मीच माझी
शमिभा पाटील ….तृतीय पंथी..…स्वतः च स्त्री मन स्वीकारलं आणि जपलं.
स्त्री मन माझं जाणलं मी
माझं अस्तित्व मान्य करावं तू
संघर्ष माझा माझ्याशी खरा
पण साथ माझी द्यायलाच हवी तू…..
शमिभा ताई त्यांच्या विषयी माहिती होतीच. पण आज बराच वेळ त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या मनातील स्त्री भावना यावर त्या बोलत होत्या. अतिशय मनातलं बोलताना त्या म्हणाल्या की, तृतीय पंथी च्या पायावर बाळाला ठेवलं जातं, त्याचा आशीर्वाद मिळवण्या साठी. पण त्यांच्या मनातील आईच्या भावना कोणीही समजून घेत नाही. समाज तिचा स्त्री वेष तर स्वीकारतो पण तिच्या भावनिक, शारीरिक गरजा नाकारतो. तृतीय पंथी ला पण कधी कोणाची प्रेयसी कोणाची पत्नी कोणाची आई व्हावस वाटू शकतं पण ती नवीन जीवाला जन्म देऊ शकत नाही या तिच्या शारीरिक अपूर्णतेमुळे तिच्या भावना नाकारल्या जातात. याचं दुःख त्यांनी व्यक्त केलं.
कवी ग्रेस यांच्या वर आचार्य पदवी प्राप्त करावी असं का वाटलं ? यावर त्या म्हणाल्या, कवी ग्रेस त्यांना आठव्या वर्गापासून आवडू लागले होते. दुःखा लाही एक नाद असतो. हे कवी ग्रेस यांच्या कवितांच्या प्रेमात पडण्याचं कारण होतं आणि प्रत्येक स्त्री तिचं भावनिक सौंदर्य मांडताना ग्रेस यांनी ज्या संवेदनशीलतेने ते व्यक्त केलं आहे ते शमिभा ताईंना भावलं.
त्यांना मी फोन केला तेव्हा त्या तुळजापूर ला होत्या. हातात परडी घेऊन देवाच्या दर्शनाला उभी असलेली देवदासी तिला या रांगेत कोणी उभ केलं आहे या समाजानेच ना, असे विचार त्यांनी व्यक्त केले. त्या परडी मागचं तिचं सांस्कृतिक शोषण यावर त्या काम करत आहेत असं त्या म्हणाल्या. शमिभा ताई आपल्या मनावरचे घाव कधी तरी कुरवाळतात तेंव्हा त्यांना जाणवतं की आपल्यातलं मी पण कुठलीही लाज न बाळगता स्वीकारायला हवं.आणि आपल्या अस्तित्वासाठी आपण संघर्ष करायलाच हवा.
शमिभा मीना भानुदास पाटील एम ए (मराठी) या
तृतीयपंथी समाजाच्या नेत्या आहेत. पीएच. डी पुर्वाभ्यास करित आहेत. गेली चौदा वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून जळगाव येथे कार्य करत आहेत. या अंतर्गत त्यांनी आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनाविषयी अनेक संघर्ष मोर्चे काढल्ले. तर रावेर, यावल तालुक्यातील फैजपूर आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन हक्क या संदर्भात जनआंदोलनात्मक कार्य केलं आहे.
भारतात स्त्रीला आणि तृतीयपंथीयांना ‘सेक्स ऑब्जेक्ट’ म्हणून पाहिले जाते. या व्यवस्थेने तृतीयपंथीयांना वर्षानुवर्षे माणूसपण नाकारले आहे. तृतीयपंथीयांना माणूस म्हणून समाजाने स्वीकारलं नाही. त्यांच्या भावना जाणुन घेतल्या नाही. त्यांना केवळ चेष्टेचा विषय म्हणून बघितलं गेलं. तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्या शमिभा ताई या म्हणतात रेल्वे, बाजार, बारसे, दिवाळी, लग्न अशा ठिकाणी त्यांची जागा एका मर्यादेत निश्चित केली आहे. त्यांच्याकडे विविध चळवळींची परंपरा असली तरी या चळवळीही एका कोशात अडकून पडल्या आहेत.
भांडवलशाही वृत्तीने देशाचे नुकसान केले, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक तृतीयपंथीयांचेही नुकसान केले आहे. हिंदी सिनेमाने हिजड्यांचे बीभत्स चित्रण केले. सिनेमामध्ये दाखवलेले तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठी, गौरी सावंत, शबनम मौसी यांनी चौकट मोडून स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शामिभा ताई ह्या तृतीयपंथीय समाजासाठी निर्माण केलेली चौकट मोडत आहेत. आज हाताने वाजणारी टाळी हेच त्यांचे जगण्याचे साधन झाले आहे. समाज आजही त्यांना स्वीकारत नाही. शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. आजही त्यांचे शिक्षणाचे प्रमाण केवळ ०.३ टक्के आहे. कायद्याने दिलेले हक्कही हा लोकशाही असलेला समाज मान्य करत नाही.त्यामुळे या समाजाचे हक्क आणि माणूस म्हणून जगणं याचं हनन होत आहे.
शमिभा पाटील ह्या वंचित बहुजन आघाडीचे नेते [प्रकाश आंबेडकर] वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडी महा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने केंद्र व राज्य सरकारने तृतीयपंथी समुदायाला कायदेशीररीत्या तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली आहे. कुठल्याही माणसाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणे व सामाजिक क्षती पोहोचविण्याच्या उद्देशाने लिंग-जातिधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करणे हा अपराधच आहे.
साहित्य, शिक्षण यासारख्या बौद्धिक क्षेत्रात तृतीयपंथी वर्गातील लोक फार कमी प्रमाणात दिसून येतात. पण शमिभा ताईने मात्र आपल्या जीवनाचा मार्ग शोधला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर राहताना पीएचडीसारखी सर्वात मोठी मानली जाणारी पदवी मिळवण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा अवघड विषयाची त्यांनी निवड केली आहे.
शमिभा ताईला लहानपणापासूनच आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत, याची जाणीव झाली होती. पण ते नेमके काय वेगळेपण आहे, कोणाला बोलावे या विवंचनेत त्या असायच्या. घरात आई, वडील, भाऊ, वहिनी, लग्न झालेली बहीण असा परिवार. सगळे उच्चशिक्षित होते. शमिभाने शालेय शिक्षण पैठण येथे पूर्ण केलं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण फैजपूरला घेतलं.
दरम्यान, त्यांचा स्वतःशी आपण काहीतरी वेगळे आहोत असा मनाशी संघर्ष सुरू होता. त्यांनी एक ठाम निर्णय घेतला आणि सगळ्यांना विश्वासात घेत हे सांगितलं. घरच्यांनीही ते स्वीकारले, पण समाज व इतरांना कसे तोंड द्यायचे, कसे सांगायचे या विवंचनेत असताना त्याचा ताईंना प्रचंड मानसिक त्रास झाला. सुमारे चौदा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना समाजाने आहे तसे स्वीकारले. पण मधल्या काळातील प्रवास हा फार अवघड आणि खडतर होता. सामाजिक प्रतिष्ठा स्थिर होत असताना त्यांची मानसिक अवस्था मात्र ढासळली होती. अनेक समुपदेशनानंतर त्या स्थिरावल्या. सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा करायची, हे आधीपासूनच ठरवले होते. प्रचंड मानसिक घालमेल सुरू असतानाच त्यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रश्नावर, झाेपडपट्टी पुनर्वसन, जातीय दंग्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला.
दरम्यान, तृतीयपंथीयांबाबतच्या वाढलेल्या चळवळींमुळे त्यांना विश्वास निर्माण झाला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले. त्यांच्या सुख-दुःखात उपक्रमात सहभागी होणे, त्यांच्यासाठी काम करत राज्यभर फिरणे, प्रबोधन करणे, तृतीयपंथीयांचे कायदे व हक्क समजावून सांगणे, असे काम त्यांनी आनंदाने स्वीकारले आहे. चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम असो की, कोरेगाव भीमा किंवा मग दीक्षाभूमी असो सगळ्या ठिकाणी त्या अभिवादन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. तरुणाईशी संवाद साधतात.
माझ्याकडे सुमारे सहा हजारांवर पुस्तकं आहेत. ती मी पूर्ण वाचलेली आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी माझे आयुष्य जगते आहे. डॉ. बाबासाहेबांना बाप, तर महात्मा जोतिबा फुले यांना आजोबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पणजोबा मानते, असे शमिभा ताई सांगतात.
प्रामाणिक पणे आपल्या भावना स्वीकारल्या आणि तृतीय पंथी समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढत आहात. आम्ही निश्चितच तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कार्याला सलाम आणि मनापासून शुभेच्छा.

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
विषय नक्कीच वेगळा आणि शमीभा ताईंची आतापर्यंची वाटचाल उल्लेखनीय आहे. डॉ खेडीकर यांनाही शुभेच्छा.
तुतीय पंथाच्या व्यक्तींनी आपले समाजातील वास्तव बदलण्याचा किती प्रामाणिक प्रयत्न केला हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आज त्यांची संख्या आणि प्रामाणिक प्रयत्नच त्यांना सद्याच्या परिस्थितीतून हळु हळु का होईना बाहेर काढू शकतात.
शमीभा ताईंसारख्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन गृहउद्योग आणि इतर उत्पादने यांच्या माध्यमातून आपले त्यांना इतरांकडे पैसे मागण्यापेक्षा स्वावलंबी बनण्याचा मार्ग ह्या ऑनलाईन डिजिटल युगात कठिण नाही. असे माझे मत आहे.
शमिभाताईंसंबंधी वाचून मन अगदी भारावून गेलं.