हिंदू धर्मात सर्वात पवित्र असलेल्या गंगा नदीची परिक्रमा होत नाही. पण नर्मदा नदीची मात्र परिक्रमा होत असते. इतकी नर्मदा परिक्रमा महत्वाची आहे.
तर ही परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सुलभा दिवाकर सांगताहेत त्यांचे अनुभव दर बुधवारी.
सुलभा दिवाकर या एमटीएनएल मधून निवृत्त झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची बी ए पदवी प्राप्त केलेल्या सुलभा दिवाकर यांना लेखनाची व सामाजिक, धार्मिक कार्याची आवड आहे. आपल्याला घरच्यांनी आज पर्यतच्या वाटचालीत साथ दिली, हे त्या कुतज्ञतेने नमूद करतात.
सुलभा दिवाकर यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
नुकतीच नर्मदा परिक्रमा करण्याचा योग आला. म्हणजे बसने परिक्रमा केली, चालत नाही !
२०१० ला माझा अपघात झाला आणि त्यात माझा उजवा पाय दुखावला. एक वर्ष मी घरीच होते. त्यानंतर चढणं उतरण हे आधाराशिवाय मला जमतच नाही. माझ्या मैत्रिणीने खूप हट्ट केला तू येच म्हणून मी परिक्रमेला गेले. तिने ह्या वर्षाच्या सुरुवातीला नर्मदा परिक्रमा केली आहे आणि दुसरी परिक्रमा नुकतीच म्हणजे २९ ऑक्टोबर २२ ला माझ्याबरोबर केली.
आम्ही ओंकारेश्वर पासून परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमेचे आयोजक कैवल्यधाम आश्रम होते. आश्रमाचे संचालक श्रीयुत अनयजी रेवाशिष रोज सकाळी नर्मदा पुराण सांगायचे. दोन अडीच तासाचे प्रवचन आम्ही मनाचा कान करून ऐकायचो.
१९७४ सालापासून परिक्रमा बसने सुरू झाली. आज बसने परिक्रमा सुरू होऊन ४८ वर्षे झाली. त्या आधी परिक्रमा फक्त पायी करत असत. परिक्रमा सर्वात प्रथम पांडवांनी केली आणि तिला ३ वर्ष ३ महिने १३ दिवस लागले. आता पायी परिक्रमा तीन ते साडेतीन महिन्यात पण पूर्ण करतात.
शारीरिक क्षमतेनुसार भक्ती भावाने परिक्रमा पूर्ण करणारे भक्त आहेत. मैयाच्या प्रेमाने, भक्तीने येतात.आम्हाला पायी परिक्रमा करणे खरोखर जमणारच नाही. आमची तेवढी शारीरिक क्षमता नाही. म्हणून आम्ही बसने परिक्रमा केली.
बसने परिक्रमा करत असलो तरी काही नियम पाळणे हे आपल्याला बंधनकारक आहे. आम्हाला तिथे जाऊन जे काही समाधान मिळालं ते अवर्णनीय आहे.
आल्यानंतर एका ओळखीच्याने फोन करून विचारलं, काही चमत्कार अनुभवलेत का ? परंतु मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला माझी शारीरिक क्षमता माहित आहे त्यामुळे मी परिक्रमा करून आले तोच माझ्यासाठी चमत्कार होता.
दिवसातून अर्धा एक किलोमीटर चालणं मला केवळ अशक्य आहे. सियाराम बाबांचे दर्शन करायला अर्धा किलोमीटर चालत जावं लागतं. कपिल ऋषी तपस्थली चा रस्ता तर कठीणच आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने, “नर्मदे हर” म्हटलं की जोश यायचा. काहीतरी शक्ती होती त्या भूमीत. शाश्वततेचा साक्षात्कार होतो त्या मैयाच्या भुमीत.
मैयाच्या त्या माऊलीच्या मायेने आज मी वयाच्या ५८ व्या वर्षी परिक्रमा करू शकले. रोज सकाळची मैयाची षोडशोपचारे पूजा त्यानंतर पंडित अनयजींच्या मधाळ वाणीत ऐकलेले नर्मदा पुराण त्या त्या स्थळावर जाण्याआधी त्या स्थळाचे महत्व आम्ही ऐकून उत्सुक व्हायचो. कधी एकदा त्या स्थळी जाऊन दर्शन घेतो असे वाटायचे. बलबला कुंड, मिठी तलाई वर्षानुवर्ष दशावताराच्या आरती मध्ये “सहस्त्रार्जुन मातला जन्मदग्नीचा वध केला”
हे ते परशुरामाचे ठिकाण परशुरामाने जिथे पण केला, मैया की बगिया, अमरकंटक उद्गम स्थल, महीष्मती घाट, सेठानी घाट रोज होणारी नर्मदाष्टक, मैया ची आरती त्यामधील “झुमकत झुमकत झुमकत झननन झननन” किती प्रसन्न वाटायचं. मैया च्या जवळ आलो की “सदा कलकल निनादिनी” चा प्रत्यय यायचा. ती नदी आहे पण खरंच तिच्यात असीम आपुलकी आहे.
मी जेव्हा जेव्हा शक्य होई, तेव्हा तेव्हा माझ्या मुलाला, बहिणीला, वहिनीला, माझ्या मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून दर्शन घ्यायला सांगायची. कारण मैयानी ग्वाही दिली आहे की माझ्या नुसत्या दर्शनाने तुमची पापमुक्ती होईल. तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकेल हे सर्वांच्या भल्यासाठी मैय्याने आपल्या पित्याकडे, शिव शंकराकडे मागणी केली आहे.
तर अश्या परिक्रमेतील महत्वाच्या तीर्थ स्थळांची आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. जे समाधान मी अनुभवले ते मला आपल्या सोबत शेयर करायचे आहेत.
तर मग पुढच्या लेखात आपण भेटू या त्या त्या पवित्र तीर्थ क्षेत्री, तोपर्यंत
नर्मदे हर ……
काल हर दुःख हर दारिद्र्य संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर….
नर्मदे हर जिंदगी भर ..
क्रमशः

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Adhunik wanprasthashram ani narmada parikrama parchay lekhan donhi chhan