नोकरीमुळे फक्त स्वतःला रोजगार मिळतो. तर उद्योग, व्यवसायामुळे अनेक जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. देशांतर्गत उत्पादन वाढले की, परदेशी कंपन्यांचे प्राबल्य कमी होत जाईल आणि देशातील पैसा देशातच राहून देश समृद्धीकडे वेगाने झेपावेल असे मत सांगली येथील उद्योजक संजय वजरिणकर व्यक्त करतात.
संजय वजरिणकर हे मूळ सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील. त्यांचा जन्म १६, ऑगस्ट १९६४ रोजी झाला. प्राथमिक, शालेय शिक्षण तासगावलाच झाले. तर बीएससी (केमिस्ट्री) ची पदवी त्यांनी सांगलीतून मिळवली. पुढे कोल्हापूर येथून एमबीएची पदवी प्राप्त केली.
वजरिणकर यांचे वडील तासगावमध्ये रस्त्यावर धान्य विकायचे. पण आई वडील दोघेही जुने मॅट्रिक झालेले होते. त्यामुळे त्यांचा शिक्षणावर खूप भर होता. त्यामुळेच आज वजरिणकरांचे मोठे भाऊ मुख्याध्यापक आहेत तर धाकटे भाऊ खाजगी कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वजरिणकर यांनी एमबीए झाल्यावर एका खाजगी कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून ४ वर्ष नोकरी केली. पण पहिल्यापासूनच त्यांची व्यवसाय करण्यासाठी इच्छा होती त्यामुळे नोकरीत मन रमत नव्हते. शेवटी हिंमत करून नोकरी सोडली. या नोकरीमुळे शेतीचे मूलभूत ज्ञान मिळाले तर व्यावसायिक अनुभवाने
व्यवसायाचे ज्ञान मिळाले.
वजरिणकर नोकरी सोडून व्यवसाय करणार म्हणून सर्व कुटुंबियांचा, नातेवाईकांचा प्रारंभी प्रचंड विरोध होता पण पत्नी सुरेखा यांनी पूर्ण साथ दिली.
तासगावमध्ये प्रथम शेती औषधाचे दुकान टाकले. त्यावेळी दिवसदिवस बसून गिराईकांची वाट बघावी लागत असे. पण चिकाटी व जिद्द सोडली नाही. पुढे दुकानामुळे शेतकऱ्यांशी संबंध येऊ लागला. त्यांच्या गरजा, समस्या लक्षात येऊ लागल्या आणि त्यातूनच त्यांना कोणत्या उत्पादनांची, औषधांची गरज आहे हे कळू लागले.
प्रत्यक्ष अनुभवातून आणि विविध उत्पादनांच्या अभ्यासातून, संशोधनातून प्रत्यक्ष उत्पादनाच्या निर्मितीकडे वजरिणकर २००१ साली वळले. उधारीवर व्यवसाय सुरू केला. मित्रांनी भांडवलासाठी आर्थिक मदत केली. सुरवातीला भाड्याने छोटा प्लॉट घेतला. तिथे उत्पादन सुरू केले. पण अनुभवी कर्मचारी, कामगार नव्हते. त्यामुळे सर्व कामे स्वतः करावी लागत आणि ती इतरांना दाखवून शिकवावी लागत. सुरवात झाली ती दोन कामगारांपासून. त्यापैकी एक स्वतः वजरिणकर होते तर दुसरा प्रत्यक्ष कामगार होता.
स्वतःच उत्पादन करायचे आणि ते दुकानांमध्ये जाऊन स्वतःच विकायचे. पुढे काम वाढू लागले आणि २०१० साली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. या कंपनीमार्फत किटकनाशके, संजीवके, द्राक्षाशी सबंधित रसायन यांचे उत्पादन केले जाते. ही उत्पादने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात जातात. थोडक्यात जिथे द्राक्षाचे उत्पादन होते, तिथे तिथे ही औषधे जातात.
आज कंपनीत अधिकारी, कर्मचारी, कामगार, लॅब तंत्रज्ञ, मार्केटिंग टीम असे जवळपास शंभर जण कार्यरत आहेत. एप्रिलमध्ये उत्पादन सुरू होते ते नोव्हेंबरपर्यंत चालते. मधल्या काळामध्ये पुढील हंगामाची कामे करून घेतली जातात. कंपनीचे वैशिष्टय म्हणजे किमान वेतन कायद्यापेक्षाही कामगारांना अधिक वेतन येथे दिले जाते. कामगारांची सुरक्षा, आरोग्य याकडे विशेष लक्ष दिले जाते.
पहिल्या वर्षी कंपनीचे अडीच कोटी रुपये एवढी झालेली उलाढाल नंतर वीस कोटीच्या पुढे गेली. कंपनी केंद्र, राज्य सरकारचे कर वेळच्या वेळी भरत असते. उत्पादनांच्या डिलिव्हरीसाठी ५ वहाने आहेत. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उत्पादन कसे वापरायचे याचे प्रात्यक्षित दाखविणारे, माहितीपट दाखविणारे आकर्षक वाहन स्वतः वजरिणकर यांनी विकसित केले आहे.
कंपनीने भारतभर आठशे वितरकांचे मजबूत जाळे निर्माण केले आहे. या साखळीमुळे, उत्पादनांच्या दर्जेदारपणामुळे विक्री व्यवस्थेची घडी उत्तमपणे बसली आहे. वजरिणकर, वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, रेडिओ, माहितीपट यावरून सातत्याने त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी करीत असतात. पण स्वतः मात्र व्यक्तिगत प्रसिद्धीपासून ते कटाक्षाने अलिप्त राहिले आहेत.
इजिप्त, चीन, मॉरिशस, दुबई, व्हिएतनाम, श्रीलंका, अमेर्निया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड या देशात भेटी देऊन तेथील उत्पादने, बाजारपेठा यांचा अभ्यास ते करून आले आहेत.
श्री.संजीव कोलार हे त्यांचे २००४ पासून भागीदार आहेत. ते स्वतः कृषी पदवीधर आहेत.
वजरिणकर ह्यांचे पुढचे पाऊल म्हणजे १५ कोटी रुपये गुंतवणूक असणारा अन्न प्रक्रिया उद्योग. या उद्योगामुळे मोठया प्रमाणात गरजू लोकांना रोजगार मिळाला. ५ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला गेला आहे.
सद्या त्यांनी ८८ नवीन प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. जसे किटक नाशके, संजीवक, बुरशी नाशक असे अनेक औषधे निर्माण केली आहेत ज्याची देश विदेशात मोठया प्रमाणात मागणी आहे.
संजयजीना फिरायला खूप आवडते. त्यांना ट्रेकिंग, जंगल सफारीचाही छंद आहे. तसेच चित्रकला व पेंटिंग करायला ही आवडते. त्यांनी स्वतः मोटरसायकलने गोवा, केरळ आधी ठिकाणे जाऊन आले आहेत. त्यांना वन्यजीव व कृषी फोटोग्राफीचा छंद आहे. असे आगळेवेगळे छंद त्यांनी जोपासले आहेत.
संजय वजरिणकर ह्यांचा मोठा मुलगा साहिल ह्याने बी फार्म केले असून तो व्यवसायात मदत करत असून पूर्ण मार्केटिंग डिपार्टमेंटची जबाबदारी अगदी चोख पणे निभावत आहे. लहान मुलगा, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर येथे बी टेक फूड टेक्नॉलॉजीच्या
फायनल इयर ला आहे. तसेच जर्मन भाषा ही शिकत आहे. पुढे जर्मनीला जाऊन फूड टेक्नॉलॉजीत मास्टर्स करण्याचा मानस आहे.
तुमची काही स्वप्ने आहे का ? हे विचारले असताना ते म्हणाले की, त्यांना कोकणात ऍग्रो टूरिझम सुरू करण्याची इच्छा आहे. त्यांच्या कोकणातील फार्म हाऊस मध्ये काजू व आंब्याची बाग आहे. रिसॉर्ट्सची साखळी सुरू होणार आहे जे काम पुढील एक ते दोन वर्षात पूर्ण होईल.
आजच्या तांत्रिक युगात तरुणांना सर्व काही इन्स्टंट हवे असते. त्यांच्यात अजिबात सहनशीलता अथवा संयम नाहीत. मात्र प्रामाणिकपणे, चिकाटीने व जिद्दीने स्वतःचे धैर्य गाठले पाहिजे मग यश तुमचेच आहे, असे ते सांगतात.
असे ही अनुभव आले की व्यवसाय शून्यावर गेला होता. मात्र अशा बिकट परिस्थितीत न थांबता, न डगमगता नव्याने सुरवात केली. मात्र थांबले नाही. किंवा हारही मानली नाही. लढले व जिकूनही दाखवले. स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. अशी जिद्द जर प्रत्येक तरुणाने दाखवली तर नक्कीच ते देखील उद्याचे नवे उद्योजक असतील. त्यांचा हा जीवन प्रवास निश्चितच तरुणांना आदर्श वाटावा असाच आहे, तर समाजालाही अभिमान वाटावा असे कार्य आहे.
त्यांचा जीवनपट उलगडताना एकच म्हणावे वाटते,
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यांपुढे खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे ! आणि असे आशावादी नागरिकच देशाची खरी संपत्ती आहेत.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अभिनंदन संजय जी आणि पुढील सारी स्वप्न पूर्ण होवोत .ही सदिच्छा 💐💐💐👏