधान वाटते…
आजची संध्याकाळ अशा प्रकारे संस्मरणीय झाली…..

रात्री साडेआठ वाजता हॉटेल वर आलो.लगेच पुढील कार्यक्रम होता तो म्हणजे हरिपाठ गुरूपाठ रामरक्षा आरत्या असे सगळे होऊन 10 वाजता जेवलो.आणि रूम मध्ये येऊन झोपयाची तयारी झाली.उद्या आम्ही सकाळी
चहा घेऊन मालसर कडे निघत आहोत.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !