तेरावे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन महानुभावांची काशी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे येत्या 31 डिसेंबर 2021, 1 आणि 2 जानेवारी 2022 रोजी होत आहे. आज पर्यंत भारतात विविध ठिकाणी 12 अखिल भारतीय महानुभाव मराठी साहित्य संमेलने झाली आहेत.
या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री व मोर्शी मतदार संघाचे माजी आमदार व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते धन्वंतरी डॉ. अनिल बोंडे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती अमरावती येथे या संमेलनाच्या आयोजन समितीचे सदस्य प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी नुकतीच दिली.
महानुभाव पंथाचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक श्री पुरुषोत्तम नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेला सर्वश्री महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक प्रा. शरद पुसदकर, मिलिंद कहाळे, मनोहर गुल्हाने, डॉ. मंगेश देशमुख व प्रमोद नागपुरे मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अनिल बोंडे यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ होण्याच्या दृष्टिकोनातून ही चांगली सुरुवात आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ. बोंडे यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री पुरुषोत्तमदादा नागपुरे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्य व्हावे यासाठी आपण तन-मन-धनाने प्रयत्न करणार आहोत, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी तसेच महानुभाव पंथांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांनी या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
खासदार श्री रामदास तडस यांनी देखील रिद्धपूर येथे होणाऱ्या या संमेलनाचे स्वागत केले असून या संमेलनासाठी त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
या संमेलनामध्ये भारतातील ज्येष्ठ महानुभाव, पंथाचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील, महाविद्यालयातील प्रत्येकी दोन विद्यार्थी व एक प्राध्यापक यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
हे संमेलन कोविड विषयक सर्व नियमांना अनुसरून घेण्यात येणार असून शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे .
या संमेलनानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित होणार असून या स्मरणिकेसाठी ज्यांना आपले साहित्य पाठवायचे आहे ते त्यांनी पुढील पत्त्यावर पाठवावे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे,
जिजाऊ नगर,
महापौर बंगल्यासमोर विद्यापीठ रोड
अमरावती कॅम्प
444 602
– देवेंद्र भुजबळ, 9869484800