आनंदवन मित्र मंडळ, नवी मुंबई आणि न्युज स्टोरी टुडे वेबपोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आणि त्यांचे सुपुत्र डॉ विकास आणि डॉ प्रकाश यांनी समर्थपणे चालविलेल्या आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ या प्रकल्पांना भेट आयोजित करण्यात आली होती. या प्रेरणादायी भेटीने स्फुरलेली ही कविता…..
दर्शन घडले नव्या विश्वाचे ,
मूक बधिर नि दिव्यांग ,
स्वावलंबी जीवन तयांचे ॥१॥
गळकी बोटे विद्रूप दशा ,
गमावला त्यांनी आत्मविश्वास मनाचा ,
बेघर पामरे दाही दिशा ॥२॥
जणू देवाने देवदूत धाडला ,
रडला ढसाढसा पाहुनी विद्रूप देहा ,
माणसाने माणसात माणूस शोधला ॥३॥
जात पात ना धर्म ,
मंदिर मस्जिद ना चर्च ,
कुष्टरोगी सेवा हेचि कर्म ॥४॥

दिवांग्याच्याठायी हाच अमुचा परमेश्वर ,
सोडिली जमीनदारी नि घरदार ,
घनदाट वनी थाटला संसार ॥५॥
अन्नपूर्णा सरस्वती ती माऊली ,
हात दिला बाबांच्या हाती ,
झाली दिव्यांगांची सावली ॥६॥
बाबांची साधना पूर्णत्वास प्रकल्पांनी ,
विकास भारती जनक श्रम – कला- स्वरानंदवनी ,
प्रकाश वाटेवरी मंदा सहचारिणी ॥७॥

अफाट जमिनी बहरल्या पिकाफुलांनी ,
प्रेमजिव्हाळा मिळविला मुक्या प्राण्यांनी ,
पंच्याहत्तरी आली सुखमय जीवनी ॥८॥
टिपले थेंब श्रमाचे ,
वेचले दाणे शिक्षणाचे ,
घेतले धडे स्वावलंबनाचे ॥९॥

जन्म व्हावा घराघरात ,
प्रेरणा तुमची मनामनांत ,
माणसातला माणूस तू अमर हया जगात ॥१०॥

— रचना : सौ.वर्षा भाबल.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच छान ,आनंदवन, हेमलकसा, मधील बाबा आमटे, प्रकाश आणि विकास आमटे याच्या कामाचे मोठे योगदान कवितेत छान मांडले आहे.